Wednesday 17 October 2018

बोलके डोळे नि भावगर्भता हे स्मिता पाटीलच्या अभिनयाचे वैशिष्ट्य!

आठवते स्मितहास्य!



मला आजही आठवतो..एक आख्यायिका होऊन राहिलेल्या अभिनेत्री स्मिता पाटीलला भेटल्याचा तो सुवर्ण क्षण!
'सितम' (१९८२) मध्ये स्मिता पाटील आणि विक्रम!

१९८२चा महाविद्यालयीन काळ..पुण्याच्या कर्वे रोड परिसरात दिग्दर्शक अरुणा-विकास 'सितम' चित्रपटाचे चित्रीकरण करीत होते..स्मिता पाटील आणि ('ज्यूली' फेम) विक्रम यांच्यावर दृश्य चित्रित होत होते..गर्दीतून कावरीबावरी होत ती त्याला शोधत येते असा प्रसंग..तो ती इतक्या जीवंतपणे साकारीत होती की बाजूच्या रहदारीतून जाणाऱ्याला खरंच काही अघटित घडलय का वाटे!
गोविन्द निहलानींच्या 'अर्धसत्य' (१९८३) मध्ये स्मिता पाटील!

तो शॉट 'ओके' झाल्यावर तेथील घरात स्मिता पाटील ला भेटायला मी गेलो, तर खाली जमिनीवर बसून फोनवर ती बोलत होती (मोठया अभिनेत्रीचा असा साधेपणा आज विरळाच!) त्यानंतर चित्रपट पत्रकारितेत आल्यावर कुणा कलाकाराची सही फारशी न घेणारा मी..पण त्या काळात तिची स्वाक्षरी मात्र आवर्जून घेतली..त्यावेळचे तिचे ते जिव्हाळापूर्ण स्मितहास्य आजही आठवते!



डॉ. जब्बार पटेल यांच्या 'जैत रे जैत' (१९७७) मध्ये स्मिता पाटील!
नंतर १९८३ला 'मॉन्ट्रीयल फिल्म फेस्टिवल'ला स्मिता पाटील ज्यूरी होती; तर १९८४ला फ्रांसला तिच्या चित्रपटांचा महोत्सव होता..त्यावेळी व पुढे १९८५ ला भारत सरकार तर्फे तिला 'पद्मश्री' बहाल करण्यात आले तेंव्हा..वेळोवेळी तिच्यावर मी लेख लिहिले!!


श्याम बेनेगलांच्या 'भूमिका' (१९७७) चित्रपटात स्मिता पाटील!
बोलके डोळे नि त्यांतून व्यक्त होणारी भावगर्भता हे स्मिता पाटील हीच्या वास्तवदर्शी अभिनयाचे वैशिष्ट्य होते! श्याम बेनेगलांचे 'निशांत', 'मंथन' व 'भूमिका', डॉ जब्बार पटेल यांचे 'जैत रे जैत' व 'उंबरठा', मुझफ्फर अलींचा 'गमन', केतन मेहतांचे 'भवनी भवाई' व 'मिर्च मसाला', रविन्द्र धर्मराजचा 'चक्र', गोविन्द निहलानींचे 'आक्रोश' व 'अर्धसत्य', महेश भट्ट यांचा 'अर्थ' आणि सत्यजित राय यांचा 'सद्गति' अशा अनेक कलात्मक/वास्तववादी/समान्तर चित्रपटांतून तिने विविध स्त्री व्यक्तिरेखा (ओम पूरी, नसीरुद्दीन, गिरीश कर्नाड व शबाना आज़मी सारख्या कलाकारांसमोर) समर्थपणे साकारल्या!

व्यावसायिक 'घुँगरू' (१९८३) चित्रपटात स्मिता पाटील!
त्याचबरोबर 'नमक हलाल' सारख्या काही मोजक्या मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपटांतूनही (अमिताभबरोबर) स्मिता पाटील दिसली! अन राज बब्बर बरोबरचा तिचा 'भीगी पलकें'ही चर्चित ठरला!!

स्त्रियांचे प्रश्न, वेदना यांना वाचा फोडत, त्यांचे सर्वव्यापी भावविश्व प्रभावीपणे स्मिता पाटील ने व्यक्त केले! स्वतंत्र विचारांची (काहीशी बंडखोरही) व आपली भूमिका कणखरपणे मांडणारी स्त्री..हे तिच्या बहुतांश व्यक्तिरेखांचे वैशिष्टय होते. या द्वारे स्त्री मुक्ति/स्वातंत्र्य या चळवळीस जणू नवचैतन्य लाभले! 


अनेक पुरस्कार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान स्मिता पाटील ला लाभले! तिचे अभिनयाचे 'स्मिता स्कूल' आजही नव्या अभिनेत्रींना मार्गदर्शक ठरावे!



एकसष्ठावी जयंती होऊन गेलेल्या तिच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा!!


स्मृतिपटलावर स्मिताभिनयाचा ठसा आजही तसाच आहे..ठळक नि गहिरा!!


- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी', पुणे)

No comments:

Post a Comment