Thursday 8 November 2018

जन्मशताब्दी विशेष:

पु.ल. : अष्टपैलु कलासक्त व्यक्तिमत्व!


'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व'..पु. ल. देशपांडे!


मराठी साहित्य आणि वक्तृत्व, नाट्य, चित्रपट, संगीत अशा सर्व क्षेत्रांत समरसून संचार केलेले मार्मिक नि मिश्किल व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे!..त्यांची जन्मशताब्दी आता सुरु झाली..आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुरु झालेल्या त्यांच्या चित्रपट कारकिर्दीसही सत्तर वर्षे होऊन गेली! तेंव्हा या प्रसंगी त्यावर इथे प्रकाशझोत टाकीत आहे..
"इथेच टाका तंबू.." या 'गुळाचा गणपती' (१९५३) 
मधील गाण्यात पु.ल. देशपांडे!

१९४७ मध्ये मो. ग. रांगणेकर यांच्या 'कुबेर' चित्रपटाद्वारे पु. ल. देशपांडे यांचे रूपेरी पडद्यावर पदार्पण झाले. यांत प्रमुख भूमिकेबरोबरच श्रीधर पार्सेकर यांच्या संगीतात ते गायलेही! त्यानंतर १९४८ मध्ये 'भाग्यरेशा' (१९४८) या शांताराम आठवले दिग्दर्शित चित्रपटात त्या काळातील आघाडीची अभिनेत्री शांता आपटे बरोबर त्यांनी नायक म्हणून भूमिका रंगवली! याच वर्षी राम गबाले यांच्या 
'वंदे मातरम' चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आणि विशेष म्हणजे त्यांच्या बरोबर यात होत्या..पत्नी सुनीताबाई देशपांडे!

१९४९ साली पु. ल. देशपांडे यांनी 'मानाचे पान' चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद..श्रेष्ठ लेखक ग. दि. माडगुळकर यांच्याबरोबर प्रथमच लिहिले आणि 'मोठी माणसे' या चित्रपटाने ते संगीत सुद्धा देऊ लागले! १९५० मध्ये 'जोहार मायबाप' या सामाजिक चित्रपटातील त्यांची भूमिका ही वैशिष्ट्यपूर्ण होती; तर याच वर्षी कथा, पटकथा व संवाद लेखनाबरोबरच 'पुढचे पाऊल' या प्रबोधनपर चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली!
'जोहार मायबाप' (१९५०)  चित्रपटात पु.ल. देशपांडे व सुलोचना!


१९५२ मध्ये तर 'दूध भात' या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखनाबरोबरच गीतेही त्यांनी लिहिली व संगीतही दिले..आणि इथूनच 'सबकुछ पु. ल.' सुरु झाले!  याच वर्षी 'संदेश' या हिंदी चित्रपटसाठी त्यांनी कथा-पटकथा लेखन केले..जे मीर असग़र अली यांनी अनुवादित केले होते! याच सुमारास राम गबाले यांचा बालमनाचा ठाव घेणारा 'देवबाप्पा' हा हृदय चित्रपट आला..ज्याचे लेखन पुलंनी केले होते आणि त्यांच्याच संगीतातील त्यांचे गाजलेले बालगीत "नाच रे मोरा आंब्याच्या वनात.." त्यातील बालनायिका मेधा गुप्तेने लोभसवाणे साकार केले होते!
'गुळाचा गणपती' (१९५३) चित्रपटाच्या पोस्टर मध्ये चित्रा व पु.ल. देशपांडे!

१९५३ मध्ये त्यांचा बहुचर्चित गाजलेला चित्रपट आला 'गुळाचा गणपती' ज्यात पु.ल. सर्वव्यापी होते! एका नाट्यवेड्या भोळ्याभाबड्या माणसाचा समाजकंटक राजकीय फायद्यासाठी कसा वापर करतात असे याचे कथासूत्र होते. ही मध्यवर्ती भूमिका भावभावनांचे अनेक कंगोरे दाखवीत पुलंनी लाजवाब साकारली. यात त्यांच्या बरोबर नायिका म्हणून समरसून काम केले ते त्या काळातील सोज्वळ अभिनेत्री चित्राने! हा चित्रपट..मराठी चित्रपट इतिहासातील एक मानदंड म्हणता येईल!

१९६० मध्ये राम गबाले यांच्या 'फूल और कलियाँ' या हिंदी चित्रपटाचे लेखन ही त्यांनी केले..ज्यास 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटा'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! यानंतर 'आज और कल' (१९६३) या वसंत जोगळेकर यांच्या हिंदी चित्रपटाचे लेखनही त्यांनी केले..ज्यात संवाद अख्तर-उल-इमान यांनी लिहिले होते! यांत सुनिल दत्त, नंदा व अशोक कुमार असे बिनीचे कलावंत होते! यानंतर तीन दशकांनी.. 
'एक होता विदुषक' (१९९३) हा डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट त्यांच्या लेखनावर आला..ज्यात लक्ष्मीकांत बेर्डे ने ती भूमिका अफलातून साकारली! या चित्रपटास राज्य व राष्ट्रीय पुरस्कार लाभले!
पत्नी सुनीताबाईंसमवेत एका प्रसन्न क्षणी पु. ल. देशपांडे!


पु. ल. देशपांडे यांना अनेकविध पुरस्कार मिळाले. त्यांत 'साहित्य अकादमी', 'संगीत नाटक अकादमी' आणि 'महाराष्ट्र भूषण' व केंद्र सरकारचा 'पद्मभूषण' यांचा विशेषत्वाने समावेश होतो!

पु. ल. देशपांडे यांची मिश्किल व्याख्याने व परिसंवादातील मार्मिक भाष्य समोर बसून ऐकल्याचे..आणि त्यांना समारंभातून भेटल्याचे क्षण आज आठवतयत!!

त्यांना ही शब्द-सुमनांजली!!


- मनोज कुलकर्णी
  ['चित्रसृष्टी']

No comments:

Post a Comment