Wednesday 31 March 2021

चित्रपटाच्या पडद्यावर शिवराय..चंद्रकांतच!

'छत्रपती शिवाजी' (१९५२) चित्रपटातील वेधक प्रसंगात त्या भूमिकेत चंद्रकांत मांढरे!

चित्रमहर्षी भालजी पेंढारकऱ.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका चित्रपटांतून तशा अनेकांनी साकारल्या; पण चंद्रकांत मांढरे हे त्या भूमिकेत खऱ्या अर्थाने शोभले. त्यांचे बंधू सूर्यकांत सुद्धा!
मात्र शिवरायांची प्रतिमा आपल्या स्मृतीपटलावर चंद्रकांतच ठसवून गेले!
(ती उंची अन्य कुणी कलाकार गाठू शकले नाहीत!)

चित्रमहर्षी भालजी पेंढारकऱ यांनी व्रतस्थपणे दैदीप्यमान ऐतिहासिकपट निर्मिले! बाबांचा 'छत्रपती शिवाजी' (१९५२) हा चित्रपट यामध्ये मानदंड ठरला आणि यात अर्थातच चंद्रकांतजी ती श्रेष्ठ व्यक्तिरेखा जणू जिवंत करून गेले!

'छत्रपती शिवाजी' (१९५२)  चित्रपटात या व्यक्तिरेखेत तडफदार चंद्रकांत मांढरे!
 
 
 
आज शिवजयंती प्रसंगी, ७० वर्षे होत आलेल्या या चित्रकृतीची आठवण झाली!

तसेच चंद्रकांत मांढरे यांना जाऊन मागच्या महिन्यात २० वर्षे उलटून गेली!
त्यांच्या भेटीचा अविस्मरणीय क्षण आज आठवतोय!!

ह्या श्रेष्ठांस त्रिवार वंदन!!

 
- मनोज कुलकर्णी

Tuesday 30 March 2021

परदेशी गौरविलेला पहिला भारतीय चित्रपट 'संत तुकाराम'..८५!

तसा मी धार्मिक नाही, पण 'प्रभात फिल्म कंपनी' ने निर्मिलेल्या पुरोगामी संतचरित्रावरील 'संत तुकाराम' (१९३६) या चित्रपटाची आठवण आज झाली! 'व्हेनिस चित्रपट महोत्सवा'त 'उत्कृष्ट चित्रपट' म्हणून गौरविलेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसला गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट, ज्यास ८५ वर्षे पूर्ण होतायत!

'संत तुकाराम' (१९३६) चित्रपटात विष्णुपंत पागनीस व शंकर कुलकर्णी!
 
शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या पटकथेवर 'प्रभात फिल्म कं.' चे दिग्गज चित्रकर्ते विष्णुपंत दामले आणि शेख फत्तेलाल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 
 
मूळ कीर्तनकार असलेल्या विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम यांची व्यक्तिरेखा यात हुबेहूब साकारली होती आणि त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत गौरी यांनी मोठे समरसून काम केले होते. तर अन्य भूमिकांत पंडित दामले, कुसुम भागवत, शंकर कुलकर्णी, शांता मजुमदार, बी. नांदेकर, मा. छोटू व सालोमालो केशव भागवत होते!

'संत तुकाराम' (१९३६) चित्रपटातील गाथा डोहात नेतानाच्या प्रसंगात विष्णुपंत पागनीस!
 
पुण्याच्या तत्कालिन (आता 'फिल्म इन्स्टिटयूट' झालेल्या) 'प्रभात फिल्म स्टुडिओ'त याचे चित्रीकरण व्ही. अवधूत यांनी अतिशय स्वाभाविक नि वेधक केले होते. विशेष उल्लेखनीय प्रसंग म्हणजे..गाथा डोहात घेऊन जातानाचा व गरुड विमानाचा क्लायमॅक्स! शंकरराव दामले यांनी चित्रपटाचे ध्वनिमुद्रण केले होते आणि ए. आर. शेख यांनी फिल्म संपादित केली होती.

'संत तुकाराम' (१९३६) चित्रपटात तल्लीन होऊन अभंग गाताना विष्णुपंत पागनीस!
कवी शांताराम आठवले यांचे यासाठीचे गीतलेखन इतके प्रतिभासंपन्न होते की लोकांना ते मूळ अभंगच वाटले! केशवराव भोळे यांच्या भावपूर्ण संगीतात स्वतः विष्णुपंत पागनीसांनीच ती भावमधुर गीते गायली होती. त्यांचे छायाचित्र हे बराच काळ संत तुकाराम म्हणूनच भावुक लोकांच्या स्मृतीत राहिले!

तर 'प्रभात' इतिहासकार बापू वाटवे यांनी मला सांगितलेली आठवण म्हणजे, 'शिकस्त' (१९५३) या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणा साठी दिलीपकुमार 'प्रभात स्टुडिओ'त होता, तेंव्हा तो 'संत तुकाराम' चे "आधी बीज एकले.." गुणगुणायचा!
 
आज तुकाराम बीज दिनी या श्रेष्ठ चित्रकृतीस प्रणाम!!

- मनोज कुलकर्णी

सिने पत्रकार स्नेही संजय दिनकर!


ज्येष्ठ सिने पत्रकार संजय दिनकर कुलकर्णी हे जाऊन आता सात वर्षे झाली!
अशा प्रसंगी अनेक जुन्या आठवणी दाटून आल्या..!

प्रथम म्हणजे ते 'केसरी'त चित्रपट पुरवणी पाहत असताना ३० वर्षांपूर्वी त्यात मी केलेले विपुल लेखन, चित्रपट विषयक झालेल्या अनेक चर्चा, मग वेळोवेळी सिने पत्रकार स्नेहींबरोबर चित्रपटासम्बधीचे कार्यक्रम, पार्ट्या यांमध्ये आमच्या रंगलेल्या मैफली, चित्रपटकर्ते व कलाकारांबरोबर झालेल्या गप्पा..! बरोबरीने पाहिलेले फ़िल्म फेस्टिवल्स..!

साधारण २८ वर्षांपूर्वी आम्ही दोघांनी पुढाकार घेऊन 'पुणे फ़िल्म जर्नालिस्ट असोसिएशन' ची केलेली स्थापना! (मात्र त्याचे अस्तित्व फार न राहिल्याची खंत आम्हाला होती!)

मग मी फ़िल्म जर्नालिज़म मध्ये बरीच वर्षे फ्रीलान्स लेखन केल्यावर, २००२ मध्ये स्वतःचे 'चित्रसृष्टी' फ़िल्म मॅगझिन सुरु केले तेंव्हा प्रकाशन समारंभास येऊन व नंतर वेळोवेळी (जागतिक चित्रपटाच्या व्यासंगाबाबतही) त्यांनी केलेली माझी प्रशंसा!

या व्यतिरिक्त वैयक्तिक स्तरावरही सुखदुःखाच्या अनेक प्रसंगी झालेले जिव्हाळ्याचे बोलणे.! वयाने ते मोठे असुनही तसे त्यांनी जाणवू दिले नाही, कारण चित्रपट या आमच्या आवडीच्या विषयाने ते अंतर ठेवू दिले नव्हते!

त्यांच्या स्मृतीस ही भावांजली.!!

- मनोज कुलकर्णी

Monday 29 March 2021

पुन्हा धुळवड दोन रंगांची..
अस्तित्वाची नि हुकुमतीची!
मिसळावी यात बंधुभावाची
माणूसकीची आणि प्रेमाची.!

- मनोज 'मानस रुमानी'

Thursday 25 March 2021

चंद्रिका ही जणू..!


'महाराष्ट्र भूषण' लोकप्रिय ज्येष्ठ गायिका आशा भोसले!

'सुवासिनी' (१९६१) मधील "हृदयी प्रीत जागते.." गीतात सीमा!

"हृदयी प्रीत जागते.." 
सारखे गदिमांचे 'सुवासिनी' गीत असो वा 
"मलमली तारुण्य माझे.." 
सारखे सुरेश भटांचे प्रणयी गीत की 
"धुंदी कळ्यांना.." 
सारखे खेबूडकरांचे लोभस अनुपमावर चित्रित गीत..

अशी माझी आवडती निवडक मराठी चित्रपट प्रेमगीते कानांत रुंजी घालू लागली..
'धाकटी बहीण' (१९७०) मधील "धुंदी कळ्यांना.." गीतात सुंदर अनुपमा!
 
जेंव्हा बाबूजी (फडके) नि अण्णा (चितळकर) यांच्या संगीतात ही गाणाऱ्या आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार जाहीर झाल्याचे वृत्त समोर आले!

 
याप्रसंगी त्यांचे पिता पंडित दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेले अविस्मरणीय नाट्यगीत आठवले जे नंतर आशा भोसले यांनी ही त्या धर्तीवर गायले..
"चंद्रिका ही जणू.."

जणू हे त्यांच्यासाठीच!

अभिनंदन.!!

- मनोज कुलकर्णी

 

Wednesday 24 March 2021

वाढदिवस की..वाढवर्ष वा वर्षवाढ!



नुकताच प्रचलित वाढदिवस झाला! अर्थात मला याचे काही अप्रुप वाटत नाही. मात्र एक मनात आले की 'वर्षाने येणाऱ्या' या जन्मदिवसास मराठीत "वाढदिवस" कसे म्हणतात? हा खरं तर एक वर्षाने वाढण्याचा दिवस. मग त्यास 'वाढवर्ष वा वर्षवाढ' संबंधित काही शब्द येऊ शकला असता! जसे रूढ हिंदीत 'बरसगाँठ वा वर्षगाँठ' हे शब्द आहेत.

आता हिंदीत 'जनम दिन' म्हंटले जाते. ते ही ठीक आहे (इंग्रजी मधील 'बर्थ डे' ला देशी शब्द). मग उर्दू मधील 'सालगिरह' हा शब्द योग्य वाटतो!

काही असो, सध्याच्या अवघड काळात रोजचा दिवस हा (जगण्यास लाभणारा) वाढदिवसच समजला पाहिजे!!

- मनोज कुलकर्णी

Monday 15 March 2021

"..जरा विसावू या वळणावर.."

कलाकार-कवी मोघे बंधूंचे प्रवासातील सहभोजनाचा क्षण टिपणारे हे छायाचित्र!

त्यांतील ज्येष्ठ, अभिनेते श्रीकांत मोघे आठवड्यापूर्वी हे जग सोडून गेले;
तर कवी सुधीर मोघे यांचा आज ७वा स्मृतिदिन!
आज त्यांच्याच गीताची वरील ओळ आठवली!

आदरांजली!!

- मनोज कुलकर्णी

 

Saturday 13 March 2021

आज दू.सं. वरील ७ च्या बातम्यांत एके ठिकाणी '७५ वा अमृत महोत्सव' म्हंटले गेले!

मागे 'अ. भा. म. साहित्य संमेलना'त व्यासपीठावर हे लिहिले गेले!

मग मराठी पाऊल पडते कुठे?

Tuesday 9 March 2021

रंगभूमीस समर्पित नाट्य समीक्षक!

नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे!
रंगभूमी-साहित्य विश्वातील एक समर्पित व्यक्तिमत्व नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांचा आज ४ था स्मृतिदिन!
'चित्रसृष्टी' समारंभात डॉ. वि. भा. देशपांडेंचा चित्रपटकर्ते राम गबालेंच्या हस्ते सत्कार होताना!

मराठी आणि नाट्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना याविषयीच्या अनेक पुस्तकांचे संपादन व लेखन त्यांनी केले. 'मराठी नाट्यकोश', 'मराठी नाटक-नाटककार, काळ आणि कर्तृत्व', 'रंगयात्रा', 'आचार्य अत्रे : प्रतिमा आणि प्रतिभा', 'पु.ल. पंच्याहत्तरी', 'गाजलेल्या रंगभूमिका' अशा पुस्तकांचा त्यात समावेश होतो.

पूर्वी माझ्या पत्रकारितेतील सुरुवातीच्या काळात मी चित्रपट आणि कधी निवडक नाटकांचे परीक्षण पण लिहीत असे. त्यावेळी नवीन नाटकांच्या प्रयोगांच्या वेळी नाट्यसंहिता, दिग्दर्शन व अभिनय यांवर लेखक, दिग्दर्शक व कलाकारां बरोबरील त्यांच्यासह आमच्या झालेल्या अनौपचारिक चर्चा आठवतायत! पुढे मी फक्त जागतिक सिनेमावरच लक्ष केंद्रित केले..पण साहित्य परिषद वा कधी चित्रपटांच्या प्रीमियरना ते आले की आपुलकीने बोलणे होई!

माझ्या 'चित्रसृष्टी' प्रथम विशेषांकात (२००२ साली) त्यांनी राष्ट्रीय रंगभूमीवर लेख लिहिला होता. प्रकाशन समारंभात त्यांचा ज्येष्ठ चित्रपटकर्ते राम गबाले यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला!

आता त्या आठवणी..!!

त्यांस आदरांजली!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 7 March 2021

दिग्गज मनस्वी अभिनेते श्रीकांत मोघे!

 
मराठी नाट्य-चित्रपट सृष्टींतील दिग्गज अभिनेते श्रीकांत मोघे हे जग सोडून गेले!

आकाशवाणी वरील वृत्तनिवेदक ते रंगभूमी, रूपेरी पडदा मालिका यांतून अभिनय असा त्यांचा प्रदीर्घ प्रवास! रंगभूमीवर कानेटकरांच्या 'लेकुरे उदंड झाली' आणि पुलंच्या 'वाऱ्यावरची वरात' नाटकांतून त्यांचे दिलखुलास व्यक्तिमत्व खेळकर वावर याची प्रचिती आली. (हे तेंव्हा आम्ही टीव्ही वर पाहिले) तर 'स्वामी' मालिकेतून ते राघोबादादांच्या खलनायकी भूमिकेत दिसले!

'आम्ही जातो आमुच्या गावा' (१९६८) चित्रपटातील "हवास तू.." गाण्यात उमा व श्रीकांत मोघे!
गुलछबू नायक अशी त्यांची पडद्या वरील प्रतिमा होती आणि बोलण्या तुन एक प्रकारचा लाडीक सूर निघे! प्रख्यात लेखक मधुसूदन कालेलकर यांच्या कथांवर प्रतिथयश दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांनी काढलेल्या 'आम्ही जातो आमुच्या गावा' (१९६८) व 'अनोळखी' (१९७३) यां चित्रपटांतून हे दिसून आले. 
यांत पहिल्या मधील "हवास तू." गाण्या तील मोहक नायिका उमा व (तोतरे बोलणारा विनोदी) मधू आपटे यांच्याबरोबर भन्नाट प्रसंग अजून लक्षात आहे. तर दुसऱ्यात दुकानदाराला "सेव्हन ओ'क्लॉक ब्लेड द्या!" असे काहीसे म्हणणारा त्यांचा आविर्भाव अफलातून होता!

ऐतिहासिक नाटकात भारदस्त श्रीकांत मोघे!
कालांतराने त्यांनी पडद्यावर विविधरंगी भूमिका रंगवल्या. समांतर चित्रपटकर्ते जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' (१९७९) मध्ये ते ग्रामीण पुढारी होते, तर 'उंबरठा' (१९८२) मध्ये डॉक्टर! दरम्यान 'अंजाम' (१९७८) सारख्या हिंदी चित्रपटांतूनही ते दिसले. पुढे सचिनच्या 'गंमत जंमत' (१९८७) आणि वर्षा उसगांवकर व प्रशांत दामले यांच्या 'पसंत आहे मुलगी' (१९८९) सारख्या चित्रपटांतून ते वयास साजेश्या पण खुमासदार भूमिका करू लागले. अखेर ऐतिहासिक 'वासुदेव बळवंत फडके' (२००७) व समकालिन 'किल्लारी' (२०१५) चित्रपटांतून त्यांनी लक्षवेधी व्यक्तिरेखा साकारल्या!

पुण्यात मराठी चित्रपट विषयक सांस्कृतिक कार्यक्रमांस ते बहुतेकदा बेबी शकुंतला व मधू आपटे यांच्यासह रिक्षातून आल्याचे मला आठवते! रंगभूमीवरील त्यांची आस्थाही मी जवळून अनुभवली ती 'थिएटर ऍकॅडमी' रौप्य महोत्सवाच्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात..यांत प्रख्यात बंगाली नाट्यकर्मी शंभू मित्रा यांच्या पायाशी बसून ते चर्चा करीत होते! त्या वयातही त्यांचे ते विनयशील वागणे नि आपल्या क्षेत्रातील दिग्गजाचा मान राखणे हे नव्या पिढीतील कलावंतांना शहारून गेले!

राष्ट्रीय पुरस्कार व पहिला राज्य पुरस्कार मिळालेल्या 'प्रपंच' (१९६१) या बाबा पाठक यांच्या सामाजिक मराठी चित्रपटात श्रीकांत मोघे यांची लक्षणीय भूमिका होती!

राज्य सरकार व नाट्य परिषदेचे पुरस्कार श्रीकांत मोघेंना लाभले. मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले!

अशा दिग्गज निगर्वी नि मनस्वी अभिनेत्यांस माझी आदरांजली!!

- मनोज कुलकर्णी