Saturday 29 September 2018

आक्रस्ताळेपणा करीत करीत
शिवराळ 'नटसम्राट' बनला
'सगळं करून' भागला नि
समाज कार्याला लागला!


- मनोज 'मानस'

Monday 24 September 2018

'पिंक' (२०१६) या हिंदी चित्रपटाचे पोस्टर!

"नाही म्हणजे नाही!"




२०१६  मध्ये..अमिताभ बच्चन, तापसी पन्नु, कीर्ति कुल्हारी आदींच्या भूमिका असलेल्या अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित 'पिंक' या हिंदी चित्रपटाची "नो मीन्स नो" संवादासह बरीच चर्चा होती..त्यांनी मांडलेलं वास्तव नि दिलेला संदेश हा उल्लेखनीय आहे. पण हा विषय (तथाकथित छेडछाडीच्या बॉलीवूडपटांपलीकडे) आपल्या भारतीय चित्रपटासही नवीन नाही!
'इन्साफ का तराजू' (१९८०)  या चित्रपटाचे पोस्टर!


'इन्साफ का तराजू' (१९८०) या चित्रपटातून पूर्वी दिग्गज चित्रपटकर्ते बी. आर. चोप्रा यांनी 'इन्साफ का तराजू' (१९८०) या चित्रपटातून (वेगळ्या कथानकासह) हा विषय प्रभावीपणे मांडला होता..त्यात झीनत अमान, राज बब्बर, पद्मिनी कोल्हापुरे व सिम्मी गरेवाल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यावेळी त्याचीही अशीच चर्चा झाली आणि त्यास पुरस्कारही मिळाले!
'लिपस्टिक' (१९७६) चित्रपटाचे पोस्टर!




तो 'इन्साफ का तराजू' बेतलेला होता एका अशाच बहुचर्चित अमेरिकन चित्रपटावर..त्याचं नाव होतं 'लिपस्टिक' (१९७६). लॅमोन्ट जॉन्सन दिग्दर्शित ह्या चित्रपटात मार्गाउक्स व मेरील हेमिंग्वे, ख्रिस सारान्दोन आणि ऍन बँक्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या..त्यातही नायिकेची 'प्लिज नो.." ही आर्जव भिडणारी होती!

तीन तपे लोटल्यावरही ह्या परिस्थितीत बदल नाही..आणि यावरील चित्रपट अजूनही समकालीन होतील!!


- मनोज कुलकर्णी 
['चित्रसृष्टी',  पुणे]

Saturday 22 September 2018

दिग्गज मराठी चित्रपटकर्ते..अनंत माने!


मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील कोल्हापूरचे एक दिग्गज चित्रपटकर्ते..अनंत माने यांची आज १०३ वी जयंती!
'मानिनी' (१९६१) मध्ये जयश्री गडकर!

१९६०, १९७० व १९८० या दशकांत मुख्यत्वे ग्रामीण लोककला (तमाशा) व सामाजिक अशा सुमारे ६० चित्रपटांचे दिग्दर्शन माने यांनी केले. ते मोठं यश प्राप्त करून, राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेही गेले!

'सांगते ऎका' (१९५९) मध्ये हंसा वाडकर, सूर्यकांत, जयश्री गडकर व दादा साळवी!
एकीकडे 'सांगते ऎका' (१९५९) सारखा प्रचंड गाजलेला तमाशाप्रधान चित्रपट; तर दुसरीकडे 'मानिनी' (१९६१) सारखा संस्कारक्षम चित्रपट करणारे मानेच! विशेष म्हणजे या दोन्हींना संगीत वसंत पवार यांचे आणि यांत जयश्री गडकर यांच्या आगळ्यावेगळ्या सुरेख भूमिका!

अनेक सन्मान
माने यांना मिळाले आणि त्यांच्या नावे मराठी चित्रपटासाठी पुरस्कार सुरु केला गेला!

त्यांच्या स्मृतीस हा मानाचा मुजरा!!


- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

Friday 21 September 2018



'विश्व शांति दिवसा'च्या शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 19 September 2018

शीतल सौंदर्यवती नीशा परुळेकर!


रूपगुणसंपन्न मराठी अभिनेत्री नीशा परुळेकर चा आज वाढदिवस!
'चित्रा' (२०१०) चित्रपटात नीशा परुळेकर!

'चित्रा' (२०१०) या अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर राज कुबेर यांनी केलेल्या स्त्री-केंद्रित सामाजिक चित्रपटातून नीशाची प्रभावी भूमिका मी प्रथम पाहिली..त्यावेळी तिच्याशी चांगली चर्चाही झाली!
'माहेरची वाट' चित्रपटात नीशा परुळेकर!


२००६ मध्ये 'चश्मे बहाद्दर' द्वारे रूपेरी पडद्यावर पदार्पण केलेल्या नीशा परुळेकरने नंतर 'असीमा - बियॉन्ड बाउंडरीज' (२००९), 'आम्ही चमकते तारे' (२०१२), 'परीस' (२०१३) व 'प्राईम टाईम' (२०१५) सारख्या वेगळ्या धर्तीच्या चित्रपटांतून भूमिका रंगवल्या.


त्यांचबरोबर 'रमाबाई भीमराव आंबेडकर' आणि 'महानायक वसंत तू..' यां चरित्रपटांतूनही तिने काम केले!
ग्लॅमरस सौंदर्य..नीशा परुळेकर!

दरम्यान राजकारणात प्रवेश करून समाजकार्यात ती हिरीरिने सहभाग घेऊ लागली!

अलिकडे 'पोलीस लाईन - एक पूर्ण सत्य' (२०१६) अणि 'दंडित' (२०१७) ह्या सामाजिक चित्रपटांतून तिने वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

काहीशा नीळसर पिंगट अशा तिच्या सुंदर डोळ्यांत भावोत्कटता प्रकर्षाने दिसते!

कला क्षेत्रातील पुढच्या वाटचालीसाठी तिला सुयश चिंततो !!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


- मनोज कुलकर्णी 
  ['चित्रसृष्टी', पुणे]

Monday 17 September 2018

अमृतमहोत्सवी कवि-गीतकार महानोर!


निसर्गकवी ना. धो. महानोर
"गडद जांभळं भरलं आभाळ...
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ..!"
महानोरांचे 'रानातल्या कविता'!

अमृतमहोत्सवी निसर्गकवी ना.धो. महानोर यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला! एका पावसाळी संध्याकाळी त्यांनी सादर केलेली ही कविता आठवते आणि मन त्या गंधानं धुंद होतं!

'रानातल्या कविता', 'गावातल्या गोष्टी' नि 'पक्ष्यांचे लक्ष थवे' सारखे त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.

'जैत रे जैत' (१९७७) चित्रपटातील गीतात स्मिता पाटील!
"चिंब पावसानं रान झालं आबादानी.." सारखी त्यांची चित्रपटगीतेही तो मराठी मातीचा लहेजा घेऊन आली...अगदी "राजसा जवळी जरा बसा.." सारखी बैठकीची लावणी सुद्धा!

यात विशेषत्वानं आठवतं ते डॉ. जब्बार पटेल यांच्या 'जैत रे जैत' (१९७७) या चित्रपटात स्मिता पाटीलनं अप्रतिम साकार केलेलं..
'पिफ्फ' मधील सत्कारानंतर महानोरांसमवेत मी!

 "नभ उतरू आलं..चिंब थरथर वल्ल
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात!'

'अजिंठा' या त्यांच्या खंड्काव्यावर प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी चित्रपटही केला!

'साहित्य अकादमी' ते 'पद्मश्री' असे मानाचे पुरस्कार त्यांना लाभले आणि मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही झाले!

'पिफ्फ' पुरस्कार सोहळ्यातही महानोरांची चांगली भेट झाली होती!

त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!


- मनोज कुलकर्णी 
[' चित्रसृष्टी', पुणे]

गेले ते दिन गेले! 


मी तसा धार्मिक नाही; पण गणेशोत्सव चालू असताना काल एकदम पूर्वीचे म्हणजे कुमार वयातील दिवस आठवले! तेंव्हा आम्ही सदाशिव पेठेत (आजच्या भाषेत सिटीत) राहत होतो. आता कोरेगाव पार्क (फेमस 'केपी') सारख्या कॉस्मोपॉलिटन भागात राहायला येऊन २५ वर्षें झाली. पण तरीही पूर्वीचे पेठेतील उत्सवी वातावरण आणि अनेकविध सांस्कृतिक कार्यांतील सहभाग..येथील पार्कातील उच्चभ्रू वातावरणातही आठवतो!

आपल्याकडे एक तर सण भरपूर! चैत्र पाडव्यापासून ते सुरु होतात..त्या सुमारास तळेगाव (दाभाड़े) येथे आमच्या (काकांच्या) घरी तेथील जत्रेसाठी जाणे व्हायचे. बालपणीच्या काळात ती मौज वाटायची! नंतर आषाढ़ महिन्यात पालख्या यायच्या तेंव्हा घरच्या मोठ्यांबरोबर लक्ष्मी रस्त्यावर त्यांसाठी जायचो. मग एकादशीला विविध प्रकारचा उपवासाचा फराळ खाणे होई..त्यातही साबुदाण्याची खिचड़ी ही अतिप्रिय..केवळ त्यासाठी असे दिवस चांगले वाटत! 

या प्रसंगी एक हृदय आठवण सांगायची म्हणजे त्या काळात आम्ही राहत असलेल्या (नागनाथ पाराजवळील) भागातून एक वृद्ध एकतारी वर "ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो.." हे गाणे गात जायचा. ते ऐकविण्यासाठी माझे आजोबा (ज्यांचा मी लाड़का होतो) रात्री फूटपाथवर मला कडेवर घेऊन थांबत, कारण ते ऐकल्याशिवाय मी झोपत नसे! कालांतराने 'संत ज्ञानेश्वर' चित्रपटातील ते गाणे नि त्यातील अभिनय-भावार्थ अनुभवताना हेलावून गेलो. वाटले संतांना जीवंत असताना समाजाने छळले आणि आता त्यांच्या सोन्याच्या पालख्या काढ़तायत याला काय म्हणावे?

मग श्रावण तर समृद्ध निसर्गा बरोबर नागपंचमी व 'राखी पौर्णिमे' सारखे काही पारंपारिक, तर काही नातेसंबंध जपणारे सण घेऊन यायचा. मग घरी गोड नारळी भाताचा बेत आणि (सख्खी बहिण नसतानाही) अनेक चुलत-आत्ये बहिणींच्या विविधरंगी राख्या हातावर यायच्या. त्यातली लाडक्या बहिणीची राखी नंतर काढवत नसे! दही हंडी उत्सवात गल्लीत सगळ्यांच्या आनंदात नाचत सहभागी व्हायचो. भाद्रपद येताच गणेशोत्सवाचे वेध लागत. कारण आम्ही राहायचो त्या आपटे वाड्यात सार्वजनिक मंडळ स्थापन केले होते. तिथे गणपती बसवून सांस्कृतिक कार्यक्रम करायचो. त्यांत तेथीलच हौशी आपले कलागुण सादर करायचे. त्या काळात सर्वांमध्ये एक जिव्हाळ्याचे वातावरण प्रस्थापित व्हायचे! 

'परख' चित्रपटातील "बरखा बहार आयी.." ह्या गाण्यातील (पत्र्याच्या छतातून वाहणाऱ्या पागोळ्यांचे) वास्तव आम्ही तिथे राहताना प्रत्यक्ष अनुभवले! तसेच तेंव्हा आमच्याकडे प्रथम टेलीविज़न आल्यावर वाड्यातील सर्व जण 'छायागीत' नि चित्रपट पाहण्यासाठी आमच्या इथे जमा होत. सामुहीक कला-आस्वादाचा अनोखा आनंद त्यातून सर्वांना मिळे!

आमचे संयुक्त कुटुंब होते आणि वडील मोठे असल्याने कुळधर्म आणि गणपती नि गौरींसाठी काका, आत्या नि त्यांची कुटुंबे जमायची. दसरा-दिवाळीत पण एकत्र स्नेहभोजन व्हायचे! आमच्या ('आदर्श शिक्षिका' सन्मानित) आईने सर्वांचेच मोठेपणाने खूप केले. तिच्याच पुण्याईने आज (तिच्या) मालकीच्या प्रशस्त घरात आम्ही राहतोय! रामायण-महाभारताच्या गोष्टींनी नेहमीच आमच्यावर चांगले संस्कार करणारे आजोबा विजयादशमी (दसरा) ते नरकचतुर्दशी (दिवाळी) सारख्या दिवसांबाबतची महती कथन करायचे!..अक्काआजी कडूनही संस्कार नि लाड व्हायचे!

लहानपणी दिवाळीचे मोठे अप्रूप असायचे..नवीन कपडे, पहाटे उठून सुवासिक तेल-उटणे लावून आंघोळी, (वाटून आलेले) फटाके वाजवणे मग खास फराळ..आणि शाळेला दिवाळीची सुट्टी त्यामुळे धमाल! यांत व्हिडीओ आणून आवडीचे चित्रपट पाहणे होतेच; कारण तोपर्यंत केबल नेटवर्क आलेले नव्हते! आता सर्व चित्रच बदललेय..नवीन कपडे मनात आले की घेतले जातात, चकली-लाडू सारखे पदार्थ केंव्हाही समोर येतात आणि श्रीखंड-गुलाबजाम ची स्वीट डिश जेवणात कधीही असते!

आपल्या सणांबरोबरच ईद नि नाताळ सारखे उत्सव पण मी महाविद्यालयीन मित्रांबरोबर साजरे करीत आलोय. चित्रपटा प्रमाणेच शेरो-शायरीची ही आवड असल्याने ईद च्या दिवसांत मुशायरा ऐकायला जाणे, बिर्याणी-शिरखुर्मा ची लज्जत घेणे..आणि ख्रिसमस ला खास कॅम्प मध्ये जाऊन मेन स्ट्रीट वर रंगीन वातावरणात संध्याकाळी फिरणे आणि केक-चहाचा गप्पांसाह आस्वाद घेणे..हे होत आलेय! होळी-रंगपंचमी सुद्धा सर्व रंगांची नि सर्वांबरोबर खेळत असू!

आता आधुनिक युगात परंपरा तशाच जोपासणे शक्य नाही आणि सणांचे ते अप्रूपही नाही! आपल्या क्षेत्रात आपली आवड जोपासणे हयातच स्वारस्य वाटते. त्यामुळे दिवसभर चित्रपट विश्वात (कॉम्पुटर वर) लिखाणाच्या माध्यमातून रमून जातो! कधी शायरीत लेखणी आजमावतो! मात्र अशा दिवसांत एकांतात मन कधीतरी सणासुदीच्या पूर्वीच्या दिवसांत जाते..ज्यांत निखळ आनंद होता; आपलेपणा, वात्सल्य, निरागसता व प्रेम होते..जे आजच्या धकाधकीच्या जीवनात दुरावलेय!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 5 September 2018

'धोंडी' प्रसंगी पूजा पवार-साळुंखे!

समर्थ अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे!



मराठी अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे यांस वाढदिवसाच्या शुभेच्छा!
'एक होता विदुषक' (१९९२) मध्ये पूजा पवार!

१९८७ मध्ये रुपेरी पडद्यावर त्यांनी अजिंक्य देव बरोबर राजदत्त दिग्दर्शित 'सर्जा' तून पदार्पण केले. त्यास 'सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपटा'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर डॉ. जब्बार पटेल यांचा कलात्मक 'एक होता विदुषक' (१९९२) आणि महेश कोठारे यांचा लोकप्रिय व्यावसायिक 'झपाटलेला' (१९९३) अशा चित्रपटांतून त्यांनी भूमिका रंगवल्या.
ऐन तारुण्यात सुंदर पूजा पवार!

विवाहानंतर दीर्घ कालावधी नंतर त्या २०१४ मध्ये चित्रपटाकडे परतल्या. त्यानंतर 'गोंदण' व अलिकडील 'धोंडी' अशा समकालिन चित्रपटांतून त्यांनी काम केले. नुकतीच त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांतूनही भूमिका रंगविण्यास सुरवात केलीये!

त्यांस शुभेच्छा!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

Sunday 2 September 2018

संगीतकार श्रीनिवास खळे.

श्रीनिवास खळे 

संगीतातील 'शुक्र तारा'!



- मनोज कुलकर्णी


"श्रावणात घन निळा बरसला.."

कुठूनसे हे स्वर कानी आले आणि याचे संगीतकार श्रीनिवास खळे यांची आठवण झाली...आज त्यांचा ७ वा स्मृतिदिन!
संगीतकार श्रीनिवास खळे गाताना!

आग्रा घराण्याचा प्रभाव असलेले खळे यांची गीतेही तितकीच रसभरीत होती..आणि मराठीसह गुजराथी, बंगाली व हिंदी अशा अन्य भाषांतही त्यांनी ती संगीतबद्ध केली.

सर्व वयोगटांत त्यांची गाणी गुणगुणली गेली..अगदी "किलबिल किलबिल पक्षी..", "चंदाराणी.." सारखी लहानांची असो की "नीज माझ्या नंदलाला.." हे अंगाई गीत! "शुक्र तारा मंद वारा.." सारखे प्रणयरंजन असो वा "उगवला चंद्र पुनवेचा.." सारखे रागदारीतील...नाहीतर "आला पाऊस मातीच्या वासात.." सारखं अस्सल मराठी मातीतलं नि "भेटी लागी जीवा.." सारखे भक्तीगीत!

'यंदा कर्तव्य आहे' (१९५६), 'बोलकी बाहुली' (१९६१) आणि 'सोबती' (१९७१) सारख्या चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले.

अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आणि 'पद्मभूषण'ने ते सन्मानितही झाले!


खळेकाकांना भेटल्याचा क्षण अजूनही स्मृतीपटलावर आहे..पुण्यात संगीतकार नौशाद यांच्या हस्ते तेंव्हा त्यांचा सत्कार झाला होता!


राम गबालेंच्या 'जिव्हाळा' (१९६८) चित्रपटातले त्यांनी संगीतबद्ध केलेले व लता मंगेशकर यांनी गायलेले माझे आवडते गीत या क्षणी आठवते नि भरून येते...


"या चिमण्यांनो परत फिरा रे..."


- मनोज कुलकर्णी 
 ['चित्रसृष्टी, पुणे]