Thursday 21 February 2019

'मानिनी'..जयश्री गडकर!

मराठी चित्रतारका जयश्री गडकर यांच्या दोन काळांतील प्रतिमा!
मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील तारका जयश्री गडकर यांचा आज ७७ वा जन्मदिन!

'सांगत्ये ऐका' (१९५९) मध्ये जयश्री गडकर व सूर्यकांत!
आपल्या अदाकारीने रुपेरी पडदा गाजवणाऱ्या ह्या अभिनेत्रीची कारकीर्द नृत्यकुशल बालकलाकार म्हणून सुरु झाली..आणि १९५५ मध्ये शांताराम बापूंच्या 'झनक झनक पायल बाजे' या संध्या नायिका असणाऱ्या हिंदी चित्रपटात ती प्रथम नर्तिकांमध्ये दिसली! त्यानंतर लेखक-दिग्दशर्क दिनकर द. पाटील यांच्या 'दिसतं तसं नसतं' मध्ये राजा गोसावींबरोबर तिने लहान भूमिका केली...आणि १९५९ मध्ये तिला स्टार करणारा तूफान हिट चित्रपट आला..अनंत माने यांचा 'सांगत्ये ऐका'!
'मानिनी' (१९६१) मध्ये जयश्री गडकर!

तसे पाहता हंसा वाडकर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या 'सांगत्ये ऐका' तमाशापटात "बुगडी माझी सांडली गं.." या हिट गाण्यावर दिलखेच नृत्य करणाऱ्या जयश्री गडकरने प्रेक्षकांना जिंकले! मग एकीकडे 'अवघाची संसार' (१९६०) सारखे शहरी तर दुसरीकडे 'मोहित्यांची मंजुळा' (१९६३) सारखे ऐतिहासिक नि 'एक गाव बारा भानगडी' (१९६८) सारखे ग्रामीण व 'महासती सावित्री' (१९७३) सारखे पौराणिक..असे यशस्वी चित्रपट करीत ती आघाडीची अभिनेत्री झाली!
'साधी माणसं' (१९६५) मध्ये सूर्यकांत व जयश्री गडकर!

या दरम्यान अनंत माने यांचा पं. महादेवशास्त्री जोशींच्या कथेवरील 'मानिनी' (१९६१) आणि बाबा..भालजी पेंढारकरांचा सूर्यकांत यांच्या बरोबरील 'साधी माणसं' (१९६५) ह्या दोन महत्वपूर्ण सामाजिक चित्रपटांतून जयश्री गडकर ने  अभिनयाचा कस लावणाऱ्या व्यक्तिरेखा स्वाभाविकपणे साकारल्या..त्यांसाठी 'उत्कृष्ठ अभिनेत्री'चे पुरस्कारही तिला  मिळाले!


'सारंगा' (१९६१) या हिंदी चित्रपटात जयश्री गडकर!
याच काळात जयश्री गडकर ने 'मदारी' (१९५९) व 'सारंगा' (१९६१) सारख्या काही हिंदी चित्रपटांतूनही सुंदर भूमिका रंगवल्या. यांतील गाणीही गाजली! पुढे दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरही रामानंद सागर याच्या 'रामायण' (१९८६) या भव्य पौराणिक मालिकेत त्या कौशल्या होऊन अवतरल्या..तर यात दशरथाची भूमिका केली होती त्यांचे अभिनेता-पति बाळ धुरी यांनी!

सुमारे २५० मराठी व हिंदी चित्रपटांतून 

जयश्री गडकर यांनी कामे केली. पुढे 
निर्मिती-दिग्दर्शनही केले. 
'अशी मी जयश्री' हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले! 

त्यांच्या निर्मितीतील चित्रपटाच्या प्रीमिअर वेळी झालेली अनौपचारीक चर्चा आठवते.. आणि त्यातून त्यांनी 'मानिनी'ची वास्तवातही कायम ठेवलेली प्रतिमाही!


अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी
   ('चित्रसृष्टी')

No comments:

Post a Comment