Sunday 29 August 2021

माध्यमवाले नि मराठी!

(आज मराठी भाषा दिन नसून, या लेखास समर्पक छायाचित्र आढळल्याने ते इथे वापरले!)


मराठी आणि एकूणच भाषांच्या स्वरूप नि अस्तित्वाबाबत मी मागे (चित्रपट/कला/साहित्य या अनुषंगाने) बरेच लिहिले आहे. पण वेळोवेळी मराठी भाषा च्या तारणहार म्हणवणाऱ्यां कडून होत असलेली तिची कुचंबणा पाहून पुन्हा त्या बाबत लिहिल्या शिवाय राहवत नाही!

'सदर' शब्द 'कॉलम' या इंग्रजीत नियमित स्तंभलेखनास वापरणाऱ्या शब्दासाठी आहे; पण इथे तो तर गायब होतोच आणि त्या सदारांची शीर्षके देखील इंग्रजीत पाहायला मिळतांत. काही मराठी वृत्तपत्रांची नावे देखील इंग्रजीत आहेत तिथे याचे काय!

पूर्वी पुण्यात एका व्याख्यानास गेलो असता तिथे प्रख्यात मराठी दैनिकाच्या साप्ताहिकाचे संपादक इंग्रजीत भाषण देत होते..ते ऐकून कान किटलेल्या सदाशिव पेठी उच्चशिक्षित महिला एकमेकांत कुजबुजताना मी ऐकले "हा बाबा करतो - काम मराठी साप्ताहिकात..आणि कशाला उगाच इंग्रजी बोलतोय!"

मराठी च्या संवर्धनाबाबत परिसंवाद वारंवार ठेवणारे 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' पुण्यात भरले असता परिचयाची मराठी महिला पत्रकार तिथे भेटताच मला "हाय!" म्हणाली (मनात म्हंटलं 'इथे तरी 'नमस्कार', 'नमस्ते' म्हणायचं!'). तर एक नामांकित मराठी अभिनेत्री एका मुलाखतीत असे म्हणाली होती की "मी इंग्रजीत विचार करते आणि मग मराठीत त्यानुसार बोलते नि वागते!"

बहुतेक मराठी चित्रपट व नाटके यांची नावे आता सर्रास इंग्रजीत असतात. त्यांत कितपत वैश्विक मराठी चित्र दिसतं तो भाग सोडा! मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यां वर तर बऱ्याचदा वाट्टेल तसे मराठी रेटले जाते. वृत्त वाहिन्यां वर ही व्याकरण धाब्यावर बसवलेले आढळतें! आता सर्वसाधारण पणे मराठी भाषा दिन, गुढी पाडवा यांच्या शुभेच्छा ही इंग्रजीत येतांत!

आता हे वाचल्यावर काही म्हणतील की 'तुम्ही तर हिंदी आणि इंग्रजीत लिहिता!" पण मी पस्तीस वर्षे मराठी भाषेतून चित्रपट विषयक लिखाण करीत आलोय. गेली काही वर्षे व्याप्ती वाढविण्यासाठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये लिहितोय. तर हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे..आणि मी काही मराठीचा 'वृथा अभिमान' बाळगत नाही!

- मनोज कुलकर्णी

Monday 23 August 2021

झिंग आणणाऱ्या संगीताचे चित्रपटांच्या यशातील योगदान!


'एक अलबेला' (२०१६) या मराठी चित्रपटात मंगेश देसाई आणि विद्या बालन!

मूळ हिंदी 'अलबेला' (१९५१) मध्ये गीता बाली व भगवानदादा!
 
'एक अलबेला' (२०१६) हा नृत्यप्रसिध्द अभिनेते.. भगवानदादांच्या जीवनावर बेतलेला मराठी चित्रपट येऊन आता ५ वर्षें होऊन गेली! तर मूळ 'अलबेला' (१९५१) हा अभिजात चित्रपट प्रदर्शित होऊन देखील आता ७० वर्षें झाली. त्याच्या यशात (दादांच्या नृत्या बरोबरच) संगीतकार अण्णा चितळकर (सी. रामचंद्र) यांचे ही योगदान मोठे आहे.

भारतीय शास्त्रीय व पाश्चात्य संगीतात माहीर - असलेल्या चितळकरसाहेबांनी यातील गाण्यांतून दोन्ही प्रकार वापरले..एकीकडे "बलमा बडा नादान.." सारखी लता मंगेशकर यांच्या आवाजातील रागदारी तील सुरावट होती; तर दुसरीकडे "दीवाना परवाना.." व "भोली सूरत दिलके खोटे.."सारखी क्लब नृत्ये! "शोला जो भडके दिल मेरा धडके.." यांसारख्या यातील गाण्यांत त्यांनी बोंगो, ड्रम्स व क्लेरोनेटचा बेमालूम वापर केलाय आणि त्यांवर भगवानदादा व अल्लड गीताबालीने बेफाम नृत्ये केलीत! ही गाणी अण्णांनी स्वतः लता मंगेशकरांबरोबर गायलीत!
'सैराट' (२०१६) मध्ये आकाश ठोसर व रिंकू राजगुरु!

 
 
 
 
 
इथे विशेषत्वाने नमूद करायचे म्हणजे 'सैराट' (२०१६) मधील "झिंगाट" गाण्यांवर लोक नाचली..ती झिंग 'अलबेला'ने त्या काळात सुरु केली होती. त्या चित्रपटा तील नृत्ये व गाण्यांच्या वेळी लोक प्रेक्षागृहात पैसे फेकून नाचायचे असे मागच्या पिढीचे सांगतात! योगायोग म्हणजे 'सैराट' च्या यशातील संगीतकार अजय-अतुल यांचे व 'अलबेला'च्या भन्नाट यशातील संगीतकार सी. रामचंद्र यांचे योगदान हे विशेष..आणि दोन्ही चित्रपटांतील गाणी संगीतकारांनीही गायलीत!!

 
- मनोज कुलकर्णी

Thursday 19 August 2021

 श्रावण असा-तसा!


श्रावणात रंगतो एकीकडे
ऊन-पावसाचा खेळ जसा

श्रावणसरीं नि ऊन कोवळे  
असतात रोमांचक काहींना!


श्रावणात नसतो दुसरीकडे
ऊन-पावसाचा खेळ तसा

श्रावणधारा नि ऊन कोरडे
झळच उघड्या संसारांना!


दृश्य यातले ते इंद्रधनुचे
मनमोहक असते काहींना

क्षितिजावरी मात्र दुसरीकडे
मळभच दाटते सदानकदा!


- मनोज 'मानस रुमानी'

Tuesday 17 August 2021

सदाबहार मराठी स्टार सचिन..६० +!

पत्नी सौ. सुप्रियासह सचिन पिळगांवकर...दोघांचेही पाठोपाठ वाढदिवस!

रूपेरी पडद्यावर अभिनयाचा सुवर्णमहोत्सव साजरा केलेल्या अभिनेता-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांचा आज ६ वा वाढदिवस!..तर त्यांच्या पत्नी-अभिनेत्री सौ. सुप्रिया पिळगांवकर यांचा ५४ वा वाढदिवस काल झाला!

'हा माझा मार्ग एकला' (१९६२) मध्ये बालकलाकार सचिन!
अवघे चार वर्षे वय असताना प्रतिथयश दिग्दर्शक राजा परांजपे यांच्या 'हा माझा मार्ग एकला' - (१९६२) या मराठी चित्रपटाद्वारे सचिनने रूपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. त्याला सांभाळणाऱ्या व्यसनी पण सहृदय माणसाची भूमिका
यात रंगवणाऱ्या राजाभाऊंना बोबड्या बोलात "पुन्हा औषध (दारू) पिले तर मी बोलणार नाही!" असे सुनावणारा तो लहानगा सचिन ह्रदय हेलावून गेला! यातील अभिनयासाठी त्यास 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार' हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला!

यानंतर लगेचच सुप्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश - मुखर्जी यांच्या 'मझली दीदी' (१९६७) द्वारे सचिन चे हिंदी चित्रपटात पदार्पण झाले. प्रख्यात बंगाली लेखक शरत्तचन्द्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरी वर आधारित या चित्रपटात मीनाकुमारी सारख्या समर्थ अभिनेत्री बरोबर त्यास काम करायला मिळाले! मराठीत दिग्दर्शक राजा परांजपे आणि हिंदीत अभिनेत्री मीना कुमारी यांच्याकडून दिग्दर्शन व अभिनयाचे आपल्यावर झालेले संस्कार नंतर सचिनने कृतज्ञपणे नमूद केलेत!

'गीत गाता चल' (१९७५) मध्ये सचिन व सारीका..
दोघांचाही नायक-नायिका म्हणून पहिला चित्रपट!
यानंतर अनेक हिंदी चित्रपटांतून मास्टर सचिन म्हणून त्याने भूमिका केल्या. यांत शम्मी कपूर व राजश्री बरोबरील - 'ब्रह्मचारी' (१९६८) मधील त्याची गोंडस छबि अजुन डोळ्यासमोर आहे. यात त्याच्या बरोबर इरसाल मुलगा रंगवलेल्या ज्युनियर मेहमूद बरोबर त्याची चांगली गट्टी जमली आणि त्यांनी १५ चित्रपटांतून बरोबर काम केले..यांतच 'अजब तुझे सरकार' (१९७१) मधील - अभिनयासाठी सचिनला पुन्हा 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार' हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला!

१९७५ मध्ये 'राजश्री प्रोडक्शन' च्या 'गीत गाता चल' या चित्रपटाने सचिनला सर्वप्रथम नायक केले. यात मोहक निळ्या डोळ्यांची षोडशा सारीका त्याची नायिका झाली..बालकलाकार म्हणून पडद्यावर आलेल्या तिचेही नायिका म्हणून हे पहिलेच सुरेख दर्शन होते! सचिन-सारीका ही जोड़ी गाजली आणि त्यांनी 'ज़िद' (१९७६), 'मधु मालती' (१९७८) व 'जान-ए-बहार' (१९७९) अशा चित्रपटांतून प्रणयी युगुल साकारले! हिंदी बरोबरच 'नदिया के पार' (१९८२) सारख्या भोजपुरी चित्रपटातून साधना सिंह बरोबर त्याने नायकाची उत्तम भूमिका रंगवली!

'अष्ट विनायक' (१९७९) या मराठी चित्रपटात सचिन आणि वंदना पंडित!
वडील शरद पिळगांवकर यांनी निर्मिलेल्या 'अष्ट विनायक' (१९७९) ने मराठी चित्रपटात नायकाची यशस्वी वाटचाल सचिनने सुरु केली. पुढे 'माय बाप' (१९८२) पासून त्याने दिग्दर्शनही सुरु केले. याच दरम्यान त्याने दिग्दर्शित केलेल्या 'नवरी मिळे नवऱ्याला' (१९८४) चित्रपटातील त्याची नायिका असलेल्या सुप्रिया सबनीस बरोबर त्याचा विवाह झाला आणि हे शिर्षक सार्थ ठरले! मग 'अशी ही बनवाबनवी' (१९८८) सारखे विनोदी तर 'आत्मविश्वास' (१९८९) सारखे सामाजिक व 'आयत्या घरात घरोबा' (१९९१) सारखे मार्मिक असे 'एकापेक्षा एक' यशस्वी चित्रपट तो दिग्दर्शित करीत गेला. तसेच आपल्या चित्रपटातील गाणीही गायला लागला!

नंतर त्याने निर्माते सुभाष घई यांच्यासाठी 'प्रेम दीवाने' (१९९२) हा हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला. जॅकी श्रॉफ, विवेक मुश्रन, पूजा भट्ट व माधुरी दीक्षित यांच्या भूमिका असणारा हा संगीत-प्रणय प्रधान चित्रपट यशस्वी ठरला! पुढे 'तू तू मैं मैं' (१९९४ ते २०००) सारखी यशस्वी हिंदी मालिका दिग्दर्शित करून त्याने दूरचित्रवाणीचा छोटा पडदा पण काबिज केला..सासु-सुनेचा फार्स असणाऱ्या या मालिकेत सुप्रिया पिळगांवकर व रीमा लागू यांनी उत्तम भूमिका रंगवल्या!

'एकुलती एक' (२०१३) मध्ये कन्या श्रिया पिळगांवकर बरोबर सचिन!
मराठी, हिंदी बरोबरच 'नवरा माझा नवसाचा' (२००४) या आपल्याच चित्रपटावरून त्याने 'एकदंता' (२००७) हा कन्नड़ चित्रपटही दिग्दर्शित केला! पुढे 'एकुलती एक' (२०१३) हा मराठी चित्रपट निर्माण करून सचिनने आपली कन्या श्रिया ला पडद्या वर आणले!

अलिकडे आलेल्या 'कट्यार - काळजात घुसली' (२०१६) या गाजलेल्या नाटकावर आधारीत चित्रपटात सचिनने साकारलेली खाँसाहेबांची भूमिका गाजली व त्यास पुरस्कार ही लाभले! या आधीही 'फिल्मफेअर' व राज्य सरकारचे पुरस्कार त्यास मिळाले होते. 'हाच माझा मार्ग' हे सचिन यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले!

'कट्यार काळजात घुसली' (२०१६)
चित्रपटात सचिन पिळगांवकर!
त्यांच्या चित्रपट प्रसंगी सचिनजींशी झालेल्या भेटी आठवतायत..आणि माझा 'चित्रसृष्टी' चा मराठी चित्रपट विशेषांक व त्यातील आपल्या विषयीचे पाहून त्यांनी दिलख़ुलास केलेली चर्चाही!

अशा या सदाबहार अष्टपैलू कलाकारास माझ्या हार्दिक शुभेच्छा!!
त्याचबरोबर सौ. सुप्रिया पिळगांवकर यांसही शुभेच्छा!!!

 
- मनोज कुलकर्णी

Monday 9 August 2021



दीड तप पूर्ती कडे..!!


'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (इफ्फी) चे गोवा इथे आगमन!
 
१९५३ च्या 'श्यामची आई' चित्रपटानंतर तब्बल ५० वर्षांनी मराठी - चित्रपटास 'सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार' मिळवून देणाऱ्या.. 'श्वास' (२००४) या चित्रपटास आता दीड तप लोटेल!

तसेच आपला प्रमुख 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (इफ्फी) चे गोवा इथे आगमन (२००४) झाल्यालाही आता दीड तप लोटेल!
 
तर गोवा येथील त्या प्रारंभीच्या '३५ व्या इफ्फी', २००४ मध्ये 'श्वास' चे 'इंडियन पेनोरामा' मधे खास प्रदर्शन झाल्यावर..त्याची निर्माते मंडळी, दिग्दर्शक संदीप सावंत आणि अभिनेते अरुण नलावडे व संदीप कुलकर्णी यांच्यासह..त्या घटनांची नोंद घेताना माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांकासह मी!

- मनोज कुलकर्णी