Friday 17 April 2020

'मनोरंजन' चे अण्णा कुलकर्णी..मराठी नाट्यसृष्टीचा आधारवड!


'मनोरंजन' पुणे या संस्थेचे संस्थापक आणि मराठी नाट्य व्यवसायाचे एका अर्थी तारणहार मनोहर कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने ९२ व्या वर्षी काल निधन झाले!

माझे स्नेही व आता त्या संस्थेची धुरा सांभाळणारे मोहन कुलकर्णी यांचे ते वडील! "अण्णा" म्हणून ते नाट्यव्यवसाया - तील त्यांच्या वर्तुळात संबोधले जायचे! नाट्यसृष्टीचा ते चालता-बोलता इतिहास तर होतेच; पण त्याचबरोबर त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी 'भावबंधन', 'अश्रूंची झाली फुले' यांसारख्या काही नाटकांतून भूमिकाही रंगवल्या होत्या. तर 'सूर्य पाहिलेला माणूस' या त्यांनी निर्मित केलेल्या नाट्यकृतीस पुरस्कार मिळाले! 


तसा त्यांच्याशी माझा परिचय जुना होता. 'मनोरंजन' संस्थेचे कार्यालय जेंव्हा पुण्यात 'विजय टॉकीज' च्या तळाशी होते तेंव्हापासून! त्यावेळी माझ्या लेखनासाठी मराठी चित्रपट कलाकारांचे रंगभूमीवरील कामाचे काही फोटोज घेण्यासाठी मी त्यांच्याकडे जात असे. तेव्हा चांगल्या सहकार्याबरोबरच पूरक माहितीही ते देत असत..अगदी पडद्यामागीलही!

पुढे नाटकाबरोबर चित्रपट प्रसिद्धी व्यवसायातही 'मनोरंजन' ने प्रवेश केला. याचे निमित्त झाले भावे-सुकथनकरचा 'दोघी' हा (रेणुका दफ्तरदार व सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका असलेला) चित्रपट! १९९६ मध्ये दिल्ली ला झालेल्या आपल्या 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (इफ्फी) तील 'इंडियन पॅनोरमा'त तो चित्रपट मी पाहिला होता. पण असे चित्रपट थिएटर मध्ये येणे अवघड असते. त्यावेळी मोहन कुलकर्णींना याबाबत मी सुचवले..आणि पुढे ('एनएफडीसी' द्वारे) तो पुण्यात प्रदर्शित होण्यासाठी त्याची प्रसिद्धी त्यांनी सांभाळली! नंतर आमचा स्नेह वृद्धिंगत होत गेला. दरम्यान 'मनोरंजन' च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यासही मी उपस्थित होतो!

पुढे २००२ ला माझा 'चित्रसृष्टी' विशेषांक सुरु झाला..त्यास पुरस्कार मिळाले. त्याचे ते कौतुक करीत! दरम्यान त्यांच्या 'मनोरंजन' चे कार्यालय वर 'विजय टॉकीज' पाशीच आले. त्यानंतर मग तिथे जाणे होई आणि..नव्या मराठी चित्रपट व्यवसायाबद्दल मोहन कुलकर्णींशी चर्चाही! त्यावेळी आत बसलेल्या अण्णांना नमस्कार केल्याशिवाय मी परतलो नाही!

'नाट्य परिषदे'च्या पुणे शाखेचे अण्णा अध्यक्ष होते. तर 'पुणे महानगरपालिके' तर्फे 'बालगंधर्व पुरस्कार' देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता!

त्यांस श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment