Saturday 25 August 2018

विनोदवीर..विजय चव्हाण.

अकाली एक्झिट!




विनोदी अभिनेता विजय चव्हाण यांच्या आकस्मित निधनाची बातमी चटका लावून गेली!

१९८५ च्या सुमारास आचार्य अत्रे यांच्या 'मोरुची मावशी' नाटकाने विजय चव्हाण प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मला आठवते त्यावेळी मी त्याची घेतलेली मुलाखत..जी तेंव्हा पुण्यातील 'मनोहर' साप्ताहिकात प्रसिद्ध झाली होती नि तो सुखावला होता! यात त्याने ती शिर्षक भूमिका साकारताना करावा लागणारा 'आटापिटा' कथन केला होता. "टांग टिंग टिंगा.." हे त्यातील गाजलेले गाणे संगीतबद्ध करणाऱ्या अशोक पत्की यांचेही ते पहिले हिट!
'मोरुची मावशी' नाटकातील त्या गाजलेल्या भूमिकेत विजय चव्हाण!




यानंतर 'आली लहर केला कहर' व 'वहिनीची माया' ने विजय चव्हाण चित्रपटात आला. त्यानंतर दादा कोंड़कें चा 'येऊ का घरात' (१९९२) असो वा महेश कोठारे चा लक्ष्मीकांत बेर्डे बरोबरील 'झपाटलेला' (१९९३) नाहीतर भरत जाधव बरोबरचा 'भरत आला परत' (२००७)..अशा विनोदवीरांबरोबर ही चित्रपटांतून त्याची अनोखी फार्सिकल 'जत्रा' रंगली. पुढे दूरचित्रवाणी मालिकांतूनही त्याने विविधरंगी भूमिका साकारल्या!

अलिकडेच राज्य शासनाचा 'व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार' स्वीकारल्यानंतर बोलताना प्रतिकुल (आरोग्य) परिस्थितीत ही आपली विनोद बुद्धी शाबूत असल्याचे त्याने दर्शवले; मात्र पुन्हा हसवण्याच्या भूमिकांत परतण्याचा त्याने व्यक्त केलेला आशावाद नियतीच्या चक्रात विरुन गेला!


त्यांस भावांजली!

- मनोज कुलकर्णी
 ('चित्रसृष्टी, पुणे)

Wednesday 22 August 2018

सूर्यकांतजींना मुजरा!


- मनोज कुलकर्णी



मराठी चित्रपटाचा रूपेरी पडदा आपल्या अस्सल रांगड्या मराठी बाण्याने गाजवणारे रुबाबदार कलावंत म्हणजे..
सूर्यकांत मांढरे!
भालजी पेंढारकर यांच्या 'साधी माणसं' (१९६५) मध्ये सूर्यकांत व जयश्री गडकर!

ग्रामीण ('सांगते ऐका') वा सामाजिक ('कन्यादान') अशा विविध जातकुळीच्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाचा ठसा उमटवला! त्यांच्या सर्वात संस्मरणीय आणि परस्पर विरोधी भूमिका ठरल्या त्या..'साधी माणसं' (१९६५) मधील सरळमार्गी, कष्टकरी शंकर व 'ज्योतिबाचा नवस' (१९७५) मधील गाजलेला बंडखोर सर्जेराव!

चित्रपटांबरोबर 'बेबंदशाही', 'आग्र्याहून सुटका' सारख्या ऐतिहासिक नाटकांतूनही त्यांनी भूमिका रंगवल्या..ते चित्रकारही होते आणि त्यांनी लिहीलेले 'धाकटी पाती' हे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले!

रुबाबदार पाटील ही सूर्यकांत यांनी झोकात रंगवला!
विविध पुरस्कारांसह 'पद्मश्री ' व 'महाराष्ट्र गौरव' सारखे सन्मानही सूर्यकांत ना लाभले!

सूर्यकांतजींबरोबरच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत..साधारण १९९२ च्या सुमारास आम्ही स्थापन केलेल्या 'पुणे फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन' च्या पहिल्या कार्यक्रमास ते प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. पुढे १९९५ ला मुंबईत साजऱ्या झालेल्या 'चित्रपट शताब्दी कार्यक्रमा'त नरीमन पॉईंट वरुन निघालेल्या मिरवणुकीत विक्टोरिया (घोडा) गाडीत त्यांच्याबरोबर मीही होतो! त्यानंतर १९९६ ला दिल्लीत सम्पन्न झालेल्या आपल्या 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा' ('इफ्फी') मध्ये त्यांनी काम केलेला 'दोघी' चित्रपट 'पेनोरमा'त असल्याने तेही तिथे आले होते..असा भेटींतून ऋणानुबंध निर्माण झाला!

आज स्मृतीदिनी त्यांना ही भावांजली!!

- मनोज कुलकर्णी
 ['चित्रसृष्टी', पुणे]

Tuesday 21 August 2018

सर्वोत्कृष्ट चित्रपट..बाळबोध कथासूत्र नि व्यक्तिरेखांकन!


- मनोज कुलकर्णी


'उत्कृष्ट चित्रपटा'चा या वेळचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मराठी 'रेडू' चित्रपटास मिळाल्यानंतर, आसामी 'व्हिलेज रॉकस्टार' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा या वेळचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर पुन्हा तशीच निराशा झाली! 
याचे कारण दोन्हींचे बाळबोध कथासूत्र, व्यक्तिरेखांकन व सरधोपट हाताळणी!

मराठी 'रेडू' चित्रपटातील दृश्य!
'रेडू' चित्रपटातील अपवादात्मक तरल दृश्य!
आजच्या अत्याधुनिक युगात जिथे समाजाच्या (आर्थिकदृष्ट्या) खालच्या स्तरापर्यंतही टेलीविज़न पोहोचला आहे आणि इंटरनेट-मोबाईल सारख्या साधनांतून भरपूर करमणूक उपलब्ध झालीये..त्या काळात रेडीओ चे अप्रूप नि त्या भोवती गुंफलेली कथा कशी काय अपील होणार? अगदी १९७० दशकपूर्व काळ जरी 'रेड़ू' ने घेतला असला, तरी ट्रांजिस्टर साठी वेडापिसा होणारा माणूस हा खुळेपणा वाटतो. तसेच खाणीत काम करणारा हा माणूस घरीदारी तसाच मातकट कपड्यात वावरतो, विक्षिप्त हावभाव करतो आणि भोवतालची काही पण त्यांत अस्वाभाविक पणे येतांत..हे चित्र अगदी निरस वाटते! तसेच सामाजिक सलोख्याच्या उदात्त बिंदुवर चित्रपटाचा क्लायमॅक्स नेण्याचा प्रयत्न इथे दिसतो!..असा जर काही सामाजिक आशय चित्रकर्त्यांना मांडायचा होता, तर त्यासाठी अन्य कथावस्तु त्यांत घ्यायला हवी होती आणि स्वाभाविक व्यक्तिरेखांकन हवे होते! नाही म्हणायला (कोकण पार्श्वभूमीवर) छायाचित्रण तेवढे वेधक झालेय!

'इटालियन नववास्तववादा'चे प्रवर्तक व्हिट्टोरिओ डी सिका यांच्या 'बायसिकल थिवज' (१९४८) चित्रपटाचा संदर्भ इथे देणे उचित ठरेल. यात तत्कालिन आर्थिक-सामाजिक वास्तव मांडण्यासाठी सायकल कथावस्तु म्हणून केंद्रस्थानी होती; पण आजच्या मेट्रो युगातही तो भिडतो, कारण त्यातील कुटुंबप्रमुखाची ती सायकल हे उपजीविकेचे साधन होते आणि ती चोरीला गेल्यावर त्याचा माग घेतानाचा घटनाक्रम सर्व ज्वलंत वास्तव समोर आणतो. हे चित्र आज जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या समाजास सर्वकालीन अपील होणारेच! अर्थात या श्रेष्ठ चित्रकृतिशी तुलना होऊ शकत नाही; पण अशा प्रादेशिक चित्रपटांनी ह्याचे अवलोकन करावे! तसेच 'रेडू' ची हाताळणी काहीशी इराणी (किअरोस्तामी सारख्याच्या) चित्रपटाच्या अंगाने करण्याचा (असफल) प्रयत्न झाल्यासारखे वाटते; पण ती मर्मभेदी स्वाभाविकता त्यांस साध्य झालेली नाही!

आसामी 'व्हिलेज रॉकस्टार' चित्रपटातील दृश्य!
आसामी 'व्हिलेज रॉकस्टार'ची अवस्था अशीच सामान्य होती. त्याबाबत मी या वेळच्या राष्ट्रीय पुरस्कारां बाबत च्या माझ्या (इंग्रजी) लेखात लिहिले होते. गावातील साधारण परिस्थितीतील मुले आपला बॅन्ड काढू पाहतात हे त्याचे कथासूत्र होते..पण अर्ध्या भागातील त्यांचा वावर हा 'फ्रेंच न्यू वेव्ह' चे प्रवर्तक फ्रांस्वा त्रुफो यांच्या 'मिस्चिफ मेकर्स' (१९५७) या लघुपटातील उडाणटप्प्पू मुलांप्रमाणे (मात्र सरधोपट झालेला) वाटतो आणि खेळण्यातील वाद्ये घेऊन भरकटलेली ही पात्रे बेगडी वाटतात! हॅन्डी कॅमेराने केलेली ही हौशी फिल्म वाटते!

राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारांत सर्वोत्कॄष्ट म्हणून निवडलेले असे चित्रपट पाहता, याबाबतच्या परीक्षक समितीच्या गुणवत्तेविषयी संदेह निर्माण होतो! त्यांत सुधारणा होण्याची गरज आहे. यामध्ये पुरस्कारप्राप्त चित्रपटकर्त्यांना नाउमेद करण्याचा हेतु नाही. पुढचे चित्रपट उत्तम करण्यासाठी त्यांना शुभेच्छा!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

Wednesday 15 August 2018

 

जय भारत!


स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा!


- मनोज कुलकर्णी

Friday 3 August 2018

कुठेय विकास?


बातम्यांसाठी चॅनेल्स सर्फ करताना एका मराठी वाहिनीवर चालू असलेल्या मराठी चित्रपटाचे सध्याच्या परिस्थितिशी सांगड घालणारे दृश्य समोर आले..'गोष्ट छोटी डोंगराएवढी' (२००९) तील तो प्रसंग..

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वृद्ध वडिलांस (निळू फुले त्यांच्या अखेरच्या भूमिकेत) भेटायला आलेला मंत्री (सयाजी शिंदे) एक लाखाची मदत देणार असल्याचे सांगतो..त्यावर तो वृद्ध पिता म्हणतो "मरणासाठी एक लाख देता..जगण्यासाठी १०-१५ हजार देत चला शेतकऱ्याला!'..ते पाहून विषण्ण मनःस्थितित बाजुला उभा होतकरू इसम (मकरंद अनासपुरे) शेतकऱ्याच्या अनाथ मुलाला दाखवत मंत्र्याला म्हणतो, "याचं नाव विकास..कसा होणार?"

अलिकडच्या काळातील मराठी चित्रपटातील हे प्रखर समकालिन चित्र असावे!..नाहीतर फॅशन म्हणून (सोशल वर्कचा कोर्स केलेले) सामाजिक वास्तव पडद्यावर आणणारे (?) काही आहेत!

'सबका साथ आणि सबका विकास' म्हणत (स्वतःचाच विकास करीत असलेल्या) सत्ताधीशांनी आता भाबड्या जनतेला असे वेठीस धरु नये!

- मनोज कुलकर्णी
 ['चित्रसृष्टी', पुणे]