Saturday 18 April 2020

आठवण गबालेंच्या 'देवबाप्पा' चित्रपटाची!

"नाच रे मोरा.." हे बालगीत 'देवबाप्पा' (१९५३) चित्रपटात करताना मेधा गुप्ते व बालमैत्रिणी!

"देवबाप्पा, कोरोना लवकर जाऊदे..मला बाहेर खेळायला जायचंय!" असं म्हणणारी दूरदर्शन वरील चिमुकली पाहताच मला राम गबाले यांच्या 'देवबाप्पा' (१९५३) या चित्रपटात देवाला पत्र लिहिणारी लहानगी आठवली!

'देवबाप्पा' (१९५३) चित्रपटात विवेक व चित्रा यांमध्ये मेधा गुप्ते!
प्रख्यात लेखक पु.ल. देशपांडे व ग.दि. माडगुळकर
कुणाचे निधन झाले तर लहान मुलांना जसे सांगतात की 'देवाघरी गेले'.. तसेच यातील विधवा आई आपल्या लहान मुलीला सांगते.. तेंव्हा ती तिथल्या पत्त्यावर वडिलांना पत्र लिहिते!..प्रेम माणिक यांनी ही कथा लिहिली आणि पटकथा-संवाद लिहिले ते पु. ल. देशपांडे यांनी!

'देवबाप्पा' (१९५३) चित्रपटाचे..
संवेदनशील दिग्दर्शक राम गबाले!
या चित्रपटातील.. 
ग. दि. माडगुळकर यांचे पु. लं. देशपांडे यांनीच संगीत दिलेले व आशा भोसले यांनी गायलेले बालगीत.. "नाच रे मोरा s.. आंब्याच्या वनात.." हे अजरामर झाले! अन यावर मोराचा पिसारा लेवून नाच करणारी ती चिमुकली सुद्धा..मेधा गुप्तेनी ती भूमिका फारच छान केली होती. तर चित्रा, विवेक आणि इंदिरा चिटणीस हे कलाकार तिच्या बरोबर यात होते.

माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांकाच्या प्रकाशन समारंभास राम गबाले जी अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांच्याशी चांगला 'जिव्हाळा' वृद्धिंगत झाला. मग ते 'देवबाप्पा' चित्रीकरणावेळच्या लहान मेधा गुप्तेच्या गमती-जमती सांगायचे!

आज या काळात सुद्धा ही भाबडी कल्पना अस्तित्वात आहे ही आपल्या निरागस संस्कृतीचं लक्षण असावं!

- मनोज कुलकर्णी

Friday 17 April 2020

'मनोरंजन' चे अण्णा कुलकर्णी..मराठी नाट्यसृष्टीचा आधारवड!


'मनोरंजन' पुणे या संस्थेचे संस्थापक आणि मराठी नाट्य व्यवसायाचे एका अर्थी तारणहार मनोहर कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने ९२ व्या वर्षी काल निधन झाले!

माझे स्नेही व आता त्या संस्थेची धुरा सांभाळणारे मोहन कुलकर्णी यांचे ते वडील! "अण्णा" म्हणून ते नाट्यव्यवसाया - तील त्यांच्या वर्तुळात संबोधले जायचे! नाट्यसृष्टीचा ते चालता-बोलता इतिहास तर होतेच; पण त्याचबरोबर त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी 'भावबंधन', 'अश्रूंची झाली फुले' यांसारख्या काही नाटकांतून भूमिकाही रंगवल्या होत्या. तर 'सूर्य पाहिलेला माणूस' या त्यांनी निर्मित केलेल्या नाट्यकृतीस पुरस्कार मिळाले! 


तसा त्यांच्याशी माझा परिचय जुना होता. 'मनोरंजन' संस्थेचे कार्यालय जेंव्हा पुण्यात 'विजय टॉकीज' च्या तळाशी होते तेंव्हापासून! त्यावेळी माझ्या लेखनासाठी मराठी चित्रपट कलाकारांचे रंगभूमीवरील कामाचे काही फोटोज घेण्यासाठी मी त्यांच्याकडे जात असे. तेव्हा चांगल्या सहकार्याबरोबरच पूरक माहितीही ते देत असत..अगदी पडद्यामागीलही!

पुढे नाटकाबरोबर चित्रपट प्रसिद्धी व्यवसायातही 'मनोरंजन' ने प्रवेश केला. याचे निमित्त झाले भावे-सुकथनकरचा 'दोघी' हा (रेणुका दफ्तरदार व सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका असलेला) चित्रपट! १९९६ मध्ये दिल्ली ला झालेल्या आपल्या 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (इफ्फी) तील 'इंडियन पॅनोरमा'त तो चित्रपट मी पाहिला होता. पण असे चित्रपट थिएटर मध्ये येणे अवघड असते. त्यावेळी मोहन कुलकर्णींना याबाबत मी सुचवले..आणि पुढे ('एनएफडीसी' द्वारे) तो पुण्यात प्रदर्शित होण्यासाठी त्याची प्रसिद्धी त्यांनी सांभाळली! नंतर आमचा स्नेह वृद्धिंगत होत गेला. दरम्यान 'मनोरंजन' च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यासही मी उपस्थित होतो!

पुढे २००२ ला माझा 'चित्रसृष्टी' विशेषांक सुरु झाला..त्यास पुरस्कार मिळाले. त्याचे ते कौतुक करीत! दरम्यान त्यांच्या 'मनोरंजन' चे कार्यालय वर 'विजय टॉकीज' पाशीच आले. त्यानंतर मग तिथे जाणे होई आणि..नव्या मराठी चित्रपट व्यवसायाबद्दल मोहन कुलकर्णींशी चर्चाही! त्यावेळी आत बसलेल्या अण्णांना नमस्कार केल्याशिवाय मी परतलो नाही!

'नाट्य परिषदे'च्या पुणे शाखेचे अण्णा अध्यक्ष होते. तर 'पुणे महानगरपालिके' तर्फे 'बालगंधर्व पुरस्कार' देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता!

त्यांस श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

Thursday 16 April 2020

"सप्तपदी हे रोज चालते.." हे पी. सावळाराम, वसंत प्रभू व लता मंगेशकर या त्रयीचे गाणे आता एकदम आठवले!

Saturday 11 April 2020

'महात्मा फुले' चित्रपट मुहूर्ताची दुर्मिळ छायाचित्रे!!


थोर भारतीय समाजसुधारक आणि विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती!

१९५४ साली साहित्यिक-चित्रकर्ते प्र. के. अत्रे यांनी त्यांच्या जीवनावर 'महात्मा फुले' हा मराठी चित्रपट निर्मिला होता.. आणि बाबुराव पेंढारकर यांनी त्यात ही शिर्षक भूमिका साकारली होती! याच्या मुहूर्त सोहळ्यास 'भारतरत्न' घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सपत्निक आले होते!
त्याची ही छायाचित्रे:-
कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, माई आंबेडकर, बाबुराव पेंढारकर व आचार्य अत्रे!

बाबुराव पेंढारकर व अन्य कलाकारांवर 'महात्मा फुले' ह्या मराठी चित्रपटाचे चित्रित झालेले दृश्य!

यास 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा' चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता!

सर्वांस आदरांजली!!!

- मनोज कुलकर्णी

Tuesday 7 April 2020

आजच्या 'जागतिक आरोग्य दिनी' या कठीण काळात कोरोना पासून सर्वांना वाचविण्याच्या कार्यात समर्पित सर्व डॉक्टर्स, नर्सेस व संबंधित यांच्या प्रति कृतज्ञता वक्त करून..त्यांना शुभेच्छा! 


- मनोज कुलकर्णी

Sunday 5 April 2020

ज्ञानदीप (?) उजळूदे..!!!

'प्रभात' च्या 'शेजारी' (१९४१) या कृष्ण/धवल चित्रपटातील "लख लख चंदेरी तेजाची.." हे मशाल नृत्य!
आजच्या 'दिवे लावण्याच्या' दिवशी व्ही. शांताराम यांच्या दोन मराठी चित्रपटांतील ही - मशाल दृश्ये आठवली..


(डाव्या बाजूचे छायाचित्र) त्यांनी आपल्या 'राजकमल कलामंदिर' साठी दिग्दर्शित केलेल्या 'पिंजरा' (१९७२) या रंगीत चित्रपटातील संध्या चे "ज्वानीच्या आगीची मशाल हाती." नृत्य;


(उजव्या बाजूचे छायाचित्र) तत्पूर्वी त्यांनी 'प्रभात फिल्म क.' साठी दिग्दर्शित केलेल्या 'शेजारी' (१९४१) या कृष्ण/धवल चित्रपटातील "लख लख चंदेरी तेजाची.." हे मशाल नृत्य!


दोन्हीचे संदर्भ वेगळे..(वरचे चित्र) मूल्य ऱ्हास सूत्रासाठीच्या पटकथेसाठीचे; तर (खालचे चित्र) मूल्य उदात्तीकरण पटकथेसाठीचे!

आजचे ९-९ चे दिवे लावणे कुठे घेऊन जाणार? 


- मनोज कुलकर्णी