Friday 26 July 2019

सहकार अग्रणी व स्मिता पिता!


स्मिता पाटीलने माता-पिता यांच्यासह साजऱ्या केलेल्या (अखेरच्या) वाढदिवस प्रसंगी शिवाजीराव पाटील!

सहकार क्षेत्रातील अग्रणी, माजी खासदार, राज्यमंत्री 
आणि दिवंगत प्रतिभाशाली अभिनेत्री स्मिता पाटीलचे वडील श्री. शिवाजीराव पाटील यांचा दुसरा स्मृतिदिन अलिकडेच होऊन गेला!

ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि साखर कारखान्यांच्या सहकार क्षेत्रात अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते!

'पिफ्फ' मध्ये शिवाजीराव पाटील यांस माझा भेटण्याचा क्षण!

दोन वर्षांपूर्वी 'पिफ्फ' मध्ये स्मिता पाटीलच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या दृकश्राव्य कार्यक्रमास शिवाजीराव पाटील यांची खास उपस्थिती होती. त्यावेळी तिचे धीरगंभीर अभिनय आविष्कार पाहताना त्यांचे डोळे पाणावले होते..!

तो संक्रांतीचा दिवस असल्याने तिळगुळ घेऊन त्यांस नमस्कार केला आणि माझा 'चित्रसृष्टी' नववास्तववादी चित्रपट विशेषांक त्यांस भेट दिला..त्याचे त्यांनी कौतुक केले!

ती भेट शेवटची ठरली!..त्यांस विनम्र आदरांजली!!


- मनोज कुलकर्णी

Thursday 11 July 2019

तेंडुलकर परंपरेची अखेर!


मंगेश तेंडुलकर यांचे पुस्तक.
प्रख्यात व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या कुंचल्याने अखेर कायमची विश्रांती घेतली..त्यास आता दोन वर्षे लोटली!

लेखक विजय तेंडुलकर.
सामाजिक-राजकीय घडामोडींवर चित्रभाष्य करणारे मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांतून उपहास सहजसुंदर व्यक्त होई. त्याचबरोबरच 
ते मार्मिक लेखनही करीत. तसेच नाटक हा सुद्धा त्यांचा आवडीचा विषय असल्याने त्याची विविधांगी समीक्षा करीत!

'संडे मूड' हा त्यांचा (व्यंगचित्रांसह) लेखसंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यांना 'महाराष्ट्र साहित्य परिषदे' चा 'चि. वि. जोशी पुरस्कार' मिळाला!

संवेदनशील अभिनेत्री प्रिया तेंडुलकर!

त्यांच्या जाण्याने तेंडुलकर परंपरेची अखेर झाली आहे असे मला वाटते. काही वर्षांपूर्वी त्यांचे बंधु व परखड लेखक-पटकथाकार विजय तेंडुलकर गेले आणि ('रजनी' प्रसिद्ध) संवेदनशील अभिनेत्री पुतणी प्रिया तेंडुलकरही हुरहूर लावून गेली! 

या तिघांसही वेगवेगळ्या प्रसंगी नि कार्यक्रमांतून भेटण्याचा व बोलण्याचा 
योग मला आला आणि त्यांतून त्यांचे प्रागतिक विचारही जाणून घेता आले!

मंगेश तेंडुलकरजींस माझी विनम्र श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 10 July 2019

भाषा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे!


माझ्या अलिकडच्या लिखाणावरून मी मराठी भाषा व त्यातील प्रादेशिक चित्रपट द्वेष्टा असल्याचा गैरसमज करून 
घेऊ नये! (वास्तविक माझी आजवरची पत्रकारिता ही प्रामुख्याने मराठीतच झाली आहे आणि मराठी चित्रपटावर मी भरपूर लिखाण केले आहे)..मराठी सिनेमा वृद्धीसाठी वारंवार माझी लेखणी झुरलीये!

फक्त संकुचित मनोवृत्तीने आपल्याच भाषा-चित्रपटाचे अवडंबर माजवणे मला योग्य वाटत नाही..आणि याविषयीची सक्ती व बोलणे-कृतीतील विरोधाभास खटकतो! त्याच्या गुण-दोषांवर टीका-टिपणी व्हायला हवी.!

सर्व भाषा आणि त्यांतील कला नि चित्रपट यांचे वैश्विक स्तरावर व्यापक अवलोकन व्हावे..आणि कुठल्या भाषेत कुणाला कसे व्यक्त व्हावे वाटते याचे सर्वंकष अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे हीच इच्छा!

- मनोज कुलकर्णी


Monday 8 July 2019

आनंदयात्री कवि!

कवि बा. भ. बोरकर.


"माझ्या गोव्याच्या भूमींत येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी.. भेटे आकाश सागरा.!"
सारख्या रोमांचकारी काव्यपंक्ती लिहिणारे..'पद्मश्री' बा. भ. बोरकर यांची आज ३५ वी पुण्यतिथी!
कवि बा. भ. बोरकर.

"मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणे गळले हो...
जीवन त्यांना कळले हो.!"
असे त्यांचे मोलाचे शब्द मार्गदर्शक वाटतात..!


त्यांना भावपूर्ण आदरांजली.!!


- मनोज कुलकर्णी

भाषावाद..निरर्थक नि संकुचित!


वर्षापूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीवर हिंदी-मराठी संदर्भात वादविवादाचा कार्यक्रम पाहण्यात आला (यात सहभागीचे मराठीही सदोष होते!)..आणि राष्ट्रीय एकात्मता साधायची सोडून अजूनही असे आंतरभाषीय किंबहुना आंतरप्रान्तीय वाद (क्षमविण्याऐवजी) कसे निर्माण केले जातात याचे वैषम्य वाटले होते. हिंदीचा असा दुस्वास करायला नकोय!

वास्तविक विविध भाषा-संस्कृतींने समृद्ध अशा आपल्या देशात..सर्वच भाषा नि संस्कृती आपल्या आहेत या भावनेतून सर्वांबाबत आत्मीयता नि आदराची भावना असली पाहीजे! त्याहूनही पुढे म्हणजे 'वसुधैव कुटुंबकम्' या आपल्या तत्वज्ञानाने विश्वव्यापी बंधुत्वाची भावना जोपासायला हवी. भाषा-साहित्य व कलांच्या क्षेत्रांत जिथे जिथे जे जे चांगले आहे ते आत्मसात करायला हवे!

इंग्लिश बाबतही असा (न्युनगंडातून आलेला) तिटकारा अधुन मधून उफाळून येतो..(यामध्ये मग काही मराठी मुद्रित/इलेक्ट्रॉनिक माध्यमेही हीरीरीने पुढे येतात. पाहायला गेले तर अशा काही माध्यमांच्या नावांत इंग्रजी अक्षरे दिसतात!) वास्तविक जागतिक संवादाचे हे भाषामाध्यम असेल तर ते का स्वीकारू नये?..त्या सहाय्याने पुढच्या पिढीने का पुढे जाऊ नये? इंग्रजी माध्यमातुन शिक्षणापासून परावृत्त करणाऱ्या अशा काही नेते मंडळींची मुले मात्र इंग्रजी माध्यमात शिकून परदेशी गेलेली असतात!

या संदर्भात काही वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालिन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी पुण्यात झालेल्या ७५व्या मराठी साहित्य सम्मेलनात केलेले खरमरीत भाष्य मला आठवतेय..त्यावेळी बोलताना ते व्यासपीठावरील फलक पाहून मान्यवरांस म्हणाले "काय हो, हे '७५वे अमृतमहोत्सवी सम्मेलन' असे लिहायची 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'त गरज का भासते? अमृतमहोत्सवी म्हणजेच ७५वे ना..मग दोन्ही कशाला नमूद करायचे? फक्त अमृतमहोत्सवी पुरेसे होते!" त्यांचे हे समर्पक बोल ऐकून श्रोत्यांमध्ये हास्याची लाट उसळली आणि व्यासपीठावरील चेहरे पडलेले होते!

तेंव्हा भाषेचा वृथा अभिमान बाळगण्यापेक्षा, भाषा वृद्धीचे कार्य दुसऱ्या भाषांचा दुस्वास न करता व्हावे..आणि कुणाला कुठल्या भाषेत लिहायला-बोलायला आवडेल हे जे ते आपल्या इच्छेने ठरवतील. उदाहरणार्थ मला हिंदी-उर्दू भाषेत लिहायला-बोलायला आवडते आणि इंग्लिश मध्ये लिहिणेही आवश्यक वाटते..याचा अर्थ मातृभाषा मराठी बाबत मला आस्था नाही असा होत नाही!

अभिव्यक्ति स्वातंत्र्य घेऊन माझी मते इथे मोकळेपणाने मी व्यक्त केली आहेत!!

- मनोज कुलकर्णी
   ['चित्रसृष्टी']

Wednesday 3 July 2019

गुड बाय डॉक्टर..तोरडमल!


अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल एका सत्कार समारंभात!

मराठी रंगभूमी आणि चित्रपट आपल्या धारदार अभिनयाने नि खर्ज्यातील आवाजाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल जीवन रंगभूमी सोडून आता दोन वर्षे झाली!
अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल.

'तरुण तुर्क म्हातारे अर्क' व 'गगनभेदी' सारखी नाटके गाजवणाऱ्या आणि 'सिंहासन' (१९८०) व 'आत्मविश्वास' (१९९३) अशा चित्रपटांतून आपल्या स्वाभाविक अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मामा तोरडमल यांनी 'संघर्ष' या दूरचित्रवाणी मालिकेतही काम केले. त्याचबरोबर लेखन-दिग्दर्शनाद्वारे दर्जेदार कलाकृती रसिकांसमोर आणल्या!

साहित्य क्षेत्रातही त्यांनी लक्षणीय योगदान दिले. यांत र. धो. कर्वे यांच्या इंग्रजी लेखसंग्रहाचे त्यांनी मराठीत 'बुद्धिप्रामाण्यवाद' हे भाषांतर केले. तर अगाथा ख्रिस्ती यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला!


त्यांना राज्य सरकारच्या 'नटवर्य पणशीकर पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले होते.

निरोपासाठी त्यांच्याच नाटकाचे शीर्षक आठवले 'गुड बाय डॉक्टर'!

त्यांना विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी