Thursday 5 April 2018

विशेष लेख:


'एकटी' ते 'आम्ही दोघी'..मराठी पडद्यावरील बदलती स्त्री!


- मनोज कुलकर्णी

'कुंकू' (१९३७) मधील शांता आपटे यांची कणखर प्रागतिक भूमिका!


'आम्ही दोघी' या नवीन मराठी चित्रपटाची झलक पाहताना वीस वर्षांपूर्वी पाहिलेल्या 'दोघी' चित्रपटाची आठवण होणे स्वाभाविक होते. त्याचबरोबर त्याही सुमारे दोन दशके मागच्या 'एकटी' चित्रपटाचे स्मरण झाले!..आणि मराठी रूपेरी पडद्यावरील बदलत्या स्त्री व्यक्तिरेखांचा पट 'मानिनी' ते अगदी 'उंबरठा' ओलांडून बाहेर स्वतःचे विश्व निर्माण करणाऱ्या कणखर स्त्रीसह डोळ्यांसमोर येऊ लागला!
'ब्रह्मचारी' (१९३८) मधील मिनाक्षी शिरोडकर यांची पेहरावासकट बंडखोर भूमिका!





१९३२ मध्ये 'प्रभात फिल्म कंपनी' च्या 'अयोध्येचा राजा' ने मराठी चित्रपट बोलू लागला; पण त्या पौराणिकपटातील दुर्गाबाई खोटे यांची राणीची भूमिका ही राजा हरिश्चंद्र च्या त्यागाशी समरसलेली होती! मात्र 'प्रभात' च्या पुढच्या चित्रपटांतील नायिका या बंडखोर भूमिका घेणाऱ्या होत्या..यांत 'कुंकू' (१९३७) मधील शांता आपटे आणि 'माणूस' (१९३९) मधील शांता हुबळीकर यांच्या व्यक्तिरेखा प्रागतिक होत्या!..दरम्यान अल्पावधीतच मास्टर विनायकांच्या 'ब्रह्मचारी' (१९३८) मधून मिनाक्षी शिरोडकर यांच्या (पेहरावासकट) बंडखोर स्त्री व्यक्तिरेखेने "यमुनाजळी खेळू खेळ कन्हैय्या.." गात प्रस्थापित भोंगळ नीतिमूल्यांना आव्हान दिले!
'एकटी' (१९६८) मध्ये त्याग व वात्सल्यमूर्ती ..सुलोचनाबाई!



आदरणीय सुलोचनाबाई यांनी तर स्त्रीचे उदात्त चित्र नेहमीच आपल्या भूमिकांद्वारे दर्शवले. यांत १९५३ मध्ये आलेल्या 'वहिनींच्या बांगड्या' या मराठी चित्रपटाच्या इतिहासात एक मानदंड ठरलेल्या चित्रकृतीने तर त्यांची तशी मूर्तिमंत मांगल्य नि वात्सल्य ही प्रतिमा निर्माण केली. तर स्त्रीत्वाचे सोसणेही पडद्यावर येत होते..यांत त्यांनी साने गुरुजींच्या कथेवरील 'मोलकरीण' (१९६३) चित्रपटात खस्ता खाऊन वाढवलेल्या मुलाकडेच घरकाम करण्याची वेळ आलेल्या स्त्रीची वेदना हृदयस्पर्शी व्यक्त केली. पुढे राजा ठाकुर यांच्या 'एकटी' (१९६८) मध्येही त्यांची भूमिका अशीच कष्टाने घर उभे करणाऱ्या समर्पित स्त्रीची होती!
माधव शिंदे यांच्या 'शिकलेली बायको' (१९५९) मध्ये उषा किरण!

मग एकीकडे कौटुंबिक तर दूसरीकडे सामाजिक अशा मराठी चित्रपटांतून स्त्री व्यक्तिरेखा आपले अस्तित्व दाखवू लागल्या. यांत दिग्दर्शकांनी पण तशी प्रागतिक भूमिका घेतली! यांत १९५९ मध्ये माधव शिंदे यांच्या 'शिकलेली बायको' द्वारे उषा किरण यांनी शिकून-सवरून आपल्या दृष्टीकोनातून विश्व पाहणारी स्त्री खऱ्या अर्थाने उभी केली! 

याच सुमारास आलेल्या अनंत माने यांच्या 'सांगत्ये ऐका' (१९५९) या तूफान गाजलेल्या तमाशापटात हंसाबाई वाडकर यांनी फडावरून..मर्दुमकी दाखवणाऱ्या गावपाटलाचे धिंडवडे काढले! नंतर माने यांच्याच 'मानिनी' (१९६१) या प. महादेवशास्त्री जोशी यांच्या कथेवरील चित्रपटात जयश्री गड़कर यांनी "उमा म्हणे यद्नि माझे जळाले माहेर.." गात श्रीमंतीचा त्याग करून प्रेमाखातर गरीब नवऱ्याचा संसार उभी करणारी स्वाभिमानी स्त्री साकारली!
अनंत माने यांच्या 'सांगत्ये ऐका' (१९५९) या गाजलेल्या चित्रपटात 
हंसाबाई वाडकर , सूर्यकांत, जयश्री गड़कर व दादा साळवी!

'जैत रे जैत' (१९७७) या डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटात स्मिता पाटील!
दरम्यान सोशिक स्त्रीच्या भूमिका आधुनमधून मराठी चित्रपटांतून येतच होत्या. यात 'सतीचं वाण' (१९६९) या सहृदय महिलांना अतिशय भावलेल्या चित्रपटाने त्यातील आशा काळे यांच्या वाटेला पुढे सोसणे म्हणजे ते किती इतक्या तशा भूमिका आल्या..त्यांत 'सासुरवाशीण' ने कहर केला! 

मात्र त्याच काळात आलेल्या सुंदर व काहीशा अल्लड रंजनाने शांतारामबापूंच्या 'चानी' (१९७७) मधून मराठी नायिकेचे रूपच बदलले आणि नंतर तिच्या 'सुशीला' (१९७८) मधील बिनधास्त अदाकारीने तर कमालच केली!
शांतारामबापूंच्या 'चानी' (१९७७) मध्ये विदेशी रूपात रंजना!



याच काळात मराठी चित्रपटात खऱ्या अर्थाने बंडखोर भूमिकेच्या अभिनेत्रीचा उदय झाला आणि ती म्हणजे..स्मिता पाटील! 'जैत रे जैत' (१९७७) या गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरी वरील डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटातून "मी रात टाकली, मी कात टाकली.." असं झुगारलेले बेधुंद जीवन जगणारी आदिवासी स्त्री तिने बेमालूम साकारली! पुढे डॉ. पटेल यांच्याच 'उंबरठा' (१९८२) चित्रपटाने तर तिच्या अशा स्त्री मुक्ति आविष्काराने कळस गाठला! पारंपारिक सुखी घराचा उंबरठा ओलांडून स्त्रियांच्या उध्धाराच्या कार्यास वाहून घेतलेली तिची ही श्रेष्ठतम भूमिका समाजातील स्त्री वर्गास दिशादर्शक ठरली!
'दोघी' (१९९६) मध्ये सोनाली कुलकर्णी व रेणुका दफ्तरदार!

यानंतर बेगड़ी विनोदी नि साचेबद्ध कौटुंबिक मराठी चित्रपटांच्या दहाएक वर्षांच्या काळात अशा उल्लेखनीय स्त्री भूमिका अगदी अभावाने दिसल्या..आणि १९९५ मध्ये मुंबई येथे झालेल्या आपल्या 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा ' ('इफ्फी') च्या 'इंडियन पॅनोरमा' मध्ये डॉ. पटेल यांच्या 'मुक्ता' चे प्रदर्शन झाले आणि त्यातील सोनाली कुलकर्णी ची जातपात विरोधी प्रागतिक विचारांच्या मुलीची भूमिका पाहून पुनश्च या बंडखोर भूमिकेचा उदय झाल्याचे जाणवले! त्याच्या पुढच्याच वर्षी दिल्लीत झालेल्या 'इफ्फी' मधील 'पॅनोरमा'त पुन्हा तिची त्या सदृश भूमिका असणारा..सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांचा 'दोघी' (१९९६) हा चित्रपट पाहताना तर त्यावर शिक्कामोर्तब झाले! तिथे आम्हां चित्रपट समीक्षकांच्या चर्चेत तर तिची तुलना स्मिता पाटीलशी झाली!
'अवंतिका' या दूरचित्रवाणी मालिकेत रूपगुणसंपन्न अभिनेत्री..मृणाल कुलकर्णी!

दरम्यान दूरचित्रवाणीच्या पडद्यावरही अशी प्रागतिक आधुनिक स्त्री भूमिका 'अवंतिका' मधून रंगवली..रूपगुणसंपन्न अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने!

अलीकडच्या काळात देविका दफ्तरदारने संवेदनशील भूमिका साकारलेला 'नितळ' (२००६), अदिती देशपांडेंचा सामाजिक समस्याप्रधान 'नॉट ओनली मिसेस राऊत' (२००९) व उषा जाधवची वेधक भूमिका असलेला 'धग' (२०१२) सारखे चाकोरीबाह्य, अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या स्त्री व्यक्तिरेखां असलेले चित्रपट येत राहिले!

नवीन 'आम्ही दोघी' या मराठी चित्रपटात प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे!
मग आधुनिक स्त्रीचे प्रतिबिंबही मराठी चित्रपटांत पडले..आणि आता 'आम्ही दोघी' हा प्रतिमा जोशी दिग्दर्शित नवा चित्रपट आला आहे. दोन काहीशा भिन्न प्रकृतीच्या जिवलग मैत्रिणी आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन असे काहीसे हे चित्र दिसते..यांत मुक्ता बर्वे जबाबदार समंजस स्त्रीच्या व्यक्तिरेखेत आणि प्रिया बापट तिच्या नेहमीच्या अल्लड (काहीशा टॉमबॉईश) भूमिकेत दिसते!


आधुनिक नि प्रागतिक विचारांच्या स्त्री व्यक्तिरेखा मराठी चित्रपटांतून दिसणे ही कायमस्वरूपी काळाची गरज आहे. त्यासाठी शुभेच्छा!


- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment