चित्रसृष्टी (मराठी)
माझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल! यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल! मनोज कुलकर्णी (पुणे)
Sunday, 9 August 2026
Wednesday, 5 August 2026
मातृछत्र हरपले!
माझी आई 'आदर्श शिक्षिका' सरोज श्री. कुलकर्णी (वय ८२ वर्षे) हिचे नुकतेच १ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले!
तिचे संपूर्ण आयुष्य म्हणजे दिव्यत्वाची प्रचितीच..
खडतर बालपण, लहान वयात लग्न नि एकत्र कुटुंबाचा भार. यांत अनेक कष्ट, दुःखे सोसत सर्वांसाठी जणू झिजणे. परिवाराची धार्मिक कार्ये व्रतस्थपणे करीत राहणे. तरीही शिक्षणाने उत्कर्ष. 'डी.एड'. ते अगदी 'हिंदी पंडिता' पर्यंत! पुढे शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ कारकीर्द. यांत सहृदय, संवेदनशील. 'आदर्श शिक्षिका' म्हणून गौरव!
निर्मळ, भावूक, हळवे मन. नातीगोती सांभाळीत, आपल्या उत्तम स्वयंपाकाने सरबराई करणे. गायन, बागकाम यांत रुची. कलासक्त राहून रसिकताही जोपासणे आणि कलागुणांना प्रोत्साहन देणे. 'सर्वांशी चांगले वागण्याचे' संस्कारी सांगणे! माया, करुणामय अशी वात्सल्यमूर्तीच होती ती!!
आमच्या कुटुंबियांवर अनंत उपकार असणाऱ्या, अशा माझ्या थोर मातेस अतिशय दुःखद अंतःकरणाने श्रद्धांजली!!!
- मनोज कुलकर्णी
Wednesday, 1 April 2026
Thursday, 19 March 2026
Wednesday, 4 March 2026
चित्रपट रसग्रहणाच्या मार्गदर्शक..डॉ. श्यामला वनारसे!
चित्रपट कला विषयक ज्येष्ठ अध्यापिका व मानसशास्त्रज्ञ डॉ. श्यामला वनारसे यांचे नुकतेच निधन झाल्याची दुःखद बातमी कळाली!
याप्रसंगी १९८३ चा माझा महाविद्यालयीन काळ आठवला. चित्रपट विषयक लिखाणास मी सुरुवात केली होती! त्याच सुमारास पुण्यामध्ये 'चित्रदर्शन' या संस्थेस चित्रपट रसग्रहण संदर्भात जोडला गेलो. डॉ. श्यामला वनारसे यांच्या मार्गदर्शनात 'टिळक स्मारक मंदिर' च्या बेसमेंट मध्ये याचे कार्यक्रम होत. यात अध्यापना साठी 'फिल्म इंस्टिट्यूट' (एफटीआयआय) चे प्रो. सतीश बहादूर येत. मग सत्यजित रे यांच्या विख्यात 'पाथेर पांचाली' पासून ते तत्कालिन पूर्व यूरोपीय चित्रपटांपर्यंत अनेक चित्रकृतिंवर व त्यांतील तीव्र अभिव्यक्तीच्या दृश्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा होई!
नंतर १९८७-८८ दरम्यान 'पुणे विद्यापीठा'च्या 'रानडे इंस्टिट्यूट' मध्ये 'कम्युनिकेशन अँड जर्नालिज़्म' (बी.सी.जे.) चे पदवी शिक्षण घेत असताना मी तेथील 'फिल्म क्लब' ही पाहू लागलो. ग्रिफिथ ('बर्थ ऑफ़ ए नेशन'), आयझेनस्टाईन ('बॅटलशिप पोटेमकिन'), डी सिका ('बायसिकल थिव्ह्ज'), गोदार्द ('ब्रेथलेस'), बर्गमन ('व्हर्जिन स्प्रिंग'), कुरोसावा ('राशोमोन') सारख्या जगविख्यात दिग्दर्शकांचे महत्वाचे चित्रपट तिथे दाखवले. सत्यजित रे यांची 'अपू ट्रीलॉजी' पूर्ण दाखवली! हे प्रशंसून प्रो. सतीश बहादूर व 'नॅशनल फिल्म अर्काइव्ह' (एनएफएआय) चे संस्थापक-संचालक पी. के. नायर यांच्या प्रोत्साहनाने, १९८९ मध्ये मी 'फिल्म इंस्टिट्यूट' मधून 'फिल्म अप्रिसिएशन कोर्स' केला. मग प्रोफेशनल फिल्म क्रिटिक म्हणून बऱ्याच ठिकाणी लिखाण करू लागलो.
विविध फिल्म क्लब्स, अनेक चित्रपट महोत्सवांतून मी देशी-विदेशी उत्तमोत्तम चित्रपट पाहून त्यांचे रसग्रहणात्मक लेखन केले. यांत आधी डॉ. श्यामला वनारसे यांच्या 'चित्रदर्शन' ने पक्का केलेला पाया महत्वाचा होता! विशेष म्हणजे माझा 'चित्रसृष्टी' विशेषांक सुरु झाल्यावर त्यांनी त्यात लेखन ही केले!
त्यांस भावपूर्ण श्रद्धांजली!!
- मनोज कुलकर्णी
Friday, 27 February 2026
Wednesday, 14 January 2026
Monday, 10 November 2025
Friday, 22 August 2025
Thursday, 12 June 2025
स्मरण पु.लं. चे!
लोकप्रिय साहित्यिक व 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व' पु. ल. देशपांडे यांचा आज २५ वा स्मृतिदिन!
कलेच्या बहुतांश माध्यमांतून पु.लं.चा मुक्त संचार होता.
त्यांचा कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन-संगीत व अभिनित..'गुळाचा गणपती' (१९५३) हा मराठी चित्रपट अविस्मरणीय!
पु.लं.ना प्रत्यक्ष ऐकणे ही एक पर्वणी असे..एका परिसंवादात बोलताना ते म्हणाले होते, "लेखक-दिग्दर्शक संबंध हे सासू-सुनेच्या संबंधा इतकेच नाजूक असतात!''
त्यांना भेटल्याचे सुखद क्षण आठवतायत!
त्यांना विनम्र अभिवादन!!
- मनोज कुलकर्णी











