Sunday 31 October 2021

गाणारे व्हायोलिन अंतर्धान पावले!

व्हायोलिन वादक प्रभाकर जोग!

ज्येष्ठ व्हायोलिन वादक व संगीतकार प्रभाकर जोग हे जग सोडून गेल्याचे दुःखद वृत्त कळाले!

गीत ध्वनिमुद्रण प्रसंगी गायिका माणिक वर्मा आणि संगीतकार प्रभाकर जोग!
व्हायोलिन वादनाचा, भाव - संगीतातील अखंड जीवनप्रवास थांबला. "हे चांदणे फुलांनी - शिंपीत रात्र आली.." असताना "घडूनी जे गेले.." ह्या अशा कालेलकरांच्या त्यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतां प्रमाणे!

'सतीची पुण्याई' (१९८०) आणि 'कैवारी' (१९८१) सारखे त्यांनी संगीत दिलेले चित्रपट गाजले. 'चित्रकर्मी', 'गदिमा' व 'लता - मंगेशकर पुरस्कार' त्यांना लाभले!

आता त्यांनी वाजविलेले "धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप." ऐकताना हे 'गाणारे व्हायोलिन' पुनःश्च प्रत्ययास आले!

त्यांस सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Tuesday 12 October 2021

शांता शेळके आणि मजरुह यांच्या काव्यरचनांतील साधर्म्य!

लोकप्रिय मराठी कवयित्री शांताबाई शेळके.

आपल्या लोकप्रिय मराठी कवयित्री शांता शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष आज सुरु झाले!..या प्रसंगी त्यांची एक अमर रचना मला आठवली..
"असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे..
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे..!"

ख्यातनाम उर्दू शायर-गीतकार मजरुह सुल्तानपुरी.

 

तर माझे आवडते ख्यातनाम उर्दू शायर व गीतकार मजरुह सुल्तानपुरी यांचे जन्मशताब्दी वर्ष अलिकडेच झाले!..त्यांची अशीच एक अमर रचना पाहा..
"रहें ना रहें हम महका करेंगे
बन के कली, बन के सबा..
बाग-ए-वफ़ा में.!"

'ममता' (१९६६) या हिंदी चित्रपटासाठी रोशन यांच्या संगीतात लता - मंगेशकर, सुमन कल्याणपुर आणि मोहम्मद रफ़ी यांनी हे हृदयस्पर्शी गीत गायलेय.

मला नेहमी ह्या दोन्ही रचनांत साधर्म्य आढळते!

दोघांनाही आदरांजली!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 3 October 2021

आमचे मराठी चे दिलखुलास प्राध्यापक द.मा.!

लोकप्रिय मराठी साहित्यिक द. मा. मिरासदार!

लोकप्रिय मराठी साहित्यिक व विनोदी कथाकथनकार द. मा. मिरासदार यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. ते महाविद्यालयात आमचे मराठी चे प्राध्यापक होते, त्यामुळे हे वृत्त समजताच मन दुःखी झाले आणि त्या काळात पोहोचले!

पुण्यात 'एमइएस गरवारे महाविद्यालया'त आमचा वर्ग त्यांच्या तासाला फुल्ल भरलेला असे, कारण कॉमर्स च्या रुक्ष विषयां मध्ये तोच एक आल्हाददायक क्षण मिळे. विशेषतः मला भाषा नि लेखनात रुची असल्याने मी तो रसिकतेने अनुभवायचो. माणसांची स्वभाव वैशिष्ट्ये, विशेषतः लहानग्यांचे भावविश्व याचे त्यांचे निरीक्षण बरोब्बर असायचे. यामुळे ते एखादा धडा समजावून सांगताना मधेमधे त्यासंबंधीची उदाहरणे द्यायचे आणि ते ऐकून वर्गात त्यास दुजोरा देण्याचा हशा निर्माण व्हायचा! महाविद्यालयीन काळानंतर सुद्धा जेंव्हा सार्वजनिक कार्यक्रमांत त्यांची गाठ पडे, तेंव्हा लहानग्यांशी त्यांच्याच आविर्भावात त्यांचा असा संवाद चाललेला पाहून ते आठवायचे!
 
विनोदी कथाकथनकार द. मा. मिरासदार!
 
द.मां.नी विपुल विनोदी लेखन केले. 'हसणावळ' आणि 'मिरासदारी' सारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. 'व्यंकूची शिकवणी' सारख्या आपल्या कथांचे खुमासदार सादरीकरण करीत ते लोकप्रिय कथाकथनकार झाले. मराठी चित्रपट कथा-पटकथा-संवाद लेखन क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केली. सुरुवातीच्या काळात 'सहकार सम्राट' (१९८०) सारख्या चित्रपटांचे संवाद लेखन त्यांनी केले. तर पुढे 'एक डाव भुताचा' (१९८२) हा त्यांची कथा-पटकथा असणारा पहिलाच चित्रपट गाजला..त्यानंतर 'ठकास- महाठक' (१९८४) सुद्धा! कालांतराने मी चित्रपट पत्रकारितेत आलो आणि..
त्यांची त्या वर्तुळात भेट झाली, तेंव्हा 'जर्नालिज्म' कोर्स केलेला आपला विद्यार्थी याचे त्यांना अप्रूप वाटले!

'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना' चे १९९८ मध्ये द.मा. अध्यक्ष झाले. 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळा' चा जीवनगौरव पुरस्कार २०१५ मध्ये त्यांना मिळाला.

त्यांची कऱ्हाड येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनातील भेट आठवते. तेंव्हा माझा 'चित्रसृष्टी' विशेषांक त्यांना दिल्यावर त्यांनी कौतुक केले होते!

त्यांस माझी श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी