Thursday 11 August 2022

'ऊन पाऊस'..एक जीवन वास्तव!

सकाळी खिडकीबाहेर पाहता बऱ्याच काळानं अनोखं दृश्य दिसलं..ऊन अन पाऊस पण! आणि आठवला राजा परांजपे यांचा 'ऊन पाऊस' (१९५४) हा संवेदनशील कौटुंबिक चित्रपट!

उतारवयात मुलांकडे (जणू वाटणी होऊन) एकमेकांपासून दूर राहणाऱ्या माता-पित्याचं जिणं हा याचा केंद्रबिंदू! कथा-पटकथा-संवाद हे ग. दि. - माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आले होते. तर, प्रथितयश दिग्दर्शक राजा - परांजपे आणि सुमती गुप्ते यांनी वृद्ध जोडप्याची ही वेदना अत्यंत भावनिकरित्या आपल्या स्वाभाविक (बापूमास्तर व काशीबाई) व्यक्तिरेखांतून पडद्यावर व्यक्त केली होती! स्मृतीपटलावर कायम राहिलेला यातील प्रसंग म्हणजे फोनवरचे ह्या दोघांचे (भावनातिरेकाने अपूर्ण राहिलेले) हृदयाचा ठाव घेणारे संभाषण! छायाचित्रकार बाळ बापट व संकलक बाळ - कोरडे ह्यांनी पण हे दृश्यानुसंधान अधिक परिणामकारक साधले होते! "या कातरवेळी पाहिजेस तू जवळी.." सारखी यातील गदिमा-सुधीर फडकेंची गाणी पण अविस्मरणीय!

'बी. आर. फिल्म्स' चा रवि चोप्रा दिग्दर्शित 'बागबान' (२००३) हा हिंदी चित्रपट 'ऊन पाऊस' वरच आधारित होता आणि अमिताभ बच्चन व हेमा मालिनी ह्यांनी आपल्या परीने ते जोडपे पडद्यावर रंगवले! पुढे 'ए बंधना' (२००७) हा कन्नड चित्रपट ही त्यावर निघाला आणि विष्णुवर्धन व जयाप्रदा ह्यांनी त्या भूमिका रंगवल्या!


आपल्या पडद्यावर आलेले जीवनाचे असे वास्तव कायम लक्षात राहणारे नि सतर्क करणारे!!

- मनोज कुलकर्णी