Saturday 16 February 2019

हमारी याद आएंगी..!

तडफदार अभिनेता रमेश भाटकर!
मराठी नाट्य-चित्रपट व मालिका यांतील हरहुन्नरी कलावंत रमेश भाटकर यांच्या निधनाची बातमी चटका लावून गेली!

 'अश्रुंची झाली फुले' या गाजलेल्या नाटकात प्रभाकर पणशीकरांबरोबर रमेश भाटकर!
अभिनयाच्या सुरुवातीच्या काळातच रंगभूमीवर गाजलेल्या 'अश्रुंची झाली फुले' मध्ये प्रभाकर पणशीकरांसारख्या खंदया अभिनेत्यासमोर रमेश भाटकर चा बेदरकार लाल्या तुफान दाद घेऊन जायचा! 

'हृदयस्पर्शी' चित्रपटात निशिगंधा वाड आणि रमेश भाटकर!
१९७७ च्या सुमारास त्याने 'चांदोबा चांदोबा भागलास का?' चित्रपटाद्वारे मराठी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर 'दुनिया 
करी सलाम' व 'आपली माणसं' सारख्या चित्रपटांतून विविध प्रकारच्या भूमिका रंगविल्या. कालांतराने (अलका कुबल बरोबरील) 'युगंधरा' आणि 'कमांडर', 'हॅलो इन्स्पेक्टर' सारख्या मालिकांतून त्याने 
छोट्या पडद्यावर उत्तम भूमिका केल्या!

सुमारे ९० (मराठी-हिंदी सह) चित्रपटांतून रमेश भाटकर यांनी काम केले. अखेरच्या काळात त्यास काही संस्थांचे जीवनगौरव पुरस्कार घेताना पाहताना कसेसच झाले होते; कारण असा ज्येष्ठत्वाचा लवलेशही त्याच्याकड़े नव्हता..हे त्याच्या बरोबर मराठी चित्रपटांच्या पार्टीत बसलेल्या आम्हा सिने पत्रकारांनी अनुभवलेय. रुबाबात धुंदित वावरणारे ते कलासक्त नि रसिक व्यक्तिमत्व होते!
वडिल प्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकारांसमवेत 
अभिनेता-पुत्र रमेश भाटकर!

एकदा मैफलित..त्याचे वडिल (दिवंगत) प्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकारांच्या अभिजात गीतांचा विषय निघाला..तेंव्हा मी 'फ़रियाद' (१९६४) मधले "वो देखो देख रहा था पपीहा.." सारखी गाणी खुद्द त्याच्या वडिलांकडून अनौपचारिक भेटीत ऐकल्याचे' सांगताच तो भारावला होता!

'जागतिक कर्करोग दिनी' त्याच आजाराने त्यास हे जग सोडावे लागणे ह्यास काय म्हणावे?

अशा प्रसंगी एका मैफलित त्याने ऐकवलेले स्नेहल भाटकरांचेच अजरामर गीत आठवते...

"कभी तनहाइयों में यूँ हमारी याद आएगी..."

त्यांस भावांजली!!!

- मनोज कुलकर्णी
  ('चित्रसृष्टी')

No comments:

Post a Comment