Sunday 25 December 2022

'लावणीसम्राज्ञी' गायिका सुलोचना चव्हाण!

'खानदानी ठसकेबाज लावणी गायकी लोप पावली!'

'लावणीसम्राज्ञी' म्हणून लौकीक प्राप्त वयोवृद्ध गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी येताच हे भाव मनी उमटले!

मुंबईतील चाळीत लहानपणी घरच्याच मेळ्यात पूर्वाश्रमीच्या या सुलोचना कदम गात. मग रंगभूमीवर पाऊल ठेवत त्यांनी अगदी हिंदी-उर्दू नाटकांतही कामे केली! त्या काळात ग्रामोफोन ऐकूनच त्यांनी आपली गायकी तयार केली. वयाच्या नवव्या वर्षीच 'कृष्ण सुदामा' या हिंदी चित्रपटात गायची संधी त्यांना मिळाली. पुढे तर मास्टर भगवान यांच्या चित्रपटांतून "नजर से नजर लड गयी.." सारखी गाणी त्यांनी संगीतकार सी. रामचंद्र यांच्यासह गायली! मराठीसह गुजराती, पंजाबी सारख्या अन्य प्रादेशिक भाषांतील गाणीही त्या गायल्या. अगदी मन्ना डें बरोबर भोजपुरीही! त्या गझल ही गात आणि ख्यातनाम गायिका बेगम अख्तर यांनी त्याबाबत त्यांची प्रशंसा केलीये!

त्यांना असे कारकिर्दीच्या सुरुवातीसच पार्श्वगायन करायला मिळाले. मात्र त्यांनी लावणी सर्वप्रथम गायली ती १९५१ मध्ये 'हीच माझी लक्ष्मी' साठी! वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली ही लावणी आचार्य अत्रे यांच्या या चित्रपटात हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली होती. मग १९५३ च्या सुमारास 'कलगीतुरा' साठी राजा बढे यांच्या काही लावण्या त्यांनी गायल्या. एस. चव्हाण त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते..आणि त्या सुलोचना चव्हाण झाल्या! यानंतर राजा ठाकूर यांच्या 'रंगल्या रात्री अशा' (१९६२) या अरुण सरनाईक अभिनित चित्रपटातील "नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापुरची.." ही त्यांनी गायलेली लावणी हिट झाली. जगदीश खेबूडकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून आलेल्या नि वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेल्या अशा लावण्यांना त्यांच्या ठसकेबाज गायकीचा बाज लाभला. पुढे यांत "कसं काय पाटील बरं हाय का..?" लावणी फेम 'सवाल माझा ऐका' (१९६५) हा जयश्री गडकर अभिनित होता; तर उषा चव्हाण, गणपत पाटील आदींचा राम कदम यांच्या संगीतातील 'केला इशारा जाता जाता' (१९६५) होता..असे अनंत मानेंचे लावणीप्रधान मराठी चित्रपट गाजू लागले.

"सोळावं वरीस धोक्याचं.." ही सुलोचनाबाईंची लोकप्रिय लावणी
'सवाल माझा ऐका' (१९६४) चित्रपटात सादर करताना जयश्री गडकर!
कालांतराने 'लावणीसम्राज्ञी' म्हणून प्रसिद्ध झालेल्या सुलोचनाबाईंची गायकी ही या गायन प्रकारास दर्जा देणारी खानदानी ठरली! "पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा.." अशा लावण्या डोक्यावर पदर घेत आब राखीत त्या सादर करीत. त्यांमध्ये लावण्यांचे मुखडे आपल्या खास लकबीत पेश करण्याची त्यांची पद्धत होती. जसे "तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाणं नाक्याचं.." म्हणताना पहिले शब्द लांबवीत शेवटच्या शब्दावर जोर देत मग "सोळावं वरीस धोक्याचं" हे सुचकतेने उच्चारणे! तर "फड सांभाळ तुऱ्याला गं आला.." सारखी बोर्डावरची लावणी त्या बसून त्याच खर्ज्यात सादर करीत.. अन "गं" वर काहीसा लटकेपणाने जोर देत मग "तुझ्या उसाला लागंल कोल्हा.." हे काहीशा अनुनासिक लयीत फिरवीत!

त्यांना मिळालेल्या पुरस्कारांनी एक प्रकारे लावणी गायकीसही मान मिळाला! त्यांत १९६५ साली मिळालेला 'मल्हारी मार्तंड' या चित्रपटातील पार्श्वगायनासाठीचा पुरस्कार आणि २०१० मध्ये मिळालेला 'लता मंगेशकर पुरस्कार' असे महाराष्ट्र शासनाचे सन्मान होते! तर अलीकडे 'पद्मश्री' हा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता!

पुण्यात 'बालगंधर्व रंगमंदिरात' त्यांची झालेली ओझरती भेट आज आठवते!
त्यांस सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी