Saturday 22 January 2022

संगीत रंगभूमीवरची तेजस्वी तारका!

संगीत रंगभुमीशी समर्पित ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ति शिलेदार यांचे निधन झाल्याची बातमी ही धक्कादायक!

चार वर्षांपूर्वी '९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य सम्मेलना' च्या अध्यक्षपदी त्या विराजमान झाल्यावर त्यांच्यावर माझ्या ह्या 'चित्रसृष्टी' (मराठी) ब्लॉग वर मी २१ एप्रिल, २०१८ रोजी लिहिलेला लेख पाहणे!

त्यांस भावपूर्ण सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Friday 21 January 2022

 मराठी चित्रपट सृष्टीचा आधारवड!

 'पुणे गेस्ट हाऊस' चे कै. चारुदत्त सरपोतदार!

मराठी चित्रपट-नाट्य वर्तुळात जिव्हाळ्याने "चारुकाका" संबोधले गेलेले चारुदत्त सरपोतदार यांस जाऊन आता ४ वर्षे होऊन गेली!

'जावई माझा भला' (१९६३) चित्रपटाचे पोस्टर!
त्यांच्या जाण्याने त्या पिढीचा या क्षेत्राशी समर्पित दुवा हरपला! वेगवेगळ्या कारणां निमित्त त्यांच्या झालेल्या भेटी व मराठी चित्रपट इतिहासावरील चर्चा मला आठवल्या!


त्यांचे वडील नानासाहेब सरपोतदार हे भारतीय चित्रपट सृष्टीच्या प्रवर्तकां पैकी एक होते! त्यांची परंपरा बंधु विश्वास तथा बाळासाहेब सरपोतदार आणि गजानन - सरपोतदार यांच्या बरोबरच त्यांनीही काही वर्षे चालवली. 'रंगल्या रात्री अशा' (१९६२) सह 'जावई माझा भला' (१९६३) व 'घर - गंगेच्या काठी' (१९७५) या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. पुढे त्यांची चित्रपट निर्मिती जरी थांबली तरी मराठी चित्रपट सृष्टीशी असणारा त्यांचा ऋणानुबंध कायम राहिला. 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'च्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. नंतर कलाकारांसाठी ते जणू आधारवड झाले!

'घर गंगेच्या काठी' (१९७५) चित्रपटाचे पोस्टर!
स्पष्ट नि परखड मत व्यक्त करणाऱ्या त्यांच्या बोलण्यात भावनेचा ओलावाही असे! मला आठवतंय बाळासाहेब - सरपोतदार यांच्या (बहुदा) एकसष्टी निमित्त आम्ही काही निवडक सिने - पत्रकारांनी त्यांचा 'पुणे गेस्ट हाऊस' वर अनौपचारीक सत्कार केला होता. त्या वेळी बासुंदी-पुरी चा बेत चारुकाकांनी तिथे ठेवला होता आणि आग्रह करून स्वतः वाढत होते! नंतर त्यांच्या परीवारा तर्फे मराठी चित्रपटांसाठी 'नानासाहेब - सरपोतदार पुरस्कार' सुरु करताना मराठी चित्रपट इतिहासकार बापू वाटवे यांच्यासह तिथे झालेली बैठक आठवते!

कालांतराने २००२ मध्ये माझा 'चित्रसृष्टी' अंक सुरु झाला..तेंव्हा प्रकाशन समारंभास स्नॅक्स-कॉफी ची ऑर्डर 'पुणे गेस्ट हाऊस' कडेच (त्यांनी ठरवल्या प्रमाणे) दिली होती. नंतर याच्या विशेषांकासाठी कोल्हापुर व पुणे चित्रपट सृष्टीवर विशेष लेख करतांना त्यांच्याशी सखोल चर्चा झाली होती! पुढे मग क्वचित अशाच सदिच्छा भेटी होत..त्यांत त्यांचे पुत्र किशोर सरपोतदार यांच्याशीही जिव्हाळ्याने बोलणे होई!

त्यांना सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Tuesday 11 January 2022

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड!


"माझा होशील का.."
हे आशा भोसले यांचे मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील एक अजरामर गीत!
(त्या सदृश शिर्षकाने एक मालिका सध्याच्या युगात ही गाजतेय!)
तर ते गीत 'लाखाची गोष्ट' (१९५२) या चित्रपटात ज्या साध्याभोळ्या नायिकेवर चित्रित झाले होते..त्या म्हणजे रेखा कामत!..त्या गेल्याची बातमी ऐकली आणि हे आठवले!

'लाखाची गोष्ट' (१९५२) चित्रपटात रेखा कामत दिग्दर्शक  राजा परांजपे!
चित्रा (कुसुम सुखटणकर) आणि रेखा (कुमुद सुखटणकर) ह्या जुन्या काळातील मध्यमवर्गीय मराठी चित्रपटातील सोज्वळ सुसंस्कृत नायिका साकारणाऱ्या अभिनेत्री भगिनी! 
प्रख्यात दिग्दर्शक-अभिनेते राजा परांजपे यांच्या चित्रपटांद्वारे त्या पडद्यावर आल्या आणि सर्वसामान्य मराठी तरुणींचे भावविश्व पडद्यावर साकार होऊ लागले!

'लाखाची गोष्ट' हा चित्रा आणि रेखा यांनी एकत्र काम केलेला गाजलेला चित्रपट..त्यात दोन राजा (परांजपे व गोसावी) त्यांचे नायक होते! त्यानंतर त्या चित्रपटाचे पटकथाकार ग. रा. कामत यांच्याशी विवाह होऊन त्या रेखा कामत झाल्या!..त्या चित्रपटास ७० वर्षें होत असताना ही दुःखद बातमी आली!

शालीन सालस नायिका साकारीत व कालांतराने चरित्र भूमिकांतून येत सुमारे सहा दशके रेखा कामत यांचा अभिनय प्रवास निरंतर राहिला!

त्यांस विनम्र सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Monday 10 January 2022

मराठी चित्रपट नव्वदीत!

'अयोध्येचा राजा' (१९३२) यात निंबाळकर, गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे दिगंबर!

१९३२ साली प्रदर्शित झालेला पहिला मराठी बोलपट 'अयोध्येचा राजा' हा आता आपली ९० वर्षे पूर्ण करीत आहे.

गौरवशाली 'प्रभात फिल्म कंपनी' निर्मित ह्या बोलपटाचे दिग्दर्शन व संकलन व्ही. शांताराम यांनी केले होते..आणि ध्वनिमुद्रणाचे महत्कार्य यशस्वी करून विष्णुपंत दामले यांनी यांत मोलाचे योगदान दिले होते!

'प्रभात' चे विष्णुपंत दामले!
दादासाहेब फाळकेंनी निर्मिलेल्या 'राजा हरिश्चंद्र' (१९१३) ह्या आपल्या पहिल्या भारतीय चित्रपटाचेच कथानक असलेल्या..'अयोध्येचा राजा' बोलपटाची पटकथा एन.व्ही.कुलकर्णी यांनी लिहिली होती. तर शेख फत्तेलाल यांचे यात कलादिग्दर्शन होते आणि छायाचित्रकार केशवराव धायबर यांनी याचे चित्रीकरण केले होते.

रंगभूमीवरील प्रख्यात गायक-अभिनेते गोविंदराव टेंबे यांनी यात हरिश्चंद्राची प्रमुख भूमिका रंगवली होती आणि संगीतही दिले होते. त्यांच्यासमवेत दुर्गा खोटे ह्या तारामतीच्या भूमिकेत पडद्यावर आल्या, तर रोहिताश्व साकारला होता दिगंबर यांनी!..आणि विश्वामित्र झाले होते निंबाळकर!

हा बोलपट त्याच वर्षी हिंदीत सुद्धा 'अयोध्या का राजा' या नावाने बनला गेला आणि त्यांचे संवाद लेखन मुन्शी इस्माईल यांनी केले होते!

मागे काही अतिउत्साहींनी ('राजा हरिश्चंद्र' मूकपटापासून धरत) मराठी चित्रपटाची शंभरी कार्यक्रम/पुस्तक द्वारे साजरी केली होती. त्यांत तथ्य नव्हते. असो!!

तर आता कुठे ९० वर्षांचा होत असलेल्या आपल्या ह्या मराठी बोलपटास ही मानवंदना!!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 9 January 2022

 

"प्रथम तुज पाहता.."

'मुंबईचा जावई' (१९७०) ह्या चित्रपटातील हे गीत डोळ्यांसमोर तरळले..जेंव्हा याचे गायक रामदास कामत यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकले!

 

राजा ठाकूर दिग्दर्शित ह्या चित्रपटात अभिनेते अरुण सरनाईक यांनी ते सादर केले होते. ते स्वतः गात असत त्यामुळे हे गीत त्या स्वाभाविक हावभावांत पडद्यावर आले होते!

पंडित रामदास कामत हे संगीत रंगभूमीवरचे दिग्गज गायक-कलावंत होते आणि त्यांनी सुमारे १८ नाटकांमधून आपल्या भूमिका सुरेल रंगवल्या होत्या.

 
त्यांस सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Friday 7 January 2022


पुरस्कार विजेते मराठी चित्रपटकर्ते राजेश पिंजाणी अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याचे वृत्त वाचून धक्का बसला!

'बाबू बँड बाजा' (२०१२) या त्यांच्या सामाजिक चित्रपटास कलाकारांसह तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते!

त्यांच्याशी चित्रपटासंदर्भात झालेली चर्चा आठवते!

भावपूर्ण अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी 

Wednesday 5 January 2022

वात्सल्यमूर्ती सिंधुताई!


अनाथांची ''माय" होऊन व्रतस्थपणे समाजकार्य करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाच्या वृत्ताने दुःख झाले!

दहा वर्षांपूर्वी 'मी सिंधुताई सपकाळ' या त्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या प्रदर्शन प्रसंगी त्यांची झालेली भेट अजूनही आठवते! "बाळा" संबोधून सर्वांशी संवाद साधण्याचे त्यांचे वात्सल्य मला तेंव्हा अनुभवायास आले!

त्यांस माझी विनम्र श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

Saturday 1 January 2022

नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!