Wednesday 7 October 2020

एक्सक्लुजिव्ह लेख!!


'स्टुडिओ सिस्टीम'..शिस्त व जिव्हाळा!

पुणे येथे सुप्रसिद्ध 'प्रभात फिल्म कंपनी' ची उभारणी होत असताना!

बदलत्या काळानुसार 'स्टुडिओ सिस्टिम' इतिहास जमा झाली! चित्रपट विस्तारत गेला आणि तो इनडोअरच्या सेट्स द्वारे उभारलेल्या कृत्रिम दृश्य निर्मितीतून बाहेर आला.. आवश्यक असणारी सृष्टी मधील प्रत्यक्ष दृश्ये चित्रित करण्यासाठी आऊटडोअर चित्रण होऊ लागले!


कलकत्त्ता येथील नामांकित 'न्यू थिएटर्स' स्टुडिओ.
या ओघात पूर्वी स्टुडिओत सेवेत असणारे दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ आपली प्रतिभा विस्तारण्यासाठी बाहेर पडले आणि 'फ्रीलान्स वर्किंग' ची पद्धती आली! हे बदल प्रगतीकडे नेण्यासाठी आवश्यक होते; 
पण 'स्टुडिओ सिस्टिम' च्या संस्कारांस जणू तिलांजली देणारे ठरले! चित्रपट कलेचे पूजक स्टुडिओस जणू मंदिर मानायचे आणि समर्पित भावनेने काम करायचे. निर्माते व दिग्दर्शकां प्रति आदरभावना ठेवून असायचे. (अर्थात तो काळ आणि चित्रकर्ते तसे होते!) यासंदर्भात चित्रपट क्षेत्रांतील काही जुन्या व्यक्तींकडून मला माहिती मिळत गेली.

भालजी पेंढारकर यांचा कोल्हापूरचा प्रसिद्ध 'जयप्रभा स्टुडिओ'!
पुण्यात जिथे 'एफटीआयआय' आहे तिथे पूर्वी आपली सुप्रसिद्ध 'प्रभात फिल्म कंपनी' होती. तिचे एक अध्वर्यु व नामवंत कला-दिग्दर्शक शेख फत्तेलाल यांचे पुत्र आणि चित्रकर्ते बाबासाहेब फत्तेलाल ह्यांच्याशी एकदा बोलताना त्यांनी वडिलांच्या काळातील 'प्रभात'च्या आठवणी सांगितल्या. 'फत्तेलाल साहेब चित्रपटासाठी हुबेबूब सेट्स उभारित. 'माणूस' ची चाळ असो वा 'शेजारी' चा धरणाचा बांध! विदेशी तंत्रज्ञ ते बघायला खास येत!' असे नमूद करुन ते म्हणाले "त्या काळात 'प्रभात' च्या मालकांचा इतका आदरयुक्त दरारा होता की, कामाची वेळ संपली तरी मालक गेल्या शिवाय नोकर मंडळी गेट बाहेर पडत नसत. तेंव्हा व्हायचे असे की दामले साहेब आणि फत्तेलाल साहेब गेट बाहेर यायचे, पण पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या कामाच्या नियोजनाबद्दल बराच वेळ तिथेच बोलत बसायचे. तेंव्हा नोकरमंडळी गेटपाशी ताटकळत उभी राहायची. मग (समोरच राहत असलेले) मालक रस्ता क्रॉस करुन गेले की सर्व बाहेर पडायचे!" हे ऐकून मी भरावलो होतो!

राज कपूर चा मुंबई मधील 'आरके स्टुडिओ'!

तसेच भालजी पेंढारकर यांनी आपल्या 'वाल्मिकी' (१९४६) चित्रपटात काम केल्याबद्दल पृथ्वीराज कपूर यांना मुंबईतली त्यांची काही जमीन बहाल केली नि पुढे त्यावर राज कपूर ने आपला 'आरके स्टुडिओ' उभारला!' त्यासंदर्भात एक आठवण चित्रपट इतिहासकार स्नेही इसाक मुजावर यांनी नमूद केली होती की..'बऱ्याच वर्षांनी राज कपूर जेंव्हा आपल्या सत्कारानिमित्त कोल्हापुरात आला होता, तेंव्हा "मामा" भालजींना भेटण्यासाठी त्यांच्या 'जयप्रभा स्टुडिओ' त गेला.
त्या दुपारच्या वेळी ते झोपले होते. तेंव्हा त्यांची देखभाल करणारा नोकर म्हणाला की "बाबा झोपलेत आणि त्यांना उठवता येणार नाही!" मग त्यांची भेट न होता राज कपूर परतला! ही निष्ठा होती. बाबांच्या कडक शिस्तित तयार झालेले दिग्गज कलाकार सुद्धा त्यांच्या कलेशी समर्पित आठवणी सांगत!

हिमांशु राय यांच्या 'बॉम्बे टॉकीज'चा बोर्ड!
पूर्वी माझे मुंबईत चित्रीकरणे, मुलाखती आदींसाठी विविध स्टुडिओज मधून जाणे होई. असाच एकदा 'आरके स्टुडिओ'चा फेरफटका मारताना मला तेथील जुन्या मंडळींनी तिथे निर्माण झालेल्या चित्रकृतींची माहिती दिली. त्यात 'आवारा' चे स्वप्नदृयातील नर्गिसच्या "घर आया मेरा परदेसी.." गाण्याच्या व 'श्री ४२०' मधील "प्यार हुआ इकरार हुआ.." ह्यां गाण्याच्या पाऊलखुणा आढळल्या! 'बॉबी' मध्ये ऋषि-डिंपल ने वापरलेली बाइकही एके ठिकाणी होती! 

कलकत्त्ता येथील नामांकित 'न्यू थिएटर्स' ने उत्कृष्ट सामाजिक चित्रपट दिले.मागे ज्येष्ठ स्नेही किणीकरांनी मला सांगितले होते की, ते जेंव्हा बी. एन. सरकार यांची मुलाखत घ्यायला तिथे गेले तेंव्हा आधी त्यांनी 'न्यू थिएटर्स'च्या भूमीला नमस्कार केला!

पुणे येथे 'प्रभात फिल्म स्टुडिओ' च्या जागी उभी राहिलेली 'फ़िल्म इन्स्टिटयूट'!
'बॉम्बे टॉकीज' बाबत तर एक हृदय गोष्ट सांगायची आहे. त्याच्या मालकीण देविका राणी यांच्याबरोबरच अशोक कुमार, दिलीप कुमार व मधुबाला असे प्रसिद्ध कलाकार घडविणारी ही संस्था..मालक हिमांशु राय गेल्यावर डबघाईला आली. तेंव्हा कंपनीला वाचविण्यासाठी तेथील कामगारांनी 'बॉम्बे टॉकीज वर्कर्स इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह - सोसायटी लि.' स्थापन करुन, त्याद्वारे 'बादबान' (१९५४) ह्या चित्रपटाची निर्मिती केली. फणि मजुमदार यांनी तो दिग्दर्शित केला आणि देव आनंद व मीना कुमारी सारख्या कलाकारांनी त्यात काम केले. ह्याला म्हणतात जिव्हाळा!

आता 'सध्याच्या परिस्थितीमुळे भविष्यातला चित्रपट वेगळा असेल' असे सुतोवाच सुधीर मिश्रा सारख्या दिग्दर्शकांनी केले आहे. काय सांगावे, बाह्य चित्रीकरणास मर्यादा आल्यास पुन्हा स्टुडिओत चित्रपट निर्मिती व्हायला लागेल!..एकूणच चित्रपटाची परिभाषा बदलून, त्याचे प्रदर्शनही काही अनोखे असेल!!
 
- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment