Thursday 19 December 2019

बुद्धिप्रामाण्यवादी नटश्रेष्ठ डॉ. लागू!

रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांतील मनस्वी कलावंत डॉ. श्रीराम लागू यांचे अखेर परवा वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले!

रंगभूमीवरचे 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू!
अभिनय क्षेत्रात रमलेल्या लागूंना वैद्यकीय पार्श्वभूमी होती आणि ते उत्तम सर्जन होते. एका वार्तालापात प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांनी 'पुण्यातील एका चित्रीकरणप्रसंगी दुखापत झाली असता आपल्यावर.. डॉ. लागूंनी उपचार केले होते!' असे सांगितल्याचे मला स्मरते!

वैद्यकीय क्षेत्राकडे पाठ फिरवून १९६९ मध्ये कानेटकरांच्या नाटकाद्वारे डॉ. लागूंनी अभिनय क्षेत्रात स्वतःला जणू झोकून दिले! जवळ जवळ अर्धशतक सुमारे २० नाटकांतुन आणि २५० हुन अधिक चित्रपटांतुन त्यांनी भूमिका केल्या. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती व इंग्रजी अशा भाषेच्या सीमा ओलांडत त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दर्शवली!
व्ही. शांताराम यांच्या 'पिंजरा' (१९७२) चित्रपटात निळु फुले, संध्या व डॉ. श्रीराम लागू!

रंगभूमीवर डॉ. लागूंनी तशा सर्वच भूमिका समरसून केल्या. त्यांत.. शिरवाडकरांचा 'नटसम्राट' आणि सॉक्रेटिस वरील 'सूर्य पाहिलेला माणूस' ह्या व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनयातील उत्तुंगता सिद्ध करणाऱ्या ठरल्या!

१९७२ ला प्रदर्शित झालेल्या शांतारामबापूंच्या 'पिंजरा' ने डॉ. लागूंची चित्रपट कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु झाली... 
'दी ब्ल्यू एंजल' (१९३०) या पहिल्या गाजलेल्या जर्मन बोलपटावर बेतलेल्या 'पिंजरा' मधील नर्तकी संध्या बरोबर त्यांची नैतिक अधःपतन होणाऱ्या मास्तराची भूमिका तशी आव्हानात्मक होती!
'सामना' (१९७४) चित्रपटांत डॉ. श्रीराम लागू व निळु फुले!


त्यानंतर 'सामना' (१९७४) आणि 'सिंहासन' (१९७९) या डॉ. जब्बार पटेलांच्या राजकीय थरारपट समजल्या गेलेल्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका ह्या लक्षवेधी होत्या. 
एकीकडे ग्रामीण राजकारणाची लक्तरं - काढणारा बेरकी मास्तर; तर दुसरीकडे - मुत्सद्दी मंत्री अशा परस्पर विरोधी भूमिका त्यांनी अनुक्रमे यांतुन बेमालूमपणे वठवल्या!

दरम्यान 'घरौंदा' सारख्या चित्रपटांतुन हिंदी मधुनही डॉ. लागू भूमिका करू लागले होते. प्रख्यात जपानी चित्रकर्ते अकिरा कुरोसवा यांच्या 'हाय अँड लो' (१९६३) या चित्रपटावर आधारित राज सिप्पीच्या 'इन्कार' (१९७७).. 
या बॉलीवुड रिमेक मधील त्यांची भूमिका.. उल्लेखनीय होती. नंतर राजेश खन्नाचा 'थोडी सी बेवफ़ाई' (१९८०) आणि अमिताभ बच्चनचा 'लावारिस' (१९८९) अशा आघाडीच्या नायकांबरोबरच्या चित्रपटांतून त्यांनी काम केले!

'देवकी नंदन गोपाला' (१९७७) चित्रपटात गाडगेबाबांच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागू!
बॉलीवुड प्रमाणेच कोलकत्यात ख्यातनाम दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या 'एक दिन... अचानक' (१९८९) मधील शबाना आझमी व अपर्णा सेन बरोबरील त्यांची भूमिका ही - उल्लेखनीय होती. तर रिचर्ड अटेनबरो यांच्या आंतरराष्ट्रीय 'गांधी' (१९८२) या 'ऑस्कर' प्राप्त चित्रपटात त्यांनी गोपालकृष्ण गोखले यांची - व्यक्तिरेखा साकारली होती!

'झाकोळ' (१९८०) या एकमेव चित्रपटाचे.. दिग्दर्शन लागूंनी केले. याद्वारे त्यांच्याबरोबर तनुजा यांनी हिंदीत काम केले; तर पुढे नावा - रूपास आलेल्या उर्मिला मातोंडकरने बाल - कलाकार म्हणून यातून पडद्यावर पदार्पण केले!

'देवकी नंदन गोपाला' (१९७७) या राजदत्त - दिग्दर्शित चित्रपटातील गाडगेबाबांची त्यांनी केलेली भूमिका ही त्यांच्या विचारसरणीशी सुसंगत होती..हे मी त्यांच्याशी वार्तालापात नमूद केले होते..तेंव्हा त्यांनी त्यास दुजोरा दिला होता!

नाट्य व चित्रपट क्षेत्रांतील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले! अखेरच्या काळात आपल्या बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतुन त्यांनी समाज प्रबोधनपर व्याख्यानेही दिली. तर 'लमाण' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले!

तरीही रंगमंचावर त्यांचे विलक्षण प्रेम होते..पण अखेर जीवनाच्या रंगभूमीवरून त्यांना एक्झिट घ्यावी लागली!

त्यांच्या स्मृतिस ही आदरांजली!!

- मनोज कुलकर्णी

Saturday 26 October 2019

वडिलांस भावपूर्ण श्रद्धांजली!!

आमचे वडिल लेखक श्रीविलास कुलकर्णी (वय ८१ वर्षे) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले!


'पुणे महानगरपालिके'तुन अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या आमच्या वडिलांचे लेखन क्षेत्रांतही योगदान होते. 
त्यांच्या साहित्य संपदेत अद्भुतरम्य साहस कथा आणि वैचारिक लेखनाचा समावेश होता. एकीकडे 'नीलमणी आणि पिवळा जादूगार', 'न हसणारी राजकन्या', 'गाणारा पक्षी', 'गुलसनोबर' सारख्या बालकथा; तर दुसरीकडे 'गौतम बुद्ध: जीवन आणि बोधकथा' व 'धर्म आणि राष्ट्रवाद' सारखी विचार मंथन करणारी पुस्तके त्यांनी लिहिली!

'रहस्य रंजन', 'रम्यकथा', 'बुआ', 'महाराष्ट्र' व 'माणूस' सारख्या नियतकालिकांतुन त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले होते. त्याचबरोबर 'सुदर्शन' मासिक' व 'सा. अखंड भारत' यांच्या संपादकीय विभागांत त्यांनी कामही केले होते. 
तर 'मेघदूत' या एकेकाळच्या लोकप्रिय मासिकाचे ते संपादक होते!

'पुणे महानगरपालिके'च्या 'नागरी जीवन' या नियतकालिकास त्यांचे संपादन सहाय्य असे. सेवानिवृत्ति नंतर अलिकडेच त्यांची 'माझी मुक्तफुले' हा गद्य-काव्य संग्रह आणि 'बालोद्यान' ही पुस्तके प्रकाशित झाली होती.

माझ्या चित्रपट पत्रकारितेस त्यांचे प्रोत्साहन होते!

त्यांच्या आत्म्यास शांती मिळो!!

- मनोज कुलकर्णी

Thursday 17 October 2019

'काँग्रेस'च्या विचारसरणीशी एकनिष्ठ नि समाज कार्यास सदैव तत्पर.. सोलापुरच्या लोकप्रिय आमदार.. 

प्रणिती शिंदे यांस विजयासाठी.. 

हार्दिक शुभेच्छा! 

- मनोज कुलकर्णी

Friday 27 September 2019

'सिंहासन' नंतर राजकीय थरारपट होण्यासारखी सद्यस्थिती!
'गाभ्रीचा पाऊस' असाही!

Saturday 31 August 2019

मुबारकबाद!


'चतुरंग प्रतिष्ठान' चा 'सामाजिक जीवन गौरव' पुरस्कार 'मुस्लिम सत्यशोधक समाजा' चे श्री. सय्यदभाई यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

- मनोज कुलकर्णी

Friday 30 August 2019

"प्रेम असता साथीला..
मार्ग सुकर ध्येयाचा!"


'मराठी बिग बॉस-२' च्या अंतिम फेरीत एकमेकांचा हात धरून पोहोचलेल्या ह्या प्रेमी युगुला कडे पाहून वरील ओळी सुचल्या!

शिवीना(णा)..शुभेच्छा !!

- मनोज कुलकर्णी

Friday 26 July 2019

सहकार अग्रणी व स्मिता पिता!


स्मिता पाटीलने माता-पिता यांच्यासह साजऱ्या केलेल्या (अखेरच्या) वाढदिवस प्रसंगी शिवाजीराव पाटील!

सहकार क्षेत्रातील अग्रणी, माजी खासदार, राज्यमंत्री 
आणि दिवंगत प्रतिभाशाली अभिनेत्री स्मिता पाटीलचे वडील श्री. शिवाजीराव पाटील यांचा दुसरा स्मृतिदिन अलिकडेच होऊन गेला!

ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि साखर कारखान्यांच्या सहकार क्षेत्रात अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते!

'पिफ्फ' मध्ये शिवाजीराव पाटील यांस माझा भेटण्याचा क्षण!

दोन वर्षांपूर्वी 'पिफ्फ' मध्ये स्मिता पाटीलच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या दृकश्राव्य कार्यक्रमास शिवाजीराव पाटील यांची खास उपस्थिती होती. त्यावेळी तिचे धीरगंभीर अभिनय आविष्कार पाहताना त्यांचे डोळे पाणावले होते..!

तो संक्रांतीचा दिवस असल्याने तिळगुळ घेऊन त्यांस नमस्कार केला आणि माझा 'चित्रसृष्टी' नववास्तववादी चित्रपट विशेषांक त्यांस भेट दिला..त्याचे त्यांनी कौतुक केले!

ती भेट शेवटची ठरली!..त्यांस विनम्र आदरांजली!!


- मनोज कुलकर्णी

Thursday 11 July 2019

तेंडुलकर परंपरेची अखेर!


मंगेश तेंडुलकर यांचे पुस्तक.
प्रख्यात व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या कुंचल्याने अखेर कायमची विश्रांती घेतली..त्यास आता दोन वर्षे लोटली!

लेखक विजय तेंडुलकर.
सामाजिक-राजकीय घडामोडींवर चित्रभाष्य करणारे मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांतून उपहास सहजसुंदर व्यक्त होई. त्याचबरोबरच 
ते मार्मिक लेखनही करीत. तसेच नाटक हा सुद्धा त्यांचा आवडीचा विषय असल्याने त्याची विविधांगी समीक्षा करीत!

'संडे मूड' हा त्यांचा (व्यंगचित्रांसह) लेखसंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यांना 'महाराष्ट्र साहित्य परिषदे' चा 'चि. वि. जोशी पुरस्कार' मिळाला!

संवेदनशील अभिनेत्री प्रिया तेंडुलकर!

त्यांच्या जाण्याने तेंडुलकर परंपरेची अखेर झाली आहे असे मला वाटते. काही वर्षांपूर्वी त्यांचे बंधु व परखड लेखक-पटकथाकार विजय तेंडुलकर गेले आणि ('रजनी' प्रसिद्ध) संवेदनशील अभिनेत्री पुतणी प्रिया तेंडुलकरही हुरहूर लावून गेली! 

या तिघांसही वेगवेगळ्या प्रसंगी नि कार्यक्रमांतून भेटण्याचा व बोलण्याचा 
योग मला आला आणि त्यांतून त्यांचे प्रागतिक विचारही जाणून घेता आले!

मंगेश तेंडुलकरजींस माझी विनम्र श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 10 July 2019

भाषा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे!


माझ्या अलिकडच्या लिखाणावरून मी मराठी भाषा व त्यातील प्रादेशिक चित्रपट द्वेष्टा असल्याचा गैरसमज करून 
घेऊ नये! (वास्तविक माझी आजवरची पत्रकारिता ही प्रामुख्याने मराठीतच झाली आहे आणि मराठी चित्रपटावर मी भरपूर लिखाण केले आहे)..मराठी सिनेमा वृद्धीसाठी वारंवार माझी लेखणी झुरलीये!

फक्त संकुचित मनोवृत्तीने आपल्याच भाषा-चित्रपटाचे अवडंबर माजवणे मला योग्य वाटत नाही..आणि याविषयीची सक्ती व बोलणे-कृतीतील विरोधाभास खटकतो! त्याच्या गुण-दोषांवर टीका-टिपणी व्हायला हवी.!

सर्व भाषा आणि त्यांतील कला नि चित्रपट यांचे वैश्विक स्तरावर व्यापक अवलोकन व्हावे..आणि कुठल्या भाषेत कुणाला कसे व्यक्त व्हावे वाटते याचे सर्वंकष अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे हीच इच्छा!

- मनोज कुलकर्णी


Monday 8 July 2019

आनंदयात्री कवि!

कवि बा. भ. बोरकर.


"माझ्या गोव्याच्या भूमींत येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी.. भेटे आकाश सागरा.!"
सारख्या रोमांचकारी काव्यपंक्ती लिहिणारे..'पद्मश्री' बा. भ. बोरकर यांची आज ३५ वी पुण्यतिथी!
कवि बा. भ. बोरकर.

"मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणे गळले हो...
जीवन त्यांना कळले हो.!"
असे त्यांचे मोलाचे शब्द मार्गदर्शक वाटतात..!


त्यांना भावपूर्ण आदरांजली.!!


- मनोज कुलकर्णी

भाषावाद..निरर्थक नि संकुचित!


वर्षापूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीवर हिंदी-मराठी संदर्भात वादविवादाचा कार्यक्रम पाहण्यात आला (यात सहभागीचे मराठीही सदोष होते!)..आणि राष्ट्रीय एकात्मता साधायची सोडून अजूनही असे आंतरभाषीय किंबहुना आंतरप्रान्तीय वाद (क्षमविण्याऐवजी) कसे निर्माण केले जातात याचे वैषम्य वाटले होते. हिंदीचा असा दुस्वास करायला नकोय!

वास्तविक विविध भाषा-संस्कृतींने समृद्ध अशा आपल्या देशात..सर्वच भाषा नि संस्कृती आपल्या आहेत या भावनेतून सर्वांबाबत आत्मीयता नि आदराची भावना असली पाहीजे! त्याहूनही पुढे म्हणजे 'वसुधैव कुटुंबकम्' या आपल्या तत्वज्ञानाने विश्वव्यापी बंधुत्वाची भावना जोपासायला हवी. भाषा-साहित्य व कलांच्या क्षेत्रांत जिथे जिथे जे जे चांगले आहे ते आत्मसात करायला हवे!

इंग्लिश बाबतही असा (न्युनगंडातून आलेला) तिटकारा अधुन मधून उफाळून येतो..(यामध्ये मग काही मराठी मुद्रित/इलेक्ट्रॉनिक माध्यमेही हीरीरीने पुढे येतात. पाहायला गेले तर अशा काही माध्यमांच्या नावांत इंग्रजी अक्षरे दिसतात!) वास्तविक जागतिक संवादाचे हे भाषामाध्यम असेल तर ते का स्वीकारू नये?..त्या सहाय्याने पुढच्या पिढीने का पुढे जाऊ नये? इंग्रजी माध्यमातुन शिक्षणापासून परावृत्त करणाऱ्या अशा काही नेते मंडळींची मुले मात्र इंग्रजी माध्यमात शिकून परदेशी गेलेली असतात!

या संदर्भात काही वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालिन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी पुण्यात झालेल्या ७५व्या मराठी साहित्य सम्मेलनात केलेले खरमरीत भाष्य मला आठवतेय..त्यावेळी बोलताना ते व्यासपीठावरील फलक पाहून मान्यवरांस म्हणाले "काय हो, हे '७५वे अमृतमहोत्सवी सम्मेलन' असे लिहायची 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'त गरज का भासते? अमृतमहोत्सवी म्हणजेच ७५वे ना..मग दोन्ही कशाला नमूद करायचे? फक्त अमृतमहोत्सवी पुरेसे होते!" त्यांचे हे समर्पक बोल ऐकून श्रोत्यांमध्ये हास्याची लाट उसळली आणि व्यासपीठावरील चेहरे पडलेले होते!

तेंव्हा भाषेचा वृथा अभिमान बाळगण्यापेक्षा, भाषा वृद्धीचे कार्य दुसऱ्या भाषांचा दुस्वास न करता व्हावे..आणि कुणाला कुठल्या भाषेत लिहायला-बोलायला आवडेल हे जे ते आपल्या इच्छेने ठरवतील. उदाहरणार्थ मला हिंदी-उर्दू भाषेत लिहायला-बोलायला आवडते आणि इंग्लिश मध्ये लिहिणेही आवश्यक वाटते..याचा अर्थ मातृभाषा मराठी बाबत मला आस्था नाही असा होत नाही!

अभिव्यक्ति स्वातंत्र्य घेऊन माझी मते इथे मोकळेपणाने मी व्यक्त केली आहेत!!

- मनोज कुलकर्णी
   ['चित्रसृष्टी']

Wednesday 3 July 2019

गुड बाय डॉक्टर..तोरडमल!


अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल एका सत्कार समारंभात!

मराठी रंगभूमी आणि चित्रपट आपल्या धारदार अभिनयाने नि खर्ज्यातील आवाजाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल जीवन रंगभूमी सोडून आता दोन वर्षे झाली!
अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल.

'तरुण तुर्क म्हातारे अर्क' व 'गगनभेदी' सारखी नाटके गाजवणाऱ्या आणि 'सिंहासन' (१९८०) व 'आत्मविश्वास' (१९९३) अशा चित्रपटांतून आपल्या स्वाभाविक अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मामा तोरडमल यांनी 'संघर्ष' या दूरचित्रवाणी मालिकेतही काम केले. त्याचबरोबर लेखन-दिग्दर्शनाद्वारे दर्जेदार कलाकृती रसिकांसमोर आणल्या!

साहित्य क्षेत्रातही त्यांनी लक्षणीय योगदान दिले. यांत र. धो. कर्वे यांच्या इंग्रजी लेखसंग्रहाचे त्यांनी मराठीत 'बुद्धिप्रामाण्यवाद' हे भाषांतर केले. तर अगाथा ख्रिस्ती यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला!


त्यांना राज्य सरकारच्या 'नटवर्य पणशीकर पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले होते.

निरोपासाठी त्यांच्याच नाटकाचे शीर्षक आठवले 'गुड बाय डॉक्टर'!

त्यांना विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 26 June 2019

असा बालगंधर्व आता न होणे.!























मराठी संगीत रंगभूमीवरील श्रेष्ठ गायक-कलाकार नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांची आज १३१ वी जयंती!

'स्वयंवर' 'संगीत शारदा' सारख्या नाटकांतील त्यांच्या स्त्री भूमिका विशेष गाजल्या. 
तसेच त्यांनी 'धर्मात्मा' (१९३५) चित्रपटात संत एकनाथांची भूमिका केली!

त्यांस विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

Tuesday 25 June 2019

सक्ती करून मराठी भाषा संवर्धन होणार नाही!
यांसाठी भाषेची स्पर्धेतील उपयुक्तता व दर्जा याकडे लक्ष द्यावे असे वाटते!
व्यक्तीचे भाषा स्वातंत्र्यही महत्वाचे!


- मनोज कुलकर्णी

Saturday 18 May 2019

चित्रपट आणि समीक्षा..गांभीर्यपूर्वक व्हावे!


'सिनेमा' हे सर्व कला नि विषयांचा समावेश असणारे अतिशय प्रभावी सर्वसमावेशक (मुख्यतः दृश्य) माध्यम आहे. 
फक्त इन्स्टिटयूट मध्ये शिकून अभिनय, दिग्दर्शन अशा त्या संबंधित कला आत्मसात होतात असे नाही..त्यासाठी अंगभूत गुण व प्रतिभा असावी लागते..आणि मुख्यत्वे दर्शकांशी संवाद साधणारी प्रतिसृष्टी पडद्यावर आणण्याची व्यापक दृष्टी असावी लागते!

यामध्ये फिल्म इन्स्टिट्यूट्सना नावे ठेवण्याचा कुठलाही उद्देश नाही. मी स्वतः तिथे 'फिल्म आप्रिसिएशन कोर्स
२५ वर्षांपूर्वी केला आहे; पण त्याच्या ६ वर्षे आधीपासून मी जागतिक सिनेमा पाहून त्यावर अभ्यासपूर्ण लिहीत आलो होतो..आणि मुख्य म्हणजे लहानपणापासून सिनेमा या माध्यमाबाबत असणारी कमालीची जिज्ञासा!

अभिनयसम्राट दिलीप कुमार आणि प्रतिभासंपन्न चित्रपटकर्ते गुरुदत्त हे काही कुठल्या इंस्टीट्युटमध्ये शिकले नव्हते; पण त्यांची उच्च अभिनय आणि दिग्दर्शन कला आज संबंधित इंस्टीट्यूट्स मधून शिकली जाते! त्यामुळे इंस्टीट्यूट्स मध्ये कोर्सेस केले म्हणजे आपण मोठे आर्टिस्ट वा डायरेक्टर झालो अशा 'बन चुके' थाटात राहू नये..मोठे केस मागे बांधून नि जीन-कुर्ता घालून सिगारेट शिलगावीत मोठ्या निर्मितीचा आव आणणे हे अखेर फोल ठरते! उगाच कशाचा कशाला 'गंध' नाही..'वळू' वळल्यासारखे चित्रपटाचे तंत्र आपल्या मर्जीनुसार कसेही वापरून चालत नाही!..ते अत्यंत जबाबदारीने नि परिपक्वपणे हाताळायला हवेय!

आणखी एक महत्वाचे नमूद करायचे म्हणजे..'चित्रपट समीक्षा' ही चित्रपटाच्या गुणात्मक वृद्धीत योगदान देऊ शकते.. पण तशी अभ्यासपूर्ण समीक्षा अगदी अभावानेच दिसते..बाकी सर्व चित्रपटाच्या आर्थिक व्यवसायास साहाय्य करणारे असते!

'कासवा'च्या गतीने वा कुवतीने का होईना आता वैश्विक स्तरावर चित्रपट उभा राहण्याची काळजी घ्या!
असो!..शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी
   ('चित्रसृष्टी')

Sunday 21 April 2019


एक श्रेष्ठ कविकल्पना


जगाचं सौंदर्य अनुभवण्याच्या नादात माणूस आपल्या परसातील पानावर पडलेल्या दवबिंदूत सामावलेले विश्व न्याहाळण्याचे विसरूनच जातो!

- मनोज कुलकर्णी

Monday 15 April 2019

राजसा...श्रृंगार रस..आणि भट!

ग़ज़ल सम्राट..कविवर्य सुरेश भट!

मराठीत गझल रचना लोकप्रिय करणारे कविवर्य सुरेश भट म्हंटले की..
"जगत मी आलो असा.." नाहीतर "उषःकाल होता होता काळरात्र झाली.!" सारखे वास्तवस्पर्शी काव्य सर्वसाधारणपणे लगेच आठवते!
संगीतकार हृदयनाथ मंगेशकर!

पण भट यांच्या श्रृंगारिक रचना सुद्धा भावतात..यात मला त्यांच्या अशा दोन रचनांचा विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो..ज्यात मुख्यत्वे 'राजसा' ला उद्देशून प्रणयाराधना करण्यात आली आहे..

"तरुण आहे रात्र अजुनी 'राजसा' निजलास का रे.?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे.?"
आणि..
"मालवून टाक दीप...चेतवून अंग अंग...
'राजसा' किती दिसात लाभला निवांत संग!"


 ख्यातनाम गायिका आशा भोसले आणि लता मंगेशकर!




दोन्ही गीते हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतात (पहिले) आशा भोसले आणि (दुसरे) लता मंगेशकर यांनी भावस्पर्शी गायली आहेत!

आज भट यांची ८७वी जयंती!


त्यांस आदरांजली!!

- मनोज कुलकर्णी


Friday 12 April 2019

डॉ. विजय देव यांचे निधन!


व्यासंगी प्राध्यापक डॉ. विजय देव यांचे पुण्यात दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले!

ख्यातनाम साहित्यिक श्रीमान गो. नी. दांडेकर यांचे ते जावई आणि लेखिका डॉ. वीणा देव यांचे पति होते; तर सुप्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी या त्यांच्या कन्या!

गोनिदांच्या जन्मशताब्दी समारंभात त्यांचे व्याख्यान ऐकल्यावर झालेली त्यांची प्रसन्न भेट मला अजूनही स्मरते!

त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 20 March 2019

कवि-गीतकार ग.दि माडगूळकर.

"या चिमण्यांनो...परत फिरा रे..
घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा.."

ग.दि माडगूळकरांचे हे हृद्य गीत अचानक स्मरले..ते आज 'जागतिक चिमणी दिन' असल्याची बातमी पाहून!
(गीतात हे मुलांस उद्देशून आहे!)


चिमण्या दिसणे आजच्या काँक्रीटच्या जंगलात दुर्मिळ झाल्याची खंत व्यक्त होत असताना हे गीत समर्पक ठरते! त्याच प्रमाणे कुटुंब-समाज व्यवस्थेबाबतही रूपकात्मक म्हणता येईल!
गायिका लता मंगेशकर.



श्रीनिवास खळे यांच्या संगीतात हे गीत मोठ्या आर्तपणे गायले होते लता मंगेशकरांनी.. 'जिव्हाळा' (१९६८) या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटासाठी!

योगायोगाने आज गबाले साहेबांचीही जयंती आहे. 'आमचा दोघांचा वाढदिवस २० मार्च 
या एकाच तारखेस असल्या'चे मी त्यांना भावुकपणे नमूद केले होते..आणि आमचा हा जिव्हाळा ते जाईपर्यंत राहिला! त्याची आठवण आणि या गीताने आज भरून आले!



माझ्या 'चित्रसृष्टी' प्रथम विशेषांकाच्या प्रकाशन समारंभास राम गबाले अध्यक्ष म्हणून आले.. त्याचे हे (उजवीकडील) मी त्यांचा सत्कार करतानाचे छायाचित्र!

त्यांच्या स्मृतीस अभिवादन!!



- मनोज कुलकर्णी

Thursday 14 March 2019

मराठी ग़ज़लसम्राट सुरेश भट्ट यांचा आज १६ वा स्मृतिदिन!


'रंग माझा वेगळा' ह्या त्यांच्या काव्यसंग्रहातील ही हृदय ग़ज़ल इथे सादर...

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!
जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!
स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!
वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा...
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

त्यांस विनम्र भावांजली!!


सुवर्णमहोत्सवी मराठी चित्रपटांचे सम्राट..दादा कोंडके!


विलक्षण लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपटकर्ते दादा कोंडके यांचा आज २१ वा स्मृतीदिन!

'विच्छा'ने रंगभूमी गाजवून, मग बाबांच्या (भालजी पेंढारकर) 'तांबडी माती' सारख्या चित्रपटात काम केल्यानंतर दादा कोंडके यांनी स्वतंत्रपणे मराठी चित्रपटाचा फड गाजवायला १९७० मध्ये सुरवात केली आणि 'सोंगाड्या', 'एकटा जीव सदाशीव' पासून ते 'वाजवू का' अशी ते जाईस्तोवर (१९९८) अफलातून विनोदी चित्रपटांची मालीकाच मराठी प्रेक्षकांपुढे सदर केली आणि त्यांना मनमुराद हसवले !
'सोंगाड्या' (१९७०) मध्ये दादा कोंडके व उषा चव्हाण!

भोळाभाबडा मराठी नायक ही दादा कोंडके यांची पडद्यावरील प्रतिमा होती! मात्र त्यांचे द्विअर्थी संवाद नि गाणी हा समीक्षकांचा कायम टीकेचा विषय राहीला..पण ते त्यांच्या प्रचंड प्रेक्षक वर्गास हवे तसे चित्रपट करीत राहिले! आणि सर्वाधिक (९) चित्रपट रौप्यमहोत्सवी झाल्याबद्दल त्यांचे नाव 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ' मध्ये नोंदले गेले !

मराठी चित्रपटसृष्टीतील त्या अर्थाने ते दादाच होते..तसा त्यांचा आविर्भाव अन कमालीचा मिश्कीलपणा आम्ही चित्रपट पत्रकारांनी त्यांच्या गप्पांच्या मेफलीत अनुभवला आहे..हा फड ते एकतर्फीच गाजवीत! त्यांच्या द्विअर्थी टोमण्यातून कुणीही सुटले नव्हते..

अगदी टीकाकार, पत्रकारही नाही!

त्यांना ही भावांजली !!


- मनोज कुलकर्णी

Saturday 2 March 2019

इसाक मुजावर..भारतीय चित्रपटाचा चालता-बोलता इतिहास!

चित्रपट इतिहासतज्ञ, समीक्षक व चित्रपट विषयक नियतकालिकांचे संपादक इसाक मुजावर यांना जाऊन आता चार वर्षे होऊन गेली!

मराठी चित्रपट पत्रकारितेतील इसाक मुजावर हे शिखरावर असलेले, प्रमाण मानले गेलेले नाव! भारतीय चित्रपटाचा चालता बोलता इतिहास असे त्यांस संबोधले जायचे! १९५५ साली सुरु झालेली त्यांची चित्रपट पत्रकारिता 'तारका', 'रसरंग'चे कार्यकारी संपादक ते स्वतःचे 'चित्रानंद' व नंतर अनेक दैनिके, नियतकालिकांतून फुलत गेली! चित्रपट विषयक लेखनातील त्यांचा शब्द हा शेवटचा मानला जायचा..पुढे त्यांची तीसेक पुस्तकेही प्रसिद्ध झाली! चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांच्या लेखनात स्वाभाविकपणे अनौपचारिकपणा असायचा!

अभ्यासपूर्ण चित्रपट विषयक लेखन करणाऱ्या आम्हा चित्रपट पत्रकारांचे इसाक मुजावर हे एक प्रेरणास्रोत होते! त्यांच्या 'चित्रानंद' मध्ये लेखन होऊ शकले नाही, कारण मी चित्रपट पत्रकारितेत आलो १९८३ मध्ये..(१९९५ नंतर 'रसरंग' मध्ये लिखाण झाले पण ते तिथे नसताना) पुढे मात्र माझ्या स्वतःच्या 'चित्रसृष्टी' दिवाळी अंकासाठी त्यांचा लेख घेण्याचा योग आला! मला आठवतेय २००२ च्या आसपास मी मुंबईत कांदिवलीच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटलो होतो; तेंव्हा मी स्वतःचे चित्रपट विषयक नियतकालिक सुरु केल्याचे त्यांना कौतुक वाटले!

त्यावेळी त्यांच्याशी झालेला मनमोकळा संवाद आठवतोय. त्या सुमारास भन्साळीचा नवा 'देवदास' प्रदर्शित झाला होता. त्यावर मार्मिक टिपणी करताना ते म्हणाले होते ''करायला गेला 'देवदास' अन झाला 'पाकीझा'!'' आमच्यासाठी दिलीपकुमारचा 'देवदास' हा मानदंड होता! पुढे त्यांच्याशी दिलखुलास गप्पा व्हायच्या आणि आपल्या खास टिपणीवर तेच टाळीसाठी हात पुढे करायचे! 'रागिणी' चित्रपटात नायक किशोरकुमारला मोहम्मद रफींच्या आवाजात "मन मोरा बावरा.." आळवताना पाहिल्याचा विषय निघाला, तेंव्हा ते म्हणाले होते ''आधी ती भूमिका भारत भूषण करणार होता म्हणून रफींच्या आवाजात ते गाणं आधीच रेकॉर्ड झाल होतं!'' असे चित्रपट इतिहासाचे अनेक दाखले त्यांच्याकडे होते..अशोककुमारनी दिलीपकुमारला काय सल्ला दिला..वगैरे. त्यामुळे त्यांची गप्पांची मैफल कधी संपू नये वाटे!

माझ्या 'चित्रसृष्टी' दिवाळी अंक, २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेला 'ट्रैजिडी किंग, एंटी हीरो ते एंग्री यंग मैन' हा त्यांचा कदाचित शेवटचा लेख असावा! याबाबतही एक हृद्य आठवण अशी आहे की मी हा विषय त्यांना दिल्यावर त्यांनी 'चित्रसृष्टी' साठी मला लेख तर दिलाच, पण नंतर विस्ताराने त्यावर पुस्तकही लिहिले 'मास्टर विठ्ठल ते अमिताभ' आणि त्याच्या प्रास्ताविक मनोगतात शेवटच्या दोन परिच्छेदांत माझा उल्लेख करून श्रेयही दिले! ते वाचून अक्षरशः भरून आले! मीही 'चित्रसृष्टी'च्या त्या दिवाळी अंकात मला मिळालेल्या त्यांच्या प्रोत्साहनाचा आवर्जून उल्लेख केला!

त्यांचा 'चित्रभूषण' सन्मानाने यथोचित सत्कार झाला होता. तसे त्यांना अन्य संबंधित पुरस्कारही मिळाले!

चित्रपट इतिहासाची ती रसिली मैफल आता पोरकी झालीये!!

 त्यांस भावांजली!!!

- मनोज कुलकर्णी

Monday 25 February 2019


बहुआयामी व्यक्तिमत्व श्रीधर माडगुळकर!
'गदिमा' पुत्र श्रीधर माडगुळकरांचे आकस्मित झालेले निधन धक्का देऊन गेले; याचे कारण काही दिवसांपूर्वीच (६ फेब्रुवारीला) त्यांना इथे मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या!

'गदिमा साहित्य कला अकादमी' चे ते विश्वस्त तर होतेच; पण पत्रकारिता-साहित्य आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रांत भरीव कार्यांने त्यांनी आपली स्वतंत्र ओळखही निर्माण केली होती. मग 'जिप्सी' सारखे त्यांचे युवा मासिक असो वा 'आठी आठी चौसष्ट' सारखे कादंबरी लेखन! तसेच नव्या युगाची चाहुल लागल्यावर 'जाळं' हे इंटरनेट नियतकालिक सुरु करणेही! आणि माडगुळे गावात विकास प्रतिष्ठान द्वारे त्यांनी केलेले समाजकार्य!
आपल्या पुस्तकांसह 'गदिमा' पुत्र श्रीधर माडगुळकर!

मला आठवते उमेदीच्या काळातील त्यांचा राजकारणातील सहभाग..पूर्वी ते जेंव्हा विधानसभेसाठी 'काँग्रेस' तर्फे उभे होते, तेंव्हा पुण्यात त्यांच्या प्रचारासाठी आशा पारेख सारखे लोकप्रिय सिने कलावंत आले होते. तेंव्हापासून ते नंतर 'गदिमा प्रतिष्ठाना' तर्फे होणाऱ्या कार्यक्रमांतून मी त्यांना पाहत नि भेटत आलो! ते एक कलासक्त, प्रतिष्ठित नि अदबशीर व्यक्तिमत्व होते!

त्यांस माझी भावपूर्ण श्रद्धांजली!

- मनोज कुलकर्णी

Thursday 21 February 2019

'मानिनी'..जयश्री गडकर!

मराठी चित्रतारका जयश्री गडकर यांच्या दोन काळांतील प्रतिमा!
मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील तारका जयश्री गडकर यांचा आज ७७ वा जन्मदिन!

'सांगत्ये ऐका' (१९५९) मध्ये जयश्री गडकर व सूर्यकांत!
आपल्या अदाकारीने रुपेरी पडदा गाजवणाऱ्या ह्या अभिनेत्रीची कारकीर्द नृत्यकुशल बालकलाकार म्हणून सुरु झाली..आणि १९५५ मध्ये शांताराम बापूंच्या 'झनक झनक पायल बाजे' या संध्या नायिका असणाऱ्या हिंदी चित्रपटात ती प्रथम नर्तिकांमध्ये दिसली! त्यानंतर लेखक-दिग्दशर्क दिनकर द. पाटील यांच्या 'दिसतं तसं नसतं' मध्ये राजा गोसावींबरोबर तिने लहान भूमिका केली...आणि १९५९ मध्ये तिला स्टार करणारा तूफान हिट चित्रपट आला..अनंत माने यांचा 'सांगत्ये ऐका'!
'मानिनी' (१९६१) मध्ये जयश्री गडकर!

तसे पाहता हंसा वाडकर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या 'सांगत्ये ऐका' तमाशापटात "बुगडी माझी सांडली गं.." या हिट गाण्यावर दिलखेच नृत्य करणाऱ्या जयश्री गडकरने प्रेक्षकांना जिंकले! मग एकीकडे 'अवघाची संसार' (१९६०) सारखे शहरी तर दुसरीकडे 'मोहित्यांची मंजुळा' (१९६३) सारखे ऐतिहासिक नि 'एक गाव बारा भानगडी' (१९६८) सारखे ग्रामीण व 'महासती सावित्री' (१९७३) सारखे पौराणिक..असे यशस्वी चित्रपट करीत ती आघाडीची अभिनेत्री झाली!
'साधी माणसं' (१९६५) मध्ये सूर्यकांत व जयश्री गडकर!

या दरम्यान अनंत माने यांचा पं. महादेवशास्त्री जोशींच्या कथेवरील 'मानिनी' (१९६१) आणि बाबा..भालजी पेंढारकरांचा सूर्यकांत यांच्या बरोबरील 'साधी माणसं' (१९६५) ह्या दोन महत्वपूर्ण सामाजिक चित्रपटांतून जयश्री गडकर ने  अभिनयाचा कस लावणाऱ्या व्यक्तिरेखा स्वाभाविकपणे साकारल्या..त्यांसाठी 'उत्कृष्ठ अभिनेत्री'चे पुरस्कारही तिला  मिळाले!


'सारंगा' (१९६१) या हिंदी चित्रपटात जयश्री गडकर!
याच काळात जयश्री गडकर ने 'मदारी' (१९५९) व 'सारंगा' (१९६१) सारख्या काही हिंदी चित्रपटांतूनही सुंदर भूमिका रंगवल्या. यांतील गाणीही गाजली! पुढे दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरही रामानंद सागर याच्या 'रामायण' (१९८६) या भव्य पौराणिक मालिकेत त्या कौशल्या होऊन अवतरल्या..तर यात दशरथाची भूमिका केली होती त्यांचे अभिनेता-पति बाळ धुरी यांनी!

सुमारे २५० मराठी व हिंदी चित्रपटांतून 

जयश्री गडकर यांनी कामे केली. पुढे 
निर्मिती-दिग्दर्शनही केले. 
'अशी मी जयश्री' हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले! 

त्यांच्या निर्मितीतील चित्रपटाच्या प्रीमिअर वेळी झालेली अनौपचारीक चर्चा आठवते.. आणि त्यातून त्यांनी 'मानिनी'ची वास्तवातही कायम ठेवलेली प्रतिमाही!


अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी
   ('चित्रसृष्टी')

Saturday 16 February 2019

हमारी याद आएंगी..!

तडफदार अभिनेता रमेश भाटकर!
मराठी नाट्य-चित्रपट व मालिका यांतील हरहुन्नरी कलावंत रमेश भाटकर यांच्या निधनाची बातमी चटका लावून गेली!

 'अश्रुंची झाली फुले' या गाजलेल्या नाटकात प्रभाकर पणशीकरांबरोबर रमेश भाटकर!
अभिनयाच्या सुरुवातीच्या काळातच रंगभूमीवर गाजलेल्या 'अश्रुंची झाली फुले' मध्ये प्रभाकर पणशीकरांसारख्या खंदया अभिनेत्यासमोर रमेश भाटकर चा बेदरकार लाल्या तुफान दाद घेऊन जायचा! 

'हृदयस्पर्शी' चित्रपटात निशिगंधा वाड आणि रमेश भाटकर!
१९७७ च्या सुमारास त्याने 'चांदोबा चांदोबा भागलास का?' चित्रपटाद्वारे मराठी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर 'दुनिया 
करी सलाम' व 'आपली माणसं' सारख्या चित्रपटांतून विविध प्रकारच्या भूमिका रंगविल्या. कालांतराने (अलका कुबल बरोबरील) 'युगंधरा' आणि 'कमांडर', 'हॅलो इन्स्पेक्टर' सारख्या मालिकांतून त्याने 
छोट्या पडद्यावर उत्तम भूमिका केल्या!

सुमारे ९० (मराठी-हिंदी सह) चित्रपटांतून रमेश भाटकर यांनी काम केले. अखेरच्या काळात त्यास काही संस्थांचे जीवनगौरव पुरस्कार घेताना पाहताना कसेसच झाले होते; कारण असा ज्येष्ठत्वाचा लवलेशही त्याच्याकड़े नव्हता..हे त्याच्या बरोबर मराठी चित्रपटांच्या पार्टीत बसलेल्या आम्हा सिने पत्रकारांनी अनुभवलेय. रुबाबात धुंदित वावरणारे ते कलासक्त नि रसिक व्यक्तिमत्व होते!
वडिल प्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकारांसमवेत 
अभिनेता-पुत्र रमेश भाटकर!

एकदा मैफलित..त्याचे वडिल (दिवंगत) प्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकारांच्या अभिजात गीतांचा विषय निघाला..तेंव्हा मी 'फ़रियाद' (१९६४) मधले "वो देखो देख रहा था पपीहा.." सारखी गाणी खुद्द त्याच्या वडिलांकडून अनौपचारिक भेटीत ऐकल्याचे' सांगताच तो भारावला होता!

'जागतिक कर्करोग दिनी' त्याच आजाराने त्यास हे जग सोडावे लागणे ह्यास काय म्हणावे?

अशा प्रसंगी एका मैफलित त्याने ऐकवलेले स्नेहल भाटकरांचेच अजरामर गीत आठवते...

"कभी तनहाइयों में यूँ हमारी याद आएगी..."

त्यांस भावांजली!!!

- मनोज कुलकर्णी
  ('चित्रसृष्टी')

मराठी पाऊल पडते कुठे.?


मागच्या वर्षी..'९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलना'चे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणी वर पाहत होतो आणि त्यात व्यासपीठा मागे बाराखडी लिहिलेली पाहून वैषम्य वाटले!..म्हणजे पुन्हा मूळाक्षरांपर्यंत भाषा आलीये का? 
(अर्थात बडोद्यात याची दखल कोणी घेतली असेल!)

तेंव्हाच मागे पुण्यात झालेल्या '७५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलना'ची आठवण झाली..
त्यावेळी व्यासपीठामागे '७५ वे अमृत महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन' असे लिहिलेले होते..
त्यावर तत्कालिन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनीही 'अमृतमहोत्सवी म्हणजे ७५ वे असे लिहावे लागते का?' असे उपहासात्मक भाष्य केले होते!

मराठी अस्मितावाल्यांनी गंभीरपणे विचार करावा!!

- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी', पुणे)

Monday 4 February 2019

चित्रपटविषयक साहित्य उपेक्षितच!


'९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' नुकतेच पार पडले! मात्र एक खंत व्यक्त करावीशी वाटते की..चित्रपट विषयक साहित्यास अद्यापही साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर कधी स्थान मिळालेले नाही..किंबहुना ते अभिजात साहित्यात गणले जात नाही!

याबाबत पूर्वीपासून (गदिमांसारख्यांकडूनही) नाराजी व्यक्त होत आली आहे. वास्तविक पाहता किती तरी (वि.स. खांडेकर, पु.भा. भावे, साने गुरुजी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे ते आनंद यादव सारख्यांचे) अभिजात साहित्य हे मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आले आहे..आणि काही साहित्यिकांचे साहित्य (पुस्तक, कादंबरी) हे त्यावरील चित्रपट लोकप्रिय झाल्यावर जास्त वाचले गेले आहे.

लिखित साहित्य लोकप्रिय करण्यात चित्रपट माध्यमाचे योगदान हे केवळ मराठी पुरतेच मर्यादित नाही; तर अन्य प्रादेशिक व परदेशी भाषांतील साहित्याबाबतही हे होत आले आहे..यांत प्रेमचंदजींचे हिंदी 'गोदान', शरतचंद्र चट्टोपाध्याय यांचे बंगाली 'देवदास' ते मार्गारेट मिशेल यांचे इंग्लिश 'गॉन विथ द विंड', गुस्तोव्ह फ्लुबर्ट यांचे फ्रेंच 'मादाम बोव्हारी' व लिओ टोलस्टोय यांचे रशियन 'ऍना कॅरेनिना' सारखे अभिजात साहित्य उदाहरणादाखल देता येईल! 


या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी 'साहित्य ते चित्रपट' सारख्या परिसंवादासारखे काही कार्यक्रम, याबाबतची समीक्षा व लेखन याबाबतचे विचारमंथन आगामी काळात होणे अपेक्षित आहे...तूर्त शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 3 February 2019

बहुचर्चित नि वादाचे '९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' नुकतेच आटोपले!
या पार्श्वभूमीवर ३० वर्षांपूर्वीचा आठवलेला हा वेगळा क्षण..

एके काळी (चित्रपट पत्रकारितेबरोबरच) औद्योगिक नियतकालिकाचा सल्लागार संपादक म्हणून कार्यरत असताना तत्कालिन (१९९७) संमेलनाध्यक्ष श्रीमान ना. स. इनामदार यांच्या हस्ते 'गदिमा पुरस्कारा'ने माझा सत्कार झाला होता!..ते हे छायाचित्र!!

- मनोज कुलकर्णी

Thursday 17 January 2019

'पिफ्फ' झालाय निरसवाणा!


आतापर्यंत 'पिफ्फ' ला जागतिक चित्रपटाशी बांधिलकी खातिर नि चित्रपटकर्ते-संचालक यांच्याबाबतच्या जिव्हाळ्यामुळे उपस्थित राहत होतो; पण गेल्या काही वर्षांपासून त्यातील रस जाऊ लागलाय. याचे मुख्य कारण म्हणजे त्यातले राजकारण आणि एका-दोघा तथाकथित क्रीएटिव्सवाल्यांची त्यातील मक्तेदारी!

'पिफ्फ' च्या सुरुवातीच्या काळात त्यास प्रोत्साहनपर माझ्या 'चित्रसृष्टी' मध्ये मी बरेच लिहिले; मात्र (काहींच्या त्यातील प्रवेशामुळे) कालांतराने त्यांत (चित्रपट निवडीसह) निर्माण होत गेलेल्या त्रुटींवर मी वारंवार लिहित आलोय. पण त्यांत काही फरक जाणवत नाही; उलट 'तथाकथित चित्रपट तज्ञां'चा मनमानीपणा दिसून येतो. त्यामुळे आता यावर काही लिहू नये वाटते!

'पिफ्फ' राज्य सरकारचा अधिकृत चित्रपट महोत्सव झाला; पण इथे तो काहींचा खाजगी असल्यासारखेच वाटते! त्याची सुत्रे तथाकथित क्रीएटिव्स डायरेक्टर व हेड असणाऱ्यांकडे गेल्याचे जाणवते. चित्रपट निवड समितीत त्यांची वाढती नावे, वार्तालाप व कार्यक्रम यांत त्यांचा वरचष्मा (का मिरवणे) हे दिसून येते!

आता 'पिफ्फ' च्या समारोपास उपस्थित राहू नये वाटते. त्यांतील सत्कार समारंभात क्रीएटिव्स डायरेक्टर स्टेजवर आल्यावर त्या थिएटरमध्ये व्हॉलेंटिअर्स आदी व्यवस्था (अरेरावीने) पाहणारा..मागे बसलेल्या मुलांना टाळ्या वाजवून जल्लोष करायचा इशारा करतो हे निदर्शनास आलेय! हे तथाकथित 'चित्रपट गुरु'ची विद्यार्थीप्रियता भासविण्यासाठी! असे भोंगळ चित्र पाहणे नि ते राजकारण नकोसे झालेय!

इथून पुढे आवश्यक बदल/सुधारणांसह 'पिफ्फ' चांगल्या मुक्त वातावरणात व्हावा ही अपेक्षा!!

- मनोज कुलकर्णी

Monday 7 January 2019

कसली भाषिक अस्मिता..नि कुठेय अभिव्यक्ती?


ज्येष्ठ लेखिका श्रीमती नयनतारा सहगल!
ख्यातनाम लेखिका श्रीमती नयनतारा सहगल यां आगामी '९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे करणार असणारे उद्घाटन अचानक रद्द झाल्याचे कळल्यावर खेद वाटला!

मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास अमराठी साहित्यिकांस नापसंती दर्शविणे ही कसली भाषिक अस्मिता? तसेच त्यांचे परखड भाषण गैरसोईचे होईल असे आयोजकांस वाटणे हे अभिव्यक्ति स्वातंत्र्यास तिलांजली देण्यासारखेच!

श्रीमती सहगल या आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या भाच्ची असून, इंग्रजीमध्ये त्यांचे विपुल लेखन प्रसिद्ध झाले आहे. २०१५ मध्ये त्यांनी वाढत्या असहिष्णुते मुळे तसेच सांस्कृतिक विविधता जपण्याच्या चिंतेतून आपला 'साहित्य अकादमी पुरस्कार' परत केला होता!..ही पार्श्वभूमी इथे लक्षात घ्यावी!

तर ही कसली भाषिक अस्मिता जी दुसऱ्या भाषांचा अनादर करते?..आणि कुठे आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य परखडपणे व्यक्त होण्याचे?

अशा गोष्टींचा निषेध!..आशा आहे हे वातावरण बदलेल!!

- मनोज कुलकर्णी
  ['चित्रसृष्टी']