Saturday 2 March 2019

इसाक मुजावर..भारतीय चित्रपटाचा चालता-बोलता इतिहास!

चित्रपट इतिहासतज्ञ, समीक्षक व चित्रपट विषयक नियतकालिकांचे संपादक इसाक मुजावर यांना जाऊन आता चार वर्षे होऊन गेली!

मराठी चित्रपट पत्रकारितेतील इसाक मुजावर हे शिखरावर असलेले, प्रमाण मानले गेलेले नाव! भारतीय चित्रपटाचा चालता बोलता इतिहास असे त्यांस संबोधले जायचे! १९५५ साली सुरु झालेली त्यांची चित्रपट पत्रकारिता 'तारका', 'रसरंग'चे कार्यकारी संपादक ते स्वतःचे 'चित्रानंद' व नंतर अनेक दैनिके, नियतकालिकांतून फुलत गेली! चित्रपट विषयक लेखनातील त्यांचा शब्द हा शेवटचा मानला जायचा..पुढे त्यांची तीसेक पुस्तकेही प्रसिद्ध झाली! चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांच्या लेखनात स्वाभाविकपणे अनौपचारिकपणा असायचा!

अभ्यासपूर्ण चित्रपट विषयक लेखन करणाऱ्या आम्हा चित्रपट पत्रकारांचे इसाक मुजावर हे एक प्रेरणास्रोत होते! त्यांच्या 'चित्रानंद' मध्ये लेखन होऊ शकले नाही, कारण मी चित्रपट पत्रकारितेत आलो १९८३ मध्ये..(१९९५ नंतर 'रसरंग' मध्ये लिखाण झाले पण ते तिथे नसताना) पुढे मात्र माझ्या स्वतःच्या 'चित्रसृष्टी' दिवाळी अंकासाठी त्यांचा लेख घेण्याचा योग आला! मला आठवतेय २००२ च्या आसपास मी मुंबईत कांदिवलीच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटलो होतो; तेंव्हा मी स्वतःचे चित्रपट विषयक नियतकालिक सुरु केल्याचे त्यांना कौतुक वाटले!

त्यावेळी त्यांच्याशी झालेला मनमोकळा संवाद आठवतोय. त्या सुमारास भन्साळीचा नवा 'देवदास' प्रदर्शित झाला होता. त्यावर मार्मिक टिपणी करताना ते म्हणाले होते ''करायला गेला 'देवदास' अन झाला 'पाकीझा'!'' आमच्यासाठी दिलीपकुमारचा 'देवदास' हा मानदंड होता! पुढे त्यांच्याशी दिलखुलास गप्पा व्हायच्या आणि आपल्या खास टिपणीवर तेच टाळीसाठी हात पुढे करायचे! 'रागिणी' चित्रपटात नायक किशोरकुमारला मोहम्मद रफींच्या आवाजात "मन मोरा बावरा.." आळवताना पाहिल्याचा विषय निघाला, तेंव्हा ते म्हणाले होते ''आधी ती भूमिका भारत भूषण करणार होता म्हणून रफींच्या आवाजात ते गाणं आधीच रेकॉर्ड झाल होतं!'' असे चित्रपट इतिहासाचे अनेक दाखले त्यांच्याकडे होते..अशोककुमारनी दिलीपकुमारला काय सल्ला दिला..वगैरे. त्यामुळे त्यांची गप्पांची मैफल कधी संपू नये वाटे!

माझ्या 'चित्रसृष्टी' दिवाळी अंक, २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेला 'ट्रैजिडी किंग, एंटी हीरो ते एंग्री यंग मैन' हा त्यांचा कदाचित शेवटचा लेख असावा! याबाबतही एक हृद्य आठवण अशी आहे की मी हा विषय त्यांना दिल्यावर त्यांनी 'चित्रसृष्टी' साठी मला लेख तर दिलाच, पण नंतर विस्ताराने त्यावर पुस्तकही लिहिले 'मास्टर विठ्ठल ते अमिताभ' आणि त्याच्या प्रास्ताविक मनोगतात शेवटच्या दोन परिच्छेदांत माझा उल्लेख करून श्रेयही दिले! ते वाचून अक्षरशः भरून आले! मीही 'चित्रसृष्टी'च्या त्या दिवाळी अंकात मला मिळालेल्या त्यांच्या प्रोत्साहनाचा आवर्जून उल्लेख केला!

त्यांचा 'चित्रभूषण' सन्मानाने यथोचित सत्कार झाला होता. तसे त्यांना अन्य संबंधित पुरस्कारही मिळाले!

चित्रपट इतिहासाची ती रसिली मैफल आता पोरकी झालीये!!

 त्यांस भावांजली!!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment