Thursday 4 October 2018

तडफदार अभिनेते...अरुण सरनाईक!


मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ आपल्या तडफदार अभिनयाने गाजवणारे अरुण सरनाईक यांचा आज ८३वा जन्मदिन!
तरुण तडफदार अरुण सरनाईक!

१९५६ रोजी 'भटाला दिली ओसरी' या मो. ग. रांगणेकरांच्या नाटकाद्वारे अभिनय कारकीर्द सुरु केलेल्या अरुण सरनाईक 
यांनी १९६१ रोजी 'शाहीर परशुराम' या अनंत माने दिग्दर्शित मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले!


पुढे मग दिनकर पाटील यांचा 'वरदक्षिणा' (१९६२) सारखे सामाजिक, मानेंचा 'एक गाव बारा भानगडी' (१९६८), 'गणाने घुंगरू हरवले' (१९७०) सारखे ग्रामीण तर 'घरकुल' (१९७०) सारखे शहरी चित्रपट..यांतील त्यांच्या भूमिका वैशिष्टपूर्ण ठरल्या! गायक घराण्यातून आल्याने त्यांनी काही चित्रपटांतून गाणीही गायली. त्यात शांतारामबापूंच्या 'चंदनाची चोळी अंग अंग जाळी' (१९७५) मधील त्यांचे "एक लाजरा न साजरा मुखडा.." गाणे गाजले!
'मुंबईचा' जावई' (१९७०) चित्रपटात गाताना अरुण सरनाईक व सुरेखा!


त्यांचे अभिनित काही चित्रपट हे विशेष ठरले..त्यातला एक म्हणजे बाबा पाठक यांनी दिग्दर्शित केलेला 'संथ वाहते कृष्णामाई' (१९६७)..पुढे आशुतोष गोवारीकरने केलेल्या 'स्वदेस' (२००४) या हिंदी चित्रपटाचे मूळ तिथेच होते आणि मराठीत अरुण सरनाईक यांनी केलेली इंजिनिअरची भूमिका यात शाहरुख खानने केली! यानंतरचा दुसरा म्हणजे राजा ठाकूर दिग्दर्शित 'मुंबईचा' जावई' (१९७०) हा एकत्र कुटुंब आणि महानगरातील घराची समस्या यावरील चित्रपट..यावर पुढे बासू चटर्जींनी 'पिया का घर' (१९७२) हा हिंदी चित्रपट केला. (अलीकडे आलेला 'डबल सीट' नामक मराठी चित्रपटाचे प्रेरणास्रोतही तोच!)

'सिंहासन' (१९७९) चित्रपटात अरुण सरनाईक!
यांतील तिसरा महत्वाचा चित्रपट म्हणजे डॉ. जब्बार पटेल यांचा 'सिंहासन' (१९७९)..यात अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची साकारलेली व्यक्तिरेखा ही त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोच्च ठरली! पुरस्कारासह त्यावरील चर्चाही गाजल्या..अशाच एका परिसंवादात त्यांनी नमूद केले की 'आपल्या भूमिकेस मिळालेली खरी पावती म्हणजे (तत्कालिन मुख्यमंत्री) वसंतदादा पाटील यांना भेटायला गेल्यावर "या सी. एम..!" म्हणून त्यांनी केलेले स्वागत!'

अरुण सरनाईक यांना भेटण्याची संधी मला मिळाली. त्यात त्यांच्या अभिनयाची तारीफ केल्यावरचे त्यांचे खर्ज्यातील हसणे आजही आठवते!

त्यांस ही आदरांजली.!!

- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी', पुणे)

No comments:

Post a Comment