Sunday 28 October 2018

मराठी रंगभूमी-चित्रपटाच्या सुवर्णकाळातील स्टार!

डॉ. काशिनाथ घाणेकर..मराठी रंगभूमी-चित्रपटाच्या सुवर्णकाळातील स्टार!

'मधुचंद्र' (१९६७) मध्ये "सुरावटीवर तुझ्या." गीतात डॉ. काशिनाथ घाणेकर व उमा!

'आधार' (१९६९) मधील "माझ्या रे प्रीती फुला.." गीतात डॉ. काशिनाथ घाणेकर व अनुपमा!
'गारंबीचा बापू' (१९८०) चित्रपटात गीता सिद्धार्थ व डॉ. काशिनाथ घाणेकर!
"अल्ला जाने क्या होगा आगे!"
'मधुचन्द्र' या चित्रपटात आपले भुरे केस मागे उडवीत लोभस नायिका उमा कडे प्रेमाचा कटाक्ष टाकीत हिंदीतील हा डायलॉग फेकणारा तो प्रेमवीर म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर! 'संवादफेक' ही क्रिया शब्दशः त्यांनीच जास्त वापरली..म्हणूनच 'डायलॉग फेकणारा' असेच इथे लिहिले!

तसेच हिंदीतील आपले मातब्बर अभिनेते दिलीप कुमार यांच्या कपाळावर ज्याप्रमाणे केस रूळत..तसेच काहीसे डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या बाबतीत होते आणि बोलताना मोठया ऐटीत ते आपले केस मागे घेत! त्याचबरोबर त्यांच्या भराभर बोलण्यात एक दिलखेचक लय असे..काहीशी हिंदीतील प्रसिद्ध प्रणयी नायक देव आनंद च्या एका दमात संवाद म्हणणारी; पण आवाजात भावगर्भता असे! निळसर डोळ्यांत एक प्रकारची बेफ़िकीरी दिसून येई!

 

हे आठवण्याचे कारण म्हणजे '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' नामक मराठी चित्रपट येऊ घातल्याचे कळले..आणि त्याचा प्रोमो पाहताना त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण अभिनयातील व्यक्तिरेखा डोळ्यासमोर तरळल्या!

पेशाने डॉक्टर असणारे काशिनाथ घाणेकर हे डेंटल सर्जन होते; पण आपल्याकडे कलेवरील प्रेमाखातर रंगभूमी आणि चित्रपटाकडे डॉक्टरांचे वळणे हा जणू प्रघात..त्यानुसारच अभिनयाची उत्तम जाण असलेले तेही या कला क्षेत्रांकडे आले! यांत रंगभूमीवर 'अश्रुंची झाली फुले' आणि 'रायगडाला जेंव्हा जाग येते' सारख्या दर्जेदार नाटकांतुन त्यांनी लाजवाब भूमिका साकारल्या आणि रूपेरी पडद्यावर श्र. ना. पेंडसे यांचा 'गारंबीचा बापू' बेमालूम साकारला!


'दादी माँ' (१९६६) या हिंदी चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर आणि तनुजा!

तसे १९५३ मध्ये 'धर्म पत्नि' या मराठी चित्रपटाद्वारे डॉ. काशिनाथ घाणेकर पडद्यावर आले. त्यानंतर 'पाठलाग' (१९६०) सारख्या चित्रपटांतून त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारल्या. यांत भालजी पेंढारकरांच्या 'मराठा तितुका मिळवावा' (१९६४) मध्ये घोड्यावर बसून "शूर आम्ही सरदार.." असे गात रूबाबात जाणारी त्यांची व्यक्तिरेखा सर्वांनाच भावली!  

पण प्रमुख नायक म्हणून त्यांस प्रसिद्धी मिळाली ती 'मधुचंद्र' (१९६७) या तरल प्रेमपटातून..याचे विशेष म्हणजे कालांतराने वास्तववादी चित्रपट दिग्दर्शित करणारे राजदत्त यांचा हा पहिला आणि उत्तम व्यवसाय केलेला चित्रपट! यात "सुरावटीवर तुझ्या उमटती.." हे प्रेमगीत काशिनाथजी व उमा यांनी उत्कटपणे साकार केले होते. माझ्या आवडत्या मराठी प्रेमपटांपैकी हे एक चित्र!  
'हा खेळ सावल्यांचा' (१९७६) मध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर व आशा काळे!

केवळ मराठी चित्रपटा पुरते डॉ. काशिनाथ घाणेकर मर्यादित राहिले नाहीत, तर १९६६ मध्ये त्यांनी अशोक कुमार व बीना रॉय यांच्या भूमिका असणाऱ्या 'दादी माँ' द्वारे हिंदी चित्रपटातही प्रवेश केला..यात "ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी.." या प्रसिद्ध गाण्यात सर्वांनी त्यांस पाहिलेय! तर 'अभिलाषा (१९६८) या हिंदी चित्रपटात ते नंदा बरोबर आले!

१९७६ साली आलेल्या 'हा खेळ सावल्यांचा' या गूढरम्य मराठी चित्रपटातील डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका ही तशी शेवटचीच! यातले "गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय.." हे आशा काळे बरोबरचे त्यांचे नृत्य-गीत गाजले..ज्यात हेमंत कुमार यांनी त्यांस आवाज दिला होता! १९८० पर्यंतचा वीस वर्षांचा काळ त्यांनी आपल्या अनेकविध भूमिकांनी गाजवला! मात्र १९८६ मध्ये एका नाटकाच्या दौऱ्यावर असताना ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे अकाली निधन झाले!

आपल्या आदरणीय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनाजींच्या कन्या कांचनताई यांच्या बरोबर डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे लग्न झाले होते. त्यांनी मग 'नाथ हा माझा' हे डॉ. घाणेकर यांचे आत्मचरित्र लिहिले!

साधारण तीसएक वर्षांपूर्वी पुण्यात मराठी चित्रपट कलावंतांचे संमेलन भरले होते. त्यावेळी 'टिळक स्मारक मंदिरा' त पायजमा-हिरवा कुर्ता परिधान केलेले डॉ.काशिनाथ घाणेकर यांना मी ओझरते भेटलो! त्यावेळी भिंतीला टेकून उभे असणाऱ्या त्यांच्यात पूर्वीचा चार्म राहिला नव्हता!

त्यांच्या स्मृतीस ही शब्दांजली!!

- मनोज कुलकर्णी 
  ['चित्रसृष्टी']

No comments:

Post a Comment