Monday 23 April 2018

महाराष्ट्राची लाडकी सोनपरी..मृणाल कुलकर्णी!


- मनोज कुलकर्णी


सुंदर मोहक 'सोनपरी'..मृणाल कुलकर्णी!

'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व'..सौंदर्यवती मृणाल कुलकर्णी सुद्धा!
'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व' असे लोकप्रिय साहित्यिक पु. ल. देशपांडे यांस संबोधले गेले. माझ्या मते महाराष्ट्राचं असं लाडकं व्यक्तिमत्व अजूनही एक आहे..ती म्हणजे मृणाल कुलकर्णी! महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान' पुरस्कार या रूपगुण संपन्न अभिनेत्री व दिग्दर्शिकेस जाहीर झाल्याने तिच्या आजवरच्या दैदीप्यमान कारकीर्दीवर हा दृष्टीक्षेप!
'स्वामी' मालिकेतील रमा..मृणाल देव (कुलकर्णी).

साहित्य व कला यांची पार्श्वभूमी असणाऱ्या (गो. नी. दांडेकर व देव) कुटुंबातील षोडशवयीन सुंदर मृणाल सर्वप्रथम  छोट्या पडद्यावर अवतरली! 'रामशात्री' ने ख्यातिप्राप्त गजानन जहागिरदार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'स्वामी' ह्या मराठी दूरदर्शन मालिकेत ती थेट पेशवे घराण्याची (माधवरावांची पत्नि) लहानगी सून रमा ह्या भूमिकेतच दिसली! पदार्पणातच घराघरांत पोहोचून हे गोजिरे रूप सर्वांचे आवडते झाले!
'श्रीकांत' (१९८५) या दूरदर्शन मालिकेत फ़ारूक़ शेख़ बरोबर मृणाल देव (कुलकर्णी).

'कमला की मौत' (१९८९) मध्ये मृणाल कुलकर्णी व आशुतोष गोवारीकर!
मग १९८५ मध्ये मृणालने दूरदर्शन वरील 'श्रीकांत' या मालिकेत फ़ारूक़ शेख़ बरोबर वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारली. विख्यात बंगाली साहित्यिक शरत्चन्द्र चट्टोपाध्याय यांच्या कथेवर ही मालिका होती. आजोबा कै. गोनीदा मराठी साहित्यातील मानाने घेतले जाणारे नाव आणि वडील डॉ. विजय देव नि आई प्रा. वीणा देव अध्यापनाच्या क्षेत्रांत व साहित्याचे जाणकार..त्यामुळे साहजिकच तिचीही साहित्याची जाण उत्तम होती नि व्यासंगही; म्हणूनच अशा अन्य प्रादेशिक भाषेतील अभिजात साहित्यातील भूमिका तिने समजून-उमजून  वठवली!
मृणाल कुलकर्णी..ग्लॅमरस स्वीट लूक!

पुढे 'पुणे विद्यापीठा'तून तिने मराठी भाषेत 'एम्.ए.' सुद्धा केले! दरम्यान 'विको' सारख्या जाहिरातींमधून नववधूच्या जाहिरातीत दिसणारी मृणाल लवकरच अॅड. रुचिर कुलकर्णीं बरोबर विवाहबद्ध झाली. सासरे जयराम कुलकर्णीही अभिनय क्षेत्रात..त्यामुळे या कलाप्रेमी परिवाराकडूनही तिच्या कलागुणांस प्रोत्साहन मिळाले!

गाजलेल्या 'अवंतिका' मालिकेत मृणाल कुलकर्णी.
अल्पावधीतच मृणाल मोठ्या पडद्यावर आली..समांतर चित्रपट ऐन भरात असणाऱ्या त्या काळात १९८९ मध्ये बासु चटर्जी यांच्या 'कमला की मौत' मध्ये तिने वेगळी भूमिका रंगवली. आज दिग्दर्शक म्हणून नाव कमावलेला आशुतोष गोवारीकर या चित्रपटात तिच्या बरोबर होता! पण त्यानंतर ती फारशी मोठ्या पडद्यावर दिसली नाही; कारण अनेक दूरचित्रवाणी मालिकांत ती व्यस्त होत गेली! मात्र मला असे नेहमी वाटते की मुख्य प्रवाहातील 'बॉलीवुड' धरतीच्या चित्रपटांत जर ती वेळेत आली असती, तर सौंदर्य नि गुणवत्ता या जोरावर ती इथे आघाडीची (लीना चंदावरकर सारखी) 'ग्लॅमरस स्टार' झाली असती!

तरी मृणाल ने 'झी' च्या 'हसरतें' पासून 'स्टार' च्या 'सोन परी' पर्यन्त गाजलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिकांतून 'प्रेटी टीव्ही स्टार' म्हणून मोठी लोकप्रियता मिळवली! या दरम्यान तिने 'मीरा', 'नूरजहाँ', 'हब्बा खातुन' ते द्रौपदी, अहिल्याबाई व जीजाबाई पर्यंत महत्वाच्या स्त्री व्यक्तिरेखा लाजवाब साकारल्या! त्याचबरोबर २००१-०३ दरम्यान त्या वेळच्या 'अल्फा मराठी' वरील स्मिता तळवलकर दिग्दर्शित 'अवंतिका' मध्ये तिने साकारलेली शिर्षक व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाली..आणि पुरुषप्रधान संस्कृतीमधील तिच्या प्रागतिक भूमिकेने ती महिला वर्गाची तर प्रचंड लाडकी झाली!
'जोडीदार' (२००० ) चित्रपटातील पारितोषिक विजेत्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी.

दरम्यान मृणालने काही मराठी चित्रपटांतूनही प्रमुख भूमिका साकारल्या..यांत 'माझं सौभाग्य' (१९९४) व 'जमलं हो जमलं' (१९९५) सारखे कौटुंबिक चित्रपट होते; तर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' (२०००) व 'वीर सावरकर' (२००१) सारख्या चरित्रपर महत्वाच्या चित्रकृती होत्या. 

ग्लॅमरस सौंदर्य व गुणवत्ता..मृणाल कुलकर्णी!
त्याचबरोबर काही हिंदी चित्रपटांतूनही कामे केली..यांत 'आशिक़' (२००१), 'उफ़्फ़ क्या जादू मोहब्बत है' (२००४) व 'कुछ मीठा हो जाये' (२००५) यांचा समावेश होतो! तसेच 'राज-का-रण' (२००५), 'मेड इन चायना' (२००९) व 'यलो' (२०१४) सारख्या राजकीय-सामाजिक मराठी चित्रपटांतूनही तिने लक्षणीय भूमिका केल्या!


अभिनय क्षेत्रात चांगले योगदान दिल्यावर मृणालने दिग्दर्शन करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला आणि २०१३ मध्ये 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' ह्या लोकप्रिय कवि मंगेश पाडगावकर यांच्या कवितेने स्फूर्ती घेऊन त्याच शिर्षकाचा रोमँटिक मराठी सिनेमा प्रथम दिग्दर्शित केला आणि त्यात भूमिकाही करून अभिनय आपण सोडलेला नाही याची ग्वाही दिली! याच्या पुढच्याच वर्षी तिने 'रमा-माधव' ही पेशवाईच्या राजकीय-सांस्कृतिक पार्श्वभूमीवरील करुण प्रेमकथा आपल्या लेखन-दिग्दर्शनातून अनोख्या नि भव्यदिव्य स्वरूपात पडद्यावर आणली!..आणि आपल्या रमा या श्रेष्ठ स्त्री व्यक्तिरेखेस एक प्रकारे मानवंदना दिली!

आपल्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीत मृणाल कुलकर्णीस आजवर अनेक पुरस्कार मिळालेत. यांत 'जोडीदार' (२०००) या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी 'स्क्रीन' चा 'उत्कृष्ठ अभिनेत्री' आणि तिच्या तिच्या अत्यंत गाजलेल्या गोंडस 'सोनपरी' साठी 'स्टार प्रवाह' चा 'बेस्ट जादुई क़िरदार' ह्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. तसेच तिने प्रमुख भूमिका केलेल्या अमोल पालेकरांच्या 'थांग' (२००५) ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता!..तर तिने स्वतः दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांस आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली प्रशंसा प्राप्त झालीये!

आता त्यांचा मुलगा विराजसही आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत या कला क्षेत्रात आला असून, नुकतेच त्याने 'हॉस्टेल डेज' या मराठी चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर जोरदार पदार्पण केले आहे..तर त्याने लिहिलेल्या पटकथेवर आता मृणाल कुलकर्णीचा नविन दिग्दर्शकीय चित्रपट 'ती अँड ती' येऊ घातला आहे..या सगळ्या बरोबर समाजकार्यांतही तिचा हीरीरिने सहभाग असतो!
दिग्दर्शन क्षेत्रातही यशस्वी पाऊल!..मृणाल कुलकर्णी!

चित्रपट कारकिर्दीसह पुढच्या सर्व कार्यांसाठी आणि या सृजनशील विश्वात कायम सोनपरीच राहण्यासाठी आमच्या फेव्हरेट मृणाल कुलकर्णीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!!


- मनोज कुलकर्णी
 ['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment