Sunday 27 February 2022

कुसुमाग्रज आणि स्वरसम्राज्ञी!

आज 'ज्ञानपीठ' नि ''पद्मभूषण' सन्मानित ख्यातनाम मराठी साहित्यिक, कवी व नाटककार..
वि. वा. शिरवाडकर तथा 'कुसुमाग्रज' यांची ११० वी जयंती!

'प्रवासी पक्षी' आणि 'विशाखा' सारखे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तर 'नटसम्राट' ही त्यांची कालातीत लोकप्रिय नाट्यकृती ठरलीये!

'मराठी माती' व 'मराठीचिए नगरी' लिहिणाऱ्या त्यांचा हा जन्मदिन 'जागतिक मराठी दिन' म्हणुन साजरा केला जातो.

"काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा.." सारख्या कुसुमाग्रजांच्या काव्यरचना गायलेल्या 'स्वरसम्राज्ञी' लता मंगेशकर यांच्यासमवेत त्यांचे आज इथे स्मरण!

त्यांस विनम्र सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Friday 25 February 2022

जगात सध्या काय चाललेय याकडे दुर्लक्ष करीत, काही अजून इतिहास अन पुराण उगाळत बसलेत!

- मनोज कुलकर्णी

Thursday 24 February 2022

विदेशी चित्रपटांच्या धर्तीवर, परदेशांत चित्रण करून मराठी सिनेमा काय साधणार? ओरिजिनल स्टोरी कन्सेप्ट, फिल्ममेकिंग जॉनर असणे आवश्यक!

- मनोज कुलकर्णी

तुम्ही काय दिवे लावले याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही!
आम्ही कशाला वाचायचं/पाहायचं?

राजकीय रंगसंगती कधी कशी ही होईल..
लाल हिरव्यात, निळा केशरीत ही जाईल!

- मनोज 'मानस रूमानी'

Sunday 20 February 2022

समाजात दुफळी निर्माण करणारे चित्रपट का निघतात?
सामाजिक सौहार्द टिकवण्याची आता खरी गरज आहे.
इतिहासावर पडदा टाकून चांगल्या वर्तमानाचा विचार व्हायला हवा!

- मनोज कुलकर्णी

Saturday 19 February 2022

समकालीन समाज वास्तवाचं भान मराठी चित्रपटाला आहे का?
ऐतिहासिक नाहीतर आधुनिकतेचा आव आणलेले 'ऑफ बीटस'
चित्रपट सर्वसामान्यांना कसे अपील होणार?

- मनोज कुलकर्णी

मराठी चित्रपट इतिहासाच्या खिंडीत अडकलाय का?,
अतर्क्यतेच्या आहारी गेलाय का?
काही पडलेले प्रश्न!!


- मनोज कुलकर्णी

शाळेत असताना 'भूगोल' विषय माझा आवडता होता. पृथ्वीतलावरील सृष्टीचे, विविध प्रदेशांचे सर्वंकष ज्ञान त्यात मिळे!
'इतिहास' अजूनही शंका निरसन झालेला विषय वाटत नाही!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 9 February 2022

लतिका चे झाले लता!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे मूळ पाळण्यातले नाव हृदया..त्याचबरोबर हेमा ही असल्याचे संदर्भ  आहेत!

त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पाऊल ठेवले ते..वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या संगीत नाटकांतून. पुढे 'भावबंधन' मधील त्यांची "लतिका" ही भूमिका सर्वांच्याच पसंतीस उतरली आणि त्यातूनच त्यांचे नाव "लता" झाले!

खरे तर 'हृदया' हेच त्यांचे नाव अधिक समर्पक ठरते..ते जगातील तमाम संगीत रसिकांच्या हृदयावर गानसम्राज्ञी म्हणून त्यांनी संपादलेले सर्वोच्च स्थान पाहता!

त्यांस सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 6 February 2022


अखेरचा हा दंडवत.!!!🙏


होतच होते ह्या भूमीवर सरस्वती पूजन..
आता स्वर्गात होईल गानसम्राज्ञी पूजन!

आमचे एक दैवत 'भारतरत्न' लता मंगेशकर जी आपणास नतमस्तक होत साश्रु नयनांनी माझी ही श्रद्धांजली!!
🥀🙏

- मनोज कुलकर्णी

Friday 4 February 2022

दिलखुलास दिग्गज..प्रोफेशनल ऍक्टर!

दिग्गज अभिनेते रमेश देव जी..तरुण तडफदार आणि बुजुर्ग!

"घरी ये, आमच्याकडे सगळे आर्टिस्ट आहेत!"
साधारण ३० वर्षांपूर्वी एका कार्यक्रमानंतर माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणालेले, आपल्या चित्रपटसृष्टीतील एक प्रस्थ रमेश जी देव आता आडनावानुसार स्वगृही परतलेत!

मूळचे राजस्थानचे आणि नंतर कोल्हापूरच्या मातीत वाढल्यामुळे त्यांच्यात रुबाब अन रांगडेपण दोन्ही होते!..सत्तर वर्षांपूर्वी, हंसा वाडकर नायिका असलेल्या 'पाटलाची पोर' हया दिनकर द. पाटलांच्या चित्रपटातील छोट्या भूमिकेद्वारे ते प्रथम पडद्यावर आले. पण ते स्वतःला शिष्य समजत ते प्रख्यात मराठी चित्रपटकर्ते राजा परांजपे यांचे, ज्यांच्या १९५५ मध्ये आलेल्या 'आंधळा मागतो एक डोळा' चित्रपटात ते खऱ्या अर्थाने चमकले!

'अपराध' (१९६९) चित्रपटातील "सांग कधी कळणार तुला.." गाण्यात रमेश देव व सीमा!
राजाभाऊ परांजपेंच्याच चित्रपटांतून काम करताना रमेशजीं ची सीमा जी ह्यांच्याशी गाठ पडली आणि 'सुवासिनी' (१९६१) हा ते नायक
नायिका असलेल्या चित्रपटातील गदिमांचे "हृदयी प्रीत जागते.." हे गीत ह्या उभयतांच्या आयुष्यात ती अनुभूती देऊन गेले. त्यानंतर दिनकर द. पाटलांच्या 'वरदक्षिणा' (१९६१) मध्ये ते विवाहित जोडप्याच्या रूपात दिसले! पुढे राजाभाऊंच्या 'पडछाया' (१९६५) आणि राजदत्तजीं च्या 'अपराध' (१९६९) ह्या काहीशा वेगळ्या चित्रपटांतून ते दोघे आगळ्या भूमिकांतून आले. अनेकविध मराठी-हिंदी चित्रपटांतून बरोबरीने काम करीत, त्यांचीच निर्मिती असलेल्या 'या सुखांनो या' (१९७५) सारखे त्यांचे सांसारिक जीवनही फुलले!

रमेश जी तसे मराठी बरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीतही प्रवेशले ते १९६२ च्या 'आरती' चित्रपटाद्वारे. ते व शशिकला ह्यांनी मीना कुमारीच्या दिर व भावजयीच्या भूमिका त्यांत केल्या होत्या. पण सुरुवातीच्या काळात ते खलनायकी भूमिकांतच हिंदी सिनेमात दिसले. 'सरस्वती चंद्र' (१९६८) ह्या अभिजात चित्रपटात नूतनचा श्रीमंत बाहेरख्याली नवरा त्यांनी तसाच रंगवला होता! पुढे जितेंद्र, संजीव कुमार, शत्रुघ्न सिन्हा यांच्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका खल प्रवृत्तीच्या राहिल्या. दरम्यान हृषिकेश मुखर्जीं नी 'आनंद' (१९७१) चित्रपटात त्यांना एका प्रतिष्टीत भूमिकेत आणले ते डॉ. कुलकर्णी म्हणून. ह्यात सीमाजी त्यांच्या पत्नी होत्या आणि हे जोडपे मराठीतच बोलले! ह्यात राजेश खन्ना व अमिताभ बच्चन ह्या दोन (माजी-आजी) सुपरस्टार्सच्या मधील ते दुवा होते!

'आनंद' (१९७१) चित्रपटात अमिताभ बच्चन व राजेश खन्ना ह्या सुपरस्टार्स मधील दुवा!
कोल्हापूर, मुंबई येथील मराठी-हिंदी चित्रपटांतून कामे करीत ते दक्षिणे कडील चित्रपट सृष्टीकडे ही वळले होते. त्यांच्यात कमालीचा प्रोफेशनलिज्म होता हे त्यांच्या बोलण्यां तून जाणवे. मद्रास ला (आताचे चेन्नई) वासन यांच्या 'जेमिनी स्टुडिओज' मध्ये ते कसे पोहोचले हे ते कार्यक्रमात आत्मविश्वास पूर्ण इंग्रजीत संभाषणाने सांगत! तेथील एस. एस. बालन यांच्या अमिताभ बच्चन व माला सिन्हा अभिनित 'संजोग' (१९७१) चित्रपटात ही ते डॉक्टर च्या भूमिकेत दिसले. पुढे 'जनम जनम ना साथ' (१९७७) ह्या गुजराथी चित्रपटात ही ते आले. 'प्रचंदा पुतानीगुलु' (१९८१) या कन्नड चित्रपटाच्या 'अनमोल सितारे' ह्या हिंदी आवृत्तीत ही ते व सीमाजी दोघे होते!

पुढे विविध प्रकारच्या हिंदी चित्रपटां तून ते दिसले..रामसेंच्या थरारक 'दहशत' (१९८१) मध्ये इन्स्पेक्टर, देव आनंद च्या 'हम नौजवान' (१९८५) मध्ये प्रिन्सिपॉल, 'कुदरत का कानून' (१९८७) मध्ये जज, 'सोने पे सुहागा' (१९८८) मध्ये वकील आणि शेवटच्या 'घायल वन्स अगेन' (२०१६) या सन्नी देओल अभिनित-दिग्दर्शित चित्रपटात कुलकर्णी आजोबा!

पुत्र अभिनय व अजिंक्य सह सीमा जी रमेश देव जी!
रमेश जी आणि सीमा जी देव ह्यांचे दोन्ही मुलगे पण चित्रपट क्षेत्रांत आले. अजिंक्य त्यांच्याच 'सर्जा' (१९८७) द्वारे अभिनेता म्हणून आणि अभिनय 'दिल्ली बेल्ली' (२०११) ह्या यशस्वी हिंदी चित्रपटाने दिग्दर्शक म्हणून! रमेशजीं ची क्रेज तरुण अभिनेता मुलासमोर ही किती जबरदस्त होती हे एका कार्यक्रमात अनुभवले. ते त्यांच्या शैलीत खर्ज्यात दिलखुलास हसून जेंव्हा बोलायला लागले तेंव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला होता. ह्याने अजिंक्य ही अचंबित झाल्याचे दिसले!

नव्वदीत ही रमेश देव यांची ऊर्जा ही तरुणांस लाजवणारी होती हे दूरदर्शन च्या एका कार्यक्रमात दिसले. त्या वयात ही "सूर तेच छेडीता.." या आपल्या गाजलेल्या गाण्यावर ते उत्स्फूर्त नाचायला लागले होते!

त्यांना जीवन गौरव सन्मान सह अनेक पुरस्कार मिळाले!!

त्यांस ही सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी