Monday 8 July 2019

भाषावाद..निरर्थक नि संकुचित!


वर्षापूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीवर हिंदी-मराठी संदर्भात वादविवादाचा कार्यक्रम पाहण्यात आला (यात सहभागीचे मराठीही सदोष होते!)..आणि राष्ट्रीय एकात्मता साधायची सोडून अजूनही असे आंतरभाषीय किंबहुना आंतरप्रान्तीय वाद (क्षमविण्याऐवजी) कसे निर्माण केले जातात याचे वैषम्य वाटले होते. हिंदीचा असा दुस्वास करायला नकोय!

वास्तविक विविध भाषा-संस्कृतींने समृद्ध अशा आपल्या देशात..सर्वच भाषा नि संस्कृती आपल्या आहेत या भावनेतून सर्वांबाबत आत्मीयता नि आदराची भावना असली पाहीजे! त्याहूनही पुढे म्हणजे 'वसुधैव कुटुंबकम्' या आपल्या तत्वज्ञानाने विश्वव्यापी बंधुत्वाची भावना जोपासायला हवी. भाषा-साहित्य व कलांच्या क्षेत्रांत जिथे जिथे जे जे चांगले आहे ते आत्मसात करायला हवे!

इंग्लिश बाबतही असा (न्युनगंडातून आलेला) तिटकारा अधुन मधून उफाळून येतो..(यामध्ये मग काही मराठी मुद्रित/इलेक्ट्रॉनिक माध्यमेही हीरीरीने पुढे येतात. पाहायला गेले तर अशा काही माध्यमांच्या नावांत इंग्रजी अक्षरे दिसतात!) वास्तविक जागतिक संवादाचे हे भाषामाध्यम असेल तर ते का स्वीकारू नये?..त्या सहाय्याने पुढच्या पिढीने का पुढे जाऊ नये? इंग्रजी माध्यमातुन शिक्षणापासून परावृत्त करणाऱ्या अशा काही नेते मंडळींची मुले मात्र इंग्रजी माध्यमात शिकून परदेशी गेलेली असतात!

या संदर्भात काही वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालिन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी पुण्यात झालेल्या ७५व्या मराठी साहित्य सम्मेलनात केलेले खरमरीत भाष्य मला आठवतेय..त्यावेळी बोलताना ते व्यासपीठावरील फलक पाहून मान्यवरांस म्हणाले "काय हो, हे '७५वे अमृतमहोत्सवी सम्मेलन' असे लिहायची 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'त गरज का भासते? अमृतमहोत्सवी म्हणजेच ७५वे ना..मग दोन्ही कशाला नमूद करायचे? फक्त अमृतमहोत्सवी पुरेसे होते!" त्यांचे हे समर्पक बोल ऐकून श्रोत्यांमध्ये हास्याची लाट उसळली आणि व्यासपीठावरील चेहरे पडलेले होते!

तेंव्हा भाषेचा वृथा अभिमान बाळगण्यापेक्षा, भाषा वृद्धीचे कार्य दुसऱ्या भाषांचा दुस्वास न करता व्हावे..आणि कुणाला कुठल्या भाषेत लिहायला-बोलायला आवडेल हे जे ते आपल्या इच्छेने ठरवतील. उदाहरणार्थ मला हिंदी-उर्दू भाषेत लिहायला-बोलायला आवडते आणि इंग्लिश मध्ये लिहिणेही आवश्यक वाटते..याचा अर्थ मातृभाषा मराठी बाबत मला आस्था नाही असा होत नाही!

अभिव्यक्ति स्वातंत्र्य घेऊन माझी मते इथे मोकळेपणाने मी व्यक्त केली आहेत!!

- मनोज कुलकर्णी
   ['चित्रसृष्टी']

No comments:

Post a Comment