Wednesday 7 October 2020

भाषा..एक विचारमंथन!


'कालिदास यांचे उत्कट संस्कृत प्रेमकाव्य' ते 'उर्दू भाषेची अन्य भाषांच्या तुलनेत प्रेमकाव्यातील प्रभावी उत्कटता' यावर मी लिहिले. आता एकूणच आपण संचार करीत असलेल्या प्रमुख भाषांवर थोडक्यात मुद्देसूद भाष्य करतोय!

मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या त्या तीनही भाषांमध्ये काही त्रुटी आणि व्यक्त होण्याच्या मर्यादाही आहेत. मराठी मध्ये आता अन्य (म्हणजे फ़ारसी, इंग्रजी व कानड़ी सुद्धा) शब्द इतके रूढ़ झालेत की त्यांसाठी मूळ मराठी शब्द शोधावे लागतील आणि सापडले तरी ते वापरले जातीलच असे नाही; किंबहुना ते हास्यास्पद ठरतील! तर हिंदी मध्ये सरलेल्या दिवसाला 'कल' आणि येणाऱ्या दिवसालाही 'कल' हाच शब्द वापरला जातो. तर अगदी शुद्ध हिंदी शब्द हे बऱ्याच अंशी संस्कृतकडूनच आलेले आहेत..उदा. प्रायः! इंग्रजी बाबत बोलायचे तर 'आदरार्थी बहुवचन' त्यात नाही. मान्यवर व्यक्तीस 'ही', 'शी' संबोधले जाते आणि कुत्रा, मांजर यांनाही! या तुलनेत 'अदब' हा मुळातच उर्दू भाषेचा स्थायीभाव आहे आणि त्यानुसार 'आप' ह्याच शब्दाने त्यांत संवाद सुरु होतो!

आता साहित्य निर्मितीबाबत नमूद करायचे तर 'करुण रस' हा मराठी गद्यामध्ये अधिक दिसून येतो आणि त्या तुलनेत दर्जेदार श्रृंगार रस अल्प प्रमाणात आढळतो. 'विडंबन' हा काव्य प्रकार इथे पार दिग्गजांनी सुरु केला, म्हणजे एखाद्याच्या साहित्याची टर उडवणेच; तर विनोदी साहित्य सुद्धा बऱ्याच अंशी या भाषेतील म्हणीप्रमाणेच 'टवाळा आवडे विनोद'! हिंदीत अलंकारिक शब्दरचना फारश्या न आढळता 'आम' भाषा आढळते; पण त्यांतही प्रांताप्रमाणे (उ.प्र., म.प्र. व बिहार) बदलत जाणाऱ्या बोली भाषेचे प्रतिनिधित्व फारसे आढळत नाही, तर (साचेबद्ध) विशुद्ध हिंदी दिसते! इंग्रजी तर (साहित्यनिर्मितीपेक्षा) जास्त करुन वसाहतवादासाठीची व्यवसायाभिमुख असल्यासारखी वाटते. वाइल्ड सारखे दिग्गजही याद्वारे आपले तत्वज्ञन मांडताना आपले ठोकताळे बिंबवताना जाणवतात!

नाट्यासारख्या अन्य साहित्य प्रकारात सुद्धा मराठीत ('लाडक्या व्यक्तिमत्वां'सकट अन्यही दिग्गज नावाजलेल्यांनी) अन्य कृतींवर आधारित वा अनुवादित केलेले दिसते! तर हिंदीत जननाट्य स्वरुपात हा प्रकार प्रत्यक्ष लोकांत जाऊन केलेला आढळतो! इंग्रजीत शेक्सपिअर सारखे नाट्यदिग्गज मानतो, पण त्यांच्या साहित्य प्रकारात 'सत्तेसाठी कुरघोड़ी, संधिसाधू व्यक्तिरेखा व प्रेमाच्या शोकांतिका' अधिक दिसतात. त्यांच्या रोमियोने जिथे जूलिएट तीच पूर्व दिशा व तिला सूर्य संबोधले! (म्हणजे इथे पुन्हा आम्ही म्हणू ती पूर्व दिशा हा इंग्रजी बाणा होताच असे म्हंटले तर वावगे ठरू नये!) वास्तविक ते मला भावले! तर अस्सल फ़ारसी वा उर्दू नाट्याविष्कार हे आपल्या बोलपटांस पूरक ठरल्याचे दिसते!

आता पुनःश्च 'उत्कट प्रेमकाव्य प्रकारा' बाबत असे की, मराठीत ते तेवढे तरल श्रृंगारिक आढळत नाही; तर हिंदीत त्यानुसार फारसा अलंकारिक फुलोरा नसल्याने (उर्दू शब्दांची मधे पाखरण नसेल तर) सरधोपट व्यक्त झालेले वाटते! इंग्रजी मध्ये अगदी वर्डस्वर्थ सारखे दिग्गज रोमॅंटिक कवी झाले, पण त्यांचे आविष्कार हे सर्वसामान्यांच्या भावनांपर्यंत किती पोहोचले असतील शंका आहे. प्रेमिकेसाठी शेक्सपिअरने सूर्याची उपमा दिली. या तुलनेत उर्दूतील प्रणयाराधनेत प्रेमिकेस नेहमी चंद्राची (शीतल सौंदर्याची) उपमा दिलेली आढळते..आणि रूमानी शायरांनी तिला "दुनिया-ए-हुस्न-ओ-इश्क़ का शबाब' संबोधले!

एकूण ह्या भाषांच्या बाबत असे वाटते की, कुणी 'रांगड़ी भाषा' संबोधल्याने, तर कुणी राजकीय फायद्यासाठी 'अस्मिता' केल्याने मराठीत (नकळत) माज आणला गेला. तर तिच्या संवर्धनासाठी मागे एका संस्थेने "शिव्याही द्या पण मराठीत!" असे घोषवाक्यही पुढे केले. यातून कुठल्या दर्ज्याचा विचार ते कळते! त्यांना असे का नाही वाटले लिहावे "दोन शब्द प्रेमाचे बोला पण मराठीत!" तर हिंदीला 'बम्बैय्या टपोरी' बोलीने खराब केले. तरी हिंदी सिनेमाने तारलेय! इंग्रजीत मुळातच एक कोरडेपणा नि परकेपणा जाणवतो. तरीही त्यात बोलले-लिहिले म्हणजे 'उच्छभ्रू' असा भ्रम झाल्याने (वसाहतवादी इंग्रज गेले तरी) ती आपले अवास्तव 'स्टेटस' राखुन आहे. मग काही 'अहंकारी लेखक' बोजड इंग्रजी शब्द वापरत, आंतरराष्ट्रीय लेखक होण्याची धडपड करीत बसतात!

शेवटी काय आहे की..जी भाषा भावते वा आपल्या प्रकृतीला पूरक वाटते..त्यात व्यक्त होणे आपल्याला आवडते! मला मातृभाषा मराठी बाबत आदर आहे आणि तिची भाषा भगिनी हिंदीचा सुद्धा! पण माझ्या रूमानी मिज़ाज नुसार व्यक्त होण्यासाठी माझी पसंती 'उर्दू' असते! (रोमॅंटिक 'फ्रेंच' ही मला आवडते!)..राष्ट्रभाषा हिंदीचा उर्दूशी मिलाप करुन मी लिहित असतो!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment