Wednesday 18 March 2020

सहृदय नि भारदस्त कलाकार!


चरित्र अभिनेते..जयराम कुलकर्णी!


ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन झाल्याचे दुःखद वृत्त कळले..आणि माझ्या चित्रपट पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात झालेली त्यांची पहिली भेट आठवली!

ऐन विशितच माझे चित्रपट विषयक सदर एका वृत्तपत्रात सुरु झाले होते आणि पहिलेच परीक्षण लिहिले ते 'धूमधड़ाका' (१९८५) या तेंव्हाच्या मल्टीस्टारर मराठी चित्रपटाचे! अभिनेता महेश कोठारेचं ते पहिलंच दिग्दर्शन होतं. [श्रीधर यांच्या 'प्यार किये जा' (१९६६) या गाजलेल्या हिंदी चित्रपटावर तो आधारित होता.] त्यांत महेशच्या वडिलांची भूमिका जयराम कुलकर्णी यांनी केली होती. संस्कृतमध्ये संवाद साधणाऱ्या शिक्षकाची अशी आगळीवेगळी! मला आठवते तेंव्हा प्रीमियर नंतर पुण्यात डेक्कनवर 'पूनम' हॉटेलमध्ये त्यांच्यासह सर्व कलाकारांशी रंगलेली मैफल!

त्यानंतरही महेश कोठारेच्या चित्रपटांतून विशेष भूमिकांत ते दिसले. त्याचबरोबर सचिनच्या 'नवरी मिळे नवऱ्याला' (१९८४) अशा व किरण शांताराम निर्मित 'अशी ही बनवाबनवी' (१९८८) या गाजलेल्या चित्रपटांतही ते होते! जवळपास दीडएकशे चित्रपटांतुन त्यांनी विविधरंगी भूमिका केल्या. त्यांत पोलिस अधिकाऱ्याची भारदस्त भूमिका उल्लेखनीय!

नंतर चित्रपटांच्या कार्यक्रमांतून ते भेटले, कधी दूरध्वनिवरही बोलणे झाले! नवोदितांना ते करीत असलेले सहकार्य काही कार्यक्रमांतून पाहिले!

मराठी रंगभूमी, आकाशवाणी ते चित्रपट असा त्यांचा प्रदीर्घ अभिनय-कला प्रवास होता!

त्यांस भावपूर्ण श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी