Wednesday 7 October 2020

'धाकटी बहीण' (१९७०) चित्रपटातील या प्रेमगीतात लोभस सौन्दर्यवती अनुपमा.
"धुंदी कळ्यांना..धुंदी फुलांना..
शब्दरूप आले मुक्या भावनांना."


अल्हाददायक वाऱ्याच्या झुळकीबरोबर हे प्रेमगीत कानावर आले आणि मन 
हळुवार प्रणयी भावना साकारणाऱ्या मराठी 
चित्रपटांच्या काळात गेले!
माझ्या मोजक्या आवडत्या मराठी प्रेमगीतांपैकी हे एक!


या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त!
जगदीश खेबुडकर या सिद्धहस्त गीतकाराच्या लेखणीतून उतरलेले हे गीत सुधीर फडके यांनी आपल्या नेहमीच्या धाटणीत संगीतबद्ध करून आशा भोसलेंबरोबर गायले आहे. 'धाकटी बहीण' (१९७०) या कौटुंबिक चित्रपटातील हे गीत, पण त्यातील प्रेमी युगुलावर चित्रित झालेले!


याचे दिग्दर्शक राजदत्त असल्याने निसर्ग सान्निध्यात रममाण प्रेमिकांवर त्यांनी चित्रित केले आहे. या आधी 'मधुचंद्र' (१९६७) ह्या त्यांच्या दिग्दर्शनातील पहिल्या चित्रपटापासून दत्ताजींची ही खासियत! त्यात पण काशिनाथ घाणेकर आणि उमा ह्या प्रेमिकांवर त्यांनीं "सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गझले.." हे प्रेमगीत असेच निसर्गाच्या कुशित चित्रित केले होते. ते ही माझे आवडते!

याचे गीतकार जगदीश खेबुडकर!

अभिनेता अरुण सरनाईक आणि लोभस सौन्दर्य असणारी अभिनेत्री अनुपमा वर "धुंदी कळ्यांना." चित्रित झाले!

'धर्मकन्या', 'घरची राणी' व 'आधार' सारख्या अगदी मोजक्या चित्रपटांतून भूमिका रंगवलेली ही देखणी नटी लवकर विवाहबद्ध होऊन, चित्रपटाकडे पाठ फिरवून अमेरिकेत स्थायिक झाली!

आता पन्नास वर्षांचा कालावधी या गीतास लोटला आहे..पण त्यातील प्रेमभावना आणि अनुपमा आजही हृदयाचा ठाव घेते!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment