Thursday 10 December 2020

सर्जनशील संगीतकार हरपला!

संगीतकार नरेंद्र भिडे!

संगीत क्षेत्रात नवं काही करू पाहणाऱ्या नरेंद्र भिडेंचं अकाली जाणं हे सर्वांनाच हुरहूर लावून गेलंय!

मराठी नाटक ते दूरचित्रवाणी मालिका यांसाठी संगीत करताना त्याने अनेक प्रयोग केले. चित्रपट क्षेत्रात सुद्धा आपल्या अनोख्या पार्श्वसंगीतानं त्यानं लक्ष वेधून घेतलं होतं. अजूनही फिल्मी पार्टीत त्यांचं स्मितहास्य करीत बोलणं आठवतं!

साधारण वर्षापूर्वी आमचं फोनवर बोलणं झालं होतं. माझ्या 'शायराना' मधील काही रचना संगीतबद्ध होऊ शकतील का या संदर्भात आम्ही भेटणार होतो. पण मधे हा कोरोनाचा लॉकडाऊन आला!..आणि आता ते राहून गेले!

माझी त्यांस भावांजली!!

- मनोज कुलकर्णी 

Monday 7 December 2020

दूरदर्शनवरील भारदस्त पाटील व्यक्तिमत्वाचा अस्त!

दिग्गज कलावंत रवि पटवर्धन!

फक्त दूरदर्शनच अस्तित्वात होतं त्या काळी ह्या छोट्या दृक-श्राव्य पडद्याचं अप्रूप मोठं होतं. संध्याकाळी सर्व कार्यक्रम पाहिले जात..'चित्रगीत' ते अगदी 'आमची माती आमची माणसं'..त्यात भारदस्त गावपाटील साकारत रवि पटवर्धन!

भारदस्त पाटील सकारलेले रवि पटवर्धन!
 
त्यानंतर त्यांनी 'सिंहासन', 'प्रतिघात' सारख्या मराठी-हिंदी चित्रपटांतून विविधरंगी भूमिका रंगवल्या. पुढे कालांतराने दूरचित्रवाणी रंगीत होऊन, विविध वाहिन्यांचं जाळं पसरलं आणि त्यांतील मालिकांमधून ते चरित्र भूमिकांत दिसू लागले.

ते गेल्याची बातमी आल्यावर कृष्ण-धवल दूरदर्शन वरील त्यांचा तो रंगतदार पाटीलच डोळ्यासमोर आला!

त्यांस भावांजली!!

- मनोज कुलकर्णी

 

Friday 23 October 2020

विशेष लेख:

रूपगुणसंपन्न पण दुर्दैवी अभिनेत्री..रंजना!

लोभस सौन्दर्यवती रंजना!

१९८० च्या दशकात मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर लोभस सौन्दर्य नि बहारदार अभिनय असणारी सुपरस्टार होती..रंजना! माझी त्या काळातील आवडती अभिनेत्री!

'झुंज' (१९७७) चित्रपटात रंजना!

 

प्रसिद्ध अभिनेत्री संध्या ही रंजनाची मावशी! तिच्या बरोबर आई वत्सला देखमुख सुद्धा चित्रपटात काम करायची. स्वाभाविकपणे बालवयातच रंजना पडद्यावर चमकली. १९६३ चा तो हिंदी चित्रपट होता 'हरिश्चंद्र तारामती'! त्यानंतर ख्यातनाम चित्रकर्ते व्ही. शांताराम यांनी १९६६ मध्ये हिंदी-मराठी दोन्ही भाषेत निर्मिलेल्या 'लडकी संह्याद्री की' चित्रपटात तिने छोटी भूमिका रंगवली. याची नायिका तिची मावशी संध्या होती. तिची आई सुद्धा यात होती, पण आपल्या मुलीने या क्षेत्रात येऊ नये असा त्यांचा कटाक्ष होता! त्यामुळे शिक्षणावर लक्ष केंद्रित करून रंजनाने 'रुईया महाविद्यालयातून 'तत्वज्ञान व साहित्य' यामध्ये पदवी संपादन केली!

'चानी' (१९७७) चित्रपटात रुपेरी केस नि गौर कांतीची रंजना!

अखेर शांतारामबापूंमुळेच १९७५ मध्ये 'चंदनाची चोळी अंग अंग जाळी' या मावशी संध्या ची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाद्वारे तिने या क्षेत्रात प्रवेश केला. पुढे १९७७ मध्ये त्यांचा पुत्र किरण शांताराम दिग्दर्शक झाल्यावर आपल्या 'झुंज' चित्रपटात त्याने रंजनास नायिका म्हणून सादर केले. आधुनिक वळणाच्या या चित्रपटात तिचा नायक होता रविंद्र महाजनी! यातील तरुण वर्गास उद्देशून असणारे गाणे "कोण होतास तू काय झालास तू.." गाजले! याच वर्षी 'असला नवरा नको गं बाई' मध्ये ग्रामीण ढंगातील राजा गोसावी बरोबर तिने काम केले!

'सुशीला' (१९७८) चित्रपटात शिक्षिकेच्या भूमिकेत रंजना!
या दरम्यान रंजनाच्या वेगळ्या आकर्षक रूपाचे दर्शन घडले ते व्ही. शांताराम यांच्या 'चानी' चित्रपटातून. चि.त्र्यं.खानोलकर यांच्या कथेवरील या चित्रपटात भारतीय मराठी स्त्री व इंग्रज अधिकारी यांच्या मिलापातून जन्माला आलेल्या नि तत्कालीन समाजाने नाकारलेल्या मुलीची आगळीवेगळी भूमिका तिने छान साकारली! त्यानंतर १९७८ मध्ये अनंत माने यांच्या 'सुशीला' चित्रपटात शिक्षिकेची अत्याचाराने झालेली वाताहत दर्शवणारी आव्हानात्मक भूमिका तिने वठवली. पूर्वार्धात ज्ञानार्जनाचे कार्य करणारी सुसंस्कृत आणि उत्तरार्धात परिस्थितीमुळे वाममार्गास लागलेली बेदरकार अशा दोन टोकाच्या व्यक्तिरेखा तिने यात बेमालूमपणे रंगवल्या!

'अरे संसार संसार' (१९८०) चित्रपटात रंजना व कुलदीप पवार!

१९८० च्या सुमारास संवेदशील चित्रकर्ते राजदत्त यांच्या 'अरे संसार संसार' चित्रपटात रंजनाची अभिनयाचा कस लावणारी महत्वपूर्ण भूमिका होती. ह्यातील "काळ्या मातीत मातीत तिफन चालते.." हे विठ्ठल वाघ यांचे गीत आणि त्यांत नायक असलेल्या कुलदीप पवार बरोबर शेत नांगरणारी तिची कर्तबगार स्त्री प्रभावी होती. तसेच यात पुढे वृद्धावस्थेत मुलांचे संसार सावरण्यापर्यंत असणारी तिची व्यापक भूमिका हृदयास भिडली! यासाठी तिला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' चा राज्य पुरस्कार मिळाला! यानंतर दत्ताजींच्या 'मुंबईचा फौजदार' ह्या हलक्या फुलक्या चित्रपटात रवींद्र महाजनी बरोबरची तिची भूमिका तशी खुमासदार होती.

'गोंधळात गोंधळ' (१९८१) चित्रपटात रंजना व अशोक सराफ!
हरहुन्नरी अशोक सराफ बरोबर रंजनाची पडद्यावर जोडी जमली. १९८१ मध्ये आलेल्या व्ही. के. नाईक यांच्या 'गोंधळात गोंधळ' या हिट चित्रपटात तिचं त्याला "ओ पॅन्टवालं s" म्हणून हाक मारणं काही वेगळच होतं! पुढे नाईकांचाच 'खिचडी', सतीश रणदिवे यांचा 'बहुरूपी' (१९८३), मुरलीधर कापडी यांचा 'बिनकामाचा नवरा' (१९८४) सारख्या चित्रपटांतून त्यांनी पडदा गाजवला! ते वास्तव जीवनात एकत्र येणार होते!

'सुशीला' (१९७८) चित्रपटात दुसऱ्या बेदरकार भूमिकेत रंजना!

अण्णासाहेब देऊळगावकर यांचा 'सासुरवाशीण' (१९७८) व जी. जी. भोसले यांचा 'लक्ष्मीची पाऊले' (१९८२) असे कौटुंबिक चित्रपट एकीकडे; तर दुसरीकडे कापडी यांचा 'भुजंग' (१९८२) अन वसंत पेंटरांचा 'जखमी वाघीण' (१९८४) असे सामाजिक चित्रपट तिच्या वैशिष्ठपूर्ण भूमिकेने लक्ष वेधत असत. सुशिक्षित, सालस, संवेदनशील बरोबरच अल्लड, बंडखोर भूमिका ही ती खुबीने रंगवीत असे! 'सुशीला' मध्ये एकीकडे "सत्यम शिवम सुंदरा.." अशी वर्गात प्रार्थना घेणारी शिक्षिका आणि यातच नंतर तमाशा फडावर "कुन्या गावाचं आलं पाखरू?.." गाण्यातील अवखळ फक्कड..अशा परस्पर विरोधी भूमिकांत रंजनाने भरलेले अनोखे रंग लाजवाब होते! तिचे असे चित्रपट तुफान गाजले!

अखेर 'फक्त एकदाच' नाटकात रंजना!
मात्र हे सर्व नियतीला पाहवले नाही की काय कोण जाणे! व्ही. शांताराम यांच्या 'झंजार' (१९८७) च्या चित्रीकरणासाठी बंगलोरला जाताना गाडीचा अपघात होऊन रंजनास अपंगत्व आले. यातून उभारी घेऊन १९९३ च्या सुमारास तिने व्हील चेअर वर बसून 'फक्त एकदाच' या नाटकात भूमिका साकारली आणि याचे ३८ प्रयोग यशस्वी केले! शेवटी तिचा जगण्याचा संघर्ष ३ मार्च, २००० रोजी थांबला!

रंजनास मी प्रथम पाहिले-भेटलो तेंव्हा चित्रपट पत्रकारितेत यायचो होतो. पुण्यात 'विजय टॉकीज' मध्ये 'गोंधळात गोंधळ' चित्रपटाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा प्रसिद्ध अभिनेता शशी कपूर च्या उपस्थितीत झाला आणि त्यास मी गेलो होतो..आणि तिथे तिला प्रथम पाहिले. मला आठवते तेंव्हा ती शेजारी बसलेल्या अशोक सराफ ला सांगत होती की 'शशी कपूर ला जाऊन नमस्कार कर!'

चित्रपट पत्रकारितेत आल्यावर रंजनाची भेट झाली. पुण्यात 'फक्त एकदाच' या तिच्या नाटकाचा तो प्रयोग..प्रियकराने कठीण प्रसंगी साथ सोडलेल्या स्त्रीची व्यथा त्यात तिने (स्वाभाविकपणे) व्यक्त केली. त्या प्रयोगानंतर मी तिला भेटायला स्टेजवर गेलो..तर पडदा पडूनही ती त्या भूमिकेत अत्यंत भावुक होऊन बसली होती! मी पुढे गेलो आणि नमस्कार करीत त्या मनस्थितीत तिच्याशी दोन शब्द बोललो "हृदय हेलावलं रंजनाजी!" तिचे डोळे पाणावले होते..आमच्या हातांचे भावनिक स्पर्श झाले!

रंजनाला जाऊन आता वीस वर्षे झाली!..पण अजूनही तिची ती शेवटची भेट आठवली की मला गहिवरून येते!!

- मनोज कुलकर्णी

Tuesday 20 October 2020

भावांजली!!!


कल्याण च्या साहित्य विश्वात अनेक वर्षे कार्यरत असलेले आणि 'काव्य किरण मंडळा'चे अध्यक्ष किरण जोगळेकर यांचे परवा दुःखद निधन झाल्याचे कळाले!


कविता आणि वैचारिक लेखनाची त्यांची जवळपास ७५ पुस्तके प्रकाशित झाली होती. साहित्य संमेलनासारख्या अनेक उपक्रमांत त्यांचा हिरीरीने सहभाग असे!


२००४ मध्ये माझ्या 'चित्रसृष्टी' दिवाळी अंकास पहिल्यांदा त्यांच्याच 'साहित्य विचार मंथन' संस्थे कडून गौरविण्यात आले. त्यानंतर आमचे संबंध वृद्धिंगत होत गेले!


त्यांस माझी भावपूर्ण श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

Saturday 17 October 2020

स्मिताचा कॅमेरा आय!


आपली प्रतिभासंपन्न अभिनेत्री स्मिता पाटील एक उत्तम दिग्दर्शिका झाली असती!

अतिशय मनस्वी नि संवेदनशील असणाऱ्या तिची फोटोग्राफ़ी सुद्धा पाहण्याजोगी होती. समाज वास्तव ती बोलकेपणाने कॅमेऱ्यात टिपत असे.

दिग्दर्शिका म्हणून सामाजिक, वास्तववादी चित्रपट तिने असेच प्रभावी रीतीने चित्रित केले असते..आणि त्यांतून स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडली असती!

तिचा पुत्र-अभिनेता प्रतिक बब्बर ने शेयर केलेले हे दुर्मिळ छायाचित्र आढळल्यावर या विचाराने मन हेलावले!

आज तिच्या जन्मदिनी व्यक्त केलेली ही रुखरुख!

सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

 

Wednesday 7 October 2020

एक्सक्लुजिव्ह लेख!!


'स्टुडिओ सिस्टीम'..शिस्त व जिव्हाळा!

पुणे येथे सुप्रसिद्ध 'प्रभात फिल्म कंपनी' ची उभारणी होत असताना!

बदलत्या काळानुसार 'स्टुडिओ सिस्टिम' इतिहास जमा झाली! चित्रपट विस्तारत गेला आणि तो इनडोअरच्या सेट्स द्वारे उभारलेल्या कृत्रिम दृश्य निर्मितीतून बाहेर आला.. आवश्यक असणारी सृष्टी मधील प्रत्यक्ष दृश्ये चित्रित करण्यासाठी आऊटडोअर चित्रण होऊ लागले!


कलकत्त्ता येथील नामांकित 'न्यू थिएटर्स' स्टुडिओ.
या ओघात पूर्वी स्टुडिओत सेवेत असणारे दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ आपली प्रतिभा विस्तारण्यासाठी बाहेर पडले आणि 'फ्रीलान्स वर्किंग' ची पद्धती आली! हे बदल प्रगतीकडे नेण्यासाठी आवश्यक होते; 
पण 'स्टुडिओ सिस्टिम' च्या संस्कारांस जणू तिलांजली देणारे ठरले! चित्रपट कलेचे पूजक स्टुडिओस जणू मंदिर मानायचे आणि समर्पित भावनेने काम करायचे. निर्माते व दिग्दर्शकां प्रति आदरभावना ठेवून असायचे. (अर्थात तो काळ आणि चित्रकर्ते तसे होते!) यासंदर्भात चित्रपट क्षेत्रांतील काही जुन्या व्यक्तींकडून मला माहिती मिळत गेली.

भालजी पेंढारकर यांचा कोल्हापूरचा प्रसिद्ध 'जयप्रभा स्टुडिओ'!
पुण्यात जिथे 'एफटीआयआय' आहे तिथे पूर्वी आपली सुप्रसिद्ध 'प्रभात फिल्म कंपनी' होती. तिचे एक अध्वर्यु व नामवंत कला-दिग्दर्शक शेख फत्तेलाल यांचे पुत्र आणि चित्रकर्ते बाबासाहेब फत्तेलाल ह्यांच्याशी एकदा बोलताना त्यांनी वडिलांच्या काळातील 'प्रभात'च्या आठवणी सांगितल्या. 'फत्तेलाल साहेब चित्रपटासाठी हुबेबूब सेट्स उभारित. 'माणूस' ची चाळ असो वा 'शेजारी' चा धरणाचा बांध! विदेशी तंत्रज्ञ ते बघायला खास येत!' असे नमूद करुन ते म्हणाले "त्या काळात 'प्रभात' च्या मालकांचा इतका आदरयुक्त दरारा होता की, कामाची वेळ संपली तरी मालक गेल्या शिवाय नोकर मंडळी गेट बाहेर पडत नसत. तेंव्हा व्हायचे असे की दामले साहेब आणि फत्तेलाल साहेब गेट बाहेर यायचे, पण पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या कामाच्या नियोजनाबद्दल बराच वेळ तिथेच बोलत बसायचे. तेंव्हा नोकरमंडळी गेटपाशी ताटकळत उभी राहायची. मग (समोरच राहत असलेले) मालक रस्ता क्रॉस करुन गेले की सर्व बाहेर पडायचे!" हे ऐकून मी भरावलो होतो!

राज कपूर चा मुंबई मधील 'आरके स्टुडिओ'!

तसेच भालजी पेंढारकर यांनी आपल्या 'वाल्मिकी' (१९४६) चित्रपटात काम केल्याबद्दल पृथ्वीराज कपूर यांना मुंबईतली त्यांची काही जमीन बहाल केली नि पुढे त्यावर राज कपूर ने आपला 'आरके स्टुडिओ' उभारला!' त्यासंदर्भात एक आठवण चित्रपट इतिहासकार स्नेही इसाक मुजावर यांनी नमूद केली होती की..'बऱ्याच वर्षांनी राज कपूर जेंव्हा आपल्या सत्कारानिमित्त कोल्हापुरात आला होता, तेंव्हा "मामा" भालजींना भेटण्यासाठी त्यांच्या 'जयप्रभा स्टुडिओ' त गेला.
त्या दुपारच्या वेळी ते झोपले होते. तेंव्हा त्यांची देखभाल करणारा नोकर म्हणाला की "बाबा झोपलेत आणि त्यांना उठवता येणार नाही!" मग त्यांची भेट न होता राज कपूर परतला! ही निष्ठा होती. बाबांच्या कडक शिस्तित तयार झालेले दिग्गज कलाकार सुद्धा त्यांच्या कलेशी समर्पित आठवणी सांगत!

हिमांशु राय यांच्या 'बॉम्बे टॉकीज'चा बोर्ड!
पूर्वी माझे मुंबईत चित्रीकरणे, मुलाखती आदींसाठी विविध स्टुडिओज मधून जाणे होई. असाच एकदा 'आरके स्टुडिओ'चा फेरफटका मारताना मला तेथील जुन्या मंडळींनी तिथे निर्माण झालेल्या चित्रकृतींची माहिती दिली. त्यात 'आवारा' चे स्वप्नदृयातील नर्गिसच्या "घर आया मेरा परदेसी.." गाण्याच्या व 'श्री ४२०' मधील "प्यार हुआ इकरार हुआ.." ह्यां गाण्याच्या पाऊलखुणा आढळल्या! 'बॉबी' मध्ये ऋषि-डिंपल ने वापरलेली बाइकही एके ठिकाणी होती! 

कलकत्त्ता येथील नामांकित 'न्यू थिएटर्स' ने उत्कृष्ट सामाजिक चित्रपट दिले.मागे ज्येष्ठ स्नेही किणीकरांनी मला सांगितले होते की, ते जेंव्हा बी. एन. सरकार यांची मुलाखत घ्यायला तिथे गेले तेंव्हा आधी त्यांनी 'न्यू थिएटर्स'च्या भूमीला नमस्कार केला!

पुणे येथे 'प्रभात फिल्म स्टुडिओ' च्या जागी उभी राहिलेली 'फ़िल्म इन्स्टिटयूट'!
'बॉम्बे टॉकीज' बाबत तर एक हृदय गोष्ट सांगायची आहे. त्याच्या मालकीण देविका राणी यांच्याबरोबरच अशोक कुमार, दिलीप कुमार व मधुबाला असे प्रसिद्ध कलाकार घडविणारी ही संस्था..मालक हिमांशु राय गेल्यावर डबघाईला आली. तेंव्हा कंपनीला वाचविण्यासाठी तेथील कामगारांनी 'बॉम्बे टॉकीज वर्कर्स इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह - सोसायटी लि.' स्थापन करुन, त्याद्वारे 'बादबान' (१९५४) ह्या चित्रपटाची निर्मिती केली. फणि मजुमदार यांनी तो दिग्दर्शित केला आणि देव आनंद व मीना कुमारी सारख्या कलाकारांनी त्यात काम केले. ह्याला म्हणतात जिव्हाळा!

आता 'सध्याच्या परिस्थितीमुळे भविष्यातला चित्रपट वेगळा असेल' असे सुतोवाच सुधीर मिश्रा सारख्या दिग्दर्शकांनी केले आहे. काय सांगावे, बाह्य चित्रीकरणास मर्यादा आल्यास पुन्हा स्टुडिओत चित्रपट निर्मिती व्हायला लागेल!..एकूणच चित्रपटाची परिभाषा बदलून, त्याचे प्रदर्शनही काही अनोखे असेल!!
 
- मनोज कुलकर्णी
भाषा..एक विचारमंथन!


'कालिदास यांचे उत्कट संस्कृत प्रेमकाव्य' ते 'उर्दू भाषेची अन्य भाषांच्या तुलनेत प्रेमकाव्यातील प्रभावी उत्कटता' यावर मी लिहिले. आता एकूणच आपण संचार करीत असलेल्या प्रमुख भाषांवर थोडक्यात मुद्देसूद भाष्य करतोय!

मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या त्या तीनही भाषांमध्ये काही त्रुटी आणि व्यक्त होण्याच्या मर्यादाही आहेत. मराठी मध्ये आता अन्य (म्हणजे फ़ारसी, इंग्रजी व कानड़ी सुद्धा) शब्द इतके रूढ़ झालेत की त्यांसाठी मूळ मराठी शब्द शोधावे लागतील आणि सापडले तरी ते वापरले जातीलच असे नाही; किंबहुना ते हास्यास्पद ठरतील! तर हिंदी मध्ये सरलेल्या दिवसाला 'कल' आणि येणाऱ्या दिवसालाही 'कल' हाच शब्द वापरला जातो. तर अगदी शुद्ध हिंदी शब्द हे बऱ्याच अंशी संस्कृतकडूनच आलेले आहेत..उदा. प्रायः! इंग्रजी बाबत बोलायचे तर 'आदरार्थी बहुवचन' त्यात नाही. मान्यवर व्यक्तीस 'ही', 'शी' संबोधले जाते आणि कुत्रा, मांजर यांनाही! या तुलनेत 'अदब' हा मुळातच उर्दू भाषेचा स्थायीभाव आहे आणि त्यानुसार 'आप' ह्याच शब्दाने त्यांत संवाद सुरु होतो!

आता साहित्य निर्मितीबाबत नमूद करायचे तर 'करुण रस' हा मराठी गद्यामध्ये अधिक दिसून येतो आणि त्या तुलनेत दर्जेदार श्रृंगार रस अल्प प्रमाणात आढळतो. 'विडंबन' हा काव्य प्रकार इथे पार दिग्गजांनी सुरु केला, म्हणजे एखाद्याच्या साहित्याची टर उडवणेच; तर विनोदी साहित्य सुद्धा बऱ्याच अंशी या भाषेतील म्हणीप्रमाणेच 'टवाळा आवडे विनोद'! हिंदीत अलंकारिक शब्दरचना फारश्या न आढळता 'आम' भाषा आढळते; पण त्यांतही प्रांताप्रमाणे (उ.प्र., म.प्र. व बिहार) बदलत जाणाऱ्या बोली भाषेचे प्रतिनिधित्व फारसे आढळत नाही, तर (साचेबद्ध) विशुद्ध हिंदी दिसते! इंग्रजी तर (साहित्यनिर्मितीपेक्षा) जास्त करुन वसाहतवादासाठीची व्यवसायाभिमुख असल्यासारखी वाटते. वाइल्ड सारखे दिग्गजही याद्वारे आपले तत्वज्ञन मांडताना आपले ठोकताळे बिंबवताना जाणवतात!

नाट्यासारख्या अन्य साहित्य प्रकारात सुद्धा मराठीत ('लाडक्या व्यक्तिमत्वां'सकट अन्यही दिग्गज नावाजलेल्यांनी) अन्य कृतींवर आधारित वा अनुवादित केलेले दिसते! तर हिंदीत जननाट्य स्वरुपात हा प्रकार प्रत्यक्ष लोकांत जाऊन केलेला आढळतो! इंग्रजीत शेक्सपिअर सारखे नाट्यदिग्गज मानतो, पण त्यांच्या साहित्य प्रकारात 'सत्तेसाठी कुरघोड़ी, संधिसाधू व्यक्तिरेखा व प्रेमाच्या शोकांतिका' अधिक दिसतात. त्यांच्या रोमियोने जिथे जूलिएट तीच पूर्व दिशा व तिला सूर्य संबोधले! (म्हणजे इथे पुन्हा आम्ही म्हणू ती पूर्व दिशा हा इंग्रजी बाणा होताच असे म्हंटले तर वावगे ठरू नये!) वास्तविक ते मला भावले! तर अस्सल फ़ारसी वा उर्दू नाट्याविष्कार हे आपल्या बोलपटांस पूरक ठरल्याचे दिसते!

आता पुनःश्च 'उत्कट प्रेमकाव्य प्रकारा' बाबत असे की, मराठीत ते तेवढे तरल श्रृंगारिक आढळत नाही; तर हिंदीत त्यानुसार फारसा अलंकारिक फुलोरा नसल्याने (उर्दू शब्दांची मधे पाखरण नसेल तर) सरधोपट व्यक्त झालेले वाटते! इंग्रजी मध्ये अगदी वर्डस्वर्थ सारखे दिग्गज रोमॅंटिक कवी झाले, पण त्यांचे आविष्कार हे सर्वसामान्यांच्या भावनांपर्यंत किती पोहोचले असतील शंका आहे. प्रेमिकेसाठी शेक्सपिअरने सूर्याची उपमा दिली. या तुलनेत उर्दूतील प्रणयाराधनेत प्रेमिकेस नेहमी चंद्राची (शीतल सौंदर्याची) उपमा दिलेली आढळते..आणि रूमानी शायरांनी तिला "दुनिया-ए-हुस्न-ओ-इश्क़ का शबाब' संबोधले!

एकूण ह्या भाषांच्या बाबत असे वाटते की, कुणी 'रांगड़ी भाषा' संबोधल्याने, तर कुणी राजकीय फायद्यासाठी 'अस्मिता' केल्याने मराठीत (नकळत) माज आणला गेला. तर तिच्या संवर्धनासाठी मागे एका संस्थेने "शिव्याही द्या पण मराठीत!" असे घोषवाक्यही पुढे केले. यातून कुठल्या दर्ज्याचा विचार ते कळते! त्यांना असे का नाही वाटले लिहावे "दोन शब्द प्रेमाचे बोला पण मराठीत!" तर हिंदीला 'बम्बैय्या टपोरी' बोलीने खराब केले. तरी हिंदी सिनेमाने तारलेय! इंग्रजीत मुळातच एक कोरडेपणा नि परकेपणा जाणवतो. तरीही त्यात बोलले-लिहिले म्हणजे 'उच्छभ्रू' असा भ्रम झाल्याने (वसाहतवादी इंग्रज गेले तरी) ती आपले अवास्तव 'स्टेटस' राखुन आहे. मग काही 'अहंकारी लेखक' बोजड इंग्रजी शब्द वापरत, आंतरराष्ट्रीय लेखक होण्याची धडपड करीत बसतात!

शेवटी काय आहे की..जी भाषा भावते वा आपल्या प्रकृतीला पूरक वाटते..त्यात व्यक्त होणे आपल्याला आवडते! मला मातृभाषा मराठी बाबत आदर आहे आणि तिची भाषा भगिनी हिंदीचा सुद्धा! पण माझ्या रूमानी मिज़ाज नुसार व्यक्त होण्यासाठी माझी पसंती 'उर्दू' असते! (रोमॅंटिक 'फ्रेंच' ही मला आवडते!)..राष्ट्रभाषा हिंदीचा उर्दूशी मिलाप करुन मी लिहित असतो!

- मनोज कुलकर्णी

संस्कृत नंतर उर्दू मध्येच उत्कट प्रेमकाव्य!



चौथ्या शतकातील कालिदास यांस आद्य संस्कृत प्रेमकविच म्हणायला हवे!

'मेघदूतम' मधून नभातील मेघाद्वारे प्रेमिकेस संदेश पाठवणारे तर 'अभिज्ञान शाकुन्तलम्' मध्ये अरण्यातही सुंदर प्रेमकाव्य फुलवणारे!

हे पाहता संस्कृत भाषा उगाच केवळ (उपदेशांच्या) सुभाषितांपुरती मर्यादित आणि प्राचीन रुक्ष चौकटीत बंदिस्त केल्यासारखी वाटते!

कालिदास यांच्या सारखे आद्य संस्कृत कवि इतक्या उच्च प्रतीच्या प्रणयी भावना व्यक्त करतात, इतकी सुंदर रुपके वापरतात हे अचंबित करते! त्याचा प्रभाव मराठी काव्यसंपदेवर फारसा दिसून येत नाही. हिंदीतही बहुतांश अवास्तव लांबण लावल्या सारखे आढळते तर (फारशी साहित्याची नसलेली) इंग्रजी त्यामध्ये फार कमी पड़ते!

त्या तुलनेत उर्दू काव्यात प्रणयी भावना अधिक उत्कटपणे आणि समृद्ध शब्द-भाषा शैलीत व्यक्त झालेली प्रकर्षाने जाणवते! 
(यांत काहींना माझे उर्दू प्रेम दिसून येईल!)

मराठीतील अर्वाचिन प्रेमकाव्ये ही बऱ्याचदा उथळ जाणवतात..आणि नव कवी तर काय उगाच तावच्या ताव भरत बसतात. किती 
आशय असतो त्यांत? 

कमीत कमी शब्दांत नि ओळींत आशयघन भाव उत्कटपणे व्यक्त व्हायला हवा. रुबाई सारख्या कवितेच्या प्रकारांत हे प्रभावीपणे आढळते आणि यांत उर्दू भाषा अव्वल ठरते!

- मनोज कुलकर्णी
'धाकटी बहीण' (१९७०) चित्रपटातील या प्रेमगीतात लोभस सौन्दर्यवती अनुपमा.
"धुंदी कळ्यांना..धुंदी फुलांना..
शब्दरूप आले मुक्या भावनांना."


अल्हाददायक वाऱ्याच्या झुळकीबरोबर हे प्रेमगीत कानावर आले आणि मन 
हळुवार प्रणयी भावना साकारणाऱ्या मराठी 
चित्रपटांच्या काळात गेले!
माझ्या मोजक्या आवडत्या मराठी प्रेमगीतांपैकी हे एक!


या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त!
जगदीश खेबुडकर या सिद्धहस्त गीतकाराच्या लेखणीतून उतरलेले हे गीत सुधीर फडके यांनी आपल्या नेहमीच्या धाटणीत संगीतबद्ध करून आशा भोसलेंबरोबर गायले आहे. 'धाकटी बहीण' (१९७०) या कौटुंबिक चित्रपटातील हे गीत, पण त्यातील प्रेमी युगुलावर चित्रित झालेले!


याचे दिग्दर्शक राजदत्त असल्याने निसर्ग सान्निध्यात रममाण प्रेमिकांवर त्यांनी चित्रित केले आहे. या आधी 'मधुचंद्र' (१९६७) ह्या त्यांच्या दिग्दर्शनातील पहिल्या चित्रपटापासून दत्ताजींची ही खासियत! त्यात पण काशिनाथ घाणेकर आणि उमा ह्या प्रेमिकांवर त्यांनीं "सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गझले.." हे प्रेमगीत असेच निसर्गाच्या कुशित चित्रित केले होते. ते ही माझे आवडते!

याचे गीतकार जगदीश खेबुडकर!

अभिनेता अरुण सरनाईक आणि लोभस सौन्दर्य असणारी अभिनेत्री अनुपमा वर "धुंदी कळ्यांना." चित्रित झाले!

'धर्मकन्या', 'घरची राणी' व 'आधार' सारख्या अगदी मोजक्या चित्रपटांतून भूमिका रंगवलेली ही देखणी नटी लवकर विवाहबद्ध होऊन, चित्रपटाकडे पाठ फिरवून अमेरिकेत स्थायिक झाली!

आता पन्नास वर्षांचा कालावधी या गीतास लोटला आहे..पण त्यातील प्रेमभावना आणि अनुपमा आजही हृदयाचा ठाव घेते!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 4 October 2020

जेंव्हा पडद्यावरचे आणि वास्तवातले मुख्यमंत्री भेटतांत!


मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ तडफदार अभिनय व खर्जातील आवाज याने गाजवणारे अरुण सरनाईक यांचा आज ८५ वा जन्मदिन!

आपल्या रौप्यमहोत्सवी अभिनय-कला कारकिर्दीत ग्रामीण, शहरी व सामाजिक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका वैशिष्टपूर्ण ठरल्या!

यांत समांतर चित्रकर्ते डॉ. जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' (१९७९) मधील त्यांची भूमिका लक्षवेधी नि महत्वाची होती. अरुण साधू यांच्या त्याच शीर्षकाच्या व 'मुंबई दिनांक' ह्या कादंबरींवर हा चित्रपट आधारित होता. यात मुख्यमंत्र्यांची भूमिका अरुण सरनाईक यांनी बेमालूमपणे साकारली होती!

तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील!
त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील ती सर्वोच्च ठरली आणि त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. राजकारणीही त्यांच्या पडद्यावरील वास्तवदर्शी मुख्यमंत्री ने प्रभावित झाले होते! 

 
यासंदर्भात एका परिसंवादात अरुण सरनाईक यांनी सांगितलेली घटना थक्क करून गेली. 'त्या सुमारास (तत्कालिन मुख्यमंत्री) वसंतदादा पाटील यांना भेटण्यास ते मंत्रालयात गेले होते. तेंव्हा दादांनी उठून "या सी. एम..!" म्हणून त्यांचे स्वागत केले! आपल्या भूमिकेस मिळालेली ती खरी पावती!' असे त्यांनी नमूद केले होते!

पुढे लवकरच चित्रपट पत्रकारितेत आल्यावर अरुण सरनाईक यांना भेटण्याची संधी मला मिळाली..त्यात त्यांच्या अभिनयाची तारीफ केल्यावरचे त्यांचे ते खर्ज्यातील हसणे आजही आठवते!

ह्या दोघांस ही आदरांजली.!!

- मनोज कुलकर्णी

अजून पुराण-इतिहासात!

गेले काही महिने दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पौराणिक मालिकांचा अंमल आहे आणि गेली काही वर्षे मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपटांचे जणू पेव फुटलेय!

 
बुवांच्या प्रवचनांचा भास व्हावा असा पुराण महिमा आणि लहानपणीचे चौथीतील पुस्तक जणू चलचित्रांद्वारे पडद्यावर येतेय असे वाटण्यासारखे इतिहास दर्शन!..इतके हे ठाशीव, एकांगी (वा एकरंगी) म्हणावे असे! सध्याचे राजकीय वातावरणही यास पोषक आहे.

पाहणाऱ्यांवर याचा चांगला परिणाम किती होत असेल माहित नाही; पण यातल्या (काही अनिष्ट) तेढ निर्माण होणाऱ्या गोष्टी मात्र ते डोक्यांत घेतांत याचा प्रत्यय येतो. काय ते ऐतिहासिक चित्रपटांतील मत्सरी संवाद नि ती भडक दृश्ये! समुदायांतील सौहार्दता यांमुळे बिघडेल हे ध्यानांत घेऊन, सामाजिक सलोखा अबाधित राहण्याच्या दृष्टीने संबंधितांनी खबरदारी घ्यावी!

वास्तविक पाहता वर्तमान परिस्थितीत इतक्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत..त्याकडे ह्या मालिका-चित्रपट वाल्यांचे लक्ष कसे जात नाही याचे नवल वाटते! जनसामान्यांना किती समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना जगण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतोय. हे सामाजिक वास्तव पडद्यावर आणावे असे का नाही वाटत यांना?

सर्वपरिचित बाळबोध रंजन किती करत बसणार अन पुराण-इतिहास तरी तथ्यांसह समोर येऊ शकतो का?..त्यापेक्षा समकालिन वास्तवदर्शी चित्रपट सादर करुन संवेदनशीलता व कलाकारांस असणारी सामाजिक बांधिलकी तरी दर्शवावी!

- मनोज कुलकर्णी

अशी मराठी नाट्य संस्कृती!

 
'अश्रूंची झाली फुले' हे प्रख्यात मराठी लेखक वसंत कानेटकर यांनी १९६० च्या दशकात लिहिलेले नाटक प्रभाकर पणशीकरांनी यशस्वीपणे रंगभूमीवर आणले.

आदर्शवादी प्राध्यापक आणि बिघडलेला विद्यार्थी यांच्या आयुष्यात नियतीने घडवलेले बदल हे याचे कथा सूत्र होते! यांत पणशीकरांनी स्वाभाविकपणे प्रा. विद्यानंद आणि.. काशिनाथ घाणेकर यांनी अफलातूनरित्या विद्यार्थी लाल्या अशा प्रमुख भूमिका रंगवल्या! 
अन याचे असंख्य प्रयोग गाजवले पण पणशीकरांच्या संस्थेतील वातावरण बदलले नाही!
अशीच मराठी संस्कृती जपणारी त्यांची ही दुर्मिळ छायाचित्रे..

(वरील) नाटककार वसंत कानेटकर यांना खुर्चीवर बसून स्वतः त्यांच्यापाशी खाली बसणारे श्रेष्ठ कलावंत प्रभाकर पणशीकर! आणि..
(बाजूचे) भारतीय बैठक नि ताटांसमोर रांगोळ्या काढलेल्या अशा पंगतीत जेवतांना यांतील चित्तरंजन कोल्हटकर सारखे कलावंत आणि पणशीकर व घाणेकर!..कदाचित पंतांनी "वदनि कवळ घेता.." सुद्धा म्हंटले असेल!

आपली नाट्यसृष्टी प्रत्यक्ष अनुभवलेल्या जुन्या लोकांकडून ऐकलेल्या त्या संस्कृतीचं प्रत्यंतर अशा छायाचित्रांनी येते!

- मनोज कुलकर्णी

Saturday 3 October 2020


आपल्या महाराष्ट्राची दोन क्षेत्रांतील ही दोन उत्तुंग व्यक्तिमत्वे..
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि थोर साहित्यिक ग. दि. माडगुळकर..

त्यांच्या अनोख्या भेटीचे हे छायाचित्र गदिमांच्या १०१ व्या जयंती प्रसंगी आढळले!

"अजब तुझे सरकार.." गीत लिहिणाऱ्या गदिमांनी या भेटीत सर्वसाधारण राजकारण्यांवर कदाचित काही मार्मिक टिपणी केली असेल असे यातून दिसते! अर्थात यात दिलखुलास हसणारे चव्हाण साहेबही साहित्याची विलक्षण जाण असणारे रसिक होते! गदिमाही तेंव्हा विधान परिषदेवर आमदार होते!

ह्या दोघांस विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी


गोनीदां आणि चित्रकृती!!


'जैत रे जैत' च्या संगीत चर्चेत हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर व स्वतः गोनीदां!


यावर्षी प्रख्यात रसिक साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या साहित्यकृतींवर निघालेल्या अभिजात मराठी चित्रपटांचे स्मरण झाले!

१९६६ सालचा 'पवनाकाठचा धोबी' आणि १९७७ सालचा 'जैत रे जैत'!
ह्या दोन्ही चित्रपटांतील प्रमुख व्यक्तिरेखां प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या बंडखोर होत्या. ज्या अनुक्रमे सूर्यकांत आणि स्मिता पाटील यांनी जीव ओतून साकारल्या होत्या!

गोनीदां यांच्या साहित्यकृती वरील ही आणखी एक श्रेष्ठ चित्रकृती.. 'देवकीनंदन गोपाला' (१९७७). राजदत्त दिग्दर्शित ह्या चित्रपटात श्रीराम लागू यांनी गाडगेबाबांची भूमिका अप्रतिम साकारली होती. 

आदरांजली!!

- मनोज कुलकर्णी
 
 

आठवणीतला गणेशोत्सव!


"तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती.."

स्नेहल भाटकरांच्या संगीतात सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या ह्या गदिमांच्या गीताचे स्वर अगदी पहाटे कानावर येत आणि त्या झुंजूमुंजू वातावरणात जाग येई!

तेंव्हा आम्ही पुण्यात अगदी सदाशिव पेठेत राहायचो आणि नागनाथ पारा जवळ आमच्या गल्लीत होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवात हे वाजे! मग दिवसभर मंगेशकरांचे "गणराज रंगी नाचतो.." सारखी गाणी दुमदुमायची. तर रात्री 'शोले' च्या "मेहबूबा.." ने आरडी अन त्यावरचा नाच फॉर्म में!

लहानपणी आम्हीही (त्या भागात आता एकमेव राहिलेल्या) आपटे वाड्यात सार्वजनिक गणपती बसवायचो. धार्मिकतेपेक्षा हा मुख्यतः सामूहिक आनंदोत्सवाचा भाग असायचा. मोठे एकत्र कुटुंब असलेल्या आमच्या घरीही दहा दिवस गणपती असे. आमचे आजोबा पूजाअर्चा करायचे. वडील आणि घरचे सर्व हौसेने सजावट करायचे. आमची आई गौरी बसवायची आणि सगळे दिवस गोडधोड, मोदक यांची रेलचेल असायची!

आम्ही मुले मात्र बाहेर सार्वजनिक गणेशोत्सवाचा देखावा, सजावट यात अधिक रमायचो. संध्याकाळी वाड्यात सामूहिक आरती व्हायची आणि रोज एका घरची खिरापत यायची. या दहा दिवसांत आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचो. त्यांत काही स्तुत्य उपक्रम असायचे! नाट्य-गायन-नृत्य अशा अंगभुत गुंणांचे दर्शन यांतून घडायचे. आता हा मराठी चित्रपट दिग्दर्शक झालेला उमेश कुलकर्णी चे आजोळ (ढोल्ये आचारी) याच वाड्यात होते. यांत त्याने स्त्रीवेषात केलेल्या गमती अजून मला स्मरतात!

गणपती पाहायला जाणे हा पुण्यातला ह्यां दिवसातला ठरलेला कार्यक्रम असे. ह्यासाठी लांबचे नातेवाईक यायचे. लोक रात्री जागून त्या गर्दीत झगमगाटीचा आनंद घ्यायचे. पण मी कधी त्यांत इंटरेस्ट घ्यायचो नाही. मला लहानपणापासून सिनेमाची आवड असल्याने ह्यां दिवसांत वाड्यांत व्हिडीओ वर मस्त क्लासिक हिंदी पिक्चर्स आणून दोस्त मंडळी बरोबर पाहायचो! उत्सव समारोपात वाड्यात एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम होई. त्यांत सर्व घरांतील खास पदार्थ यायचे आणि अंगणात मोठी पंगत बसून त्यांचा सामूहिक आस्वाद घेतला जायचा!

कालांतराने लग्न नि आपापले वेगळे संसार झालेले काका-आत्या त्यांच्या कुटुंबांसह आमचे मोठे घर असल्याने शेवटच्या दिवशी आमच्या घरी जमत (ही परंपरा अजून चालू आहे). आमच्या वडिलांना सर्वांना जमवून उत्सव साजरा करायची फार हौस! घरची मोठी माऊली म्हणून आमची आई सर्वांचे मायेने करे (आणि अजूनही करते). सर्वांचे एकत्र जेवण होई.

अखेर मग मिरवणुकीने वाजत-गाजत-नाचत सार्वजनिक नि घरच्या गणपतीचे विसर्जन होई. आमच्या 'भावे हायस्कुल' मध्येही हा उत्सव साजरा होई. येथल्या व बाजूच्या 'ज्ञान प्रबोधिनी' च्या ढोल-लेझिम पथकात पण आम्ही हौसेने सामील व्हायचो!

लहानपणी काही प्रश्न माझ्या मनात यायचे, म्हणजे इवलुशा उंदरावर मोठा गणपती कसा बसत असेल, चंद्र त्यांस खरंच हसला असेल का, मग चतुर्थीला चंद्र दर्शनच कसे लागते..ते अगदी त्या हत्तीचे असे का झाले इथपर्यंत! अद्याप हे अनुत्तरित आहेत!

आता पंचवीस वर्षांहून अधिक काळ लोटलाय आम्ही इकडे कोरेगाव पार्क येथील आमच्या प्रशस्त वास्तूत राहायला येऊन! इथल्या कॉस्मोपॉलिटन वातावरणात हे उत्सव त्या सारखे दिसून येत नाहीत आणि काळ ही आता बदललाय! मलाही असल्या धार्मिक कार्यक्रमांत स्वारस्य राहिलेले नाही!

तेंव्हाचा गणेशोत्सव आणि आताचा यावर काही बोद्धिक घेत बसणार नाही. पण इतकेच नमूद करावेसे वाटते की पैशाची वारेमाप उधळपट्टी, प्रदूषण, अनिष्ट गोष्टींचा अंतर्भाव अन भलतीकडे वाहवत गेलेल्या या सार्वजनिक महोत्सवावर गंभीरपणे विचार व्हावा!

- मनोज कुलकर्णी

Monday 18 May 2020

अखेर कोरोना ने एक साहित्यिक-रंगकर्मी नेले! 
मतकरींना श्रद्धांजली!!

Sunday 10 May 2020

"आई म्हणजे (वात्सल्याने डबडबलले) गाईचे डोळे आणि (सतत धडधडणारे) सशाचे काळीज!" 
असे साने गुरुजींनी म्हंटल्याचे वाचले होते! 

मातृदिनी सर्व मातांस शुभेच्छा!! 

- मनोज कुलकर्णी

Friday 1 May 2020

आज महाराष्ट्र राज्याचा ६० वा वर्धापनदिन!
या हीरक महोत्सवी क्षणी शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी

Saturday 18 April 2020

आठवण गबालेंच्या 'देवबाप्पा' चित्रपटाची!

"नाच रे मोरा.." हे बालगीत 'देवबाप्पा' (१९५३) चित्रपटात करताना मेधा गुप्ते व बालमैत्रिणी!

"देवबाप्पा, कोरोना लवकर जाऊदे..मला बाहेर खेळायला जायचंय!" असं म्हणणारी दूरदर्शन वरील चिमुकली पाहताच मला राम गबाले यांच्या 'देवबाप्पा' (१९५३) या चित्रपटात देवाला पत्र लिहिणारी लहानगी आठवली!

'देवबाप्पा' (१९५३) चित्रपटात विवेक व चित्रा यांमध्ये मेधा गुप्ते!
प्रख्यात लेखक पु.ल. देशपांडे व ग.दि. माडगुळकर
कुणाचे निधन झाले तर लहान मुलांना जसे सांगतात की 'देवाघरी गेले'.. तसेच यातील विधवा आई आपल्या लहान मुलीला सांगते.. तेंव्हा ती तिथल्या पत्त्यावर वडिलांना पत्र लिहिते!..प्रेम माणिक यांनी ही कथा लिहिली आणि पटकथा-संवाद लिहिले ते पु. ल. देशपांडे यांनी!

'देवबाप्पा' (१९५३) चित्रपटाचे..
संवेदनशील दिग्दर्शक राम गबाले!
या चित्रपटातील.. 
ग. दि. माडगुळकर यांचे पु. लं. देशपांडे यांनीच संगीत दिलेले व आशा भोसले यांनी गायलेले बालगीत.. "नाच रे मोरा s.. आंब्याच्या वनात.." हे अजरामर झाले! अन यावर मोराचा पिसारा लेवून नाच करणारी ती चिमुकली सुद्धा..मेधा गुप्तेनी ती भूमिका फारच छान केली होती. तर चित्रा, विवेक आणि इंदिरा चिटणीस हे कलाकार तिच्या बरोबर यात होते.

माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांकाच्या प्रकाशन समारंभास राम गबाले जी अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांच्याशी चांगला 'जिव्हाळा' वृद्धिंगत झाला. मग ते 'देवबाप्पा' चित्रीकरणावेळच्या लहान मेधा गुप्तेच्या गमती-जमती सांगायचे!

आज या काळात सुद्धा ही भाबडी कल्पना अस्तित्वात आहे ही आपल्या निरागस संस्कृतीचं लक्षण असावं!

- मनोज कुलकर्णी

Friday 17 April 2020

'मनोरंजन' चे अण्णा कुलकर्णी..मराठी नाट्यसृष्टीचा आधारवड!


'मनोरंजन' पुणे या संस्थेचे संस्थापक आणि मराठी नाट्य व्यवसायाचे एका अर्थी तारणहार मनोहर कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने ९२ व्या वर्षी काल निधन झाले!

माझे स्नेही व आता त्या संस्थेची धुरा सांभाळणारे मोहन कुलकर्णी यांचे ते वडील! "अण्णा" म्हणून ते नाट्यव्यवसाया - तील त्यांच्या वर्तुळात संबोधले जायचे! नाट्यसृष्टीचा ते चालता-बोलता इतिहास तर होतेच; पण त्याचबरोबर त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी 'भावबंधन', 'अश्रूंची झाली फुले' यांसारख्या काही नाटकांतून भूमिकाही रंगवल्या होत्या. तर 'सूर्य पाहिलेला माणूस' या त्यांनी निर्मित केलेल्या नाट्यकृतीस पुरस्कार मिळाले! 


तसा त्यांच्याशी माझा परिचय जुना होता. 'मनोरंजन' संस्थेचे कार्यालय जेंव्हा पुण्यात 'विजय टॉकीज' च्या तळाशी होते तेंव्हापासून! त्यावेळी माझ्या लेखनासाठी मराठी चित्रपट कलाकारांचे रंगभूमीवरील कामाचे काही फोटोज घेण्यासाठी मी त्यांच्याकडे जात असे. तेव्हा चांगल्या सहकार्याबरोबरच पूरक माहितीही ते देत असत..अगदी पडद्यामागीलही!

पुढे नाटकाबरोबर चित्रपट प्रसिद्धी व्यवसायातही 'मनोरंजन' ने प्रवेश केला. याचे निमित्त झाले भावे-सुकथनकरचा 'दोघी' हा (रेणुका दफ्तरदार व सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका असलेला) चित्रपट! १९९६ मध्ये दिल्ली ला झालेल्या आपल्या 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (इफ्फी) तील 'इंडियन पॅनोरमा'त तो चित्रपट मी पाहिला होता. पण असे चित्रपट थिएटर मध्ये येणे अवघड असते. त्यावेळी मोहन कुलकर्णींना याबाबत मी सुचवले..आणि पुढे ('एनएफडीसी' द्वारे) तो पुण्यात प्रदर्शित होण्यासाठी त्याची प्रसिद्धी त्यांनी सांभाळली! नंतर आमचा स्नेह वृद्धिंगत होत गेला. दरम्यान 'मनोरंजन' च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यासही मी उपस्थित होतो!

पुढे २००२ ला माझा 'चित्रसृष्टी' विशेषांक सुरु झाला..त्यास पुरस्कार मिळाले. त्याचे ते कौतुक करीत! दरम्यान त्यांच्या 'मनोरंजन' चे कार्यालय वर 'विजय टॉकीज' पाशीच आले. त्यानंतर मग तिथे जाणे होई आणि..नव्या मराठी चित्रपट व्यवसायाबद्दल मोहन कुलकर्णींशी चर्चाही! त्यावेळी आत बसलेल्या अण्णांना नमस्कार केल्याशिवाय मी परतलो नाही!

'नाट्य परिषदे'च्या पुणे शाखेचे अण्णा अध्यक्ष होते. तर 'पुणे महानगरपालिके' तर्फे 'बालगंधर्व पुरस्कार' देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता!

त्यांस श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

Thursday 16 April 2020

"सप्तपदी हे रोज चालते.." हे पी. सावळाराम, वसंत प्रभू व लता मंगेशकर या त्रयीचे गाणे आता एकदम आठवले!

Saturday 11 April 2020

'महात्मा फुले' चित्रपट मुहूर्ताची दुर्मिळ छायाचित्रे!!


थोर भारतीय समाजसुधारक आणि विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती!

१९५४ साली साहित्यिक-चित्रकर्ते प्र. के. अत्रे यांनी त्यांच्या जीवनावर 'महात्मा फुले' हा मराठी चित्रपट निर्मिला होता.. आणि बाबुराव पेंढारकर यांनी त्यात ही शिर्षक भूमिका साकारली होती! याच्या मुहूर्त सोहळ्यास 'भारतरत्न' घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सपत्निक आले होते!
त्याची ही छायाचित्रे:-
कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, माई आंबेडकर, बाबुराव पेंढारकर व आचार्य अत्रे!

बाबुराव पेंढारकर व अन्य कलाकारांवर 'महात्मा फुले' ह्या मराठी चित्रपटाचे चित्रित झालेले दृश्य!

यास 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा' चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता!

सर्वांस आदरांजली!!!

- मनोज कुलकर्णी

Tuesday 7 April 2020

आजच्या 'जागतिक आरोग्य दिनी' या कठीण काळात कोरोना पासून सर्वांना वाचविण्याच्या कार्यात समर्पित सर्व डॉक्टर्स, नर्सेस व संबंधित यांच्या प्रति कृतज्ञता वक्त करून..त्यांना शुभेच्छा! 


- मनोज कुलकर्णी

Sunday 5 April 2020

ज्ञानदीप (?) उजळूदे..!!!

'प्रभात' च्या 'शेजारी' (१९४१) या कृष्ण/धवल चित्रपटातील "लख लख चंदेरी तेजाची.." हे मशाल नृत्य!
आजच्या 'दिवे लावण्याच्या' दिवशी व्ही. शांताराम यांच्या दोन मराठी चित्रपटांतील ही - मशाल दृश्ये आठवली..


(डाव्या बाजूचे छायाचित्र) त्यांनी आपल्या 'राजकमल कलामंदिर' साठी दिग्दर्शित केलेल्या 'पिंजरा' (१९७२) या रंगीत चित्रपटातील संध्या चे "ज्वानीच्या आगीची मशाल हाती." नृत्य;


(उजव्या बाजूचे छायाचित्र) तत्पूर्वी त्यांनी 'प्रभात फिल्म क.' साठी दिग्दर्शित केलेल्या 'शेजारी' (१९४१) या कृष्ण/धवल चित्रपटातील "लख लख चंदेरी तेजाची.." हे मशाल नृत्य!


दोन्हीचे संदर्भ वेगळे..(वरचे चित्र) मूल्य ऱ्हास सूत्रासाठीच्या पटकथेसाठीचे; तर (खालचे चित्र) मूल्य उदात्तीकरण पटकथेसाठीचे!

आजचे ९-९ चे दिवे लावणे कुठे घेऊन जाणार? 


- मनोज कुलकर्णी