Friday 26 October 2018

शास्त्रीय गायक-संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर..८१!


पंडित हृदयनाथ मंगेशकर.

मंगेशकर संगीत परिवारातील एक दिग्गज गायक-संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आज ८१ वा वाढदिवस!
पंडित हृदयनाथ मंगेशकर गाताना!

पिता दीनानाथ मंगेशकर आणि उस्ताद अमीर खांसाहेबांचे सांगीतिक संस्कार असलेले हृदयनाथ मंगेशकर यांचे भावगीत गायनही त्या धरतीनेच येते!
'महानंदा' (१९८५) च्या "माझे राणी माझे मोगा.." गाण्याचे दृश्य!

१९५५ साली मराठी चित्रपट 'आकाश गंगा' पासून त्यांची संगीतकार म्हणून कारकीर्द सुरु झाली आणि नंतर मराठी व हिंदी चित्रपटांस त्यांचे अभिजात संगीत लाभले!

मग 'संसार' चे "दयाघना.." असो वा 'निवडुंग' चे "केंव्हा तरी पहाटे.." आणि हिंदीतील 'धनवान' मधील "ये आँखे देखकर.." वा 'लेकिन' मधील "केसरीया बालमा.." तर 'महानंदा' च्या "माझे राणी माझे मोगा.." सारख्या गाण्यांतून त्यांनी गोव्याच्या लोकसंगीताचा चांगला वापर केला!
माता-पिता यांच्या फोटोंसह मंगेशकर बंधु-भगिनी (डावीकडून)
 उषाताई, मीनाताई, आशाताई, हृदयनाथजी व लतादीदी!

"ये रे घना.." नि "मी डोलकर.." सारखी त्यांनी संगीतबद्ध केलेली अन्य गाणीही गाजली आणि मंगेश पाडगावकर, सुरेश भट व ग्रेस यांच्या त्यांनी स्वरबद्ध केलेल्या काव्यरचनाही! तर मंगेशकर बंधु-भगिनींनी गायलेले सावरकरांचे "सागरा प्राण तळमळला.." गीत हृदयस्पर्शीच!

त्यांच्याशी झालेल्या भेटी आज आठवतायत.. यात चित्रकर्ते राम गबाले यांच्या 'हे गीत जीवनाचे' या अखेरच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांच्या बरोबर आम्हा समीक्षकांची रंगलेली मैफल आठवते..यात त्यांनी पार लहानपणापासून ते संगीतकार पर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला होता!

मी 'चित्रसृष्टी' चा संगीत विशेषांक पं. हृदयनाथ मंगेशकरना दाखवताना!
यानंतर अलीकडे 'पिफ' मध्ये त्यांना पुरस्कार दिल्यानंतरची भेट...यात त्यांनी माझ्या 'चित्रसृष्टी' चा संगीत विशेषांक आवर्जून पाहीला!

यातील वार्तालापात प्रशंसनीय भाष्य झाल्यावर मी मनात दीर्घ काळ घोळणारा प्रश्न त्यांना विचारला "बाळासाहेब, आपण हिंदी चित्रपटांसाठी केलेली काही गाणी ही आपल्या लोकप्रिय मराठी गीतांवर आधारित आहेत...म्हणजे 'मशाल' चे "ओ होली आयी.." हे 'जैत रे जैत' च्या ''ओ जांभुळ पिकल्या.." गाण्यावर वाटते आणि 'माया मेमसाब' चे "खुद से बाते करते रहेना.." हे 'हा खेळ सावल्यांचा' च्या ''काजळ रातीनं ओढून नेला.." ची आठवण करून देते!" यावर मिश्किल हसत ते म्हणाले "एक तर संगीतातील मूळ चीज ही बदलत नाही आणि मला एखादी रचना आवडली की मी ती पुन्हा वापरतो!"

गायन-संगीताची पं. हृदयनाथ मंगेशकर यांना अनेक पारितोषिके मिळाली आणि १९९० साली 'लेकिन' चित्रपटाच्या संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! तर २००९ मध्ये सरकार तर्फे त्यांना 'पद्मश्री' बहाल करण्यात आले!


तर अशा मंगेशकरसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 
- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment