Sunday 4 October 2020

अजून पुराण-इतिहासात!

गेले काही महिने दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पौराणिक मालिकांचा अंमल आहे आणि गेली काही वर्षे मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपटांचे जणू पेव फुटलेय!

 
बुवांच्या प्रवचनांचा भास व्हावा असा पुराण महिमा आणि लहानपणीचे चौथीतील पुस्तक जणू चलचित्रांद्वारे पडद्यावर येतेय असे वाटण्यासारखे इतिहास दर्शन!..इतके हे ठाशीव, एकांगी (वा एकरंगी) म्हणावे असे! सध्याचे राजकीय वातावरणही यास पोषक आहे.

पाहणाऱ्यांवर याचा चांगला परिणाम किती होत असेल माहित नाही; पण यातल्या (काही अनिष्ट) तेढ निर्माण होणाऱ्या गोष्टी मात्र ते डोक्यांत घेतांत याचा प्रत्यय येतो. काय ते ऐतिहासिक चित्रपटांतील मत्सरी संवाद नि ती भडक दृश्ये! समुदायांतील सौहार्दता यांमुळे बिघडेल हे ध्यानांत घेऊन, सामाजिक सलोखा अबाधित राहण्याच्या दृष्टीने संबंधितांनी खबरदारी घ्यावी!

वास्तविक पाहता वर्तमान परिस्थितीत इतक्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत..त्याकडे ह्या मालिका-चित्रपट वाल्यांचे लक्ष कसे जात नाही याचे नवल वाटते! जनसामान्यांना किती समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना जगण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतोय. हे सामाजिक वास्तव पडद्यावर आणावे असे का नाही वाटत यांना?

सर्वपरिचित बाळबोध रंजन किती करत बसणार अन पुराण-इतिहास तरी तथ्यांसह समोर येऊ शकतो का?..त्यापेक्षा समकालिन वास्तवदर्शी चित्रपट सादर करुन संवेदनशीलता व कलाकारांस असणारी सामाजिक बांधिलकी तरी दर्शवावी!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment