Thursday 19 December 2019

बुद्धिप्रामाण्यवादी नटश्रेष्ठ डॉ. लागू!

रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांतील मनस्वी कलावंत डॉ. श्रीराम लागू यांचे अखेर परवा वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले!

रंगभूमीवरचे 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू!
अभिनय क्षेत्रात रमलेल्या लागूंना वैद्यकीय पार्श्वभूमी होती आणि ते उत्तम सर्जन होते. एका वार्तालापात प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांनी 'पुण्यातील एका चित्रीकरणप्रसंगी दुखापत झाली असता आपल्यावर.. डॉ. लागूंनी उपचार केले होते!' असे सांगितल्याचे मला स्मरते!

वैद्यकीय क्षेत्राकडे पाठ फिरवून १९६९ मध्ये कानेटकरांच्या नाटकाद्वारे डॉ. लागूंनी अभिनय क्षेत्रात स्वतःला जणू झोकून दिले! जवळ जवळ अर्धशतक सुमारे २० नाटकांतुन आणि २५० हुन अधिक चित्रपटांतुन त्यांनी भूमिका केल्या. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती व इंग्रजी अशा भाषेच्या सीमा ओलांडत त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दर्शवली!
व्ही. शांताराम यांच्या 'पिंजरा' (१९७२) चित्रपटात निळु फुले, संध्या व डॉ. श्रीराम लागू!

रंगभूमीवर डॉ. लागूंनी तशा सर्वच भूमिका समरसून केल्या. त्यांत.. शिरवाडकरांचा 'नटसम्राट' आणि सॉक्रेटिस वरील 'सूर्य पाहिलेला माणूस' ह्या व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनयातील उत्तुंगता सिद्ध करणाऱ्या ठरल्या!

१९७२ ला प्रदर्शित झालेल्या शांतारामबापूंच्या 'पिंजरा' ने डॉ. लागूंची चित्रपट कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु झाली... 
'दी ब्ल्यू एंजल' (१९३०) या पहिल्या गाजलेल्या जर्मन बोलपटावर बेतलेल्या 'पिंजरा' मधील नर्तकी संध्या बरोबर त्यांची नैतिक अधःपतन होणाऱ्या मास्तराची भूमिका तशी आव्हानात्मक होती!
'सामना' (१९७४) चित्रपटांत डॉ. श्रीराम लागू व निळु फुले!


त्यानंतर 'सामना' (१९७४) आणि 'सिंहासन' (१९७९) या डॉ. जब्बार पटेलांच्या राजकीय थरारपट समजल्या गेलेल्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका ह्या लक्षवेधी होत्या. 
एकीकडे ग्रामीण राजकारणाची लक्तरं - काढणारा बेरकी मास्तर; तर दुसरीकडे - मुत्सद्दी मंत्री अशा परस्पर विरोधी भूमिका त्यांनी अनुक्रमे यांतुन बेमालूमपणे वठवल्या!

दरम्यान 'घरौंदा' सारख्या चित्रपटांतुन हिंदी मधुनही डॉ. लागू भूमिका करू लागले होते. प्रख्यात जपानी चित्रकर्ते अकिरा कुरोसवा यांच्या 'हाय अँड लो' (१९६३) या चित्रपटावर आधारित राज सिप्पीच्या 'इन्कार' (१९७७).. 
या बॉलीवुड रिमेक मधील त्यांची भूमिका.. उल्लेखनीय होती. नंतर राजेश खन्नाचा 'थोडी सी बेवफ़ाई' (१९८०) आणि अमिताभ बच्चनचा 'लावारिस' (१९८९) अशा आघाडीच्या नायकांबरोबरच्या चित्रपटांतून त्यांनी काम केले!

'देवकी नंदन गोपाला' (१९७७) चित्रपटात गाडगेबाबांच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागू!
बॉलीवुड प्रमाणेच कोलकत्यात ख्यातनाम दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या 'एक दिन... अचानक' (१९८९) मधील शबाना आझमी व अपर्णा सेन बरोबरील त्यांची भूमिका ही - उल्लेखनीय होती. तर रिचर्ड अटेनबरो यांच्या आंतरराष्ट्रीय 'गांधी' (१९८२) या 'ऑस्कर' प्राप्त चित्रपटात त्यांनी गोपालकृष्ण गोखले यांची - व्यक्तिरेखा साकारली होती!

'झाकोळ' (१९८०) या एकमेव चित्रपटाचे.. दिग्दर्शन लागूंनी केले. याद्वारे त्यांच्याबरोबर तनुजा यांनी हिंदीत काम केले; तर पुढे नावा - रूपास आलेल्या उर्मिला मातोंडकरने बाल - कलाकार म्हणून यातून पडद्यावर पदार्पण केले!

'देवकी नंदन गोपाला' (१९७७) या राजदत्त - दिग्दर्शित चित्रपटातील गाडगेबाबांची त्यांनी केलेली भूमिका ही त्यांच्या विचारसरणीशी सुसंगत होती..हे मी त्यांच्याशी वार्तालापात नमूद केले होते..तेंव्हा त्यांनी त्यास दुजोरा दिला होता!

नाट्य व चित्रपट क्षेत्रांतील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले! अखेरच्या काळात आपल्या बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतुन त्यांनी समाज प्रबोधनपर व्याख्यानेही दिली. तर 'लमाण' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले!

तरीही रंगमंचावर त्यांचे विलक्षण प्रेम होते..पण अखेर जीवनाच्या रंगभूमीवरून त्यांना एक्झिट घ्यावी लागली!

त्यांच्या स्मृतिस ही आदरांजली!!

- मनोज कुलकर्णी