Sunday 29 April 2018

विशेष लेख:


सुवर्णमहोत्सवी सौंदर्यवर्षा!

(गोवन ब्यूटीची गोल्डन ज्युबिली!)



- मनोज कुलकर्णी



सुंदर चेहऱ्यातील नीळसर छटा असणाऱ्या पिंगट डोळ्यांत रोमॅंटिक भाव घेऊन ती षोडशा १९८२ मध्ये 'ब्रह्मचारी' नाटकाद्वारे स्वच्छंदी फुलपाखरी भूमिकेत मराठी रंगभूमीवर अवतरली..आणि 'जवाँ दिलां'ची धड़कन बनली.. ती 'गोवन ब्यूटी' म्हणजे वर्षा उसगांवकर! तिने त्या नाटकात तीच किशोरी ललना रंगवली जी १९३८ मध्ये मास्टर विनायक यांच्या 'ब्रह्मचारी' चित्रपटात गोव्याच्याच मिनाक्षी शिरोडकर यांनी 'त्या काळात' बिनधास्त साकारली होती!
'ब्रह्मचारी' नाटकातून प्रशांत दामले बरोबर वर्षा उसगांवकरची प्रेटी एंट्री!
'गंमत जंमत' ने रूपेरी पडद्यावर गोवन ब्यूटी..वर्षा उसगांवकर!

गोव्यात रंगभूमीवर नैपुण्य प्राप्त करीत असताना वर्षा उसगांवकरने औरंगाबाद येथे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या कड़े नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले ते प्रशांत दामले बरोबर 'ब्रह्मचारी' नाटकाने! ह्याच्या तूफान यशानंतर ती थेट मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर "मी आले.." अशी साद देत आली..१९८७ चा सचिन पिळगावकरचा 'गंमत जम्मत' हा तो चित्रपट! तिने याद्वारे मराठी नायिकेस खऱ्या अर्थाने ग्लॅमर दिले!

त्यानंतर 'रेशीमगाठी' सारख्या तिच्या चित्रपटांची लिहिलेली परीक्षणे नि तिची रसिकांमध्ये वाढती लोकप्रियता हे सर्व मला आठवतंय..यांत मग नितीश भारद्वाज बरोबर 'पसंत आहे मुलगी' (१९८९) सारखे साजेसे चित्रपट करताना त्यांची बहुचर्चित ठरलेली 'केमिस्ट्री' सुद्धा!
नितीश भारद्वाज बरोबर वर्षा उसगांवकरची रोमॅंटिक केमिस्ट्री!

याच काळात दूरदर्शनवर रवि चोप्रा यांच्या 'महाभारत' (१९८८) या भव्य मालिकेत वर्षा उसगावकर उत्तरा म्हणून अवतरली; तर १९९० मध्ये दूरचित्रवाणीच्या पडद्यावर महत्वाच्या भूमिकेत ती आली..'झाँसी की रानी'! पुढे १९९४ ला नीरजा गुलेरी च्या 'चंद्रकांता' मालिकेत तिची नावाला साजेशी व्यक्तिरेखा होती...रूपमती!
बॉलीवुड च्या 'हनिमून' (१९९२) मध्ये वर्षा उसगांवकर व ऋषी कपूर!

१९९० च्या सुमारास वर्षा उसगावकरने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यांत मिथुन चक्रवर्ती बरोबरील 'शिकारी' नंतर महेश भट्टचा 'साथी' (१९९१) हा खऱ्या अर्थाने तिचा मोठे यश मिळवलेला हिंदी चित्रपट होता..आदित्य पांचोली आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खान यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात तिला गाणीही चांगली मिळाली! यानंतर 'हनिमून' (१९९२) चित्रपटात तर ऋषी कपूर ची ती नायिका झाली. त्रिकोणीय प्रेमकथा असणाऱ्या या चित्रपटात आणखी एक मराठी अभिनेत्री तिच्या समोर आली ती म्हणजे..अश्विनी भावे!
'सवत माझी लाडकी' (१९९३) मध्ये नीना कुलकर्णी आणि वर्षा उसगांवकर!

यानंतर मराठी चित्रपटांतून तिला स्मिता तळवलकरच्या 'सवत माझी लाडकी' (१९९३) सारख्या वेगळ्या आणि संजय सूरकरच्या 'यज्ञ' (१९९४) सारख्या आव्हानात्मक भूमिका मिळाल्या..असे चाकोरीबाह्य चित्रपट करीत अभिनयाचे गहिरे रंग ती दर्शवीत गेली. तिला उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकेही मिळाली!
सौंदर्यवती वर्षा उसगांवकरची नृत्यमुद्रा!

मग २००० च्या सुमारास..'चौदवी का चाँद' सारख्या अभिजात हिंदी चित्रपटांस संगीत देणारे श्री. रवि यांचे पुत्र अजय शर्मा यांच्याशी वर्षा उसगावकरचा विवाह झाला..याची निमंत्रण पत्रिका मला रविसाहेबांकडून खास आली होती!

यानंतरही हिंदी चित्रपटांतून ती वेगळ्या भूमिका करीत गेली. यांत एन. चंद्रा च्या 'स्टाईल' (२००१) मध्ये ती इन्स्पेक्टर होती; तर केतन मेहताच्या 'मंगल पांडे' (२००५) या आमिर खान ची भूमिका असणाऱ्या चित्रपटात तिने राणी लक्ष्मीबाईंची भूमिका रंगवली! पुढे 'कंगना' (२०१६) या राजस्थानी चित्रपटातही तिने काम केले!

२०१६ च्याच सुमारास 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'च्या कार्यकारिणीत रुपगुणसंपन्न वर्षा उसगावकर निवडून आल्याने त्या कार्यात चैतन्य येईल याबाबत मी लिहिले होते!
वर्षा उसगांवकरने भूमिका रंगवलेला गोव्याचा कोकणी भाषेतील चित्रपट..'जावोंय नंबर वन'!

मूळची गोव्याची नि मातृभाषा कोकणी असणारी वर्षा उसगांवकर त्या प्रादेशिक चित्रपटांतून मात्र दिसली नव्हती! मात्र चांगली गात असल्याने तिचा कोकणी अल्बम 'रूप तुजेम लयता..' प्रसिद्ध झाला होता..(तिचे कोकणी व हिंदी चित्रपट गीते गाणे मी रूबरू अनुभवले होते!)..


आणि आता तिने भूमिका रंगवलेला गोव्याचा कोकणी भाषेतील चित्रपट अखेर आला..'जावोंय नंबर वन'!

नुकताच तिच्या सुंदर जीवनाचा सुवर्णमहोत्सव संपन्न झाला आहे. यामुळेच या लेखाचे प्रयोजन होते!

ही सौंदर्यवर्षा अशीच रसिकांवर बरसत राहो यासाठी हार्दिक शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment