Saturday 3 October 2020

आठवणीतला गणेशोत्सव!


"तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती.."

स्नेहल भाटकरांच्या संगीतात सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या ह्या गदिमांच्या गीताचे स्वर अगदी पहाटे कानावर येत आणि त्या झुंजूमुंजू वातावरणात जाग येई!

तेंव्हा आम्ही पुण्यात अगदी सदाशिव पेठेत राहायचो आणि नागनाथ पारा जवळ आमच्या गल्लीत होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवात हे वाजे! मग दिवसभर मंगेशकरांचे "गणराज रंगी नाचतो.." सारखी गाणी दुमदुमायची. तर रात्री 'शोले' च्या "मेहबूबा.." ने आरडी अन त्यावरचा नाच फॉर्म में!

लहानपणी आम्हीही (त्या भागात आता एकमेव राहिलेल्या) आपटे वाड्यात सार्वजनिक गणपती बसवायचो. धार्मिकतेपेक्षा हा मुख्यतः सामूहिक आनंदोत्सवाचा भाग असायचा. मोठे एकत्र कुटुंब असलेल्या आमच्या घरीही दहा दिवस गणपती असे. आमचे आजोबा पूजाअर्चा करायचे. वडील आणि घरचे सर्व हौसेने सजावट करायचे. आमची आई गौरी बसवायची आणि सगळे दिवस गोडधोड, मोदक यांची रेलचेल असायची!

आम्ही मुले मात्र बाहेर सार्वजनिक गणेशोत्सवाचा देखावा, सजावट यात अधिक रमायचो. संध्याकाळी वाड्यात सामूहिक आरती व्हायची आणि रोज एका घरची खिरापत यायची. या दहा दिवसांत आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचो. त्यांत काही स्तुत्य उपक्रम असायचे! नाट्य-गायन-नृत्य अशा अंगभुत गुंणांचे दर्शन यांतून घडायचे. आता हा मराठी चित्रपट दिग्दर्शक झालेला उमेश कुलकर्णी चे आजोळ (ढोल्ये आचारी) याच वाड्यात होते. यांत त्याने स्त्रीवेषात केलेल्या गमती अजून मला स्मरतात!

गणपती पाहायला जाणे हा पुण्यातला ह्यां दिवसातला ठरलेला कार्यक्रम असे. ह्यासाठी लांबचे नातेवाईक यायचे. लोक रात्री जागून त्या गर्दीत झगमगाटीचा आनंद घ्यायचे. पण मी कधी त्यांत इंटरेस्ट घ्यायचो नाही. मला लहानपणापासून सिनेमाची आवड असल्याने ह्यां दिवसांत वाड्यांत व्हिडीओ वर मस्त क्लासिक हिंदी पिक्चर्स आणून दोस्त मंडळी बरोबर पाहायचो! उत्सव समारोपात वाड्यात एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम होई. त्यांत सर्व घरांतील खास पदार्थ यायचे आणि अंगणात मोठी पंगत बसून त्यांचा सामूहिक आस्वाद घेतला जायचा!

कालांतराने लग्न नि आपापले वेगळे संसार झालेले काका-आत्या त्यांच्या कुटुंबांसह आमचे मोठे घर असल्याने शेवटच्या दिवशी आमच्या घरी जमत (ही परंपरा अजून चालू आहे). आमच्या वडिलांना सर्वांना जमवून उत्सव साजरा करायची फार हौस! घरची मोठी माऊली म्हणून आमची आई सर्वांचे मायेने करे (आणि अजूनही करते). सर्वांचे एकत्र जेवण होई.

अखेर मग मिरवणुकीने वाजत-गाजत-नाचत सार्वजनिक नि घरच्या गणपतीचे विसर्जन होई. आमच्या 'भावे हायस्कुल' मध्येही हा उत्सव साजरा होई. येथल्या व बाजूच्या 'ज्ञान प्रबोधिनी' च्या ढोल-लेझिम पथकात पण आम्ही हौसेने सामील व्हायचो!

लहानपणी काही प्रश्न माझ्या मनात यायचे, म्हणजे इवलुशा उंदरावर मोठा गणपती कसा बसत असेल, चंद्र त्यांस खरंच हसला असेल का, मग चतुर्थीला चंद्र दर्शनच कसे लागते..ते अगदी त्या हत्तीचे असे का झाले इथपर्यंत! अद्याप हे अनुत्तरित आहेत!

आता पंचवीस वर्षांहून अधिक काळ लोटलाय आम्ही इकडे कोरेगाव पार्क येथील आमच्या प्रशस्त वास्तूत राहायला येऊन! इथल्या कॉस्मोपॉलिटन वातावरणात हे उत्सव त्या सारखे दिसून येत नाहीत आणि काळ ही आता बदललाय! मलाही असल्या धार्मिक कार्यक्रमांत स्वारस्य राहिलेले नाही!

तेंव्हाचा गणेशोत्सव आणि आताचा यावर काही बोद्धिक घेत बसणार नाही. पण इतकेच नमूद करावेसे वाटते की पैशाची वारेमाप उधळपट्टी, प्रदूषण, अनिष्ट गोष्टींचा अंतर्भाव अन भलतीकडे वाहवत गेलेल्या या सार्वजनिक महोत्सवावर गंभीरपणे विचार व्हावा!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment