Monday 20 December 2021

ह्या सैराटांना आवरा!!

जाती-वर्ग भेदांतून प्रेमिकांचे जीवन उध्वस्त करणाऱ्यांचा तीव्र निषेध!

Wednesday 15 December 2021

गायिका-चित्रकार उषा मंगेशकरजी..८५ +


आपल्या ठसकेबाज मऱ्हाटमोळ्या गायकी ने प्रसिद्ध असलेल्या उषा मंगेशकर जी यांचा आज ८६ वा वाढदिवस!

या प्रसंगी त्यांचे फारसे परिचित नसलेल्या कलासक्त व्यक्तिमत्वाचे हे (वरील छायाचित्रातील) दर्शन!
त्या उत्तम चित्रकार असून इथे त्यांचे पेन्टिंग त्यांच्या ज्येष्ठ भगिनी व श्रेष्ठ गायिका लता मंगेशकर कौतुकाने न्याहाळत असल्याचे दिसते!

सुप्रसिद्ध गायिका भगिनी लता मंगेशकर व उषा मंगेशकर!
ह्या दोघींची हिंदी द्वंद्वगीते गाजली..
म्हणजे दोन नर्तकींचे नृत्यगीत असण्याऱ्या काळातील..सी. रामचंद्रांच्या संगीतातील.. "अपलम चपलम.." (आझाद/१९५५) आणि 
जी. एस. कोहलींच्या संगीतातील "तुम को पिया दिल दिया.." (शिकारी/१९६३).

पण लावणीप्रधान मराठी चित्रपटातील उषाबाईंनी गायलेली गाणी ही त्याची स्वतंत्र ओळख! त्यात शांताराम बापूंच्या 'पिंजरा' (१९७२) मधील राम कदमांच्या संगीतातील "तुम्हावर केली मी मर्जी बहाल.." सारखी खेबूडकरांची त्यांनी गायलेली गाणी तुफान गाजली!

त्यांना शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी

 

Friday 3 December 2021

राजभाषा त्यांना कामास नाही आली..
तेंव्हा त्यांना राष्ट्रभाषा ध्यानात आली!

- मनोज 'मानस रूमानी'

Thursday 2 December 2021

गुलाबी थंडीत गुलाबी स्वप्नातून..रजईतून बाहेर यावंस वाटत नाही!

ना(ना)म मखलाशी करण्यापेक्षा
स्त्री-अन्यायावर बोलावे!

Tuesday 16 November 2021

इकडे कणव नि तिकडे उपहास.!
एकीकडे स्वच्छ, प्रामाणिकता नि दुसरीकडे कुणा(नको)चीही स्तुती!
काय हा विरोधाभास.?!

पुराण आणि इतिहासातून बाहेर येऊन समकालिन वास्तवाकडे संवेदनशीलपणे कधी पाहणार?

 - मनोज कुलकर्णी

Thursday 11 November 2021

बोलविते धनी वर असेच असल्यावर अशी टंग ना बरळेल तर नवल!


- मनोज कुलकर्णी

Sunday 31 October 2021

गाणारे व्हायोलिन अंतर्धान पावले!

व्हायोलिन वादक प्रभाकर जोग!

ज्येष्ठ व्हायोलिन वादक व संगीतकार प्रभाकर जोग हे जग सोडून गेल्याचे दुःखद वृत्त कळाले!

गीत ध्वनिमुद्रण प्रसंगी गायिका माणिक वर्मा आणि संगीतकार प्रभाकर जोग!
व्हायोलिन वादनाचा, भाव - संगीतातील अखंड जीवनप्रवास थांबला. "हे चांदणे फुलांनी - शिंपीत रात्र आली.." असताना "घडूनी जे गेले.." ह्या अशा कालेलकरांच्या त्यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतां प्रमाणे!

'सतीची पुण्याई' (१९८०) आणि 'कैवारी' (१९८१) सारखे त्यांनी संगीत दिलेले चित्रपट गाजले. 'चित्रकर्मी', 'गदिमा' व 'लता - मंगेशकर पुरस्कार' त्यांना लाभले!

आता त्यांनी वाजविलेले "धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप." ऐकताना हे 'गाणारे व्हायोलिन' पुनःश्च प्रत्ययास आले!

त्यांस सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Tuesday 12 October 2021

शांता शेळके आणि मजरुह यांच्या काव्यरचनांतील साधर्म्य!

लोकप्रिय मराठी कवयित्री शांताबाई शेळके.

आपल्या लोकप्रिय मराठी कवयित्री शांता शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष आज सुरु झाले!..या प्रसंगी त्यांची एक अमर रचना मला आठवली..
"असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे..
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे..!"

ख्यातनाम उर्दू शायर-गीतकार मजरुह सुल्तानपुरी.

 

तर माझे आवडते ख्यातनाम उर्दू शायर व गीतकार मजरुह सुल्तानपुरी यांचे जन्मशताब्दी वर्ष अलिकडेच झाले!..त्यांची अशीच एक अमर रचना पाहा..
"रहें ना रहें हम महका करेंगे
बन के कली, बन के सबा..
बाग-ए-वफ़ा में.!"

'ममता' (१९६६) या हिंदी चित्रपटासाठी रोशन यांच्या संगीतात लता - मंगेशकर, सुमन कल्याणपुर आणि मोहम्मद रफ़ी यांनी हे हृदयस्पर्शी गीत गायलेय.

मला नेहमी ह्या दोन्ही रचनांत साधर्म्य आढळते!

दोघांनाही आदरांजली!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 3 October 2021

आमचे मराठी चे दिलखुलास प्राध्यापक द.मा.!

लोकप्रिय मराठी साहित्यिक द. मा. मिरासदार!

लोकप्रिय मराठी साहित्यिक व विनोदी कथाकथनकार द. मा. मिरासदार यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. ते महाविद्यालयात आमचे मराठी चे प्राध्यापक होते, त्यामुळे हे वृत्त समजताच मन दुःखी झाले आणि त्या काळात पोहोचले!

पुण्यात 'एमइएस गरवारे महाविद्यालया'त आमचा वर्ग त्यांच्या तासाला फुल्ल भरलेला असे, कारण कॉमर्स च्या रुक्ष विषयां मध्ये तोच एक आल्हाददायक क्षण मिळे. विशेषतः मला भाषा नि लेखनात रुची असल्याने मी तो रसिकतेने अनुभवायचो. माणसांची स्वभाव वैशिष्ट्ये, विशेषतः लहानग्यांचे भावविश्व याचे त्यांचे निरीक्षण बरोब्बर असायचे. यामुळे ते एखादा धडा समजावून सांगताना मधेमधे त्यासंबंधीची उदाहरणे द्यायचे आणि ते ऐकून वर्गात त्यास दुजोरा देण्याचा हशा निर्माण व्हायचा! महाविद्यालयीन काळानंतर सुद्धा जेंव्हा सार्वजनिक कार्यक्रमांत त्यांची गाठ पडे, तेंव्हा लहानग्यांशी त्यांच्याच आविर्भावात त्यांचा असा संवाद चाललेला पाहून ते आठवायचे!
 
विनोदी कथाकथनकार द. मा. मिरासदार!
 
द.मां.नी विपुल विनोदी लेखन केले. 'हसणावळ' आणि 'मिरासदारी' सारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. 'व्यंकूची शिकवणी' सारख्या आपल्या कथांचे खुमासदार सादरीकरण करीत ते लोकप्रिय कथाकथनकार झाले. मराठी चित्रपट कथा-पटकथा-संवाद लेखन क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केली. सुरुवातीच्या काळात 'सहकार सम्राट' (१९८०) सारख्या चित्रपटांचे संवाद लेखन त्यांनी केले. तर पुढे 'एक डाव भुताचा' (१९८२) हा त्यांची कथा-पटकथा असणारा पहिलाच चित्रपट गाजला..त्यानंतर 'ठकास- महाठक' (१९८४) सुद्धा! कालांतराने मी चित्रपट पत्रकारितेत आलो आणि..
त्यांची त्या वर्तुळात भेट झाली, तेंव्हा 'जर्नालिज्म' कोर्स केलेला आपला विद्यार्थी याचे त्यांना अप्रूप वाटले!

'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना' चे १९९८ मध्ये द.मा. अध्यक्ष झाले. 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळा' चा जीवनगौरव पुरस्कार २०१५ मध्ये त्यांना मिळाला.

त्यांची कऱ्हाड येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनातील भेट आठवते. तेंव्हा माझा 'चित्रसृष्टी' विशेषांक त्यांना दिल्यावर त्यांनी कौतुक केले होते!

त्यांस माझी श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

Thursday 9 September 2021

गणेशोत्सव आणि प्राजक्ताची फुले यांचे सुगंधी नाते माझ्या बालपणाशी जोडले होते!

ते मी या कवितेत उतरवले आहे...

 


तो प्राजक्त सुगंधी!

 
 
आठवणींच्या हिंदोळ्यावर आज प्राजक्त फुलला
गेणेशोत्सवातले रम्य बाल्य पुन्हा घेऊन आला

श्रावण सर येऊन जाता दरवळे गंध मातीचा..
भाद्रपदाची चाहुल मग देई सुगंध प्राजक्ताचा

हळुवार भावनांना फुलवणारा साथी तो होता
टप टप टप पडणारा सडा असा प्राजक्ताचा

ऋतु असेच फुलत होते काळ पुढे जाता...
ऋणानुबंध ही होत होता वृद्धिंगत आमचा

फुल त्याचे ऐटीत कळीवर होते एकदा..
बहुदा सुचवत होते क्षण आला प्रीतीचा


मीही मग पाहिली जुई फुललेली बाजुला..
घेतली फुले तिची देण्या पहिल्या प्रेमाला!

 
- मनोज 'मानस रुमानी'

Sunday 5 September 2021


 

"खरा तो एकची धर्म..जगाला प्रेम अर्पावे!"

..असा सार्थ उपदेश करणारे श्रेष्ठ व्यक्तिमत्व..साने गुरुजी यांस आजच्या शिक्षक दिनी विनम्र अभिवादन!!


 
- मनोज कुलकर्णी

Sunday 29 August 2021

माध्यमवाले नि मराठी!

(आज मराठी भाषा दिन नसून, या लेखास समर्पक छायाचित्र आढळल्याने ते इथे वापरले!)


मराठी आणि एकूणच भाषांच्या स्वरूप नि अस्तित्वाबाबत मी मागे (चित्रपट/कला/साहित्य या अनुषंगाने) बरेच लिहिले आहे. पण वेळोवेळी मराठी भाषा च्या तारणहार म्हणवणाऱ्यां कडून होत असलेली तिची कुचंबणा पाहून पुन्हा त्या बाबत लिहिल्या शिवाय राहवत नाही!

'सदर' शब्द 'कॉलम' या इंग्रजीत नियमित स्तंभलेखनास वापरणाऱ्या शब्दासाठी आहे; पण इथे तो तर गायब होतोच आणि त्या सदारांची शीर्षके देखील इंग्रजीत पाहायला मिळतांत. काही मराठी वृत्तपत्रांची नावे देखील इंग्रजीत आहेत तिथे याचे काय!

पूर्वी पुण्यात एका व्याख्यानास गेलो असता तिथे प्रख्यात मराठी दैनिकाच्या साप्ताहिकाचे संपादक इंग्रजीत भाषण देत होते..ते ऐकून कान किटलेल्या सदाशिव पेठी उच्चशिक्षित महिला एकमेकांत कुजबुजताना मी ऐकले "हा बाबा करतो - काम मराठी साप्ताहिकात..आणि कशाला उगाच इंग्रजी बोलतोय!"

मराठी च्या संवर्धनाबाबत परिसंवाद वारंवार ठेवणारे 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' पुण्यात भरले असता परिचयाची मराठी महिला पत्रकार तिथे भेटताच मला "हाय!" म्हणाली (मनात म्हंटलं 'इथे तरी 'नमस्कार', 'नमस्ते' म्हणायचं!'). तर एक नामांकित मराठी अभिनेत्री एका मुलाखतीत असे म्हणाली होती की "मी इंग्रजीत विचार करते आणि मग मराठीत त्यानुसार बोलते नि वागते!"

बहुतेक मराठी चित्रपट व नाटके यांची नावे आता सर्रास इंग्रजीत असतात. त्यांत कितपत वैश्विक मराठी चित्र दिसतं तो भाग सोडा! मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यां वर तर बऱ्याचदा वाट्टेल तसे मराठी रेटले जाते. वृत्त वाहिन्यां वर ही व्याकरण धाब्यावर बसवलेले आढळतें! आता सर्वसाधारण पणे मराठी भाषा दिन, गुढी पाडवा यांच्या शुभेच्छा ही इंग्रजीत येतांत!

आता हे वाचल्यावर काही म्हणतील की 'तुम्ही तर हिंदी आणि इंग्रजीत लिहिता!" पण मी पस्तीस वर्षे मराठी भाषेतून चित्रपट विषयक लिखाण करीत आलोय. गेली काही वर्षे व्याप्ती वाढविण्यासाठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये लिहितोय. तर हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे..आणि मी काही मराठीचा 'वृथा अभिमान' बाळगत नाही!

- मनोज कुलकर्णी

Monday 23 August 2021

झिंग आणणाऱ्या संगीताचे चित्रपटांच्या यशातील योगदान!


'एक अलबेला' (२०१६) या मराठी चित्रपटात मंगेश देसाई आणि विद्या बालन!

मूळ हिंदी 'अलबेला' (१९५१) मध्ये गीता बाली व भगवानदादा!
 
'एक अलबेला' (२०१६) हा नृत्यप्रसिध्द अभिनेते.. भगवानदादांच्या जीवनावर बेतलेला मराठी चित्रपट येऊन आता ५ वर्षें होऊन गेली! तर मूळ 'अलबेला' (१९५१) हा अभिजात चित्रपट प्रदर्शित होऊन देखील आता ७० वर्षें झाली. त्याच्या यशात (दादांच्या नृत्या बरोबरच) संगीतकार अण्णा चितळकर (सी. रामचंद्र) यांचे ही योगदान मोठे आहे.

भारतीय शास्त्रीय व पाश्चात्य संगीतात माहीर - असलेल्या चितळकरसाहेबांनी यातील गाण्यांतून दोन्ही प्रकार वापरले..एकीकडे "बलमा बडा नादान.." सारखी लता मंगेशकर यांच्या आवाजातील रागदारी तील सुरावट होती; तर दुसरीकडे "दीवाना परवाना.." व "भोली सूरत दिलके खोटे.."सारखी क्लब नृत्ये! "शोला जो भडके दिल मेरा धडके.." यांसारख्या यातील गाण्यांत त्यांनी बोंगो, ड्रम्स व क्लेरोनेटचा बेमालूम वापर केलाय आणि त्यांवर भगवानदादा व अल्लड गीताबालीने बेफाम नृत्ये केलीत! ही गाणी अण्णांनी स्वतः लता मंगेशकरांबरोबर गायलीत!
'सैराट' (२०१६) मध्ये आकाश ठोसर व रिंकू राजगुरु!

 
 
 
 
 
इथे विशेषत्वाने नमूद करायचे म्हणजे 'सैराट' (२०१६) मधील "झिंगाट" गाण्यांवर लोक नाचली..ती झिंग 'अलबेला'ने त्या काळात सुरु केली होती. त्या चित्रपटा तील नृत्ये व गाण्यांच्या वेळी लोक प्रेक्षागृहात पैसे फेकून नाचायचे असे मागच्या पिढीचे सांगतात! योगायोग म्हणजे 'सैराट' च्या यशातील संगीतकार अजय-अतुल यांचे व 'अलबेला'च्या भन्नाट यशातील संगीतकार सी. रामचंद्र यांचे योगदान हे विशेष..आणि दोन्ही चित्रपटांतील गाणी संगीतकारांनीही गायलीत!!

 
- मनोज कुलकर्णी

Thursday 19 August 2021

 श्रावण असा-तसा!


श्रावणात रंगतो एकीकडे
ऊन-पावसाचा खेळ जसा

श्रावणसरीं नि ऊन कोवळे  
असतात रोमांचक काहींना!


श्रावणात नसतो दुसरीकडे
ऊन-पावसाचा खेळ तसा

श्रावणधारा नि ऊन कोरडे
झळच उघड्या संसारांना!


दृश्य यातले ते इंद्रधनुचे
मनमोहक असते काहींना

क्षितिजावरी मात्र दुसरीकडे
मळभच दाटते सदानकदा!


- मनोज 'मानस रुमानी'

Tuesday 17 August 2021

सदाबहार मराठी स्टार सचिन..६० +!

पत्नी सौ. सुप्रियासह सचिन पिळगांवकर...दोघांचेही पाठोपाठ वाढदिवस!

रूपेरी पडद्यावर अभिनयाचा सुवर्णमहोत्सव साजरा केलेल्या अभिनेता-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांचा आज ६ वा वाढदिवस!..तर त्यांच्या पत्नी-अभिनेत्री सौ. सुप्रिया पिळगांवकर यांचा ५४ वा वाढदिवस काल झाला!

'हा माझा मार्ग एकला' (१९६२) मध्ये बालकलाकार सचिन!
अवघे चार वर्षे वय असताना प्रतिथयश दिग्दर्शक राजा परांजपे यांच्या 'हा माझा मार्ग एकला' - (१९६२) या मराठी चित्रपटाद्वारे सचिनने रूपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. त्याला सांभाळणाऱ्या व्यसनी पण सहृदय माणसाची भूमिका
यात रंगवणाऱ्या राजाभाऊंना बोबड्या बोलात "पुन्हा औषध (दारू) पिले तर मी बोलणार नाही!" असे सुनावणारा तो लहानगा सचिन ह्रदय हेलावून गेला! यातील अभिनयासाठी त्यास 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार' हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला!

यानंतर लगेचच सुप्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश - मुखर्जी यांच्या 'मझली दीदी' (१९६७) द्वारे सचिन चे हिंदी चित्रपटात पदार्पण झाले. प्रख्यात बंगाली लेखक शरत्तचन्द्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरी वर आधारित या चित्रपटात मीनाकुमारी सारख्या समर्थ अभिनेत्री बरोबर त्यास काम करायला मिळाले! मराठीत दिग्दर्शक राजा परांजपे आणि हिंदीत अभिनेत्री मीना कुमारी यांच्याकडून दिग्दर्शन व अभिनयाचे आपल्यावर झालेले संस्कार नंतर सचिनने कृतज्ञपणे नमूद केलेत!

'गीत गाता चल' (१९७५) मध्ये सचिन व सारीका..
दोघांचाही नायक-नायिका म्हणून पहिला चित्रपट!
यानंतर अनेक हिंदी चित्रपटांतून मास्टर सचिन म्हणून त्याने भूमिका केल्या. यांत शम्मी कपूर व राजश्री बरोबरील - 'ब्रह्मचारी' (१९६८) मधील त्याची गोंडस छबि अजुन डोळ्यासमोर आहे. यात त्याच्या बरोबर इरसाल मुलगा रंगवलेल्या ज्युनियर मेहमूद बरोबर त्याची चांगली गट्टी जमली आणि त्यांनी १५ चित्रपटांतून बरोबर काम केले..यांतच 'अजब तुझे सरकार' (१९७१) मधील - अभिनयासाठी सचिनला पुन्हा 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार' हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला!

१९७५ मध्ये 'राजश्री प्रोडक्शन' च्या 'गीत गाता चल' या चित्रपटाने सचिनला सर्वप्रथम नायक केले. यात मोहक निळ्या डोळ्यांची षोडशा सारीका त्याची नायिका झाली..बालकलाकार म्हणून पडद्यावर आलेल्या तिचेही नायिका म्हणून हे पहिलेच सुरेख दर्शन होते! सचिन-सारीका ही जोड़ी गाजली आणि त्यांनी 'ज़िद' (१९७६), 'मधु मालती' (१९७८) व 'जान-ए-बहार' (१९७९) अशा चित्रपटांतून प्रणयी युगुल साकारले! हिंदी बरोबरच 'नदिया के पार' (१९८२) सारख्या भोजपुरी चित्रपटातून साधना सिंह बरोबर त्याने नायकाची उत्तम भूमिका रंगवली!

'अष्ट विनायक' (१९७९) या मराठी चित्रपटात सचिन आणि वंदना पंडित!
वडील शरद पिळगांवकर यांनी निर्मिलेल्या 'अष्ट विनायक' (१९७९) ने मराठी चित्रपटात नायकाची यशस्वी वाटचाल सचिनने सुरु केली. पुढे 'माय बाप' (१९८२) पासून त्याने दिग्दर्शनही सुरु केले. याच दरम्यान त्याने दिग्दर्शित केलेल्या 'नवरी मिळे नवऱ्याला' (१९८४) चित्रपटातील त्याची नायिका असलेल्या सुप्रिया सबनीस बरोबर त्याचा विवाह झाला आणि हे शिर्षक सार्थ ठरले! मग 'अशी ही बनवाबनवी' (१९८८) सारखे विनोदी तर 'आत्मविश्वास' (१९८९) सारखे सामाजिक व 'आयत्या घरात घरोबा' (१९९१) सारखे मार्मिक असे 'एकापेक्षा एक' यशस्वी चित्रपट तो दिग्दर्शित करीत गेला. तसेच आपल्या चित्रपटातील गाणीही गायला लागला!

नंतर त्याने निर्माते सुभाष घई यांच्यासाठी 'प्रेम दीवाने' (१९९२) हा हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला. जॅकी श्रॉफ, विवेक मुश्रन, पूजा भट्ट व माधुरी दीक्षित यांच्या भूमिका असणारा हा संगीत-प्रणय प्रधान चित्रपट यशस्वी ठरला! पुढे 'तू तू मैं मैं' (१९९४ ते २०००) सारखी यशस्वी हिंदी मालिका दिग्दर्शित करून त्याने दूरचित्रवाणीचा छोटा पडदा पण काबिज केला..सासु-सुनेचा फार्स असणाऱ्या या मालिकेत सुप्रिया पिळगांवकर व रीमा लागू यांनी उत्तम भूमिका रंगवल्या!

'एकुलती एक' (२०१३) मध्ये कन्या श्रिया पिळगांवकर बरोबर सचिन!
मराठी, हिंदी बरोबरच 'नवरा माझा नवसाचा' (२००४) या आपल्याच चित्रपटावरून त्याने 'एकदंता' (२००७) हा कन्नड़ चित्रपटही दिग्दर्शित केला! पुढे 'एकुलती एक' (२०१३) हा मराठी चित्रपट निर्माण करून सचिनने आपली कन्या श्रिया ला पडद्या वर आणले!

अलिकडे आलेल्या 'कट्यार - काळजात घुसली' (२०१६) या गाजलेल्या नाटकावर आधारीत चित्रपटात सचिनने साकारलेली खाँसाहेबांची भूमिका गाजली व त्यास पुरस्कार ही लाभले! या आधीही 'फिल्मफेअर' व राज्य सरकारचे पुरस्कार त्यास मिळाले होते. 'हाच माझा मार्ग' हे सचिन यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले!

'कट्यार काळजात घुसली' (२०१६)
चित्रपटात सचिन पिळगांवकर!
त्यांच्या चित्रपट प्रसंगी सचिनजींशी झालेल्या भेटी आठवतायत..आणि माझा 'चित्रसृष्टी' चा मराठी चित्रपट विशेषांक व त्यातील आपल्या विषयीचे पाहून त्यांनी दिलख़ुलास केलेली चर्चाही!

अशा या सदाबहार अष्टपैलू कलाकारास माझ्या हार्दिक शुभेच्छा!!
त्याचबरोबर सौ. सुप्रिया पिळगांवकर यांसही शुभेच्छा!!!

 
- मनोज कुलकर्णी

Monday 9 August 2021



दीड तप पूर्ती कडे..!!


'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (इफ्फी) चे गोवा इथे आगमन!
 
१९५३ च्या 'श्यामची आई' चित्रपटानंतर तब्बल ५० वर्षांनी मराठी - चित्रपटास 'सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार' मिळवून देणाऱ्या.. 'श्वास' (२००४) या चित्रपटास आता दीड तप लोटेल!

तसेच आपला प्रमुख 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (इफ्फी) चे गोवा इथे आगमन (२००४) झाल्यालाही आता दीड तप लोटेल!
 
तर गोवा येथील त्या प्रारंभीच्या '३५ व्या इफ्फी', २००४ मध्ये 'श्वास' चे 'इंडियन पेनोरामा' मधे खास प्रदर्शन झाल्यावर..त्याची निर्माते मंडळी, दिग्दर्शक संदीप सावंत आणि अभिनेते अरुण नलावडे व संदीप कुलकर्णी यांच्यासह..त्या घटनांची नोंद घेताना माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांकासह मी!

- मनोज कुलकर्णी

Friday 30 July 2021

चित्रपटसृष्टी च्या वात्सल्यमूर्ती सुलोचना जी!



मूर्तिमंत वात्सल्य नि मांगल्य..असा ज्यांचा उल्लेख करता येईल अशा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टी तील ज्येष्ठ व श्रेष्ठ अभिनेत्री म्हणजे सुलोचना जी..त्यांचा आज ९३ वा वाढदिवस!

'वहिनींच्या बांगड्या' (१९५३) चित्रपटातील श्रेष्ठ भूमिकेत सुलोचना जी!
 
दर वर्षी दूरध्वनीवरून त्यांना शुभेच्छा देताना.. पडद्यावरील त्यांच्या सात्विक प्रतिमांचा पटच डोळ्यासमोर तरळतो!
 
पंधरा वर्षांपूर्वी माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांका साठी त्यांची मी घेतलेली अनौपचारिक मुलाखत - आठवते. तो जिव्हाळा अजून कायम आहे.

त्यांना उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी


पावसाळा आणि बा. भ. बोरकर यांच्या कविता आठवणार नाहीत असे होणार नाही..
 
मग "सरीवर सरी आल्या ग.." असो 
वा "क्षितिजी आले भरते ग.."
 
 मन धुंद करणारे!

- मनोज कुलकर्णी

Sunday 11 July 2021

गोनीदांस वंदन!

दुर्गप्रेमी लेखक..गो. नी. दांडेकर!

मराठी साहित्यविश्वातील एक श्रेष्ठतम व्यक्तिमत्व गो. नी. दांडेकर यांची १०५ वी जयंती परवा संपन्न झाली!

गो.नी.दां. लिखित प्रसिद्ध 'मृण्मयी'!
 
विपुल साहित्यसंपदा असणाऱ्या गो.नी.दां.च्या 'मृण्मयी' व 'पडघवली' सारख्या कादंबऱ्या तर त्यांत मानदंड ! त्यांच्या काही साहित्यकृती पडद्यावरही चित्रबद्ध झाल्या. यांत 'पवनाकाठचा धोंडी' व 'जैत रे.. जैत' वर अभिजात चित्रपट झाले आणि 'शितू' वर लघुपट!

गो.नी.दां.च्या 'स्मरणगाथा'स १९७६ मध्ये 'साहित्य अकादमी - पुरस्कार' मिळाला! तर १९८१ मध्ये अकोला येथे झालेल्या 'मराठी- साहित्य संमेलना' चे अध्यक्षपद त्यांनी भूषविले!

त्यांस विनम्र अभिवादन!!

 
- मनोज कुलकर्णी

Thursday 1 July 2021

 
प्रदीर्घ काळ मुक्त चित्रपट पत्रकारितेत विपुल लेखन करीत आलेले ज्येष्ठ लेखक-समीक्षक स्नेही श्री. शशिकांत किणीकर यांचा आज..
८० वा वाढदिवस!

माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांकांतूनही त्यांनी लिहिले

त्यांस दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा!

 
- मनोज कुलकर्णी

Sunday 13 June 2021

पुल-अत्रेंचा हास्यकल्लोळ!!


आपल्या विनोदी वा उपहासात्मक शैलीने अवघ्या महाराष्ट्राला हसायला लावलेले हे दोन साहित्यिक..
पु. ल. देशपांडे आणि आचार्य प्र. के. अत्रे एका व्यासपीठावर आल्यावर काय होते..याची ही खुमासदार झलक!

योगायोग असा की काल पुलंचा स्मृतिदिन होता आणि आज अत्रेंचा स्मृतिदिन आहे.
दोघांस विनम्र अभिवादन!!


- मनोज कुलकर्णी

Saturday 12 June 2021

बहुरंगी व्यक्तिमत्व पु. ल.!

 
लोकप्रिय साहित्यिक व 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व' पु. ल. देशपांडे यांचा आज २१ वा स्मृतिदिन!

 
कलेच्या बहुतांश माध्यमांतून पु.लं.चा मुक्त संचार होता. त्यांचा..कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन-संगीत व अभिनित..'गुळाचा गणपती' (१९५३) हा मराठी चित्रपट अविस्मरणीय!

पु.लं.ना प्रत्यक्ष ऐकणे ही एक पर्वणी असे. एका परिसंवादात बोलताना ते म्हणाले होते, "लेखक नि दिग्दर्शक संबंध हे सासू-सुनेच्या संबंधा इतकेच नाजूक असतात!''

त्यांना भेटल्याचे सुखद क्षण आज आठवतायत!

त्यांना विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

Friday 11 June 2021

साने गुरुजींस वंदन!



'श्यामची आई' सारखी मातेची महती सांगणारी हृदयस्पर्शी व संस्कारक्षम साहित्यकृती निर्मिणारे..

आणि "खरा तो एकची धर्म..जगाला प्रेम अर्पावे!" सारखा संदेश देणारे समाजवादी विचारवंत व थोर साहित्यिक..
साने गुरुजी यांस ७१ व्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

Tuesday 8 June 2021

कवि अनिल (आ. रा. देशपांडे)

उदासीनता विसर जगाची
तुझाच मी, तू माझि सदाची
विरले हृदयांतरि बघ अंतर
तू अणिक मी जवळ निरंतर
गगनि उगवला सायंतारा..!

कवि अनिल (आ. रा. देशपांडे) यांची ही रचना. 
त्यांची मागच्या महिन्यात पुण्यतिथी होती!

गायक गजाननराव वाटवे

 
 
 
तर हे गीत अमर करणारे आद्य भावगीत गायक गजाननराव वाटवे यांची आज जयंती!

फार पूर्वी त्यांच्या गायनाचा पुण्यात 'भरत नाट्य मंदिरा' मध्ये कार्यक्रम ऐकल्याचे अजून स्मरते!

त्यांना विनम्र अभिवादन!

- मनोज कुलकर्णी

महात्मा फुले यांचे 'शेतकऱ्याचा असूड' हे अलिकडच्या वास्तवावर प्रकर्षाने आठवले!

- मनोज कुलकर्णी

Monday 7 June 2021

निसर्गासही आमिष.?

 
"येरे येरे पावसा..
तुला देतो पैसा.."
पूर्वी (बालवर्गात) हे बडबडगीत असायचे.!
 
- मनोज कुलकर्णी