Monday 4 February 2019

चित्रपटविषयक साहित्य उपेक्षितच!


'९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' नुकतेच पार पडले! मात्र एक खंत व्यक्त करावीशी वाटते की..चित्रपट विषयक साहित्यास अद्यापही साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर कधी स्थान मिळालेले नाही..किंबहुना ते अभिजात साहित्यात गणले जात नाही!

याबाबत पूर्वीपासून (गदिमांसारख्यांकडूनही) नाराजी व्यक्त होत आली आहे. वास्तविक पाहता किती तरी (वि.स. खांडेकर, पु.भा. भावे, साने गुरुजी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे ते आनंद यादव सारख्यांचे) अभिजात साहित्य हे मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आले आहे..आणि काही साहित्यिकांचे साहित्य (पुस्तक, कादंबरी) हे त्यावरील चित्रपट लोकप्रिय झाल्यावर जास्त वाचले गेले आहे.

लिखित साहित्य लोकप्रिय करण्यात चित्रपट माध्यमाचे योगदान हे केवळ मराठी पुरतेच मर्यादित नाही; तर अन्य प्रादेशिक व परदेशी भाषांतील साहित्याबाबतही हे होत आले आहे..यांत प्रेमचंदजींचे हिंदी 'गोदान', शरतचंद्र चट्टोपाध्याय यांचे बंगाली 'देवदास' ते मार्गारेट मिशेल यांचे इंग्लिश 'गॉन विथ द विंड', गुस्तोव्ह फ्लुबर्ट यांचे फ्रेंच 'मादाम बोव्हारी' व लिओ टोलस्टोय यांचे रशियन 'ऍना कॅरेनिना' सारखे अभिजात साहित्य उदाहरणादाखल देता येईल! 


या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी 'साहित्य ते चित्रपट' सारख्या परिसंवादासारखे काही कार्यक्रम, याबाबतची समीक्षा व लेखन याबाबतचे विचारमंथन आगामी काळात होणे अपेक्षित आहे...तूर्त शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment