Saturday 27 February 2021

कुसुमाग्रज..मराठी भाषेस लाभलेला एक दैदीप्यमान अलंकार!


जयंती नि राजभाषा दिनी वंदन!!

- मनोज कुलकर्णी

पत्रकार सदा डुंबरे!
ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे गेले याची पत्रकार विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

तसा त्यांचा माझा फार परिचय नव्हता. पण मी येथे जर्नालिज्म डिपार्टमेंट/'रानडे इन्स्टिटयूट' मधून १९८७-८८ मध्ये 'बीसीजे' करीत असताना, एक असाइनमेंट म्हणून 'सकाळ' कडे पुण्यातील 'आदिवासी संशोधन संस्थे' वर त्याच्या तत्कालिन संचालकांच्या मुलाखतीसह लेख दिला होता. अरुण खोरे यांच्या सांगण्यावरून. ते तेंव्हा सदा डुंबरें बरोबर काम करीत होते!..आणि माझा तो लेख त्यांनी एडिटोरिअल शेजारी मिडिल आर्टिकल म्हणून प्रसिद्ध केला. तेंव्हा वृत्तपत्र क्षेत्रात त्या जागी लेख येणे प्रतिष्ठेचे समजले जायचे!

पुढे काही वृत्तपत्रांतून अल्प काम केल्यानंतर माझा मुख्य प्रवाहातील पत्रकारितेशी फार संबंध राहिला नाही. (नंतर कधी चित्रपट विषयक लेख देण्यास 'सकाळ' मध्ये गेलो!) 'चित्रपट पत्रकारिता' हे माझे स्पेशलायझेशन होते. 'फ़िल्म अप्रेसिएशन कोर्स' करून या क्षेत्रात मी फ्री लान्स कार्यरत राहिलो. तेंव्हा अशा कार्यक्रमांस कधी डुंबरे असत..आणि समोर येताच स्मित हास्य करीत!

तेंव्हा पासून मी एक निरीक्षण केलेय की त्यांचे संवाद साधणे वा कार्यक्रमांतून बोलणे हे बहुतांश इंग्रजीत असायचे. 
मग जब्बार पटेलांच्या 'मुक्ता' चित्रपटाच्या डेक्कनवर 'पूनम' मध्ये झालेल्या पार्टीत "वुई आर प्राऊड ऑफ यू!" म्हणत सोनाली कुलकर्णीच्या अभिनयाचे कौतुक करणे असो. अथवा 'रानडे इन्स्टिटयूट' मधील स्नेहमेळाव्यातील संभाषण असो, नाहीतर 'सकाळ' च्या वर्धापन दिनी बोलणे असो! एकदा, बहुदा त्यांच्या साप्ताहिकाच्या वर्धापनदिनी ते इंग्रजीतून व्याख्यान देत असताना (मराठी वृत्तपत्र पत्रकाराकडून अनपेक्षित असल्याने) श्रोत्यांना ते न रुचल्याचेही मी ऐकलेय!

त्यांच्या 'ब्रॉड व्हिजन' मुळे तसे असावे! सदैव ऐटीत नि प्रसन्न वाटणारे हे व्यासंगी पत्रकार असे अकाली जावेत याचे वाईटच वाटते!
त्यांस भावांजली!

- मनोज कुलकर्णी