Friday 23 October 2020

विशेष लेख:

रूपगुणसंपन्न पण दुर्दैवी अभिनेत्री..रंजना!

लोभस सौन्दर्यवती रंजना!

१९८० च्या दशकात मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर लोभस सौन्दर्य नि बहारदार अभिनय असणारी सुपरस्टार होती..रंजना! माझी त्या काळातील आवडती अभिनेत्री!

'झुंज' (१९७७) चित्रपटात रंजना!

 

प्रसिद्ध अभिनेत्री संध्या ही रंजनाची मावशी! तिच्या बरोबर आई वत्सला देखमुख सुद्धा चित्रपटात काम करायची. स्वाभाविकपणे बालवयातच रंजना पडद्यावर चमकली. १९६३ चा तो हिंदी चित्रपट होता 'हरिश्चंद्र तारामती'! त्यानंतर ख्यातनाम चित्रकर्ते व्ही. शांताराम यांनी १९६६ मध्ये हिंदी-मराठी दोन्ही भाषेत निर्मिलेल्या 'लडकी संह्याद्री की' चित्रपटात तिने छोटी भूमिका रंगवली. याची नायिका तिची मावशी संध्या होती. तिची आई सुद्धा यात होती, पण आपल्या मुलीने या क्षेत्रात येऊ नये असा त्यांचा कटाक्ष होता! त्यामुळे शिक्षणावर लक्ष केंद्रित करून रंजनाने 'रुईया महाविद्यालयातून 'तत्वज्ञान व साहित्य' यामध्ये पदवी संपादन केली!

'चानी' (१९७७) चित्रपटात रुपेरी केस नि गौर कांतीची रंजना!

अखेर शांतारामबापूंमुळेच १९७५ मध्ये 'चंदनाची चोळी अंग अंग जाळी' या मावशी संध्या ची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाद्वारे तिने या क्षेत्रात प्रवेश केला. पुढे १९७७ मध्ये त्यांचा पुत्र किरण शांताराम दिग्दर्शक झाल्यावर आपल्या 'झुंज' चित्रपटात त्याने रंजनास नायिका म्हणून सादर केले. आधुनिक वळणाच्या या चित्रपटात तिचा नायक होता रविंद्र महाजनी! यातील तरुण वर्गास उद्देशून असणारे गाणे "कोण होतास तू काय झालास तू.." गाजले! याच वर्षी 'असला नवरा नको गं बाई' मध्ये ग्रामीण ढंगातील राजा गोसावी बरोबर तिने काम केले!

'सुशीला' (१९७८) चित्रपटात शिक्षिकेच्या भूमिकेत रंजना!
या दरम्यान रंजनाच्या वेगळ्या आकर्षक रूपाचे दर्शन घडले ते व्ही. शांताराम यांच्या 'चानी' चित्रपटातून. चि.त्र्यं.खानोलकर यांच्या कथेवरील या चित्रपटात भारतीय मराठी स्त्री व इंग्रज अधिकारी यांच्या मिलापातून जन्माला आलेल्या नि तत्कालीन समाजाने नाकारलेल्या मुलीची आगळीवेगळी भूमिका तिने छान साकारली! त्यानंतर १९७८ मध्ये अनंत माने यांच्या 'सुशीला' चित्रपटात शिक्षिकेची अत्याचाराने झालेली वाताहत दर्शवणारी आव्हानात्मक भूमिका तिने वठवली. पूर्वार्धात ज्ञानार्जनाचे कार्य करणारी सुसंस्कृत आणि उत्तरार्धात परिस्थितीमुळे वाममार्गास लागलेली बेदरकार अशा दोन टोकाच्या व्यक्तिरेखा तिने यात बेमालूमपणे रंगवल्या!

'अरे संसार संसार' (१९८०) चित्रपटात रंजना व कुलदीप पवार!

१९८० च्या सुमारास संवेदशील चित्रकर्ते राजदत्त यांच्या 'अरे संसार संसार' चित्रपटात रंजनाची अभिनयाचा कस लावणारी महत्वपूर्ण भूमिका होती. ह्यातील "काळ्या मातीत मातीत तिफन चालते.." हे विठ्ठल वाघ यांचे गीत आणि त्यांत नायक असलेल्या कुलदीप पवार बरोबर शेत नांगरणारी तिची कर्तबगार स्त्री प्रभावी होती. तसेच यात पुढे वृद्धावस्थेत मुलांचे संसार सावरण्यापर्यंत असणारी तिची व्यापक भूमिका हृदयास भिडली! यासाठी तिला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' चा राज्य पुरस्कार मिळाला! यानंतर दत्ताजींच्या 'मुंबईचा फौजदार' ह्या हलक्या फुलक्या चित्रपटात रवींद्र महाजनी बरोबरची तिची भूमिका तशी खुमासदार होती.

'गोंधळात गोंधळ' (१९८१) चित्रपटात रंजना व अशोक सराफ!
हरहुन्नरी अशोक सराफ बरोबर रंजनाची पडद्यावर जोडी जमली. १९८१ मध्ये आलेल्या व्ही. के. नाईक यांच्या 'गोंधळात गोंधळ' या हिट चित्रपटात तिचं त्याला "ओ पॅन्टवालं s" म्हणून हाक मारणं काही वेगळच होतं! पुढे नाईकांचाच 'खिचडी', सतीश रणदिवे यांचा 'बहुरूपी' (१९८३), मुरलीधर कापडी यांचा 'बिनकामाचा नवरा' (१९८४) सारख्या चित्रपटांतून त्यांनी पडदा गाजवला! ते वास्तव जीवनात एकत्र येणार होते!

'सुशीला' (१९७८) चित्रपटात दुसऱ्या बेदरकार भूमिकेत रंजना!

अण्णासाहेब देऊळगावकर यांचा 'सासुरवाशीण' (१९७८) व जी. जी. भोसले यांचा 'लक्ष्मीची पाऊले' (१९८२) असे कौटुंबिक चित्रपट एकीकडे; तर दुसरीकडे कापडी यांचा 'भुजंग' (१९८२) अन वसंत पेंटरांचा 'जखमी वाघीण' (१९८४) असे सामाजिक चित्रपट तिच्या वैशिष्ठपूर्ण भूमिकेने लक्ष वेधत असत. सुशिक्षित, सालस, संवेदनशील बरोबरच अल्लड, बंडखोर भूमिका ही ती खुबीने रंगवीत असे! 'सुशीला' मध्ये एकीकडे "सत्यम शिवम सुंदरा.." अशी वर्गात प्रार्थना घेणारी शिक्षिका आणि यातच नंतर तमाशा फडावर "कुन्या गावाचं आलं पाखरू?.." गाण्यातील अवखळ फक्कड..अशा परस्पर विरोधी भूमिकांत रंजनाने भरलेले अनोखे रंग लाजवाब होते! तिचे असे चित्रपट तुफान गाजले!

अखेर 'फक्त एकदाच' नाटकात रंजना!
मात्र हे सर्व नियतीला पाहवले नाही की काय कोण जाणे! व्ही. शांताराम यांच्या 'झंजार' (१९८७) च्या चित्रीकरणासाठी बंगलोरला जाताना गाडीचा अपघात होऊन रंजनास अपंगत्व आले. यातून उभारी घेऊन १९९३ च्या सुमारास तिने व्हील चेअर वर बसून 'फक्त एकदाच' या नाटकात भूमिका साकारली आणि याचे ३८ प्रयोग यशस्वी केले! शेवटी तिचा जगण्याचा संघर्ष ३ मार्च, २००० रोजी थांबला!

रंजनास मी प्रथम पाहिले-भेटलो तेंव्हा चित्रपट पत्रकारितेत यायचो होतो. पुण्यात 'विजय टॉकीज' मध्ये 'गोंधळात गोंधळ' चित्रपटाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा प्रसिद्ध अभिनेता शशी कपूर च्या उपस्थितीत झाला आणि त्यास मी गेलो होतो..आणि तिथे तिला प्रथम पाहिले. मला आठवते तेंव्हा ती शेजारी बसलेल्या अशोक सराफ ला सांगत होती की 'शशी कपूर ला जाऊन नमस्कार कर!'

चित्रपट पत्रकारितेत आल्यावर रंजनाची भेट झाली. पुण्यात 'फक्त एकदाच' या तिच्या नाटकाचा तो प्रयोग..प्रियकराने कठीण प्रसंगी साथ सोडलेल्या स्त्रीची व्यथा त्यात तिने (स्वाभाविकपणे) व्यक्त केली. त्या प्रयोगानंतर मी तिला भेटायला स्टेजवर गेलो..तर पडदा पडूनही ती त्या भूमिकेत अत्यंत भावुक होऊन बसली होती! मी पुढे गेलो आणि नमस्कार करीत त्या मनस्थितीत तिच्याशी दोन शब्द बोललो "हृदय हेलावलं रंजनाजी!" तिचे डोळे पाणावले होते..आमच्या हातांचे भावनिक स्पर्श झाले!

रंजनाला जाऊन आता वीस वर्षे झाली!..पण अजूनही तिची ती शेवटची भेट आठवली की मला गहिवरून येते!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment