Wednesday, 5 August 2026

मातृछत्र हरपले!

माझी आई 'आदर्श शिक्षिका' सरोज श्री. कुलकर्णी (वय ८२ वर्षे) हिचे नुकतेच १ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले!

तिचे संपूर्ण आयुष्य म्हणजे दिव्यत्वाची प्रचितीच..
खडतर बालपण, लहान वयात लग्न नि एकत्र कुटुंबाचा भार. यांत अनेक कष्ट, दुःखे सोसत सर्वांसाठी जणू झिजणे. परिवाराची धार्मिक कार्ये व्रतस्थपणे करीत राहणे. तरीही शिक्षणाने उत्कर्ष अगदी 'हिंदी पंडिता' पर्यंत! पुढे शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ कारकीर्द. यांत सहृदय, संवेदनशील. 'आदर्श शिक्षिका' म्हणून गौरव!

निर्मळ, भावूक, हळवे मन. नातीगोती सांभाळीत, आपल्या उत्तम स्वयंपाकाने सरबराई करणे. गायन, बागकाम यांत रुची. कलासक्त राहून रसिकताही जोपासणे आणि कलागुणांना प्रोत्साहन देणे. 'सर्वांशी चांगले वागण्याचे' संस्कारी सांगणे! माया, करुणामय अशी वात्सल्यमूर्तीच होती ती!!

आमच्या कुटुंबियांवर अनंत उपकार असणाऱ्या, अशा माझ्या थोर मातेस अतिशय दुःखद अंतःकरणाने श्रद्धांजली!!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday, 1 April 2026

गलिच्छ भोंदूगिरी नि भ्रष्ट राजकारणी
समाज व्यवस्थेची अगदी वाट लावली!


तीव्र निषेध!!

- मनोज कुलकर्णी

Thursday, 19 March 2026

नव वर्ष..विचार!!

चैत्रातील हा नव वर्षारंभ
घेऊन येवो नव चैतन्य..!

'वसुधैव कुटुंबकम्' विचारानं
सर्व मानवजातीच्या प्रगतीचं!

धर्म-जात सर्व भेद विसरून..
प्रेम, स्नेह भाव रुजवण्याचं!


- मानस रूमानी

Wednesday, 4 March 2026

चित्रपट रसग्रहणाच्या मार्गदर्शक..डॉ. श्यामला वनारसे!

चित्रपट कला विषयक ज्येष्ठ अध्यापिका व मानसशास्त्रज्ञ डॉ. श्यामला वनारसे यांचे नुकतेच निधन झाल्याची दुःखद बातमी कळाली!

याप्रसंगी १९८३ चा माझा महाविद्यालयीन काळ आठवला. चित्रपट विषयक लिखाणास मी सुरुवात केली होती! त्याच सुमारास पुण्यामध्ये 'चित्रदर्शन' या संस्थेस चित्रपट रसग्रहण संदर्भात जोडला गेलो. डॉ. श्यामला वनारसे यांच्या मार्गदर्शनात 'टिळक स्मारक मंदिर' च्या बेसमेंट मध्ये याचे कार्यक्रम होत. यात अध्यापना साठी 'फिल्म इंस्टिट्यूट' (एफटीआयआय) चे प्रो. सतीश बहादूर येत. मग सत्यजित रे यांच्या विख्यात 'पाथेर पांचाली' पासून ते तत्कालिन पूर्व यूरोपीय चित्रपटांपर्यंत अनेक चित्रकृतिंवर व त्यांतील तीव्र अभिव्यक्तीच्या दृश्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा होई!

नंतर १९८७-८८ दरम्यान 'पुणे विद्यापीठा'च्या 'रानडे इंस्टिट्यूट' मध्ये 'कम्युनिकेशन अँड जर्नालिज़्म' (बी.सी.जे.) चे पदवी शिक्षण घेत असताना मी तेथील 'फिल्म क्लब' ही पाहू लागलो. ग्रिफिथ ('बर्थ ऑफ़ ए नेशन'), आयझेनस्टाईन ('बॅटलशिप पोटेमकिन'), डी सिका ('बायसिकल थिव्ह्ज'), गोदार्द ('ब्रेथलेस'), बर्गमन ('व्हर्जिन स्प्रिंग'), कुरोसावा ('राशोमोन') सारख्या जगविख्यात दिग्दर्शकांचे महत्वाचे चित्रपट तिथे दाखवले. सत्यजित रे यांची 'अपू ट्रीलॉजी' पूर्ण दाखवली! हे प्रशंसून प्रो. सतीश बहादूर व 'नॅशनल फिल्म अर्काइव्ह' (एनएफएआय) चे संस्थापक-संचालक पी. के. नायर यांच्या प्रोत्साहनाने, १९८९ मध्ये मी 'फिल्म इंस्टिट्यूट' मधून 'फिल्म अप्रिसिएशन कोर्स' केला. मग प्रोफेशनल फिल्म क्रिटिक म्हणून बऱ्याच ठिकाणी लिखाण करू लागलो.

विविध फिल्म क्लब्स, अनेक चित्रपट महोत्सवांतून मी देशी-विदेशी उत्तमोत्तम चित्रपट पाहून त्यांचे रसग्रहणात्मक लेखन केले. यांत आधी डॉ. श्यामला वनारसे यांच्या 'चित्रदर्शन' ने पक्का केलेला पाया महत्वाचा होता! विशेष म्हणजे माझा 'चित्रसृष्टी' विशेषांक सुरु झाल्यावर त्यांनी त्यात लेखन ही केले!

त्यांस भावपूर्ण श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

Friday, 27 February 2026

अडथळा येत नसतो प्रेमात भाषेचा..
डोळ्यांतुन व्यक्त होते ते शब्दांविना!

- मानस रूमानी

(मराठी राजभाषा दिन शुभेच्छा!)

Wednesday, 14 January 2026

आधी होऊ दे तर बोलणे
मग होईलच गोड बोलणे!

 - मानस रूमानी

(संक्रांतीच्या शुभेच्छा!)🍪