Wednesday 31 October 2018

स्वरमय स्मृती ठेवूनी जाती!

दिग्गज सुगम गीत-संगीतकार यशवंत देव!

"जीवनात ही घडी अशीच राहू दे.."

असे आपल्या स्वरमय जीवनगीतात तल्लिन राहिलेले दिग्गज सुगम गीत-संगीतकार यशवंत देव अखेर हे जग सोडून गेले!
यशवंत देव आणि अभिजात संगीतकार अनिल बिस्वास!

यशवंत देव यांचे "जीवनात ही घडी अशीच राहू दे.." हे 
लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे साकार करताना सुजाता!
स्वतः गीतलेखन करीत असल्याने यशवंत देव यांचे संगीत हे शब्दप्रधान होणे स्वाभाविकच होते; म्हणूनच मंगेश पाडगावकर आणि ग्रेस यांसारख्या कवींच्या गीतांनाही त्यांनी भावगर्भ स्वरसाज चढविला! यांत कवि अनिल यांचे "नको जाऊ कोमेजुन माझ्या प्रितीच्या फुला.." आणि मंगेश पाडगांवकर यांचे "दिवस तुझे हे फुलायचे.." अशी तरल प्रेमगीते होती; तर कुसुमाग्रजांचे "काही बोलायचे आहे.." आणि ग्रेस यांचे "हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद स्वराने.." सारखी आर्त भावपूर्ण गीते होती!

यशवंत देव यांची स्वतःचीही गीते संवेदशील होती..ज्यांत होते "माणसांच्या गर्दीत माणूस माणसाला शोधत आहे.." आणि "अशी धरा असे गगन सजेल का..?" सारखा आशावाद! तर त्यांनी चित्रपटांसाठी संगीतबद्ध केलेली गाणीही गाजली..ज्यांत "येशील येशील येशील राणी.." हे वसंत बापट यांचे होते. त्यांची अनेकविध गाणी अरुण दाते ते अगदी फडके नि मंगेशकरांनी गायली. त्यांच्यावर भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिजात संगीतकार अनिल बिस्वास यांचा प्रभाव होता!

यशवंत देव यांना अनेक मानसन्मान मिळाले. यांत 'गादिमा पुरस्कार' आणि 'लता मंगेशकर पुरस्कार' यांचा विशेषत्वाने समावेश होतो!

त्यांच्यावर आचार्य रजनीश (ओशो) यांच्या तत्वज्ञानाचाही प्रभाव होता..याची प्रचिती त्यांच्या जीवनाविषयीच्या काही गाण्यांतून प्रकर्षाने येते..ज्यांत "विश्वाचा खेळ मांडिला आम्ही.." सारखी त्यांची होती; तर काही त्यांनी संगीतबद्ध केलेली पाडगांवकरांची "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.."

त्यांस श्रद्धांजली वाहताना त्यांचे हृदय गाणे आठवते..
"अशी पाखरें येतीं आणिक स्मृती ठेवूनी जाती.."

- मनोज कुलकर्णी
   ['चित्रसृष्टी']

Sunday 28 October 2018

मराठी रंगभूमी-चित्रपटाच्या सुवर्णकाळातील स्टार!

डॉ. काशिनाथ घाणेकर..मराठी रंगभूमी-चित्रपटाच्या सुवर्णकाळातील स्टार!

'मधुचंद्र' (१९६७) मध्ये "सुरावटीवर तुझ्या." गीतात डॉ. काशिनाथ घाणेकर व उमा!

'आधार' (१९६९) मधील "माझ्या रे प्रीती फुला.." गीतात डॉ. काशिनाथ घाणेकर व अनुपमा!
'गारंबीचा बापू' (१९८०) चित्रपटात गीता सिद्धार्थ व डॉ. काशिनाथ घाणेकर!
"अल्ला जाने क्या होगा आगे!"
'मधुचन्द्र' या चित्रपटात आपले भुरे केस मागे उडवीत लोभस नायिका उमा कडे प्रेमाचा कटाक्ष टाकीत हिंदीतील हा डायलॉग फेकणारा तो प्रेमवीर म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर! 'संवादफेक' ही क्रिया शब्दशः त्यांनीच जास्त वापरली..म्हणूनच 'डायलॉग फेकणारा' असेच इथे लिहिले!

तसेच हिंदीतील आपले मातब्बर अभिनेते दिलीप कुमार यांच्या कपाळावर ज्याप्रमाणे केस रूळत..तसेच काहीसे डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या बाबतीत होते आणि बोलताना मोठया ऐटीत ते आपले केस मागे घेत! त्याचबरोबर त्यांच्या भराभर बोलण्यात एक दिलखेचक लय असे..काहीशी हिंदीतील प्रसिद्ध प्रणयी नायक देव आनंद च्या एका दमात संवाद म्हणणारी; पण आवाजात भावगर्भता असे! निळसर डोळ्यांत एक प्रकारची बेफ़िकीरी दिसून येई!

 

हे आठवण्याचे कारण म्हणजे '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' नामक मराठी चित्रपट येऊ घातल्याचे कळले..आणि त्याचा प्रोमो पाहताना त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण अभिनयातील व्यक्तिरेखा डोळ्यासमोर तरळल्या!

पेशाने डॉक्टर असणारे काशिनाथ घाणेकर हे डेंटल सर्जन होते; पण आपल्याकडे कलेवरील प्रेमाखातर रंगभूमी आणि चित्रपटाकडे डॉक्टरांचे वळणे हा जणू प्रघात..त्यानुसारच अभिनयाची उत्तम जाण असलेले तेही या कला क्षेत्रांकडे आले! यांत रंगभूमीवर 'अश्रुंची झाली फुले' आणि 'रायगडाला जेंव्हा जाग येते' सारख्या दर्जेदार नाटकांतुन त्यांनी लाजवाब भूमिका साकारल्या आणि रूपेरी पडद्यावर श्र. ना. पेंडसे यांचा 'गारंबीचा बापू' बेमालूम साकारला!


'दादी माँ' (१९६६) या हिंदी चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर आणि तनुजा!

तसे १९५३ मध्ये 'धर्म पत्नि' या मराठी चित्रपटाद्वारे डॉ. काशिनाथ घाणेकर पडद्यावर आले. त्यानंतर 'पाठलाग' (१९६०) सारख्या चित्रपटांतून त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारल्या. यांत भालजी पेंढारकरांच्या 'मराठा तितुका मिळवावा' (१९६४) मध्ये घोड्यावर बसून "शूर आम्ही सरदार.." असे गात रूबाबात जाणारी त्यांची व्यक्तिरेखा सर्वांनाच भावली!  

पण प्रमुख नायक म्हणून त्यांस प्रसिद्धी मिळाली ती 'मधुचंद्र' (१९६७) या तरल प्रेमपटातून..याचे विशेष म्हणजे कालांतराने वास्तववादी चित्रपट दिग्दर्शित करणारे राजदत्त यांचा हा पहिला आणि उत्तम व्यवसाय केलेला चित्रपट! यात "सुरावटीवर तुझ्या उमटती.." हे प्रेमगीत काशिनाथजी व उमा यांनी उत्कटपणे साकार केले होते. माझ्या आवडत्या मराठी प्रेमपटांपैकी हे एक चित्र!  
'हा खेळ सावल्यांचा' (१९७६) मध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर व आशा काळे!

केवळ मराठी चित्रपटा पुरते डॉ. काशिनाथ घाणेकर मर्यादित राहिले नाहीत, तर १९६६ मध्ये त्यांनी अशोक कुमार व बीना रॉय यांच्या भूमिका असणाऱ्या 'दादी माँ' द्वारे हिंदी चित्रपटातही प्रवेश केला..यात "ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी.." या प्रसिद्ध गाण्यात सर्वांनी त्यांस पाहिलेय! तर 'अभिलाषा (१९६८) या हिंदी चित्रपटात ते नंदा बरोबर आले!

१९७६ साली आलेल्या 'हा खेळ सावल्यांचा' या गूढरम्य मराठी चित्रपटातील डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका ही तशी शेवटचीच! यातले "गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय.." हे आशा काळे बरोबरचे त्यांचे नृत्य-गीत गाजले..ज्यात हेमंत कुमार यांनी त्यांस आवाज दिला होता! १९८० पर्यंतचा वीस वर्षांचा काळ त्यांनी आपल्या अनेकविध भूमिकांनी गाजवला! मात्र १९८६ मध्ये एका नाटकाच्या दौऱ्यावर असताना ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे अकाली निधन झाले!

आपल्या आदरणीय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनाजींच्या कन्या कांचनताई यांच्या बरोबर डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे लग्न झाले होते. त्यांनी मग 'नाथ हा माझा' हे डॉ. घाणेकर यांचे आत्मचरित्र लिहिले!

साधारण तीसएक वर्षांपूर्वी पुण्यात मराठी चित्रपट कलावंतांचे संमेलन भरले होते. त्यावेळी 'टिळक स्मारक मंदिरा' त पायजमा-हिरवा कुर्ता परिधान केलेले डॉ.काशिनाथ घाणेकर यांना मी ओझरते भेटलो! त्यावेळी भिंतीला टेकून उभे असणाऱ्या त्यांच्यात पूर्वीचा चार्म राहिला नव्हता!

त्यांच्या स्मृतीस ही शब्दांजली!!

- मनोज कुलकर्णी 
  ['चित्रसृष्टी']

Saturday 27 October 2018

नायरसाहेबांना अभिवादन!

२००२ मध्ये माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांक प्रकाशन समारंभात श्री. पी. के. नायर यांचा सत्कार करताना मी!
आज 'वर्ल्ड डे फॉर ऑडियो-विज़ुअल हेरीटेज'..म्हणजेच 'विश्व दृक-श्राव्य वारसा दिन'!

याप्रसंगी विश्व सिनेमाचे जतन करण्याचे मोलाचे कार्य केलेल्या आपल्या 'राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय' ('एन.एफ.ए.आय.') चे संस्थापक व विख्यात चित्रपट इतिहासकार..आदरणीय (दिवंगत) श्री. पी. के. नायर यांस विनम्र अभिवादन!

- मनोज कुलकर्णी

Friday 26 October 2018

शास्त्रीय गायक-संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर..८१!


पंडित हृदयनाथ मंगेशकर.

मंगेशकर संगीत परिवारातील एक दिग्गज गायक-संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आज ८१ वा वाढदिवस!
पंडित हृदयनाथ मंगेशकर गाताना!

पिता दीनानाथ मंगेशकर आणि उस्ताद अमीर खांसाहेबांचे सांगीतिक संस्कार असलेले हृदयनाथ मंगेशकर यांचे भावगीत गायनही त्या धरतीनेच येते!
'महानंदा' (१९८५) च्या "माझे राणी माझे मोगा.." गाण्याचे दृश्य!

१९५५ साली मराठी चित्रपट 'आकाश गंगा' पासून त्यांची संगीतकार म्हणून कारकीर्द सुरु झाली आणि नंतर मराठी व हिंदी चित्रपटांस त्यांचे अभिजात संगीत लाभले!

मग 'संसार' चे "दयाघना.." असो वा 'निवडुंग' चे "केंव्हा तरी पहाटे.." आणि हिंदीतील 'धनवान' मधील "ये आँखे देखकर.." वा 'लेकिन' मधील "केसरीया बालमा.." तर 'महानंदा' च्या "माझे राणी माझे मोगा.." सारख्या गाण्यांतून त्यांनी गोव्याच्या लोकसंगीताचा चांगला वापर केला!
माता-पिता यांच्या फोटोंसह मंगेशकर बंधु-भगिनी (डावीकडून)
 उषाताई, मीनाताई, आशाताई, हृदयनाथजी व लतादीदी!

"ये रे घना.." नि "मी डोलकर.." सारखी त्यांनी संगीतबद्ध केलेली अन्य गाणीही गाजली आणि मंगेश पाडगावकर, सुरेश भट व ग्रेस यांच्या त्यांनी स्वरबद्ध केलेल्या काव्यरचनाही! तर मंगेशकर बंधु-भगिनींनी गायलेले सावरकरांचे "सागरा प्राण तळमळला.." गीत हृदयस्पर्शीच!

त्यांच्याशी झालेल्या भेटी आज आठवतायत.. यात चित्रकर्ते राम गबाले यांच्या 'हे गीत जीवनाचे' या अखेरच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांच्या बरोबर आम्हा समीक्षकांची रंगलेली मैफल आठवते..यात त्यांनी पार लहानपणापासून ते संगीतकार पर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला होता!

मी 'चित्रसृष्टी' चा संगीत विशेषांक पं. हृदयनाथ मंगेशकरना दाखवताना!
यानंतर अलीकडे 'पिफ' मध्ये त्यांना पुरस्कार दिल्यानंतरची भेट...यात त्यांनी माझ्या 'चित्रसृष्टी' चा संगीत विशेषांक आवर्जून पाहीला!

यातील वार्तालापात प्रशंसनीय भाष्य झाल्यावर मी मनात दीर्घ काळ घोळणारा प्रश्न त्यांना विचारला "बाळासाहेब, आपण हिंदी चित्रपटांसाठी केलेली काही गाणी ही आपल्या लोकप्रिय मराठी गीतांवर आधारित आहेत...म्हणजे 'मशाल' चे "ओ होली आयी.." हे 'जैत रे जैत' च्या ''ओ जांभुळ पिकल्या.." गाण्यावर वाटते आणि 'माया मेमसाब' चे "खुद से बाते करते रहेना.." हे 'हा खेळ सावल्यांचा' च्या ''काजळ रातीनं ओढून नेला.." ची आठवण करून देते!" यावर मिश्किल हसत ते म्हणाले "एक तर संगीतातील मूळ चीज ही बदलत नाही आणि मला एखादी रचना आवडली की मी ती पुन्हा वापरतो!"

गायन-संगीताची पं. हृदयनाथ मंगेशकर यांना अनेक पारितोषिके मिळाली आणि १९९० साली 'लेकिन' चित्रपटाच्या संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! तर २००९ मध्ये सरकार तर्फे त्यांना 'पद्मश्री' बहाल करण्यात आले!


तर अशा मंगेशकरसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 
- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

Thursday 25 October 2018

महिलांवरील अत्याचारांस वाचा फोडणाऱ्या 'मिस इंडिया' अभिनेत्री विरुद्ध आयटम डान्स करणारीची नौटंकी वृत्त वाहिन्यांवर दिसणे खेदजनक! 

- मनोज कुलकर्णी

Tuesday 23 October 2018

फक्त 'क्रीडा'चाच विचार..कला-लेखन क्षेत्राबाबत काय?


गेल्या वर्षी दूरदर्शन वरील बातम्यांमध्ये 'आता क्रीडा पत्रकारांना पण राज्य सरकार पुरस्कार देणार' अशा आशयाची बातमी ऐकली होती!

तेंव्हा विचार केला..पूर्वी पासून केवळ क्रीडा क्षेत्राकडेच सरकार दरबारी सवलतींचा ओघ राहत आला आहे..आणि कला-सिनेमा क्षेत्रांकडे दुर्लक्ष झाले आहे.

मग या क्षेत्रांत समर्पितपणे काम करणाऱ्या कलाकार, लेखक आणि चित्रपटाच्या उन्नतीच्या दृष्टीने गांभीर्यपूर्वक लेखन-कार्य करणाऱ्या सिने पत्रकारांचे काय?..त्याबाबत काही ठरल्याचे अद्याप ऐकीवात नाही!

ही सार्वत्रिक वा प्रातिनिधीक भावना समजावी!


- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी', पुणे)

Monday 22 October 2018

आमच्या अक्काआजी (आईची आई) श्रीमती मालतीबाई देशपांडे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९६ व्या वर्षी नुकतेच 
दुःखद निधन झाले!

त्यांच्या पश्चात् कन्या, पुत्र, जावई, सुना, नातू व पतवंडे असा परिवार आहे. 
आमच्या आई निवृत्त 'आदर्श शिक्षिका' सौ. सरोज कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत्या.

शैक्षणिक क्षेत्रात शिक्षिका ते प्राचार्या पर्यंत मोठे योगदान दिलेल्या आमच्या अक्कांचा स्वातंत्र्य चळवळीत पण 
सहभाग होता!

माझ्यावर विशेष माया असणाऱ्या आमच्या अक्कांस माझी हृद्य अंतःकरणाने श्रद्धांजली!!

-  मनोज कुलकर्णी

Wednesday 17 October 2018

बोलके डोळे नि भावगर्भता हे स्मिता पाटीलच्या अभिनयाचे वैशिष्ट्य!

आठवते स्मितहास्य!



मला आजही आठवतो..एक आख्यायिका होऊन राहिलेल्या अभिनेत्री स्मिता पाटीलला भेटल्याचा तो सुवर्ण क्षण!
'सितम' (१९८२) मध्ये स्मिता पाटील आणि विक्रम!

१९८२चा महाविद्यालयीन काळ..पुण्याच्या कर्वे रोड परिसरात दिग्दर्शक अरुणा-विकास 'सितम' चित्रपटाचे चित्रीकरण करीत होते..स्मिता पाटील आणि ('ज्यूली' फेम) विक्रम यांच्यावर दृश्य चित्रित होत होते..गर्दीतून कावरीबावरी होत ती त्याला शोधत येते असा प्रसंग..तो ती इतक्या जीवंतपणे साकारीत होती की बाजूच्या रहदारीतून जाणाऱ्याला खरंच काही अघटित घडलय का वाटे!
गोविन्द निहलानींच्या 'अर्धसत्य' (१९८३) मध्ये स्मिता पाटील!

तो शॉट 'ओके' झाल्यावर तेथील घरात स्मिता पाटील ला भेटायला मी गेलो, तर खाली जमिनीवर बसून फोनवर ती बोलत होती (मोठया अभिनेत्रीचा असा साधेपणा आज विरळाच!) त्यानंतर चित्रपट पत्रकारितेत आल्यावर कुणा कलाकाराची सही फारशी न घेणारा मी..पण त्या काळात तिची स्वाक्षरी मात्र आवर्जून घेतली..त्यावेळचे तिचे ते जिव्हाळापूर्ण स्मितहास्य आजही आठवते!



डॉ. जब्बार पटेल यांच्या 'जैत रे जैत' (१९७७) मध्ये स्मिता पाटील!
नंतर १९८३ला 'मॉन्ट्रीयल फिल्म फेस्टिवल'ला स्मिता पाटील ज्यूरी होती; तर १९८४ला फ्रांसला तिच्या चित्रपटांचा महोत्सव होता..त्यावेळी व पुढे १९८५ ला भारत सरकार तर्फे तिला 'पद्मश्री' बहाल करण्यात आले तेंव्हा..वेळोवेळी तिच्यावर मी लेख लिहिले!!


श्याम बेनेगलांच्या 'भूमिका' (१९७७) चित्रपटात स्मिता पाटील!
बोलके डोळे नि त्यांतून व्यक्त होणारी भावगर्भता हे स्मिता पाटील हीच्या वास्तवदर्शी अभिनयाचे वैशिष्ट्य होते! श्याम बेनेगलांचे 'निशांत', 'मंथन' व 'भूमिका', डॉ जब्बार पटेल यांचे 'जैत रे जैत' व 'उंबरठा', मुझफ्फर अलींचा 'गमन', केतन मेहतांचे 'भवनी भवाई' व 'मिर्च मसाला', रविन्द्र धर्मराजचा 'चक्र', गोविन्द निहलानींचे 'आक्रोश' व 'अर्धसत्य', महेश भट्ट यांचा 'अर्थ' आणि सत्यजित राय यांचा 'सद्गति' अशा अनेक कलात्मक/वास्तववादी/समान्तर चित्रपटांतून तिने विविध स्त्री व्यक्तिरेखा (ओम पूरी, नसीरुद्दीन, गिरीश कर्नाड व शबाना आज़मी सारख्या कलाकारांसमोर) समर्थपणे साकारल्या!

व्यावसायिक 'घुँगरू' (१९८३) चित्रपटात स्मिता पाटील!
त्याचबरोबर 'नमक हलाल' सारख्या काही मोजक्या मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपटांतूनही (अमिताभबरोबर) स्मिता पाटील दिसली! अन राज बब्बर बरोबरचा तिचा 'भीगी पलकें'ही चर्चित ठरला!!

स्त्रियांचे प्रश्न, वेदना यांना वाचा फोडत, त्यांचे सर्वव्यापी भावविश्व प्रभावीपणे स्मिता पाटील ने व्यक्त केले! स्वतंत्र विचारांची (काहीशी बंडखोरही) व आपली भूमिका कणखरपणे मांडणारी स्त्री..हे तिच्या बहुतांश व्यक्तिरेखांचे वैशिष्टय होते. या द्वारे स्त्री मुक्ति/स्वातंत्र्य या चळवळीस जणू नवचैतन्य लाभले! 


अनेक पुरस्कार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान स्मिता पाटील ला लाभले! तिचे अभिनयाचे 'स्मिता स्कूल' आजही नव्या अभिनेत्रींना मार्गदर्शक ठरावे!



एकसष्ठावी जयंती होऊन गेलेल्या तिच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा!!


स्मृतिपटलावर स्मिताभिनयाचा ठसा आजही तसाच आहे..ठळक नि गहिरा!!


- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी', पुणे)

Monday 15 October 2018

रूपगुणसंपन्न अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम!


'गोजिरी' या तिने साकारलेल्या भूमिकेप्रमाणेच असणारी आजच्या मराठी चित्रपट सृष्टीतील रूपगुणसंपन्न अभिनेत्री म्हणजे मधुरा वेलणकर-साटम!
'गोजिरी' (२००७) चित्रपटात मधुरा वेलणकर!

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'नॉट ओनली मिसेस राऊत' (२००३) या आपल्या पदार्पणातील मराठी चित्रपटातच मधुरा वेलणकर ने अभिनयाची चुणूक दाखवली होती..आणि त्यासाठी तिला उत्कृष्ट अभिनयाचा राज्य पुरस्कारही मिळाला! लगेचच ती 'जजंतरम ममंतरम' या हिंदी चित्रपटात राजकुमारी म्हणून झळकली!
'नॉट ओनली मिसेस राऊत' (२००३) 
चित्रपटात मधुरा वेलणकर!


त्यानंतर 'सरीवर सरी' (२००५) चित्रपटात ग्लॅमर विश्वात नाव करू पाहणारी आणि ''मी अमृता बोलतेय'' (२००८) या वास्तवदर्शी चित्रपटात अन्यायाला वाचा फोडणारी ह्या तिच्या व्यक्तिरेखा अभिनेत्री म्हणून तिला सिद्ध करणाऱ्या ठरल्या. त्यानंतर घरच्याच अभिजीत साटम दिग्दर्शित 'हापूस' (२०१०) चित्रपटात तर तिने भिन्न स्वभाव वैशिष्ठ्यांच्या दुहेरी भूमिका बेमालूम साकारल्या!
'सरीवर सरी' (२००५) चित्रपटात मधुरा वेलणकर!


याबरोबरच लघुपट, वृत्तपट, दूरचित्रवाणी मालिकां आणि नाटकांतून ती लक्षणीय भूमिका साकारीत आली आहे. 'संस्कृति', 'कलागौरव', 'झी', 'हीरकणी' आणि 'व्ही. शांताराम' असे अनेक पुरस्कार तिला मिळालेत!

प्रसिद्धीच्या झोतात असूनही आपले संवेदनशील मन आणि विनयशील सुस्वभाव हे तिने जपले असल्याची प्रचिती..अगदी तिच्या पहिल्या चित्रपटापासून आतापर्यंत तिला भेटताना नेहमीच आली!

वेलणकर आणि साटम अशा अभिनय कलेची पार्श्वभूमी असणाऱ्या परिवारांतील या सुस्वरूप अभिनेत्रीने यापुढेही रूपेरी पडदा गाजवावा..ह्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!


- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

Thursday 4 October 2018

तडफदार अभिनेते...अरुण सरनाईक!


मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ आपल्या तडफदार अभिनयाने गाजवणारे अरुण सरनाईक यांचा आज ८३वा जन्मदिन!
तरुण तडफदार अरुण सरनाईक!

१९५६ रोजी 'भटाला दिली ओसरी' या मो. ग. रांगणेकरांच्या नाटकाद्वारे अभिनय कारकीर्द सुरु केलेल्या अरुण सरनाईक 
यांनी १९६१ रोजी 'शाहीर परशुराम' या अनंत माने दिग्दर्शित मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले!


पुढे मग दिनकर पाटील यांचा 'वरदक्षिणा' (१९६२) सारखे सामाजिक, मानेंचा 'एक गाव बारा भानगडी' (१९६८), 'गणाने घुंगरू हरवले' (१९७०) सारखे ग्रामीण तर 'घरकुल' (१९७०) सारखे शहरी चित्रपट..यांतील त्यांच्या भूमिका वैशिष्टपूर्ण ठरल्या! गायक घराण्यातून आल्याने त्यांनी काही चित्रपटांतून गाणीही गायली. त्यात शांतारामबापूंच्या 'चंदनाची चोळी अंग अंग जाळी' (१९७५) मधील त्यांचे "एक लाजरा न साजरा मुखडा.." गाणे गाजले!
'मुंबईचा' जावई' (१९७०) चित्रपटात गाताना अरुण सरनाईक व सुरेखा!


त्यांचे अभिनित काही चित्रपट हे विशेष ठरले..त्यातला एक म्हणजे बाबा पाठक यांनी दिग्दर्शित केलेला 'संथ वाहते कृष्णामाई' (१९६७)..पुढे आशुतोष गोवारीकरने केलेल्या 'स्वदेस' (२००४) या हिंदी चित्रपटाचे मूळ तिथेच होते आणि मराठीत अरुण सरनाईक यांनी केलेली इंजिनिअरची भूमिका यात शाहरुख खानने केली! यानंतरचा दुसरा म्हणजे राजा ठाकूर दिग्दर्शित 'मुंबईचा' जावई' (१९७०) हा एकत्र कुटुंब आणि महानगरातील घराची समस्या यावरील चित्रपट..यावर पुढे बासू चटर्जींनी 'पिया का घर' (१९७२) हा हिंदी चित्रपट केला. (अलीकडे आलेला 'डबल सीट' नामक मराठी चित्रपटाचे प्रेरणास्रोतही तोच!)

'सिंहासन' (१९७९) चित्रपटात अरुण सरनाईक!
यांतील तिसरा महत्वाचा चित्रपट म्हणजे डॉ. जब्बार पटेल यांचा 'सिंहासन' (१९७९)..यात अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची साकारलेली व्यक्तिरेखा ही त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोच्च ठरली! पुरस्कारासह त्यावरील चर्चाही गाजल्या..अशाच एका परिसंवादात त्यांनी नमूद केले की 'आपल्या भूमिकेस मिळालेली खरी पावती म्हणजे (तत्कालिन मुख्यमंत्री) वसंतदादा पाटील यांना भेटायला गेल्यावर "या सी. एम..!" म्हणून त्यांनी केलेले स्वागत!'

अरुण सरनाईक यांना भेटण्याची संधी मला मिळाली. त्यात त्यांच्या अभिनयाची तारीफ केल्यावरचे त्यांचे खर्ज्यातील हसणे आजही आठवते!

त्यांस ही आदरांजली.!!

- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी', पुणे)

Wednesday 3 October 2018

'कलियुग' कार मराठे!


ज्येष्ठ लेखक-पत्रकार ह. मो. मराठे 'कलियुग' सारखी कादंबरी लिहून अखेर हे जग सोडून गेले त्यास आता वर्ष लोटले!

वृत्तपत्रीय पत्रकारितेसह साप्ताहिक-मासिकांतील त्यांचे ललित लेखन हे वैशिष्ठ्यपूर्ण व बरेचसे उपहासात्मक असे. पुस्तकांमध्ये 'बालकांड' हे त्यांचे आत्मचरित्रपर लेखन होते. 'काळेशार पाणी' ही त्यांची कथा फार चर्चित ठरली आणि त्यावर पुढे 'डोह' हा मराठी चित्रपटही झाला!

माझ्या चित्रपट विषयक लेखनाची ते प्रशंसा करीत आणि ते संपादक असलेल्या ('नवशक्ती' वगैरे) नियतकालिकांत माझे लेख मागवून छापीत असत! त्याचबरोबर सामाजिक, कला विषयक मनमोकळ्या गप्पाही होत. त्यांच्या कादंबऱ्यांवर निघालेल्या काही मराठी चित्रपटांबाबत ('मार्केट' वरील 'पैसा पैसा पैसा') ते नाराजीही व्यक्त करीत!

त्यांच्या भेटीचे अनौपचारिक क्षण आठवतायत!

त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी', पुणे)

'गदिमां'ना मानवंदना!


 - मनोज कुलकर्णी 


जनमानसांत रुजलेले काव्य रचणारे श्रेष्ठ गीतकार व पटकथाकार ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच सुरु झाले!


त्यांस सुमनांजली वाहताना.. गदिमांची मला भावलेली व आजही समकालिन असणारी ही रचना आठवली... 


"..अजब तुझे सरकार!"

लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार..
इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजिवीता
बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार!
लबाड जोडिती इमले माड्या, गुणवंताना मात्र झोपडया
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार!
वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार!"


********************************************************