Wednesday 19 May 2021

चौकट छेदणारी समर्थ अभिनेत्री..रीमा!

रीमा यांच्या अभिनय मुद्रा!

रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणी यांवर विविधरंगी व्यक्तिरेखांद्वारे आपल्या अष्टपैलू अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या रीमा यांस जाऊन आता चार वर्षे झाली!

'सिंहासन' (१९७९) या डॉ. जब्बार पटेल यांच्या चित्रपटात..रीमा!
रीमा लागू ह्या अभिनेत्रीस सर्वप्रथम पडद्या वर पाहीले ते 'सिंहासन' (१९७९) या डॉ.जब्बार पटेल यांच्या राजकीय समांतर मराठी चित्रपटात. त्यात डॉ.लागूं सारख्या दिग्गज कलाकारांच्या मांदीयाळीत पुरुष प्रधान - संस्कृतीत आपले स्थान निर्माण करणाऱ्या महत्वाकांक्षी स्त्रीच्या रूपात ती दिसली..नि जाणवले की सरधोपट स्त्री भूमिकांत ही बंदिस्त होणारी नाही..आणि पुढे हे प्रत्ययास आले!

 
पुण्यात 'हुजूर पागा' शाळेत असतानाच आपल्या आई मंदाकिनी भडभडे यांच्या प्रोत्साहनाने त्यांच्याबरोबर मूळच्या या नयनने रंगभूमीवर पाऊल ठेवले होते..आणि पुढे मराठी नाटकांत वैशिष्ट्यपूर्ण भूमिकां रंगवल्या. त्यांतही मुख्यत्वे 'पुरुष' व 'सविता दामोदर - परांजपे' सारखी समांतर रंगभूमीवरील सामाजिक समस्याप्रधान नाटके होती..आणि (अभिनेते विवेक लागूंबरोबरील विवाहानंतर) रीमा लागू ही समर्थ अभिनेत्री नावारुपास आली!

अरुणा राजे यांच्या 'रिहाई' (१९८९) चित्रपटात रीमा!
१९८० मध्ये शशी कपूर निर्मित व श्याम बेनेगल दिग्दर्शित.. 'कलयुग' ने तिने हिंदी चित्रपटात पदार्पण केले..आणि यातही कुलभूषण खरबंदा बरोबरील अवखळ भूमिकेत तिने पारंपरिक चौकटीस छेद दिला!..पुढे अरुणा राजे यांच्या 'रिहाई' (१९८९) मध्ये तर रीमाची बंडखोर भूमिका - वादग्रस्त ठरली!

दरम्यान १९८५ मध्ये 'खानदान' या हिंदी मालिकेद्वारे तिने टेलीविज़न वर पदार्पण केले होते..आणि पुढे 'मानाचा मुजरा' या मराठी कार्यक्रमात ही आली! तर सुप्रिया पिळगांवकर बरोबरील तूफान गाजलेल्या 'तू तू मैं मैं' मालिकेतील विनोदी भूमिकेने तिला 'इंडिया टेली अवार्ड' मिळाले!

सुप्रिया पिळगांवकर बरोबर 'तू तू मैं मैं' या दूरचित्रवाणी मालिकेत मध्ये रीमा!
निरुपा रॉय नंतर बॉलीवुडची नवी आई..म्हणून तिच्या कारकिर्दीस (नकळत ) वेगळे वळण दिले ते नासिर हुसैन यांच्या 'क़यामत से क़यामत तक' (१९८८) या आमीर खान नायक म्हणून आलेल्या चित्रपटाने..याची नवोदित नायिका जूही चावलाची आई रंगवली रीमा ने! पुढे सूरज बड़जात्या च्या पहिल्या हिट 
'मैंने प्यार किया' (१९८९ ) या सलमान खान ला स्टार - करणाऱ्या चित्रपटात ती त्याची आई झाली..ते मग राम गोपाल वर्माच्या हिट 'रंगीला' (१९९५) मध्ये उर्मिला मातोंडकर ची आई...हे चालू राहिले!
'वास्तव' (१९९९) चित्रपटात संजय दत्तची आई..रीमा!

यातही तिच्या आई प्रतिमेस वेगळे परिमाण देणारी - व्यक्तिरेखा महेश मांजरेकर च्या 'वास्तव' (१९९९) या चित्रपटात तिला मिळाली..बिघडलेल्या बाबा संजय दत्त ची आई - रंगवताना तिने अखेर मोठी कणखर भूमिका घेतली..या वाममार्गास लागलेल्या मुलावर गोळी झाडणारी! काहीशी 'मदर इंडिया' (१९५७) तील सुनील दत्त ची माता साकारणाऱ्या नर्गिसची आठवण यावेळी झाली!..आणि तिलाही मनोमन ही भावली असावी असे वाटले!

मराठी चित्रपटांतूनही ती वैशिष्ठयपूर्ण भूमिका करीत राहिली..यांत 'रेशमगाठ' (२००२) साठी तिला 'सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री' चा पुरस्कार मिळाला. 'जन्म' (२०११) मधील भूमिका तिला व्यक्तिशः आवडलेली! तिची कन्या मृण्मयी लागूही रंगभूमी, टी.व्ही. व चित्रपट यांतून अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रांत कार्यरत आहे.

रीमा यांस शासनाचा 'व्ही. शांताराम पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले!..अभिनयाची चतुरस्त्र कारकीर्द असणाऱ्या अशा या अजूनही चांगल्या उमेदीत असणाऱ्या अभिनेत्रीस अशी लवकर एक्झिट घ्यावी लागली याची हुरहुर वाटते!

माझी ही सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Monday 10 May 2021

प्रतिभासंपन्न कवी-गीतकार खेबूडकर!

लोकप्रिय कवी-गीतकार जगदीश खेबूडकर!
"धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना..
शब्दरूप आले मुक्या भावनांना"

'धाकटी बहीण' (१९७०) चित्रपटातील "धुंदी कळ्यांना.." गीतात सुंदर लोभस अनुपमा!
रम्य संध्याकाळी आमच्या बगिच्यात हळुवार वाऱ्याच्या झुळुकीसह..काही आवडत्या मराठी प्रेमगीतांपैकी हे कानांत रुंजी घालू लागले!..त्यावरील सुंदर अनुपमाची लोभस प्रणयी मुद्रा डोळ्यासमोर आली!...हे लिहिणारे कवी जगदीश खेबुडकर यांचा आज जन्मदिन!

तसे खेबुडकर अस्सल कोल्हापूरच्या मातीतले कवी. कुमार वयातच त्यांनी महात्मा- गांधींवर कविता लिहिली! पुढे शिक्षकी पेशात ते आले. तेंव्हा लोकगीत प्रकारात ते लिहीत गेले. १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांची अशी गीते आकाशवाणीवर प्रसारित होत गेली. सुप्रसिद्ध संगीतकार वसंत पवार यांच्या ऐकण्यात ती आली आणि त्यांनी खेबूडकरांना चित्रपट गीतलेखन करायला बोलावले.

'सवाल माझा ऐका' (१९६४) चित्रपटात अरुण सरनाईक व जयश्री गडकर!
यातील "सोळावं वरीस धोक्याचं.." ही सुलोचना चव्हाण यांनी गायलेली लावणी गाजली!
तो काळ (तमाशाप्रधान) ग्रामीण मराठी चित्रपटाचा होता. साहजिकच खेबूडकरांना प्रथम लावणी लिहायला लागली. राजा ठाकूर यांच्या 'रंगल्या रात्री अशा' (१९६२)  चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली "नांव गांव कशाला पुसता.." ही वसंत पवार यांच्या संगीतात लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी गायली. यानंतर 'वाघ्या मुरळी', सवाल माझा ऐका' (१९६४) सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी अशा धर्तीची फक्कड गीते लिहिली!

'साधी माणसं' (१९६५) चित्रपटात सूर्यकांत आणि जयश्री गडकर!
यानंतर एकदम चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांच्या 'साधी माणसं' (१९६५) या ग्रामीण सामाजिक चित्रपटासाठी खेबूडकरांनी लिहिलेले "ऐरणीच्या देवा तुला.." हे आनंदघन म्हणजेच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी संगीतबद्ध करून गायले. तर 'थांब लक्ष्मी कुंकू लावते' (१९६७) मधील प्रभाकर जोग यांच्या संगीतात लता मंगेशकर यांनी गायलेले त्यांचे "शुभंकरोती कल्याणम्.." हे तर संस्कारक्षम पाठ देणारेच होते! यानंतर कमलाकर तोरणेंच्या 'आम्ही जातो आमुच्या गावा' (१९६८) चित्रपटातील त्यांचे "देहाची तिजोरी.." हे बाबूजी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध करून गायले. त्यांनी लिहिलेली असली भक्तिगीतं सामाजिक नि नैतिकतेचे संदर्भ असणारी होती!

'पिंजरा' (१९७३) तील "ज्वानीच्या आगीची मशाल हाती.." या गीत-नृत्यात संध्या!

यानंतर अनंत मानेंच्या 'एक गाव बार भानगडी' (१९६८) चित्रपटाने खेबुडकर पुन्हा ग्रामीण लोकसंगीताची बाज असलेल्या गीतलेखनाकडे वळले. मग चित्रपती व्ही.शांताराम यांच्या 'पिंजरा' (१९७३) चित्रपटा साठी त्यांनी लिहिलेल्या व राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या अशा (तमाशाप्रधान) गीतांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला! यांतील "ज्वानीच्या आगीची मशाल हाती.." अशा उषा मंगेशकरांनी गायलेल्या गीतांवरील संध्याची नृत्ये नेत्रदीपक होती! पुढे १९७५ मध्ये किरण शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या शहरी माहोलच्या 'झुंज' (१९७५) मधील त्यांचे "कोण होतास तू...कोण होतीस तू.." हे जुगलबंदी गीत गाजले. तर तोरणेंच्या 'ज्योतिबाचा नवस' (१९७५) मधील "ही दुनिया हाय एक जत्रा.." सारखी त्यांची गीतं ग्रामीण बाज घेऊन लोकप्रिय होत होती.

'सुशीला' (१९७८) चित्रपटातील "कुण्या गावाचं आलं पाखरू.." गाण्यात रंजना!

खेबूडकरांनी वेगळ्या धर्तीच्या चित्रपटांसाठी पण गीत लेखन केले. यांत डॉ. जब्बार पटेल यांचा समांतर सिनेमा 'सामना' (१९७५) होता; तर अनंत मानेंचे सामाजिक 'सुशीला' (१९७८) व 'झेड पी' (१९९१) होते!

आपल्या सुवर्ण महोत्सवी चित्रपट कारकिर्दीत जगदीश खेबूडकरांनी सुमारे ३०० मराठी - चित्रपटांसाठी जवळपास अडीच हजार गाणी लिहिली! ह्यांपैकी काही चित्रपट हे राष्ट्रीय व राज्य पातळी वर गौरविले गेले! ते सुद्धा सन्मानित झाले!

मराठी चित्रपटसृष्टीत "नाना" म्हणून संबोधले गेलेल्या खेबूडकरांना ही सुमनांजली!!


- मनोज कुलकर्णी

 

 

"भय इथले संपत नाही.."


कवी ग्रेस यांचे हे शब्द आज कमालीचे.. वास्तवदर्शी वाटतायत!

त्यांस जन्मदिनी आदरांजली!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 9 May 2021

थोर समाज सुधारक एकत्र!!!


कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा 'भारतरत्न' डॉ.बाबासाहेब आंबेडकर!
'रयत शिक्षण संस्थे'द्वारे शिक्षण प्रसाराचे मोठे कार्य करणारे 'पद्मभूषण' कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन!

त्यांचे आपल्या देशाच्या घटनेचे शिल्पकार 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर व समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या समवेत चे हे १९४९ चे दुर्मिळ छायाचित्र!
(विकिपीडिया वर पाहण्यात आले!)

त्यांस विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

गाईचे डोळें (जे सतत वात्सल्याने पाणावलेले असतांत) आणि सशाचे काळीज (जे सदैव काळजीने धडधडत असते) असे आईचे वर्णन साने गुरुजी यांनी केले होते!

मातृदिनी सर्व मातांना वंदन!

- मनोज कुलकर्णी

Sunday 2 May 2021

हवी राष्ट्रीय एकात्मता!


कला-संस्कृतीचा हा महाराष्ट्र असता..
वीर, संत-सुधारकांची ही भूमी असता!

अण्णा, अक्का शब्द इथे रुळता..
कर्नाटकी कशिदा साडीवर काढता!

इडली-वडा, डोस्यावर ताव मारता
आसामच्या चहाची लज्जत घेता!

गुजराती गरबा झोकात खेळता...
पंजाबी खाना-लस्सीचा स्वाद घेता!

ओडिसी नृत्य शैली अनुभवता..
रायचे बंगाली चित्रपट गौरविता!

काश्मीर ते कन्याकुमारी म्हणता
हिमालयाच्या हाकेला सह्याद्री असता!

कशाला मग प्रादेशिक अस्मिता?
जर सर्व एकच भारतीय असता.!
 

 - मनोज 'मानस रूमानी'

Saturday 1 May 2021

मन्नादांचे अलौकिक मराठी गीत!


अष्टपैलू पार्श्वगायक मन्ना डे!

आपल्या भारतीय चित्रपट संगीतातील शास्त्रीय बैठक असलेले अष्टपैलू पार्श्वगायक मन्ना डे यांचा आज जन्मदिन!

'देवकी नंदन गोपाला' (१९७७) मध्ये गाडगेबाबांच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागू.
त्यांच्या बंगाली नि हिंदी चित्रपट गायना वर बरेच लिहिले गेले. पण त्यांनी काही निवडक मराठी गाणी सुद्धा गायली. त्यातल्या एका अर्थपूर्ण गीताची आज आठवण झाली! ते म्हणजे..
गो. नी दांडेकर लिखित साहित्य कृतीवरील राजदत्त दिग्दर्शित चित्रपट 'देवकी नंदन गोपाला' (१९७७) चे शीर्षक गीत..
"गोपाला गोपाला..
देवकीनंदन गोपाला..
सांभाळ ही तुझी लेकरं
पुण्य समजती पापाला.."

ग.दि. माडगूळकरांनी लिहिलेले हे गीत राम कदम यांनी संगीतबद्ध केले होते आणि गाडगे बाबांच्या अमर भूमिकेत..
डॉ. श्रीराम लागू यांनी ते पडद्यावर हृद्य साकार केले!

आजही समकालिन वाटणारे हे गीत!

मन्नादांना सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

ह्या कठीण दिवसांत हे आल्हाददायक!

आमच्या बंगल्यात बहरलेले नारळ आणि आंबा हे वृक्ष!
 
सध्याच्या उदास वातावरणात मन प्रसन्न करण्यासाठी आता केवळ आपल्या घरापासचा परिसरच!

आमच्या बंगल्यातील झाडाचा नारळ!
 
कोरेगांव पार्क येथील आमच्या बंगल्यात नारळ आणि आंबा ह्या वृक्षां- पाशी उभे राहिले की हलणाऱ्या पानांतून येणारी वाऱ्याची झुळूक आल्हाद- दायी वाटते! त्यांवर बसणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट.. आणि कोकिळीची "कुहूs" हे ऐकू आले की रोमांचकच! मग हे वृक्ष सावली बरोबरच त्यांची फळे ही आपल्यापुढे सादर करतांत, तेंव्हा त्यांचं निर्मळ, निर्व्याज प्रेम हेलावून जातं!
आमच्या बंगल्यातील झाडाचे..कैरी नि आंबा!

 
 
मग रोज मिळणाऱ्या ह्या घरच्या नारळाचे (पाणी आदी) व कैरी-आंब्याचे (पन्हे, आमरस आदी) आस्वाद घेणे हे (बाजारा तून आणलेल्यांपेक्षा).. लज्जतदारच!!

- मनोज कुलकर्णी

महाराष्ट्राची एकसष्ठी!


१ मे, १९६० रोजी आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे ह्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण आणि आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत राजभवनात अनावरण होताना!

(हे दुर्मिळ छायाचित्र विकिपीडिया वर पाहण्यात आले!)

आज १ मे, २०२१ ला आपल्या संयुक्त महाराष्ट्राची एकसष्ठी साजरी होतेय असे म्हणायला हवे!
हार्दिक शुभेच्छा!!💐

- मनोज कुलकर्णी