Monday 31 December 2018

मिचएल काकोयान्नीस यांच्या 'झोर्बा द ग्रीक' ( १९६४) चित्रपटाचे पोस्टर!

'झोर्बा द ग्रीक' आणि तेंडुलकरांचे रसग्रहण!



काही समकालिन संदर्भांमुळे व प्रसंग औचित्यामुळे..
'झोर्बा द ग्रीक' या अभिजात चित्रपटाची आठवण झाली! त्याचबरोबर आठवले..प्रख्यात लेखक विजय तेंडुलकर यांनी या चित्रपटाचे केलेले रसग्रहण!

१९४६ साली प्रसिद्ध झालेल्या विख्यात ग्रीक लेखक निकोस कझान्टझाकीस यांच्या 'झोर्बा द ग्रीक' या अभिजात कादंबरीस ७० वर्षे पूर्ण होऊन गेली! याच कादंबरीवरून त्याच नावाचा चित्रपट ग्रीक दिग्दर्शक मिचएल काकोयान्नीस यांनी तयार केला..जो डिसेम्बर, १९६४ मध्ये प्रदर्शित झाला होता! 

या चित्रपटात शीर्षक भूमिका केली होती ख्यातनाम मेक्सिकन-अमेरिकन अभिनेते अँथोनी क़ुइन यांनी.. त्यांची जन्मशताब्दी तीन वर्षांपूर्वी होऊन गेली!..या चित्रपटातील मॅडम हॉर्टेन्स ह्या भूमिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री' चा 'ऑस्कर' पुरस्कार लिला केदरोवा ह्या रशियन- फ्रेंच अभिनेत्रीने जिंकला होता!
'झोर्बा द ग्रीक' ( १९६४) चित्रपटात अँथोनी क़ुइन व अॅलन बेट्स!

आपल्या पुस्तकी विश्वातून बाहेर येऊन..
झोर्बा नामक अवलिया बरोबर जीवनाची 
खरी अनुभूती घेणाऱ्या बॅसिल या बुद्धिजीवी लेखकाची ही सफर!..यात अॅलन बेट्स या इंग्लिश अभिनेत्याने ही बॅसिलची भूमिका 'झोर्बा' अप्रतिम रंगवलेल्या अँथोनी क़ुइन बरोबर केली आहे..तर यात विधवेची लक्षवेधी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या इरेन पापास ह्या ग्रीक अभिनेत्री आता ९२ वर्षांच्या आहेत!
   लेखक विजय तेंडुलकर!

आपल्या धारदार लेखणीने वास्तवदर्शी लेखन करणारे विजय तेंडुलकर हे प्रतिभाशाली नाटककार व पटकथा लेखक होते हे सर्वज्ञात आहे; पण ते जागतिक चित्रपटाचे (विशेषतः अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमनचे) चाहते आणि उत्तम चित्रपट रसग्रहण करणारे होते हे फार कमी लोकांना माहीत असेल! त्यांचे हे वैशिठ्य मी चित्रपट महोत्सवांतून आणि संबंधित चर्चासत्रातून जवळून अनुभवले आहे..ज्यात त्यांनी एकदा 'झोर्बा द ग्रीक' चित्रपटाचे (पटकथा, तंत्र व अभिनय अशा) बारकाव्यांनिशी रसभरीत विश्लेषण केले होते!..आणि ऐकणारे तो विलक्षण दृश्यानुभव घेत होते!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 30 December 2018

"..स्मृती ठेवुनी जाती.."

कवि-गीतकार मंगेश पाडगावकर!
मराठीतील अत्यंत लोकप्रिय कवि आणि गीतकार मंगेश पाडगावकर हे जग सोडून गेल्याला आता तीन वर्षें झाली! त्यांच्या आठवणीत शिर्षक ओळ मनात रुंजी घालते!
मंगेश पाडगावकरांची काव्यसंपदा त्यांच्याकडून ऐकणे हा अनोखा अनुभव असे!

'आनंदऋतू', 'गझल' ते 'जिप्सी', 'बोलगाणी' 
असे ४० च्या आसपास काव्यसंग्रह आणि.. 
मराठी चित्रपटांसाठी मंगेश पाडगावकरांनी 
गीते लिहिली.

पाडगावकरांची काव्यसंपदा पाहता ते नेहमी काळाबरोबर राहिलेले आणि त्यानुसार कायम नाविन्यपूर्ण लिहिणारे असे कालातीत कवि वाटतात! तसेच सर्व (युवासह) पिढींना भावणारे त्यांचे काव्य नवा बहर घेऊन आल्याचे जाणवते! 

म्हणूनच "लाजून हासणे.." लिहिणारे पाडगावकर कालांतराने लिहून गेले "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.." यात 'मराठीतून "इश्श" म्हणून प्रेम करता येतं आणि उर्दूमधून "इश्क" म्हणूनही प्रेम करता येतं' अशी भाषातीत प्रेमाची अनुभूती ते देतात! अर्थात "शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले.." हेही त्यांनी लिहिलेय!
कवि मंगेश पाडगावकर..तत्कालिन राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जीं कडून 'पद्मभूषण' पुरस्कार स्वीकारताना!


"शब्द शब्द जपून ठेव.." अशी काव्यरचना करणाऱ्या मंगेश पाडगावकरांना.. 'साहित्य अकादमी' पुरस्कारा बरोबरच 'महाराष्ट्र भूषण' व 'पद्मभूषण' पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. 'विश्व मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले!

"शुक्र तारा मंद वारा.." हे अरुण दातेंनी गायलेलं आणि "माझे जीवन गाणे.." हे पं. जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं अशी पाडगावकरांची गीते मनात रुंजी घालतात!

मात्र ते "या जन्मावर..या जगण्यावर शतदा प्रेम करावे." असे सांगून आपल्यातून निघून गेलेत!
त्यांना ही विनम्र भावांजली!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 26 December 2018

मग्रूर कलाकाराची पाठराखण असामान्य दिग्दर्शक 'समजणाऱ्या' शिष्ठाने पुण्यातल्या आशियाई चित्रपट महोत्सवात परवा केली!


पण धर्मनिरपेक्ष मानवतेवर बोलण्यासाठी आधी माणूसपण असावे लागते!

Thursday 20 December 2018

प्रथितयश चित्रपटकर्ते भालकर काळाच्या पडद्याआड!

मराठी चित्रपटकर्ते यशवंत भालकर!
विविधरंगी मराठी चित्रपटकर्ते यशवंत भालकर यांचे काल अकाली निधन झाले!

कोल्हापूर मध्ये 'चित्रतपस्वी' भालजी पेंढारकर यांच्या 'तांबडी माती' सारख्या चित्रपटांतून सुरुवातीस बालकलाकार म्हणून..आणि नंतर बाबांच्याच 'जयप्रभा स्टुडिओ'त श्रमिक कामे करीत यशवंत भालकर सहाय्यक दिग्दर्शकापर्यंत पोहोचले होते!
यशवंत भालकर दिग्दर्शित 'पैज लग्नाची' (१९९७) मध्ये अविनाश नारकर आणि वर्षा उसगांवकर!

१९९७ मध्ये भालकर यांनी स्वतंत्रपणे 'पैज लग्नाची' हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. काही अंशी हिंदी (संजीवकुमार-मुमताज़ अभिनीत) 'खिलौना' धर्तीच्या या चित्रपटात अविनाश नारकर व वर्षा उसगांवकर यांनी अप्रतिम भूमिका साकारल्या होत्या. यास 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'सह १४ राज्य पुरस्कार मिळाले. त्या सोहळ्यास मी उपस्थित होतो!
यशवंत भालकर यांच्या 'सत्ताधीश' (२०००) मध्ये कुलदीप पवार व ऐश्वर्या नारकर!

यानंतर १९९९ मध्ये भालकरांच्या 'घे भरारी' चित्रपटाने 'व्ही. शांताराम पुरस्कार' मिळवला. यानंतरचा  'सत्ताधीश' (२०००) हा त्यांचा 
चित्रपट म्हणजे एक राजकीय थरार होता! 

मग 'राजमाता जिजाऊ' ते 'लेक लाडकी' असे सुमारे १३ मराठी चित्रपट भालकरांनी २०१३ 
पर्यंत दिग्दर्शित केले. त्याचबरोबर 'पडद्या मागचा सिनेमा' सारखी पुस्तकेही लिहिली!

तसेच सलग दोन वर्षें यशवंत भालकर हे.. 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'चे अध्यक्ष होते!

त्यांस अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी 
  ['चित्रसृष्टी']

Friday 14 December 2018

'गदिमा' नावाशी ऋणानुबंध!

चित्रपट पत्रकारितेबरोबरच पूर्वी मी एक कॉर्पोरेट मॅगझिनही संपादित करीत होतो. त्यास माझ्या दशकभराच्या कारकिर्दीत जे पुरस्कार मिळाले..त्यांतला प्रतिष्ठेचा म्हणजे 'गदिमा पुरस्कार'! वीस वर्षांपूर्वी तत्कालिन मराठी संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कादंबरीकार ना. स. इनामदार यांच्या हस्ते ह्या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले!

- मनोज कुलकर्णी

गदिमांस वंदन!

श्रेष्ठ लेखक-कवी-गीतकार-अभिनेते व पटकथाकार..'पद्मश्री' प्राप्त ग. दि. माडगुळकर!
श्रेष्ठ लेखक, कवी, गीतकार, अभिनेते व पटकथाकार..'पद्मश्री' प्राप्त ग. दि. माडगुळकर यांची आज पुण्यतिथी! 
त्यांना हे जग सोडून आता ४० वर्षं होऊन गेली!
तरुण तडफदार लेखक ग. दि. माडगुळकर!

मराठी चित्रपटांच्या (विशेषतः दिग्दर्शक राजा परांजपे, संगीतकार सुधीर फडके व गदिमा ह्या प्रसिद्ध त्रिकुटाच्या) सुवर्ण काळात सुमारे १५७ चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केले आणि विविध असंख्य अर्थपूर्ण गीतेही लिहिली..त्याचबरोबर २३ हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी लिहिले!

"दैव जाणिले कुणी.." व "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.." सारखी सर्वकालीन भावार्थ असणारी आणि "अजब तुझे सरकार.." सारखी समकालीन संदर्भ असणारी त्यांची गीते अविस्मरणीय!

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी




मराठी चित्रपटांच्या सुवर्ण काळातील त्रिकुट! (दिग्दर्शक राजा परांजपे, 
संगीतकार सुधीर फडके व 
लेखक ग. दि. माडगुळकर)

Sunday 9 December 2018

पूर्वीचा 'नटसम्राट' पुन्हा होईल?

निराशाजनक 'नटसम्राट' चित्रपट!

तात्यासाहेब शिरवाडकरांची अभिजात नाट्यकृती 'नटसम्राट' २०१६ मध्ये रुपेरी पडद्यावर आली होती..महेश मांजरेकर दिग्दर्शित व नाना पाटेकर अभिनीत!..
तो शिवराळ नटसम्राट पाहून घोर निराशा झाली होती!

माझ्या स्मृतीपटलावर कोरले गेलेय ते फार वर्षांपूर्वी पाहिलेले 'नटसम्राट' नाटक..ज्यात शिर्षक भूमिका गणपतराव बेलवलकर साकारली होती दिग्गज कलावंत दत्ता भट यांनी आणि पत्नी कावेरीची भूमिका साकारली होती वात्सल्यमूर्ती शांता जोग यांनी. "माझं जरा ऐकायचं.." अशा त्यांच्या करुण आर्जवेला "सरकार.." म्हणून आर्त साद देणारे ते नटसम्राट...काळीज पिळवटून टाकणारे होते!

आशा आहे कुणी हृदय 'नटसम्राट' पडद्यावर साकारेल!!

- मनोज कुलकर्णी

Saturday 8 December 2018

स्त्री-मुलींबद्दल वाह्यात बरळलेल्या सत्ताधारी प्रवक्त्यास एका मराठी वृत्त वाहिनीवर चर्चेत सहभागी झालेले पाहून खेद वाटला!

'मराठी बिग बॉस' विनर (गुर्मीत राहिल्याने)..

'हिंदी बिग बॉस' मधून बाहेर!

Friday 7 December 2018

संगीत रंगभूमीवरील अध्वर्यू..जयराम शिलेदार!

संगीत रंगभूमीचे श्रेष्ठ कलावंत जयराम शिलेदार!

संगीत रंगभूमीस समर्पित श्रेष्ठ कलावंत जयराम शिलेदार यांची आज 
१०२ वी जयंती!

संगीत रंगभूमीवर सूर्यास्त झालेला नव्हता अशा त्या (साधारण तीस वर्षांपूर्वीच्या) काळात त्या संगीताभिनयी किरणांची अनुभूती मला आली!

विशीच्या आतच चित्रपट पत्रकारितेत लिहिता झालेल्या मला अचानक शिलेदार मंडळींच्या (गोनीदां लिखित) 'संगीत मंदोदरी' नाटकास समीक्षेसाठी जावे लागले नि साक्षात जयराम शिलेदारांशी संवादाचा सुवर्णयोग आला!

'लोकशाहीर रामजोशी' (१९४७) चित्रपटात जयराम शिलेदार!





चहा पिता पिता (त्यांच्या पारिवारिक) "नाना" म्हणून त्यांच्याशी संवाद कसा साधता आला याचे मलाच आश्चर्य वाटले..इतका मार्दवयुक्त जिव्हाळा! नंतर त्यांच्या कुटुंबियांचे संगीत रंगभूमीवरील काम पाहता आले..विशेषतः त्यांच्या कन्या कीर्ती शिलेदार यांचा बहारदार संगीताभिनय!!

'स्वयंवर', 'शाकुंतल', 'सौभद्र', 'मानापमान' व 'संशयकल्लोळ' सारख्या संगीत नाटकांबरोबरच जयराम शिलेदार यांनी 'लोकशाहीर रामजोशी' (१९४७) व 'जीवाचा सखा' (१९४८) सारख्या चित्रपटांतूनही सुरेख भूमिका साकारल्या! 


'रामजोशी' तील "सुंदरा मनामध्ये भरली.." ही त्यांनी झोकात पेश केलेली लावणी अजूनही कानात रुंजी घालतेय!

शिलेदार नानांस विनम्र अभिवादन!!


- मनोज कुलकर्णी