Monday 30 July 2018

दिग्गज संगीतकार-गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी!

बाबूजी स्मरण..जन्मशताब्दी लेख:


- मनोज कुलकर्णी



"तोच चन्द्रमा नभात..तीच चैत्रयामिनी..
एकांती मज समीप..तीच तूही कामिनी.."

अलिकडेच चंद्रग्रहण झाले..पण माझ्या मनात चंद्राचा संदर्भ असलेली काही हळूवार प्रणयी गीतें रुंजी घालीत होती..त्यांत अभिजात हिंदी बरोबरच होते ते बाबुजींनी संगीतबद्ध केलेले व गायलेले (शांता शेळके यांचे) हे मधूर गीत!

मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील सुगमसंगीतातील एक अध्वर्यु असलेले सुधीर फडके अर्थात बाबूजी यांचा काल स्मृतिदिन होता..त्याच्या तीन दिवस आधी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु झाले!
प्रख्यात त्रिकुट.. चित्रपटकार राजा परांजपे, संगीतकार-गायक सुधीर फडके 
व लेखक गीतकार ग. दि. माडगूळकर! 

कोल्हापूर येथे जन्मलेले राम फड़के..म्हणजेच सुधीर फडके यांनी १९४१ मध्ये 'एच एम् व्ही' मध्ये आपली गायन कारकीर्द सुरु केली आणि १९४६ मध्ये नामांकित 'प्रभात फिल्म कंपनी' त संगीत दिग्दर्शक म्हणून ते रुजू झाले!

विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून नाव कमावलेल्या सुधीर फड़के यांनी सुरुवातीस हिंदी चित्रपटांस संगीत दिले..'गोकुळ' चित्रपटासाठी क़मर जलालाबादी यांची गीते स्वरबद्ध केल्यावर, १९४७ मध्ये 'प्रभात' च्या 'आगे बढ़ो' अशा समयोचित चित्रपटास त्यांनी संगीत दिले..यशवंत पेठकर दिग्दर्शित ह्या चित्रपटाचा नायक होता देव आनंद..आणि याची नायिका असलेल्या ख़ुर्शीद बरोबर गाणी गायली होती मोहम्मद रफ़ी यांनी! (पुढे बाबुजींच्या लग्नात रफ़ी यांनी मंगलाष्टके म्हंटली होती असे सांगतात!)

प्रसिद्ध गायिका आशा भोसले संगीतकार सुधीर फडके!

'जगाच्या पाठीवर' (१९६०) मध्ये बाबुजींचे  
"एक धागा सुखाचा.." साकार करताना राजा परांजपे!

१९४८ मध्ये मग राजा परांजपे यांच्या 'जीवाचा सखा' द्वारे त्यांनी मराठी चित्रपटास संगीत देण्यास सुरूवात केली..ह्याची पटकथा व गीते ग. दि. माडगूळकर यांनी लिहिली होती आणि इथूनच राजाभाऊ-गदिमा व बाबूजी हे प्रसिद्ध त्रिकुट जमले! मग त्यांच्या 'पुढचं पाउल' (१९५०) सारखे ते एकत्र कायम पुढेच जात राहिले..आणि 'लाखाची गोष्ट' (१९५२) निर्मित गेले..आशा भोसले यांनी गायलेले "सांग तू माझा होशील का.." सारखी अवीट गोडीची गाणी यात होती. नंतर 'जगाच्या पाठीवर' (१९६०) मध्ये तर या त्रिकुटाच्या बाबुजींनीच गायलेल्या "एक धागा सुखाचा.. " सारख्या अर्थपूर्ण गाण्यांनी कमाल केली!


'भाभी की चुडिया' (१९६१) चित्रपटात "ज्योति कलश छलके.." गाण्यात मीना कुमारी!
दरम्यान बाबुजींनी अन्य चित्रपटकर्त्यांसाठी पण संगीत दिग्दर्शन केले..यामध्ये राम गबाले ('जशास तसे'/१९५१), राजा ठाकूर ('मी तुळस तुझ्या अंगणी'/१९५५) आणि मधुकर तथा बाबा पाठक ('प्रपंच'/१९६१) यांचा प्रामुख्याने समावेश होता! तसेच राजा परांजपे यांच्या 'सुवासिनी' (१९६१) सारख्या चित्रपटांतील गाजलेली जोड़ी रमेश देव-सीमा यांच्या निर्मितीतील 'या सुखांनो या' (१९७५) चित्रपटासही बाबुजींनी संगीत दिले आणि यात त्यांनी गायलेले शिर्षकगीतही सुखावह होते!


बाबुजींनी संगीत दिलेल्या काही अभिजात मराठी चित्रपटांच्या हिंदी आवृत्यांना पण त्यांनीच संगीतबद्ध केले..यांत प्रामुख्याने नमूद करायचा तो सुलोचनाबाईंच्या हृदय व्यक्तिरेखेने अजरामर झालेल्या 'वहिनींच्या बांगड्या' (१९५३) चित्रपटावरून निघालेल्या 'भाभी की चुडिया' (१९६१) या चित्रपटाचा..यात दिग्गज अभिनेत्री मीना कुमारीने ती भूमिका लाजवाब साकारली होती! यातील लता मंगेशकारांनी गायलेले "ज्योति कलश छलके.." हे गाणे तर काळजाला भिड़ते! तसेच विशेष उल्लेख करायचा तो बाबुजींनी संगीत दिलेल्या 'पेहली तारीख़' (१९५४) चित्रपटाच्या किशोर कुमारने गायलेल्या शीर्षक गीताचा.. 'रेडिओ सीलोन' ला पूर्वी दर महिन्याच्या एक तारखेला ते हमखास लागायचे!
संगीतकार-गायक सुधीर फडके सपत्नीक!

सुमारे १०२ चित्रपटांस सुधीर फडके तथा बाबुजींनी संगीत दिले ज्यांत मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांचाही समावेश होता. त्यांनी संगीत दिलेल्या काही चित्रपटांस (पहिला 'प्रपंच'चा) राज्य पुरस्कार मिळाले, तर काहींना राष्ट्रीयही.. यांत राजा परांजपे यांचा 'हा माझा मार्ग एकला' (१९६१) होता! तर १९९१ मध्ये त्यांना 'संगीत नाटक अकादमी' चा सन्मानही प्राप्त झाला!

त्याच बरोबर गदिमांचे 'गीत रामायण' ही बाबुजींनी संगीतबद्ध करून घराघरांत पोहोचवले! तसेच गदिमांनी लिहिलेले सैनिकांसाठीचे मराठी स्फूर्तीगीतही त्यांनी संगीतबद्ध केले!

अखेरीस 'वीर सावरकर' चित्रपटाचा त्यांनी ध्यास घेतला होता..आणि (वारंवार दिग्दर्शक बदलून) वेद राही यांच्या कडून तो पूर्ण करून घेऊन २००१ मध्ये प्रदर्शित केला. याच्या पुण्यातील पत्रकार परिषदेस मी होतो!
बाबुजींच्या संगीतातील 'आधार' (१९६९) मध्ये "माझ्या रे प्रीती फुला." गाण्यात सुंदर अनुपमा!

तत्पूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेला शेवटचा मराठी चित्रपट होता 'रेशीम गाठी' (१९८८)..वर्षा उसगांवकर व अशोक शिंदे यांच्या भूमिका असलेल्या त्याच्या पुण्यातील प्रदर्शनानंतर पार्टी झाली होती आणि बाबूजी आवर्जून तिथे उपस्थित होते..भांडारकर रोड वरील हॉटेलच्या टेरेसवर तेंव्हा (चित्रपटावर चर्चा कमी होऊन) त्यांच्या संगीताची मैफलच पत्रकारांनी जमवली आणि मध्यरात्रीपर्यंत ती रंगली!

ते आठवून त्यांस आज ही सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

Tuesday 24 July 2018

(दिवंगत) काँग्रेस नेते विलासराव देशमुख!

रसिक राजकारणी!


गुरुदत्तच्या 'चौदावी का चाँद' (१९६०) मध्ये वहिदा रहमान!
राजकारणी म्हणजे रुक्ष असा आपला सर्वसाधारण समज असतो; पण काँग्रेसच्या काळातील रसिक मंत्री त्यांच्या कलासक्त भाषणांतून मी अनुभवलेत! त्यातले एक म्हणजे (दिवंगत) विलासराव देशमुख!

ते सांस्कृतिक मंत्री असताना त्यांच्या हस्ते मुंबईत झालेल्या चित्रपट महोत्सवात दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांचा सत्कार होता आणि तो झाल्यावर बोलताना त्यांनी वहिदाजींवर चित्रित झालेल्या अभिजात गाण्याची ओळ म्हंटली "चौदावी का चाँद हो..या आफताब हो..जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो.." हे ऐकून वहिदाजी उतार वयातही लाजेने चूर झाल्या होत्या!

हा किस्सा मी विलासरावांचे पुत्र नि आता चित्रपटसृष्टीत नाव कमावलेल्या रितेश देशमुखला त्याने निर्मित केलेल्या मराठी 'यलो' चित्रपटाच्या मागे पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत गप्पांच्या ओघात सांगितला..तेंव्हा तो हे ऐकून भावुक झाला!

गुरुदत्तच्या 'चौदावी का चाँद' (१९६०) मधील रफींनी गायलेले माझे ते आवडते गाणे आज पाहत असताना ही आठवण झाली!


- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

Monday 23 July 2018

ट्रॉफीसह  मेघा धाडे!

जिगरबाज मेघा धाडे ने 'बिग बॉस मराठी' ची ट्रॉफी जिंकली!

पुष्कर जोग व लोभस सई लोकुर..मैत्री-प्रेम!


तर समंजस पुष्कर जोग व लोभस सई लोकुर यांच्या निष्पाप-निरागस मैत्री-प्रेमाने हृदये जिंकली!
'बिग बॉस मराठी' मध्ये 'स्मिता गोंदकर!

पहिल्या तीन मध्ये आलेल्या स्मिता गोंदकर चा परफॉर्मन्सही कौतुकास्पद होता!

यांचे अभिनंदन!!
  
- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

Thursday 19 July 2018

मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील सुंदर अभिनेत्री..उमा!


- मनोज कुलकर्णी


सुवर्णकाळातील रूपगुणसंपन्न मराठी अभिनेत्री ..उमा भेंडे!

"सुरावटीवर तुझ्या उमटती..
अचूक कशी रे माझी गझले!"

'मधुचंद्र' (१९६७) चित्रपटात काशिनाथ घाणेकर यांच्या बरोबर उमा!

मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर साकार झालेले माझे एक सर्वांत आवडते प्रेमगीत!

'मधुचंद्र' (१९६७) या राजदत्त दिग्दर्शित चित्रपटात काशिनाथ घाणेकर यांच्या बरोबर ते रोमांचक साकार केले होते..लोभसवाणे सौंदर्य असणाऱ्या उमा यांनी!

'थोरातांची कमळा' (१९६३) मध्ये सात्विक भूमिकेत उमा!
त्या गेल्याची बातमी ऐकल्यावर त्यांच्या अशा प्रणयी, त्याचबरोबर सात्विक नि सोज्वळ अविस्मरणीय भूमिका डोळ्यांसमोर तराळल्या होत्या..!
‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा' (१९७४) तील पारितोषिक विजेत्या भूमिकेत उमा!

कोल्हापूरच्या कलावंत साक्रीकर कुटुंबाची पार्श्वभूमी..आई-वडील फिल्म कंपन्यांतून ('प्रभात' व 'अत्रे पिक्चर्स') कामे करीत. तेंव्हा उमा यांनी कथ्थक व भरतनाट्यम नृत्याचे प्रशिक्षण लहानपणी घेतले..त्याच सुमारास बाबा भालजी पेंढारकरांच्या 'आकाशगंगा' (१९५९) चित्रपटात त्यांना लहान भूमिका मिळाली!

यानंतर १९६३ मध्ये माधवराव शिंदे यांच्या 'थोरातांची कमळा' या चित्रपटात त्या सर्वप्रथम नायिका झाल्या..बरोबर होते सूर्यकांत! मग 'स्वयंवर झाले सीतेचे' सारखे पौराणिक, 'शेवटचा मालुसरा' सारखे ऐतिहासिक व 'आम्ही जातो आमुच्या गावा' सारख्या सामाजिक..अशा गाजलेल्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका ह्या वैशिष्ठ्यपूर्ण होत्या. त्यांत ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा' (१९७४) तील भूमिकेसाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा पुरस्कार मिळाला!

आपली निर्मिती असणाऱ्या 'भालू' (१९८०) मध्ये प्रकाश भेंडे यांच्या बरोबर उमा!
त्यांनी हिंदी चित्रपटांतूनही भूमिका रंगवल्या..यांत १९६४ मधील सत्येन बोस यांचा 'दोस्ती' आणि 'एक दिल और सौ अफसाने' हे विशेष उल्लेखनीय होत. त्यांनी छत्तीसगढी आणि तेलुगू चित्रपटांतूनही कामे केली!

‘नाते जडले दोन जिवांचे’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाश भेंडे यांच्याशी त्यांचे जीवनाचे नाते जुळले! दोघांनी मग 'श्री प्रसाद चित्र' ही संस्था स्थापन करून १९८० च्या दशकात 'भालू', 'चटक चांदणी' व 'आई थोर तुझे उपकार' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली..ते रौप्यमहोत्सवी ठरले.

'मराठी चित्रपट महामंडळ' व राज्य सरकार तर्फे पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले!

त्यांचा आज पहिला स्मृतिदिन!..त्यांना माझी ही सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

Friday 13 July 2018

भारदस्त अभिनेते निळू फुले!

स्मरण निळूभाऊंचे.!


- मनोज कुलकर्णी 



डॉ. जब्बार पटेल यांच्या 'सामना' (१९७४) मध्ये निळू फुले!
रंगभूमी व मराठी-हिंदी चित्रपटांतून आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण अभिनयाचा ठसा उमटवणारे भारदस्त अभिनेते निळू फुले यांचा आज स्मृतिदिन!

'कथा अकलेच्या कांद्याची' या गाजलेल्या लोकनाट्यापासून अभिनय कारकीर्द सुरू झालेल्या निळू फुले यांनी..रुपेरी पडद्यावर पदार्पण केले ते अनंत माने यांच्या 'एक गाव बारा भानगडी' (१९६८) या मराठी चित्रपटातून...त्यातील त्यांची इरसाल झेलेअण्णा ही व्यक्तिरेखा जणू त्यांची पडद्यावरील प्रतिमेची नांदीच होती!
तडफदार अभिनेते निळू फुले!

प्रामुख्याने ग्रामीण ढंगाच्या खलनायकी भूमिका केलेल्या निळू फुले यांनी निवडक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखाही साकारल्या...उदाहरणार्थ व्ही.शांताराम यांच्या 'पिंजरा' (१९७२) या लोकप्रिय चित्रपटातील त्यांची वैशिष्ठ्यपूर्ण भूमिका! तसेच डॉ. जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' (१९७९) मधील त्यांची पत्रकाराची भूमिकाही लक्षवेधी होती!

मराठी बरॊबरच हिंदी चित्रपटांतूनही निळू फुले यांनी आपले अस्तित्व प्रकर्षाने दर्शवले..मग महेश भट्ट यांचा 'सारांश' (१९८४) असो; नाहीतर मनमोहन देसाईंचा 'कुली' (१९८३) हा सुपरस्टार अमिताभ बच्चनचा बहुचर्चित चित्रपट!

सुमारे २५० चित्रपटांतून निळूभाऊंनी काम केले..मात्र 'राष्ट्र सेवा दला'त काम केले असल्याने त्यांना समाजकार्याबाबत आस्था होती!..जाहीर कार्यक्रमांत खादीच्या झब्बा-पायजम्यात येऊन ते विनयशील बोलत!

त्यांची समाजवादी विचारसरणी 'हीच खरी दौलत' (१९८०) चित्रपटात त्यांनी साकारलेल्या या गाण्यातून प्रतिबिंबीत होते...

"रंजल्या जिवाची मनी धरी खंत..
तोचि खरा साधू..तोचि खरा संत.."