Sunday 13 June 2021

पुल-अत्रेंचा हास्यकल्लोळ!!


आपल्या विनोदी वा उपहासात्मक शैलीने अवघ्या महाराष्ट्राला हसायला लावलेले हे दोन साहित्यिक..
पु. ल. देशपांडे आणि आचार्य प्र. के. अत्रे एका व्यासपीठावर आल्यावर काय होते..याची ही खुमासदार झलक!

योगायोग असा की काल पुलंचा स्मृतिदिन होता आणि आज अत्रेंचा स्मृतिदिन आहे.
दोघांस विनम्र अभिवादन!!


- मनोज कुलकर्णी

Saturday 12 June 2021

बहुरंगी व्यक्तिमत्व पु. ल.!

 
लोकप्रिय साहित्यिक व 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व' पु. ल. देशपांडे यांचा आज २१ वा स्मृतिदिन!

 
कलेच्या बहुतांश माध्यमांतून पु.लं.चा मुक्त संचार होता. त्यांचा..कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन-संगीत व अभिनित..'गुळाचा गणपती' (१९५३) हा मराठी चित्रपट अविस्मरणीय!

पु.लं.ना प्रत्यक्ष ऐकणे ही एक पर्वणी असे. एका परिसंवादात बोलताना ते म्हणाले होते, "लेखक नि दिग्दर्शक संबंध हे सासू-सुनेच्या संबंधा इतकेच नाजूक असतात!''

त्यांना भेटल्याचे सुखद क्षण आज आठवतायत!

त्यांना विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

Friday 11 June 2021

साने गुरुजींस वंदन!



'श्यामची आई' सारखी मातेची महती सांगणारी हृदयस्पर्शी व संस्कारक्षम साहित्यकृती निर्मिणारे..

आणि "खरा तो एकची धर्म..जगाला प्रेम अर्पावे!" सारखा संदेश देणारे समाजवादी विचारवंत व थोर साहित्यिक..
साने गुरुजी यांस ७१ व्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

Tuesday 8 June 2021

कवि अनिल (आ. रा. देशपांडे)

उदासीनता विसर जगाची
तुझाच मी, तू माझि सदाची
विरले हृदयांतरि बघ अंतर
तू अणिक मी जवळ निरंतर
गगनि उगवला सायंतारा..!

कवि अनिल (आ. रा. देशपांडे) यांची ही रचना. 
त्यांची मागच्या महिन्यात पुण्यतिथी होती!

गायक गजाननराव वाटवे

 
 
 
तर हे गीत अमर करणारे आद्य भावगीत गायक गजाननराव वाटवे यांची आज जयंती!

फार पूर्वी त्यांच्या गायनाचा पुण्यात 'भरत नाट्य मंदिरा' मध्ये कार्यक्रम ऐकल्याचे अजून स्मरते!

त्यांना विनम्र अभिवादन!

- मनोज कुलकर्णी

महात्मा फुले यांचे 'शेतकऱ्याचा असूड' हे अलिकडच्या वास्तवावर प्रकर्षाने आठवले!

- मनोज कुलकर्णी

Monday 7 June 2021

निसर्गासही आमिष.?

 
"येरे येरे पावसा..
तुला देतो पैसा.."
पूर्वी (बालवर्गात) हे बडबडगीत असायचे.!
 
- मनोज कुलकर्णी
 
 

Sunday 6 June 2021


"असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे

हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले

तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे
स्वये मनात जागते, न सूर-ताल मागते

अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते
उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे

कुणास काय ठाउके कसे, कुठे, उद्या असू ?
निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू

तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे!"

..असे लिहिणाऱ्या कवयित्री-गीतकार शांताबाई शेळके यांस स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

 - मनोज कुलकर्णी

Saturday 5 June 2021

सहृदय वात्सल्यमूर्ती!



दिग्गज अभिनेत्री..सुलभा देशपांडे!

रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणी अशा तिन्ही माध्यमांतून आपल्या स्वाभाविक अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे हे जग सोडून आता पाच वर्षें झाली!

भावपूर्ण भूमिकेत सुलभा देशपांडे!
मला आठवतंय चित्रपट पत्रकारितेच्या पदार्पणातील काळात मी 'हेच माझे माहेर' (१९८४) या राजदत्त दिग्दर्शित चित्रपटाचे परीक्षण लिहिले होते..त्यात सुलभा देशपांडेंची अनोखी व्यक्तिरेखा होती..नातसून आल्यावर सुनेच्या बाजूने खंबीरपणे उभी राहणारी सासू! पुढे अशा सहृदय आगळ्या भूमिका त्यांनी पडद्यावर सहज रंगविल्या.

१९६०च्या दशकात प्रायोगिक रंगभूमी चळवळी तील सुलभा देशपांडे हे एक अग्रणी नाव होते. याच काळात विजय तेंडूलकर यांच्या 'शांतता कोर्ट चालू आहे' (१९६७) मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका प्रभावीपणे रंगवली! १९७१ मध्ये पती अरविंद देशपांडे यांसह त्यांनी 'आविष्कार' या नाट्य संस्थेची स्थापना केली आणि समांतर रंगभूमी समृद्ध करण्यास हातभार लावला. पुढे लहान मुलांसाठी 'चंद्रशाळा' संस्था स्थापन करून १९८२च्या सुमारास 'दुर्गा झाली गौरी' सारखी बालनाट्ये त्यांनी सादर केली. याद्वारे पुढे आलेल्या कलाकारांतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे.. उर्मिला मातोंडकर!

'चौकट राजा' (१९९१) चित्रपटात सुलभा देशपांडे व दिलीप प्रभावळकर!
१९७० व १९८० च्या दशकांत जोरात असलेल्या समांतर चित्रपटांतून सुलभा देशपांडे यांनी उल्लेखनीय स्त्री - व्यक्तिरेखा साकारल्या. यांत जब्बार पटेलांचा 'जैत रे जैत', श्याम बेनेगलांचा 'कोंडुरा', सैद मिर्झांचा 'अरविंद देसाई की अजीब दास्तान', मुझफ्फर अलींचा 'गमन' ते..पुढे मीरा नायरचा 'सलाम बॉम्बे' असे वैविध्यपूर्ण चित्रपट होते. 
नंतर संजय सुरकरच्या 'चौकट राजा' (१९९१) मधील मानसिक विकलांग मुलाचा सांभाळ - करणाऱ्या मातेची त्यांची भूमिका हृदयाला भिडली!

'इंग्लिश विन्ग्लीश ' (२०१२) या श्रीदेवीच्या पुनरागमन चित्रपटात व 'कहेता है दिल जी ले जरा' (२०१३) या दूरचित्रवाणी मालिकेत सुलभा देशपांडे दिसल्या. मराठी-हिंदी चित्रपट व मालिका असा त्यांचा अभिनय प्रवास होता!

'संगीत नाटक अकादमी' ते 'जीवन गौरव' असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले!

त्यांस विनम्र श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी