Wednesday 20 March 2019

कवि-गीतकार ग.दि माडगूळकर.

"या चिमण्यांनो...परत फिरा रे..
घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा.."

ग.दि माडगूळकरांचे हे हृद्य गीत अचानक स्मरले..ते आज 'जागतिक चिमणी दिन' असल्याची बातमी पाहून!
(गीतात हे मुलांस उद्देशून आहे!)


चिमण्या दिसणे आजच्या काँक्रीटच्या जंगलात दुर्मिळ झाल्याची खंत व्यक्त होत असताना हे गीत समर्पक ठरते! त्याच प्रमाणे कुटुंब-समाज व्यवस्थेबाबतही रूपकात्मक म्हणता येईल!
गायिका लता मंगेशकर.



श्रीनिवास खळे यांच्या संगीतात हे गीत मोठ्या आर्तपणे गायले होते लता मंगेशकरांनी.. 'जिव्हाळा' (१९६८) या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटासाठी!

योगायोगाने आज गबाले साहेबांचीही जयंती आहे. 'आमचा दोघांचा वाढदिवस २० मार्च 
या एकाच तारखेस असल्या'चे मी त्यांना भावुकपणे नमूद केले होते..आणि आमचा हा जिव्हाळा ते जाईपर्यंत राहिला! त्याची आठवण आणि या गीताने आज भरून आले!



माझ्या 'चित्रसृष्टी' प्रथम विशेषांकाच्या प्रकाशन समारंभास राम गबाले अध्यक्ष म्हणून आले.. त्याचे हे (उजवीकडील) मी त्यांचा सत्कार करतानाचे छायाचित्र!

त्यांच्या स्मृतीस अभिवादन!!



- मनोज कुलकर्णी

Thursday 14 March 2019

मराठी ग़ज़लसम्राट सुरेश भट्ट यांचा आज १६ वा स्मृतिदिन!


'रंग माझा वेगळा' ह्या त्यांच्या काव्यसंग्रहातील ही हृदय ग़ज़ल इथे सादर...

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!
जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!
स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!
वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा...
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

त्यांस विनम्र भावांजली!!


सुवर्णमहोत्सवी मराठी चित्रपटांचे सम्राट..दादा कोंडके!


विलक्षण लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपटकर्ते दादा कोंडके यांचा आज २१ वा स्मृतीदिन!

'विच्छा'ने रंगभूमी गाजवून, मग बाबांच्या (भालजी पेंढारकर) 'तांबडी माती' सारख्या चित्रपटात काम केल्यानंतर दादा कोंडके यांनी स्वतंत्रपणे मराठी चित्रपटाचा फड गाजवायला १९७० मध्ये सुरवात केली आणि 'सोंगाड्या', 'एकटा जीव सदाशीव' पासून ते 'वाजवू का' अशी ते जाईस्तोवर (१९९८) अफलातून विनोदी चित्रपटांची मालीकाच मराठी प्रेक्षकांपुढे सदर केली आणि त्यांना मनमुराद हसवले !
'सोंगाड्या' (१९७०) मध्ये दादा कोंडके व उषा चव्हाण!

भोळाभाबडा मराठी नायक ही दादा कोंडके यांची पडद्यावरील प्रतिमा होती! मात्र त्यांचे द्विअर्थी संवाद नि गाणी हा समीक्षकांचा कायम टीकेचा विषय राहीला..पण ते त्यांच्या प्रचंड प्रेक्षक वर्गास हवे तसे चित्रपट करीत राहिले! आणि सर्वाधिक (९) चित्रपट रौप्यमहोत्सवी झाल्याबद्दल त्यांचे नाव 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ' मध्ये नोंदले गेले !

मराठी चित्रपटसृष्टीतील त्या अर्थाने ते दादाच होते..तसा त्यांचा आविर्भाव अन कमालीचा मिश्कीलपणा आम्ही चित्रपट पत्रकारांनी त्यांच्या गप्पांच्या मेफलीत अनुभवला आहे..हा फड ते एकतर्फीच गाजवीत! त्यांच्या द्विअर्थी टोमण्यातून कुणीही सुटले नव्हते..

अगदी टीकाकार, पत्रकारही नाही!

त्यांना ही भावांजली !!


- मनोज कुलकर्णी

Saturday 2 March 2019

इसाक मुजावर..भारतीय चित्रपटाचा चालता-बोलता इतिहास!

चित्रपट इतिहासतज्ञ, समीक्षक व चित्रपट विषयक नियतकालिकांचे संपादक इसाक मुजावर यांना जाऊन आता चार वर्षे होऊन गेली!

मराठी चित्रपट पत्रकारितेतील इसाक मुजावर हे शिखरावर असलेले, प्रमाण मानले गेलेले नाव! भारतीय चित्रपटाचा चालता बोलता इतिहास असे त्यांस संबोधले जायचे! १९५५ साली सुरु झालेली त्यांची चित्रपट पत्रकारिता 'तारका', 'रसरंग'चे कार्यकारी संपादक ते स्वतःचे 'चित्रानंद' व नंतर अनेक दैनिके, नियतकालिकांतून फुलत गेली! चित्रपट विषयक लेखनातील त्यांचा शब्द हा शेवटचा मानला जायचा..पुढे त्यांची तीसेक पुस्तकेही प्रसिद्ध झाली! चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांच्या लेखनात स्वाभाविकपणे अनौपचारिकपणा असायचा!

अभ्यासपूर्ण चित्रपट विषयक लेखन करणाऱ्या आम्हा चित्रपट पत्रकारांचे इसाक मुजावर हे एक प्रेरणास्रोत होते! त्यांच्या 'चित्रानंद' मध्ये लेखन होऊ शकले नाही, कारण मी चित्रपट पत्रकारितेत आलो १९८३ मध्ये..(१९९५ नंतर 'रसरंग' मध्ये लिखाण झाले पण ते तिथे नसताना) पुढे मात्र माझ्या स्वतःच्या 'चित्रसृष्टी' दिवाळी अंकासाठी त्यांचा लेख घेण्याचा योग आला! मला आठवतेय २००२ च्या आसपास मी मुंबईत कांदिवलीच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटलो होतो; तेंव्हा मी स्वतःचे चित्रपट विषयक नियतकालिक सुरु केल्याचे त्यांना कौतुक वाटले!

त्यावेळी त्यांच्याशी झालेला मनमोकळा संवाद आठवतोय. त्या सुमारास भन्साळीचा नवा 'देवदास' प्रदर्शित झाला होता. त्यावर मार्मिक टिपणी करताना ते म्हणाले होते ''करायला गेला 'देवदास' अन झाला 'पाकीझा'!'' आमच्यासाठी दिलीपकुमारचा 'देवदास' हा मानदंड होता! पुढे त्यांच्याशी दिलखुलास गप्पा व्हायच्या आणि आपल्या खास टिपणीवर तेच टाळीसाठी हात पुढे करायचे! 'रागिणी' चित्रपटात नायक किशोरकुमारला मोहम्मद रफींच्या आवाजात "मन मोरा बावरा.." आळवताना पाहिल्याचा विषय निघाला, तेंव्हा ते म्हणाले होते ''आधी ती भूमिका भारत भूषण करणार होता म्हणून रफींच्या आवाजात ते गाणं आधीच रेकॉर्ड झाल होतं!'' असे चित्रपट इतिहासाचे अनेक दाखले त्यांच्याकडे होते..अशोककुमारनी दिलीपकुमारला काय सल्ला दिला..वगैरे. त्यामुळे त्यांची गप्पांची मैफल कधी संपू नये वाटे!

माझ्या 'चित्रसृष्टी' दिवाळी अंक, २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेला 'ट्रैजिडी किंग, एंटी हीरो ते एंग्री यंग मैन' हा त्यांचा कदाचित शेवटचा लेख असावा! याबाबतही एक हृद्य आठवण अशी आहे की मी हा विषय त्यांना दिल्यावर त्यांनी 'चित्रसृष्टी' साठी मला लेख तर दिलाच, पण नंतर विस्ताराने त्यावर पुस्तकही लिहिले 'मास्टर विठ्ठल ते अमिताभ' आणि त्याच्या प्रास्ताविक मनोगतात शेवटच्या दोन परिच्छेदांत माझा उल्लेख करून श्रेयही दिले! ते वाचून अक्षरशः भरून आले! मीही 'चित्रसृष्टी'च्या त्या दिवाळी अंकात मला मिळालेल्या त्यांच्या प्रोत्साहनाचा आवर्जून उल्लेख केला!

त्यांचा 'चित्रभूषण' सन्मानाने यथोचित सत्कार झाला होता. तसे त्यांना अन्य संबंधित पुरस्कारही मिळाले!

चित्रपट इतिहासाची ती रसिली मैफल आता पोरकी झालीये!!

 त्यांस भावांजली!!!

- मनोज कुलकर्णी