Wednesday 11 January 2023

खांडेकर..जीवनवादी साहित्यिक!


'ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त पहिले मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर यांची आज १२५ वी जयंती!

'अमृतवेल' आणि बहुसन्मानित 'ययाति' सारख्या त्यांच्या साहित्यकृतीं जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देतात.

मराठी, तेलुगु, तामिळ आणि हिंदी चित्रपट त्यांच्या साहित्यांवर निर्मिले गेले. त्यांत 'छाया' (१९३६), ज्वाला' (१९३८), 'देवता' (१९३९), 'अमृत', 'धर्मपत्नी' (१९४१) आणि 'परदेशी' (१९५३) यांचा समावेश होतों.

'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' अध्यक्ष आणि 'साहित्य अकादमी पुरस्कार' 'पद्मभूषण' ने खांडेकर गौरविले गेले!

त्यांना विनम्र सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Monday 2 January 2023

चित्रपट संस्कृती रुजवण्याचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व!

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर!

'प्रभात चित्र मंडळा'चे संस्थापक आणि ज्येष्ठ चित्रपट समीक्षक.. सुधीर नांदगावकर यांचे निधन झाल्याने चित्रपटाशी समर्पित दुवा अखेर निखळला!

त्यांच्याशी पंचवीस वर्षांपूर्वी माझा परिचय झाला तो आपल्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया' ('इफ्फी') मुळे! आम्ही चित्रपट विषयक अभ्यास पूर्ण लिखाण करणारे असल्याने स्नेह वृद्धिंगत झाला! चित्रपट माध्यमाचा यथायोग्य प्रसार होण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या 'प्रभात चित्र मंडळा'चे कार्यही मी अनुभवले. फिल्म सोसायटी चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते!

त्यांच्या 'प्रभात' द्वारे निघणाऱ्या 'रूपवाणी' साठी मी लिहावे असा त्यांचा आग्रह होता; पण ते राहून गेले! २००२ मध्ये मी सुरु केलेल्या 'चित्रसृष्टी' या संपूर्ण जागतिक चित्रपटावर अभ्यासपूर्ण भाष्य करणाऱ्या विशेषांकाचे त्यांना अप्रूप वाटले आणि याच्या प्रकाशन समारंभापूर्वी फोन करून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या! पुढे त्यामधून 'समांतर सिनेमा ची वाटचाल' वर त्यांनी लेख ही लिहिला.

'मुंबई अकादमी ऑफ मूव्हिंग इमेज' ('मामी') द्वारे 'मुंबई फिल्म फेस्टिव्हल' सुरु करण्यात त्यांचाच पुढाकार होता! हा विचार तसा 'इफ्फी' च्या आयोजन स्थळाच्या अनुषंगाने पुढे आल्याचे मला स्मरते! १९९५ मध्ये 'इफ्फी' मुंबईत झाला, तेंव्हाच आपली चित्रपटसृष्टी असलेल्या याच महानगरात पुढेही तो राहावा असे बहुदा त्यांना वाटत होते! १९९६ मध्ये दिल्लीत झालेल्या 'इफ्फी' मध्ये त्यांच्या या चर्चेने जोर धरला. नंतर "मुंबईतच आपला वेगळा चित्रपट महोत्सव असेल" हे त्यांचे बोल तिथे मी ऐकले! आणि त्याच्या पुढच्याच वर्षी १९९७ मध्ये त्यांच्या संकल्पनेतून या 'मामी'च्या 'मुंबई फिल्म फेस्टिव्हल' ची मुहूर्तमेढ रोवली गेली! त्यांनंतर 'आशियाई चित्रपट महोत्सव'ही मुंबईत भरू लागला. सुरुवातीची काही वर्षे मी ह्या चित्रपट महोत्सवांस उपस्थित राहिलोही!

कालांतराने सोशल मीडिया म्हणजेच 'फेसबुक' वरील माझे जागतिक चित्रपटावरील लिखाण ते वाखाणीत असत. यांत कधी 'मुग़ल-ए-आज़म' चित्रपटावर दुर्मिळ छायाचित्रांसह केलेले माझे लेखन आवडून "मनोज, तुझा हा उपक्रम उत्तम आहे" अशी टिप्पणी करून केलेली प्रशंसा असे; तर कधी चित्रपट दिग्दर्शक राज खोसला यांच्यावरील लेखाला दिलेली दाद! 'ते म्हणजे समांतर सिनेमा' असे बऱ्याच जणांना वाटे; पण त्यांना त्या व्यतिरिक्त अभिजात चित्रपटांतही रुची होती. गुरुदत्त हा अभिनेता-चित्रकर्ता आमच्या दोघांचाही जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांना त्याचा 'कागज़ के फूल' सर्वोत्तम वाटे, तर मला (कवी मनाचा असल्याने) 'प्यासा' श्रेष्ठ! तसा त्यांना काव्य-शायरी मध्येही रस होता हे त्यांनी फेसबुक वरील माझे असे लिखाणही नेहमीच लाईक केल्याचे पाहता निदर्शनास आले!

अलिकडे काही वर्षापूर्वी चित्रपट विषयक संदर्भ-माहिती विचारण्यासाठी त्यांचा फोन येत असे. (इतक्या ज्येष्ठांनी आपल्याला असे विचारावे हे मला अचंबित करे, पण चित्रपट इतिहासावरील माझ्या अभ्यासावरचा त्यांचा विश्वास यातून जाणवे! शेवटचा फोन 'प्रख्यात चित्रकर्ते केदार शर्मांबाबत माहिती'साठी आला होता! त्यानंतर काही संपर्क नव्हता!

त्यांस माझी ही भावांजली!!

- मनोज कुलकर्णी