Wednesday 31 October 2018

स्वरमय स्मृती ठेवूनी जाती!

दिग्गज सुगम गीत-संगीतकार यशवंत देव!

"जीवनात ही घडी अशीच राहू दे.."

असे आपल्या स्वरमय जीवनगीतात तल्लिन राहिलेले दिग्गज सुगम गीत-संगीतकार यशवंत देव अखेर हे जग सोडून गेले!
यशवंत देव आणि अभिजात संगीतकार अनिल बिस्वास!

यशवंत देव यांचे "जीवनात ही घडी अशीच राहू दे.." हे 
लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे साकार करताना सुजाता!
स्वतः गीतलेखन करीत असल्याने यशवंत देव यांचे संगीत हे शब्दप्रधान होणे स्वाभाविकच होते; म्हणूनच मंगेश पाडगावकर आणि ग्रेस यांसारख्या कवींच्या गीतांनाही त्यांनी भावगर्भ स्वरसाज चढविला! यांत कवि अनिल यांचे "नको जाऊ कोमेजुन माझ्या प्रितीच्या फुला.." आणि मंगेश पाडगांवकर यांचे "दिवस तुझे हे फुलायचे.." अशी तरल प्रेमगीते होती; तर कुसुमाग्रजांचे "काही बोलायचे आहे.." आणि ग्रेस यांचे "हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद स्वराने.." सारखी आर्त भावपूर्ण गीते होती!

यशवंत देव यांची स्वतःचीही गीते संवेदशील होती..ज्यांत होते "माणसांच्या गर्दीत माणूस माणसाला शोधत आहे.." आणि "अशी धरा असे गगन सजेल का..?" सारखा आशावाद! तर त्यांनी चित्रपटांसाठी संगीतबद्ध केलेली गाणीही गाजली..ज्यांत "येशील येशील येशील राणी.." हे वसंत बापट यांचे होते. त्यांची अनेकविध गाणी अरुण दाते ते अगदी फडके नि मंगेशकरांनी गायली. त्यांच्यावर भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिजात संगीतकार अनिल बिस्वास यांचा प्रभाव होता!

यशवंत देव यांना अनेक मानसन्मान मिळाले. यांत 'गादिमा पुरस्कार' आणि 'लता मंगेशकर पुरस्कार' यांचा विशेषत्वाने समावेश होतो!

त्यांच्यावर आचार्य रजनीश (ओशो) यांच्या तत्वज्ञानाचाही प्रभाव होता..याची प्रचिती त्यांच्या जीवनाविषयीच्या काही गाण्यांतून प्रकर्षाने येते..ज्यांत "विश्वाचा खेळ मांडिला आम्ही.." सारखी त्यांची होती; तर काही त्यांनी संगीतबद्ध केलेली पाडगांवकरांची "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.."

त्यांस श्रद्धांजली वाहताना त्यांचे हृदय गाणे आठवते..
"अशी पाखरें येतीं आणिक स्मृती ठेवूनी जाती.."

- मनोज कुलकर्णी
   ['चित्रसृष्टी']

No comments:

Post a Comment