Wednesday 26 October 2022

"त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?
त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का?
त्या नभाच्या नीलरंगी होऊनिया गीत का?
गात वायूच्या स्वरांने सांग तू आहेस का..?"


पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध करून गायलेले हे लोकप्रिय गीत आज मला आठवले ते हे छायाचित्र पाहून..ज्यात त्यांच्या ज्येष्ठ भगिनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर जी त्यांना ओवाळत आहेत!
आज हृदयनाथजींचा ८५ वा वाढदिवस आणि आज भाऊबीज ही आहे!
पण आज लतादीदी नाहीत..तेंव्हा हे त्यांच्या मनात असेल असे वाटले!!
 

त्यांस वंदन!!!
- मनोज कुलकर्णी

Sunday 16 October 2022

राजदत्त..मराठी चित्रपटसृष्टीचे ऋषीतूल्य व्यक्तिमत्व!


आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज राजदत्त जी यांनी आता वयाची नव्वदी पूर्ण केली आहे. सुमारे साठ वर्षांच्या कारकिर्दीत विविध शैलीचे मराठी चित्रपट अत्यंत संवेदनशीलतेने हाताळलेले ते आता या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहेत!

विदर्भात अमरावती जिल्ह्यात जन्मलेल्या त्यांचे मूळ नाव दत्तात्रय मायाळू! शालेय-महाविद्यालयीन काळांत त्यांनी कुसुमाग्रजांचे 'दूरचे दिवे' आणि आचार्य अत्रे यांचे 'उद्याचा संसार' यांसारख्या नाटकांतून भूमिका केल्या होत्या. ते काम प्रख्यात चित्रपटकर्ते राजा परांजपे यांच्या हस्ते पारितोषिक मिळून वाखाणले गेले. पुढे राजाभाऊंचे सहाय्यक होऊन त्यांनी चित्रपट क्षेत्रांत प्रवेश केला!

राजदत्त दिग्दर्शित पहिल्या 'मधुचंद्र' (१९६७) चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर व उमा!
समाजसेवा व स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा हिरीरीने सहभाग असे. गोवा मुक्ती संग्रामात ही ते उतरले! लेखक ग.त्र्य. माडखोलकर यांच्या प्रोत्साहनाने त्यांचे वृत्तपत्रीय लेखन सुरु झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर नागपूर व पुणे इथे काही काळ त्यांनी पत्रकारिता केली. नंतर (त्या काळच्या) मद्रास येथे जाऊन 'चांदोबा' या मासिकाच्या संपादकीय विभागात त्यांनी काम केले. तिथल्या वास्तव्यात त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. १९५९ च्या सुमारास तिथे नामांकित 'एव्हीएम' या चित्रपट निर्मिती संस्थेचा 'बाप बेटे' हा चित्रपट राजा परांजपे दिग्दर्शित करीत होते. तेंव्हा त्यांच्याकडे या मायाळूंना उमेदवारी करायला मिळाली!

तर असा राजाभाऊंमुळे चित्रपट क्षेत्रात प्रवेश झाल्याने, त्या नावातील 'राज' ला स्वतःच्या नावातील 'दत्ता' जोडून त्यांनी "राजदत्त" नाव धारण केले! 'जगाच्या पाठीवर', 'आधी कळस मग पाया', 'हा माझा मार्ग एकला', 'पडछाया' अशा जवळपास १३ गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी राजाभाऊंचे ते सहाय्यक होते. १९६७ च्या सुमारास 'मधुचंद्र' या चित्रपटाद्वारे राजदत्त यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली. प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांच्या मूळ हलक्याफुलक्या प्रेमकथेवरील हा मधुसूदन कालेलकर यांनी पटकथा लिहिलेला चित्रपट लाईट-रोमँटिक शैलीत त्यांनी हाताळला. साधारण हिंदी शहरी बाजाच्या या चित्रपटासाठी त्यांनी एन. दत्ता यांच्या कडून संगीत करून घेतले आणि आशा भोसलें बरोबर महेंद्र कपूर यांचा आवाज वापरला! शीर्षकगीतासह (जे माझे एक आवडते आहे ते) "सुरावटीवर तुझ्या उमटती.." अशी यातील भावरम्य गाणी गदिमांनी लिहिली होती. सुंदर मोहक उमा व डॉ. काशिनाथ घाणेकर ह्या कलाकारांनी यांतील प्रेमी युगुल पडद्यावर तितक्याच तरलतेने साकारले! हा गाजलेला चित्रपट त्या काळचा रोमँटिक-कॉमेडी अन आजच्या भाषेत "रॉमकॉम"!

'घरची राणी' (१९६८) चित्रपटात सहकलाकारासह अनुपमा व सुलोचना!
यानंतरचा दुसरा चित्रपट करण्यास त्यांना चित्रमहर्षी भालजी पेंढारकर व स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांचे सहकार्य लाभले. कोल्हापूरच्या 'जयप्रभा स्टुडिओ'त भालजींच्याच कथेवर 'घरची राणी' (१९६८) हा स्त्रीप्रधान चित्रपट त्यांनी केला, ज्याची नायिका होती..लोभस सौन्दर्यवती अनुपमा! यांतील "संसार हा सुखाचा मी अमृतात न्हाते.." हे दत्ता डावजेकर यांच्या संगीतातील जगदीश खेबुडकर यांचे लताजींनी गायलेले गीत संस्मरणीय ठरले. महाराष्ट्र शासनाचा 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा पुरस्कार यास मिळाला! त्यानंतर असे वेगवेगळ्या धर्तीचे चित्रपट राजदत्तजी यशस्वीरित्या दिग्दशित करीत गेले, जे वेगवेळ्या गोष्टींनी वैशिष्ठ्य पूर्ण ठरले! ह्यांमध्ये रमेश देव व सीमा ह्यांच्या अनोख्या भूमिका असलेला 'अपराध' (१९६९) होता, लेखक ग. दि. माडगुळकर, शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, द. मा. मिरासदार व चित्रकर्ते राजा परांजपे ह्यांच्या खुमासदार भूमिका असलेला उपहासात्मक 'वऱ्हाडी आणि वाजंत्री' (१९७३) होता, सचिन व नवोदित वंदना पंडित यांच्यासह शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांची हृदय भूमिका असलेला श्रद्धेवर आधारित 'अष्टविनायक' (१९७९) होता, तर स्त्री शक्तीचं उदात्तीकरण करणारा (माझी एक आवडती अभिनेत्री) रंजना च्या समर्थ अभिनयाचे दर्शन घडविणारा 'अरे संसार संसार' (१९८१) होता!

 
त्यांतही सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकणारे राजदत्तजींचे चित्रपट हे प्रभावी ठरले. ह्यांत समाजसुधारक संत गाडगेबाबांच्या जीवनावरील गोनीदां लिखित नि डॉ. श्रीराम लागू यांच्या अप्रतिम भूमिकेने नटलेला 'देवकी नंदन गोपाला' (१९७७) होता, वेठबिगाराचं जिणं दर्शवणारा यशवंत दत्त अभिनित वास्तववादी 'शापित' (१९८२) होता, तर जयवंत दळवी यांच्या 'पर्याय' नाटकावर आधारित स्त्रीमुक्ती विषयक 'पुढचं पाऊल' (१९८६) होता आणि पुण्यातील थरारक घटनांवर आधारित बहुचर्चित 'माफीचा साक्षीदार' (१९८६) ही होता! त्यांनी 'दूरी' (१९८९) हा हिंदी चित्रपट ही दिग्दर्शित केला होता आणि त्यांत शर्मिला टागोर व मार्क जुबेर यांच्या बरोबर यशवंत दत्त यांनी भूमिका रंगवली होती!

'शापित' (१९८२) चित्रपटात यशवंत दत्त, मधु कांबीकर, कुलदीप पवार व निळू फुले!
राजदत्तजींनी काही लघुपट व माहितीपट पण केले आणि दूरदर्शन मालिका सुद्धा दिग्दर्शित केल्या. यांत 'गोट्या' मालिका गाजली आणि तिने 'रापा' पुरस्कार मिळवला! त्याचबरोबर 'एक कहानी' ही हिंदी मालिका त्यांनी दिग्दर्शित केली आणि सामाजिक प्रश्नांसंबंधी 'इन सर्च ऑफ सोल्यूशन' ही!

सुमारे २८ चित्रपटांचे दिग्दर्शन राजदत्तजींनी केले आणि त्यांतील १४ चित्रपट राज्य पुरस्कारांनी गौरविले गेले!..असे ते एकमेव दिग्गज मराठी चित्रकर्ते! त्याचबरोबर त्यांचे ३ चित्रपट राष्ट्रीय स्तरावर गौरविले गेले. तसेच ताश्कंद, व्हेनिस यांसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत त्यांचे चित्रपट समाविष्ट झाले!

महाराष्ट्र राज्याचा 'जीवन गौरव', 'चित्रभूषण', दूरदर्शन सह्यांद्रीचा 'चित्ररत्न' अशा पुरस्कारांनी राजदत्तजी सन्मानित झाले! मोठी चित्रपट कारकीर्द नि उच्च स्थानी पोहोचूनही ते विनम्र असतात. मितभाषी, मृदु बोलणारे ते चित्रपट वर्तुळांत आदराचे स्थान मिळवून आहेत. आडनावाप्रमाणेच 'मायाळू' व्यक्तिमत्व!

अशा आदरणीय दत्ताजींना मानाचा मुजरा!..आणि चांगल्या आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 9 October 2022

कोजागरी पौर्णिमा तशीही होती!

पूर्वी पुण्यात सारसबागे मध्ये कोजागरी पौर्णिमा साजरी करण्याचा हौशी पुणेकर मंडळींचा शिरस्ता असायचा!
म्हणजे जेंव्हा टीव्ही चॅनेल्सचं करमणुकीचं जाळं नव्हतं आणि कॉम्प्युटर व मोबाईल ह्या गोष्टींशी केंद्रित भावविश्व नव्हतं; तर निसर्गसान्निध्यात, बागेत फिरायला जाणे ह्या गोष्टी ही मन प्रफुल्लित करायच्या तो काळ!

तेंव्हा मग बऱ्याच जणांची कोजागरी पौर्णिमेची रम्य संध्याकाळ कुटुंब आणि मित्रपरिवार सह सारसबागेत फुलत असे!

"शुक्रतारा, मंद वारा,
चांदणे पाण्यातुनी..
चंद्र आहे, स्वप्नं वाहे,
धुंद या गाण्यातूनी.."

अशा मंगेश पाडगावकरांच्या काव्याच्या ओळी रसिक मना मनांत रुंजी घालायच्या!

गाण्याच्या भेंड्या व्हायच्या. चंद्राकडे पाहत नाजूक भावना फ़ुलायच्या. भेळ, मसाला दुधाचा आस्वाद घेतला जायचा!

आता हे हळुवार भावविश्व राहिले नाही. आधुनिक समृद्धीच्या काळात ही कोजागरी पौर्णिमा आता करमणुकीच्या अत्याधुनिक साधनांसह मंदधुंद वातावरणात पार पडते!

तरीही अशा चांदण्या रात्री, माझ्यासारखा एखादा बंगल्याच्या टेरेसवर एकांतात चंद्राकडे पाहत असे आपले कवीमन फुलवत असतो..
"मसाला दूध घेत पाहता नभातील चंद्राकडे
मनात मात्र असते लोभस मुख प्रियतमेचे!"


- मनोज कुलकर्णी ('मानस रूमानी')

Friday 7 October 2022

'सहेला रे' च्या निमित्ताने..'सहेली रे' चा विचार!

नुकताच पाहण्यात आलेला 'सहेला रे' नामक मराठी चित्रपट. व्यवसायात व्यस्त पती मुळे काहीसा मानसिक कोंडमारा झालेल्या स्त्री ला रियुनियन च्या निमित्ताने जिंदादिल वर्गमित्र भेटतो, त्याचे अव्यक्त प्रेम उमजते आणि ती तिचं प्रफुल्लित जिणं मनसोक्त अनुभवतें, तसेच स्वत्व साध्य करते. असे ह्याचे हे कथासूत्र! (यावरील माझे परीक्षण माझ्या या 'चित्रसृष्टी' ब्लॉग वर इथे प्रसिद्ध झालेय!)

या निमित्ताने सर्वसाधारणपणे दुसऱ्या बाजूने ही विचार केला. समाजात अशीही स्थिती असू शकते की (घराकडे पाठ फिरवून) कला आदी करिअर क्षेत्रांत अतिव्यस्त झालेल्या अति महत्वाकांक्षी पत्नी मुळे संवेदनशील कलासक्त पुरुषाचा मानसिक कोंडमारा झालेला असेल. तेंव्हा त्यालाही हळुवार कवी मनाची शाळा-महाविद्यालयीन लोभस मैत्रीण पुन्हा भेटली, तर तिच्यामुळे त्याचे ही जीवन फुलून येईल! मग तिला ही उद्देशून 'सहेली रे' चित्रपट बनू शकतो!

हे व्यक्त होताना, मी पुरुषप्रधान संस्कृतीचा पुरस्कर्ता नसून, स्त्री-पुरुष समानतेच्या आधुनिक विचारांचा असल्याचे आवर्जून नमूद करतो. समाजात ह्या दोन्ही वर्गांस मोकळेपणाने वावरण्याचे स्वातंत्र्य असल्याने, इथे 'सहेला रे' हवा तर 'सहेली रे' ही हवी असे वाटू शकते!

- मनोज कुलकर्णी

Tuesday 4 October 2022

'सहेला रे'..स्त्रीची स्वत्वासाठी चित्रपटीय हाक!

"सहेला रे.." हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक अग्रणी किशोरी आमोणकर यांनी राग भोपालीत गायलेले गीत कानात रुंजी घालू लागते! तसेच मृणाल पांडे लिखित संगीतविषयक हिंदी साहित्यकृती 'सहेला रे' ही स्मरते! निमित्त, आता मृणाल कुलकर्णी यांच्या मराठी चित्रपटाचे शीर्षक..'सहेला रे'!

व्यवसायात व्यस्त पती मुळे काहीसा मानसिक कोंडमारा झालेल्या स्त्री ला रियुनियन (माजी - विद्यार्थ्यांच्या मेळाव्या) च्या निमित्ताने अचानक जिंदादिल वर्गमित्र भेटतो, त्याचे अव्यक्त प्रेम उमजते आणि अल्प काळासाठी का होईना ती तिचं प्रफुल्लित जिणं मनसोक्त अनुभवतें, त्याचबरोबर स्वत्व साध्य करते! हे कथासूत्र असणाऱ्या ह्या चित्रपटात सुबोध भावे व सुमित राघवन यांनी अनुक्रमे पती व मित्र ह्या दोन भिन्न प्रकृतीच्या व्यक्तिरेखा त्याच आविर्भावात रंगवल्यात आणि त्यांच्यासमवेत मृणाल कुलकर्णी यांनीच हे स्त्री जीवननाट्य पडद्यावर कधी संयत तर कधी अत्युत्कटतेनं रंगवलंय!

छायाचित्रण उल्लेखनीय आहे. त्यांत काही तीव्र भावनिक प्रसंगांचे चित्रीकरण व त्यातील सेटिंग-लाइटिंग हे हाँगकाँग चे चित्रकर्ते वॊन्ग कर-वाई 
('इन दी मूड फॉर लव्ह'/२००० फेम) यांच्या धाटणीचे वाटते! संबंधित तंत्रज्ञांवर त्यांचा प्रभाव असावा! यातले "सई बाई गं.." गीत चित्रपटाचा आशय घेऊन येते!

या विषयावर वेगवेगळ्या स्वरूपात आधी काही चित्रपट येऊन गेलेत. २०१८ मधील रियुनियन वरचा तामिळ 'नाईन्टी सिक्स' हा या संदर्भात कुणाला आठवला तर नवल नाही! अर्थात 'सहेला रे' हा काही भावनिक नि हलक्याफुलक्या रीतीने संतुलित पटकथेद्वारे चौकटीत हा विषय मांडतो! मात्र काही प्रसंग रचना विनोदासाठी केलेली वाटते. कार्यक्रमातील काव्यवाचन वा किल्ल्यावरच्या मस्तीत मुलांची शेरो-शायरी! इथे अभिरुची राखता आली असती! काही आरोळीवजा (खटकणारे) संवाद सोडता, करमणुकीच्या परिघातच हे चित्रपटीय भाष्य होते!

या क्षणी मला टागोरांच्या अभिजात बंगाली कादंबरी वरील श्रेष्ठ चित्रकर्ते सत्यजित राय यांची 'चारुलता' (१९६४) ही चित्रकृती आठवते. पतीच्या व्यस्ततेमुळे एकाकी जीवन कंठणाऱ्या कला-काव्य रसिक घरंदाज स्त्रीचे जीवन कलासक्त तरुणाच्या येण्याने बदलते असा याचा कथा आशय. अर्थात या कथेस अन्यही कंगोरे होते!

असो, 'प्लॅनेट मराठी' ची 'सहेला रे' ही चित्रपट निर्मिती स्त्रीची स्वत्वासाठी एक हाक म्हणता येईल! मात्र मधेमधे येणारा अनाठायी ह्यूमर (काहीसा खट्याळ) टाळला असता व प्रमुख व्यक्तिरेखांचे भावविश्व अधिक उत्कट (रोमँटिक) करण्या वर भर दिला असता, तर हे तरल भावोत्कट चित्रकाव्य होऊ शकले असते!!


- मनोज कुलकर्णी