Monday 25 February 2019


बहुआयामी व्यक्तिमत्व श्रीधर माडगुळकर!
'गदिमा' पुत्र श्रीधर माडगुळकरांचे आकस्मित झालेले निधन धक्का देऊन गेले; याचे कारण काही दिवसांपूर्वीच (६ फेब्रुवारीला) त्यांना इथे मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या!

'गदिमा साहित्य कला अकादमी' चे ते विश्वस्त तर होतेच; पण पत्रकारिता-साहित्य आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रांत भरीव कार्यांने त्यांनी आपली स्वतंत्र ओळखही निर्माण केली होती. मग 'जिप्सी' सारखे त्यांचे युवा मासिक असो वा 'आठी आठी चौसष्ट' सारखे कादंबरी लेखन! तसेच नव्या युगाची चाहुल लागल्यावर 'जाळं' हे इंटरनेट नियतकालिक सुरु करणेही! आणि माडगुळे गावात विकास प्रतिष्ठान द्वारे त्यांनी केलेले समाजकार्य!
आपल्या पुस्तकांसह 'गदिमा' पुत्र श्रीधर माडगुळकर!

मला आठवते उमेदीच्या काळातील त्यांचा राजकारणातील सहभाग..पूर्वी ते जेंव्हा विधानसभेसाठी 'काँग्रेस' तर्फे उभे होते, तेंव्हा पुण्यात त्यांच्या प्रचारासाठी आशा पारेख सारखे लोकप्रिय सिने कलावंत आले होते. तेंव्हापासून ते नंतर 'गदिमा प्रतिष्ठाना' तर्फे होणाऱ्या कार्यक्रमांतून मी त्यांना पाहत नि भेटत आलो! ते एक कलासक्त, प्रतिष्ठित नि अदबशीर व्यक्तिमत्व होते!

त्यांस माझी भावपूर्ण श्रद्धांजली!

- मनोज कुलकर्णी

Thursday 21 February 2019

'मानिनी'..जयश्री गडकर!

मराठी चित्रतारका जयश्री गडकर यांच्या दोन काळांतील प्रतिमा!
मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील तारका जयश्री गडकर यांचा आज ७७ वा जन्मदिन!

'सांगत्ये ऐका' (१९५९) मध्ये जयश्री गडकर व सूर्यकांत!
आपल्या अदाकारीने रुपेरी पडदा गाजवणाऱ्या ह्या अभिनेत्रीची कारकीर्द नृत्यकुशल बालकलाकार म्हणून सुरु झाली..आणि १९५५ मध्ये शांताराम बापूंच्या 'झनक झनक पायल बाजे' या संध्या नायिका असणाऱ्या हिंदी चित्रपटात ती प्रथम नर्तिकांमध्ये दिसली! त्यानंतर लेखक-दिग्दशर्क दिनकर द. पाटील यांच्या 'दिसतं तसं नसतं' मध्ये राजा गोसावींबरोबर तिने लहान भूमिका केली...आणि १९५९ मध्ये तिला स्टार करणारा तूफान हिट चित्रपट आला..अनंत माने यांचा 'सांगत्ये ऐका'!
'मानिनी' (१९६१) मध्ये जयश्री गडकर!

तसे पाहता हंसा वाडकर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या 'सांगत्ये ऐका' तमाशापटात "बुगडी माझी सांडली गं.." या हिट गाण्यावर दिलखेच नृत्य करणाऱ्या जयश्री गडकरने प्रेक्षकांना जिंकले! मग एकीकडे 'अवघाची संसार' (१९६०) सारखे शहरी तर दुसरीकडे 'मोहित्यांची मंजुळा' (१९६३) सारखे ऐतिहासिक नि 'एक गाव बारा भानगडी' (१९६८) सारखे ग्रामीण व 'महासती सावित्री' (१९७३) सारखे पौराणिक..असे यशस्वी चित्रपट करीत ती आघाडीची अभिनेत्री झाली!
'साधी माणसं' (१९६५) मध्ये सूर्यकांत व जयश्री गडकर!

या दरम्यान अनंत माने यांचा पं. महादेवशास्त्री जोशींच्या कथेवरील 'मानिनी' (१९६१) आणि बाबा..भालजी पेंढारकरांचा सूर्यकांत यांच्या बरोबरील 'साधी माणसं' (१९६५) ह्या दोन महत्वपूर्ण सामाजिक चित्रपटांतून जयश्री गडकर ने  अभिनयाचा कस लावणाऱ्या व्यक्तिरेखा स्वाभाविकपणे साकारल्या..त्यांसाठी 'उत्कृष्ठ अभिनेत्री'चे पुरस्कारही तिला  मिळाले!


'सारंगा' (१९६१) या हिंदी चित्रपटात जयश्री गडकर!
याच काळात जयश्री गडकर ने 'मदारी' (१९५९) व 'सारंगा' (१९६१) सारख्या काही हिंदी चित्रपटांतूनही सुंदर भूमिका रंगवल्या. यांतील गाणीही गाजली! पुढे दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरही रामानंद सागर याच्या 'रामायण' (१९८६) या भव्य पौराणिक मालिकेत त्या कौशल्या होऊन अवतरल्या..तर यात दशरथाची भूमिका केली होती त्यांचे अभिनेता-पति बाळ धुरी यांनी!

सुमारे २५० मराठी व हिंदी चित्रपटांतून 

जयश्री गडकर यांनी कामे केली. पुढे 
निर्मिती-दिग्दर्शनही केले. 
'अशी मी जयश्री' हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले! 

त्यांच्या निर्मितीतील चित्रपटाच्या प्रीमिअर वेळी झालेली अनौपचारीक चर्चा आठवते.. आणि त्यातून त्यांनी 'मानिनी'ची वास्तवातही कायम ठेवलेली प्रतिमाही!


अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी
   ('चित्रसृष्टी')

Saturday 16 February 2019

हमारी याद आएंगी..!

तडफदार अभिनेता रमेश भाटकर!
मराठी नाट्य-चित्रपट व मालिका यांतील हरहुन्नरी कलावंत रमेश भाटकर यांच्या निधनाची बातमी चटका लावून गेली!

 'अश्रुंची झाली फुले' या गाजलेल्या नाटकात प्रभाकर पणशीकरांबरोबर रमेश भाटकर!
अभिनयाच्या सुरुवातीच्या काळातच रंगभूमीवर गाजलेल्या 'अश्रुंची झाली फुले' मध्ये प्रभाकर पणशीकरांसारख्या खंदया अभिनेत्यासमोर रमेश भाटकर चा बेदरकार लाल्या तुफान दाद घेऊन जायचा! 

'हृदयस्पर्शी' चित्रपटात निशिगंधा वाड आणि रमेश भाटकर!
१९७७ च्या सुमारास त्याने 'चांदोबा चांदोबा भागलास का?' चित्रपटाद्वारे मराठी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर 'दुनिया 
करी सलाम' व 'आपली माणसं' सारख्या चित्रपटांतून विविध प्रकारच्या भूमिका रंगविल्या. कालांतराने (अलका कुबल बरोबरील) 'युगंधरा' आणि 'कमांडर', 'हॅलो इन्स्पेक्टर' सारख्या मालिकांतून त्याने 
छोट्या पडद्यावर उत्तम भूमिका केल्या!

सुमारे ९० (मराठी-हिंदी सह) चित्रपटांतून रमेश भाटकर यांनी काम केले. अखेरच्या काळात त्यास काही संस्थांचे जीवनगौरव पुरस्कार घेताना पाहताना कसेसच झाले होते; कारण असा ज्येष्ठत्वाचा लवलेशही त्याच्याकड़े नव्हता..हे त्याच्या बरोबर मराठी चित्रपटांच्या पार्टीत बसलेल्या आम्हा सिने पत्रकारांनी अनुभवलेय. रुबाबात धुंदित वावरणारे ते कलासक्त नि रसिक व्यक्तिमत्व होते!
वडिल प्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकारांसमवेत 
अभिनेता-पुत्र रमेश भाटकर!

एकदा मैफलित..त्याचे वडिल (दिवंगत) प्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकारांच्या अभिजात गीतांचा विषय निघाला..तेंव्हा मी 'फ़रियाद' (१९६४) मधले "वो देखो देख रहा था पपीहा.." सारखी गाणी खुद्द त्याच्या वडिलांकडून अनौपचारिक भेटीत ऐकल्याचे' सांगताच तो भारावला होता!

'जागतिक कर्करोग दिनी' त्याच आजाराने त्यास हे जग सोडावे लागणे ह्यास काय म्हणावे?

अशा प्रसंगी एका मैफलित त्याने ऐकवलेले स्नेहल भाटकरांचेच अजरामर गीत आठवते...

"कभी तनहाइयों में यूँ हमारी याद आएगी..."

त्यांस भावांजली!!!

- मनोज कुलकर्णी
  ('चित्रसृष्टी')

मराठी पाऊल पडते कुठे.?


मागच्या वर्षी..'९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलना'चे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणी वर पाहत होतो आणि त्यात व्यासपीठा मागे बाराखडी लिहिलेली पाहून वैषम्य वाटले!..म्हणजे पुन्हा मूळाक्षरांपर्यंत भाषा आलीये का? 
(अर्थात बडोद्यात याची दखल कोणी घेतली असेल!)

तेंव्हाच मागे पुण्यात झालेल्या '७५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलना'ची आठवण झाली..
त्यावेळी व्यासपीठामागे '७५ वे अमृत महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन' असे लिहिलेले होते..
त्यावर तत्कालिन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनीही 'अमृतमहोत्सवी म्हणजे ७५ वे असे लिहावे लागते का?' असे उपहासात्मक भाष्य केले होते!

मराठी अस्मितावाल्यांनी गंभीरपणे विचार करावा!!

- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी', पुणे)

Monday 4 February 2019

चित्रपटविषयक साहित्य उपेक्षितच!


'९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' नुकतेच पार पडले! मात्र एक खंत व्यक्त करावीशी वाटते की..चित्रपट विषयक साहित्यास अद्यापही साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर कधी स्थान मिळालेले नाही..किंबहुना ते अभिजात साहित्यात गणले जात नाही!

याबाबत पूर्वीपासून (गदिमांसारख्यांकडूनही) नाराजी व्यक्त होत आली आहे. वास्तविक पाहता किती तरी (वि.स. खांडेकर, पु.भा. भावे, साने गुरुजी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे ते आनंद यादव सारख्यांचे) अभिजात साहित्य हे मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आले आहे..आणि काही साहित्यिकांचे साहित्य (पुस्तक, कादंबरी) हे त्यावरील चित्रपट लोकप्रिय झाल्यावर जास्त वाचले गेले आहे.

लिखित साहित्य लोकप्रिय करण्यात चित्रपट माध्यमाचे योगदान हे केवळ मराठी पुरतेच मर्यादित नाही; तर अन्य प्रादेशिक व परदेशी भाषांतील साहित्याबाबतही हे होत आले आहे..यांत प्रेमचंदजींचे हिंदी 'गोदान', शरतचंद्र चट्टोपाध्याय यांचे बंगाली 'देवदास' ते मार्गारेट मिशेल यांचे इंग्लिश 'गॉन विथ द विंड', गुस्तोव्ह फ्लुबर्ट यांचे फ्रेंच 'मादाम बोव्हारी' व लिओ टोलस्टोय यांचे रशियन 'ऍना कॅरेनिना' सारखे अभिजात साहित्य उदाहरणादाखल देता येईल! 


या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी 'साहित्य ते चित्रपट' सारख्या परिसंवादासारखे काही कार्यक्रम, याबाबतची समीक्षा व लेखन याबाबतचे विचारमंथन आगामी काळात होणे अपेक्षित आहे...तूर्त शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 3 February 2019

बहुचर्चित नि वादाचे '९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' नुकतेच आटोपले!
या पार्श्वभूमीवर ३० वर्षांपूर्वीचा आठवलेला हा वेगळा क्षण..

एके काळी (चित्रपट पत्रकारितेबरोबरच) औद्योगिक नियतकालिकाचा सल्लागार संपादक म्हणून कार्यरत असताना तत्कालिन (१९९७) संमेलनाध्यक्ष श्रीमान ना. स. इनामदार यांच्या हस्ते 'गदिमा पुरस्कारा'ने माझा सत्कार झाला होता!..ते हे छायाचित्र!!

- मनोज कुलकर्णी