Saturday 18 May 2019

चित्रपट आणि समीक्षा..गांभीर्यपूर्वक व्हावे!


'सिनेमा' हे सर्व कला नि विषयांचा समावेश असणारे अतिशय प्रभावी सर्वसमावेशक (मुख्यतः दृश्य) माध्यम आहे. 
फक्त इन्स्टिटयूट मध्ये शिकून अभिनय, दिग्दर्शन अशा त्या संबंधित कला आत्मसात होतात असे नाही..त्यासाठी अंगभूत गुण व प्रतिभा असावी लागते..आणि मुख्यत्वे दर्शकांशी संवाद साधणारी प्रतिसृष्टी पडद्यावर आणण्याची व्यापक दृष्टी असावी लागते!

यामध्ये फिल्म इन्स्टिट्यूट्सना नावे ठेवण्याचा कुठलाही उद्देश नाही. मी स्वतः तिथे 'फिल्म आप्रिसिएशन कोर्स
२५ वर्षांपूर्वी केला आहे; पण त्याच्या ६ वर्षे आधीपासून मी जागतिक सिनेमा पाहून त्यावर अभ्यासपूर्ण लिहीत आलो होतो..आणि मुख्य म्हणजे लहानपणापासून सिनेमा या माध्यमाबाबत असणारी कमालीची जिज्ञासा!

अभिनयसम्राट दिलीप कुमार आणि प्रतिभासंपन्न चित्रपटकर्ते गुरुदत्त हे काही कुठल्या इंस्टीट्युटमध्ये शिकले नव्हते; पण त्यांची उच्च अभिनय आणि दिग्दर्शन कला आज संबंधित इंस्टीट्यूट्स मधून शिकली जाते! त्यामुळे इंस्टीट्यूट्स मध्ये कोर्सेस केले म्हणजे आपण मोठे आर्टिस्ट वा डायरेक्टर झालो अशा 'बन चुके' थाटात राहू नये..मोठे केस मागे बांधून नि जीन-कुर्ता घालून सिगारेट शिलगावीत मोठ्या निर्मितीचा आव आणणे हे अखेर फोल ठरते! उगाच कशाचा कशाला 'गंध' नाही..'वळू' वळल्यासारखे चित्रपटाचे तंत्र आपल्या मर्जीनुसार कसेही वापरून चालत नाही!..ते अत्यंत जबाबदारीने नि परिपक्वपणे हाताळायला हवेय!

आणखी एक महत्वाचे नमूद करायचे म्हणजे..'चित्रपट समीक्षा' ही चित्रपटाच्या गुणात्मक वृद्धीत योगदान देऊ शकते.. पण तशी अभ्यासपूर्ण समीक्षा अगदी अभावानेच दिसते..बाकी सर्व चित्रपटाच्या आर्थिक व्यवसायास साहाय्य करणारे असते!

'कासवा'च्या गतीने वा कुवतीने का होईना आता वैश्विक स्तरावर चित्रपट उभा राहण्याची काळजी घ्या!
असो!..शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी
   ('चित्रसृष्टी')